घरफिचर्स‘ऑनलाईन’मुळे अभिजात कला ऑफलाईन !

‘ऑनलाईन’मुळे अभिजात कला ऑफलाईन !

Subscribe

आज १५ ते २५ वयोगटातील मुले स्मार्टफोनच्या आहारी गेलेली दिसतायत. तर २५ ते ३५ वयोगटातील व्यक्ती आपल्या कामाच्या वेळातून उरलेला जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनवर असतात. पूर्वीच्या लोकांना साहित्य, कला किंवा वाचनाचा आस्वाद मिळाल्यामुळे डोक्याला एकप्रकारची किक मिळायची. आता या किकची टुल्स बदलली आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, टिक टॉक, पब्जीसारख्या माध्यमांवर पडीक असलेल्या आजच्या तरुणाईला त्यातूनच किक मिळतेय. या ऑनलाईन साधनांमुळे अभिजात कला ऑफलाईन होताना दिसत आहेत. अर्थात, यालाही सकारात्मक बाजू आहे.

अठराव्या शतकात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली. विसाव्या शतकापर्यंत जगभरात त्याचा प्रसार झाला. जगभरात त्याचे इष्ट आणि अनिष्ट परिणाम दिसून आले. औद्योगिक क्रांतीमुळे विकास झालाच, पण दुसर्‍या बाजूला भारतासारख्या देशातील अनेक प्राचीन कला, हस्तोद्योग लयास गेले. औद्योगिक क्रांतीने जशी प्रगती साधली, तशी काही लोकांसाठी ती अधोगती. तसंच एकविसावं शतक हे आयटी क्षेत्राच्या प्रगतीसाठी ओळखलं जातंय. प्रत्येक वर्षागणिक आयटी क्षेत्र आपल्यासमोर काहीतरी नवं दालन खुलं करतंय. आयटी आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्र हातात हात घालून एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचलंय. त्याला जोड मिळाली इंटरनेटची. आज जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. चार ते सहा इंच असलेल्या या स्मार्टफोनमध्ये आज काय नाहीये? आजचा स्मार्टफोन हा फक्त संवादापुरता मर्यादित उरलेला नाहीये. तो आता जगण्याचा भाग बनलाय. प्रत्येक माणूस स्मार्टफोनसोबत ऑनलाईन झालाय. मग तुम्हाला या लेखाच्या शीर्षकाबाबत प्रश्न पडू शकतो. यामुळं अभिजात कला ऑफलाईन कशी काय होतेय?

या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याआधी पु.ल. देशपांडे यांचे एक गाजलेलं वाक्य उदृत करतो. पुल म्हणाले होते, “उपजिविकेसाठी आवश्यक असणार्‍या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल”. पुलंनी जेव्हा हे वाक्य म्हटलं असेल तेव्हा फार फार तर टेलिफोन, पेजर, संगणकावर इंटरनेट सुरू झालेलं असेल. पण त्यांना स्मार्टफोन नावाचा भस्मासूर येईल आणि भविष्यकाळात सर्वच कला एका हाताच्या बोटावर आणून ठेवेल, हे कुणाला माहीत होतं.

- Advertisement -

स्मार्टफोन आज नुसता आयुष्याचा भाग नाही, तर तो शरीराशी जोडला नसलेला एक अवयव झालाय. शरीरातील इतर अवयवांना आपला मेंदू ‘कंट्रोल’ करतो. पण स्मार्टफोन आता मेंदूलाही ‘कंट्रोल’ करण्यापर्यंत पोहोचलाय. तुम्ही विश्वास ठेवा वा नका ठेवू. पण स्मार्टफोनने वाचन, नाटक, कला आणि क्रीडा संस्कृतीवर मोठा घाला घातलाय. आज १५ ते २५ वयोगटातील मुले स्मार्टफोनच्या आहारी गेलेली दिसतायत. तर २५ ते ३५ वयोगटातील व्यक्ती आपल्या कामाच्या वेळातून उरलेल्या जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनवर असतात. पूर्वीच्या लोकांना साहित्य, कला किंवा वाचनाचा आस्वाद मिळाल्यामुळे डोक्याला एकप्रकारची किक मिळायची. आता या किकची टुल्स बदलली आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, टिक टॉक, पब्जी सारख्या माध्यमांवर पडीक असलेल्या आजच्या तरुणाईला त्यातूनच किक मिळतेय.

औद्यागिक क्रांतीचे जसे इष्ट-अनिष्ट परिणाम झालेत. तसेच आयटी-इंटरनेट आणि स्मार्टफोननेही अनेक इष्ट आणि अनिष्ट परिणाम घडले आहेत. आपण ते नकारात्मक दृष्टीने घेतो की सकारात्मक हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. स्मार्टफोन चहुबाजूंनी आपल्या आयुष्याचा ताबा घेतोय. त्यामुळे त्याच्या वापरावर आता विचार करण्याची वेळ आली आहे. साहित्य-कला-क्रीडा हा भारतीय संस्कृतीचा पाया मानला जातो. या पायावर या स्मार्टफोनमुळे काय परिणाम झालेत, हे आपण पाहुयात.

- Advertisement -

साहित्य – वाचन

स्मार्टफोनने लोकांचे वाचन खूप कमी केलंय. फेसबुक, ट्विटर आणि इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याला हवा तसा कटेंट वाचायला मिळतोय. त्यामुळं पुस्तकं वाचण्याचा कल कमी झालाय. पुस्तकं विकत घेऊन किंवा वाचनालयातून पुस्तकं आणून वाचणार्‍यांमध्ये एका विशिष्ट वयाची माणसं जास्त दिसतात. भारत हा तरूणांचा देश असल्याचं म्हटलं जातं, पण भारतातील तरुणाई पुस्तकांपासून दूर होत चाललेली दिसतेय. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरीक्त इतर साहित्याकडे तरुणांची उदासीनता दिसून येतेय.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल नेटवर्किंग साईटवरील मर्यादित शब्दांच्या पोस्ट वाचण्याची सवय झालेल्या तरुणपिढीला आता पुस्तकं किंवा वर्तमानपत्रातील लांबलचक लेख वाचण्याचा कंटाळा येतो. तर स्मार्टफोनवरदेखील स्क्रोलेबल असलेला कटेंट फारसा वाचला जात नाही. उदाहरणार्थ, आपल्या मोबाइल स्क्रिनवर दिसतोय तेवढाच कटेंट एकावेळी वाचला जातो. जर स्मार्टफोनधारकाला मोबाईलवर स्क्रोल करावं लागत असेल तर तो कटेंट न वाचता पुढे निघून जातो. एकूनच काय? तर लोकांचा एकाग्रतेचा वेळ (Attention Time) कमी झालाय. काही सेकंदात जर इंटरेस्टिंग गोष्ट वाचायला, पहायला मिळत असेल तर व्यक्ती तिथे रुळतो. नाहीतर पुढे निघून जातो. आजघडीला जर ही अवस्था असेल तर येणार्‍या काळात साहित्य निर्मिती, साहित्याची जोपासना करणे कठीण होऊन बसेल की काय? अशी शंका आहे.

नाटक-सिनेमा-मनोरंजन

गेल्या काही वर्षांत नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइम यासारख्या ओटीटी (over the top) प्लॅटफॉर्मनी चांगलाच धुमाकूळ घातलाय. भारतातही वूट, अल्ट बालाजी, झी ५, हॉटस्टार आणि उल्लूसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मनी चांगलीच प्रसिद्धी मिळवलीये. सध्याच्या घडीला अनेकजन या प्लॅटफॉर्मवरील मनोरंजनात्मक कटेंटला पसंती देताना दिसतायत. एक हजार रुपयांच्या आत काही महिन्यांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व मिळते. त्याबदलात ओटीटीवरील उपलब्ध असलेला सर्व कटेंट फुकटात आणि कधीही पाहता येतो. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कामाच्या वेळा निश्चित नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ओटीटीकडे आकर्षित होताना दिसतोय. नाटक किंवा सिनेमा पाहायचा म्हटला तर ठराविक वेळ काढावा लागतो. पैसेही चांगलेच खर्च करावे लागतात. त्या बदल्यात ओटीटीवर रिव्ह्यू चेक करून हवा तसा कटेंट पाहता येतो. एखादी सिरीज आवडली नाही तर ती मध्येच सोडून दुसरं काहीही पाहता येतं. ही सोय नाटक किंवा सिनेमाला नसते. हे म्हणजे मॉलमधून कपडे घेण्यासारखे आहे. तुम्ही कितीही कपडे घालून ट्राय करू शकता. विकत तुम्हाला आवडेल तेच घ्यायचे आहे. टीव्हीवर मालिका पाहणार्‍यांची संख्याही आता घटली असल्याचे दिसते. प्रत्येक वृत्तवाहिनीने आपला ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. प्रेक्षक त्यांची आवडती मालिका त्यांच्या वेळेनुसार कधीही पाहतात.

खेळांवर होणारा परिणाम

स्मार्टफोनचा परिणाम खेळांवरही झालेला आहे. शहरांमध्ये खेळायला मैदाने नाहीत. त्यामुळे पूर्वीच्या बैठ्या खेळांची जागा आता स्मार्टफोनने घेतलीये. त्यातही पंचवीशीच्या खालील मुले पब्जी सारख्या गेमच्या आहारी गेलेली दिसत आहेत. आधी ब्लू व्हेल, पोकेमॉन गो आणि त्यानंतर आलेल्या पब्जीने गेमने जगभरात अनेक मुलांचा बळी घेतला. तरीही हे गेम खेळणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक प्रौढ व्यक्तीही ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या आहेत. तासनतास मोबाईलवर गेम खेळल्यामुळे हल्लीच एका मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. पुढची पिढी मोठ्या प्रमाणावर या मोबाईल गेम्सच्या जाळ्यात अडकली.

२०१६ साली एका संशोधनानुसार असे समोर आले की आपण दिवसभरात २,६१७ वेळा आपल्या स्मार्टफोनला टच करतो. त्यातही जे लोक आहारी गेले आहेत, ते दिवसाला ५,४०० वेळा आपल्या स्मार्टफोनला टच करतात.mediakix.com या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार जगभरातील स्मार्टफोन युजर दिवसाला ४० मिनिटे युट्यूब, २५ मिनिटे फेसबुक, १५ मिनिटे इन्स्टाग्राम आणि ट्विटरला १ मिनिट देतात.

सोशल मीडिया कारणीभूत

स्मार्टफोनवर अ‍ॅपचा वापर प्रमाणाबाहेर होत असल्यामुळे त्याचा परिणाम पुस्तकाच्या निर्मिती आणि विक्रीवर होतोय. फक्त मराठीच नाही तर जगभरातील इतर अनेक भाषांच्या पुस्तक निर्मितीवर परिणाम झालेला आहे. इंग्रजी पुस्तकांच्या विक्रीवरही अ‍ॅपचा परिणाम दिसतोय. प्रामुख्याने व्हॉट्सअ‍ॅपचा वापर नको तेवढा वाढला आहे. त्यामुळं गंभीर लेखनाचे वाचन कमी झालंय. वाचकच कमी झाल्यामुळे चांगले लेख, पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचतच नाहीयेत. पुस्तकांची विक्री कमी झाल्याचा तोटा माझ्यासारख्या अनेक प्रकाशकांना सोसावा लागतोय.

पुस्तकांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कागद. एकीकडे कागदाची किंमत प्रचंड वाढत चाललीये आणि दुसरीकडे पुस्तकांची विक्री कमी होतेय. त्यामुळं चांगली पुस्तकं किंवा चांगली संहिता हातात असून प्रकाशित करायची की नाही? असा प्रश्न प्रकाशकांसमोर असतो.मराठीमध्ये दरवर्षी दहा हजार पुस्तके प्रकाशित व्हायची, त्यांची संख्या आता रोडावली आहे. महाराष्ट्रात ४० हजारांपर्यंत ग्रंथालये आहेत. वाचकांचा ओढा कमी असल्यामुळे ग्रंथालयाचे अनुदान, कर्मचार्‍यांचे पगार याचा ताळमेळ लावणे अशक्यप्राय झालंय. मराठी पुस्तकांचे चित्र फारसे चांगले नाही. याला जसा सोशल मीडिया कारणीभूत आहे, तसं सरकारी धोरणही कारणीभूत आहे.

सकारात्मक बाजू

सोशल मीडियाचा अतिरेकी वापर पुस्तकं आणि वर्तमानपत्रांच्या मुळावर आलेला आहेच. पण त्याची सकारात्मक बाजू आहे. पुस्तक प्रकाशित करणे किंवा वर्तमानपत्रामध्ये लिहिणे वेगवेगळ्या कारणांमुळे सर्वांनाच शक्य होत नाही. ते सोशल मीडियावर व्यक्त होतात. सोशल मीडियावर होणारी वैचारिक देवाणघेवाण महत्त्वाची ठरते. कुठल्याही गोष्टीत चांगल्या-वाईट गोष्टी असतातच. आपण त्यातल्या कोणत्या गोष्टी घेतो, हे महत्त्वाचे ठरते.

गणेश पंडित (लेखक, दिग्दर्शक, अभिनेता)

नाटक हा ओटीटी प्लॅटफॉर्मपेक्षाही वरचढ प्रकार आहे. नाटक हे जास्त बोल्ड आहे. नाटकात जितकं सरळसोट विषयाला हात घालून बोलण्याची ताकद आहे, तितकी दुसर्‍या कोणत्याच माध्यमात नाही, असं माझं म्हणणं आहे. आता सेन्सॉर बोर्डमुळे नाटकाची भाषा अमुक-तमुकच हवी, दिवाणखानाच हवा, असं वेगळंवेगळं आपणच केलंय. पण नाटक हा जगण्याशी जास्त प्रामाणिक असलेला प्रकार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालणारा कटेंट आता लोकांना मजा देतोय. कारण लोकांना नाटक किंवा टीव्हीवर जेवढं थेट ऐकता येत नाही किंवा पाहता येत नाही, ते सध्या ओटीटीवर पाहता येतंय. त्यामुळं तो आकर्षित करतोय. पण अंतिमतः गोष्ट सागंण्याची हातोटी कशी आहे, त्यावर सर्व अवलंबून आहे. ओटीटीचा पारंपरिक मनोरंजनाच्या माध्यमावर होणारा परिणाम हा तात्कालिक आहे. जसं टीव्ही मालिका आल्यानंतर नाटकावर परिणाम झाला होता. नाटकांची गर्दी थोडीशी कमी झाली होती. पण नंतर पुन्हा नाटकं चालायला लागली.

सध्या ओटीटीकडे तरुणांचा ओढा असला तरी नाटकालाही तरुण तेवढ्याच प्रमाणात येतायत. तसं नसतं तर एकांकिका स्पर्धांची गर्दी कमी झाली असती. अलीकडेच शिवाजी मंदिरला एक नाट्यमहोत्सव झाला. सोमवारचा दिवस असूनही सकाळ आणि दुपारच्या वेळेत प्रायोगिक नाटकांना तरुणांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. याचा अर्थ तरुणांना नाटक बघायचं आहे. पण टिपीकल नाटक बघायची त्यांची तयारी नाही. वर्षानुवर्षे दिवाणखाना टाईप बोरींग नाटकं येत असल्यामुळे कदाचित तरुणवर्ग ओटीटीकडे वळला.

पण जेव्हा नाटक वेगळा विषय देण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तरुण पुन्हा नाटकं बघतील. संगीत देवबाभळी सारखं व्यावसायिक नसणारं नाटक आपल्याकडे चागलं चालतंय. ओटीटी प्लॅटफॉर्म कितीही चांगले असले तरी प्रेक्षक तिथे फेरफटका मारायलाच जातात, तिथे राहायला कुणीच जात नाही. ओटीटीवर लोक दीर्घकाळ रमतील असे नाही.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -