घरफिचर्समहाभियोग आणि डोनाल्ड ट्रम्प

महाभियोग आणि डोनाल्ड ट्रम्प

Subscribe

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डेमोक्रॅटिक पक्षाने महाभियोगाचा प्रस्ताव आणला आहे. अमेरिकेची संसद असणार्‍या कॅपिटल हिल इमारतीवर बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्याविरोधात हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. या प्रस्तावात ट्रम्प  यांनी आंदोलकांना हिंसा करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षातले अनेक सिनेटरही आता ट्रम्प  यांची साथ द्यायला तयार नाहीत. इतकंच नाही तर ट्रम्प  यांनी प्रशासकीय पातळीवर ज्या काही नियुक्त्या केल्या होत्या त्यातल्या काही जणांनीही कॅपिटल हिलच्या घटनेनंतर राजीनामा दिला आहे. नियोजित कार्यक्रमानुसार मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 20 जानेवारी रोजी व्हाईट हाऊस सोडायचं आहे आणि त्याच दिवशी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन पदभार स्वीकारतील. मात्र, कॅपिटल हिलवरच्या हिंसाचारानंतर डेमोक्रेटिक पक्षाचे नेते आता 20 जानेवारपर्यंत प्रतीक्षा करायला तयार नाहीत. ट्रम्प यांनी तात्काळ पदभार सोडावा, असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच त्यांना पुन्हा अध्यक्षीय निवडणुकीला उभं राहण्यावर बंदी घालावी, अशीही त्यांची मागणी आहे.
ट्रम्प  यांनी लवकरात लवकर व्हाईट हाऊस सोडण्याची घोषणा केली नाही तर त्यांच्याविरोधात महाभियोग सुरू करू, असं अमेरिकेची संसद असलेल्या काँग्रेसच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळेच हिंसाचार उफाळला आणि एका पोलीस अधिकार्‍यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचंही पेलोसी म्हणाल्या. ट्रम्प यांच्यावर याआधीही एकदा महाभियोगाचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यावेळी जे रिपब्लिकन सिनेटर ट्रम्प यांच्या बाजूने होते त्यातले बहुतेक सिनेटर यावेळी मात्र ट्रम्प  यांची साथ द्यायला तयार नाहीत. याचा अर्थ ते ट्रम्पविरोधात भूमिका घेणार, असं नाही. मात्र, यावरून ट्रम्प  यांनी आपल्या लाखो समर्थकांची सहानुभूती गमावल्याचं स्पष्ट होतं. दरम्यान, संसदेत अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाला आव्हान देऊन जो बायडन यांचा विजय न रोखणार्‍या सर्वच रिपब्लिकन सिनेटर्सच्या समानांतर नवीन उमेदवार देणार असल्याचा विडा ट्रम्प  यांनी उचलला आहे. कॅपिटल हिलवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारवर चहुबाजूंनी टीका झाली. ट्रम्प यांच्या विश्वासातल्या अनेक रिपब्लिकन नेत्यांनीही या घटनेचा जाहीरपणे निषेध केला. टीका करणार्‍यांमध्ये ट्रम्प  प्रशासनातील अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ अमेरिकन राजकीय नेत्यांचा समावेश आहे. कॅपिटल हिलवरील हिंसाचारानंतर संसदेच्या कामकाजात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या वर्तणुकीचा निषेध केला. कारण ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलवर चढाई करून जो तमाशा केला, त्यामुळे जगभरात अमेरिकेवर टीका केला. स्वत:ला आदर्श लोकशाही म्हणवणार्‍या अमेरिकेचे पितळ उघडे पडले, असे बोलले जाऊ लागले.

कॅपिटल हिल ही चूक सोडली तर ट्रम्प अमेरिकेच्या उदारमतवाद्यांसाठी अखेरची घंटा ठरले होते. अमेरिकन अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यापासून निर्णयांचा धडाका लावला होता. त्यामुळे संपूर्ण जग त्यांच्याकडे अचंबित होऊन पाहत होते. याआधी निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी जी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करणेच शक्य नाही असे मत तज्ज्ञ व्यक्त करत होते. किंबहुना ट्रम्प यांची मते अशा तज्ज्ञांना टोकाची वाटतात. इतक्या पराकोटीची मते मांडणार्‍या उमेदवाराला हरवणे सोपे जाईल असा हिशेब करून  हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांचे रिपब्लिकन पार्टीमधले प्रतिस्पर्धी सँडर्स हे पार्टीचे उमेदवार म्हणून निवडून येऊ नयेत व ट्रम्प यांनाच पक्षाची उमेदवारी मिळेल अशा खेळी केल्या होत्या. या जुगारामध्ये हिलरीबाई स्वतःच निवडणूक हरून बसल्या होत्या. त्यानंतर निर्णयांचा धडाका लावणार्‍या ट्रम्प यांनी आपल्या टीकाकारांना उघडे पडले होतेे.  ट्रम्प यांनाही त्यांचे टीकाकार फेकूच म्हणत. ट्रम्प म्हणतात त्या गोष्टी अंमलात आणणे शक्यच नाही असे पांडित्य झाडणार्‍यांची चांगलीच पंचाईत ट्रम्प यांनी केली होती. त्यांच्या मनामध्ये आपल्याला काय करायचे आहे याबद्दल जरासुद्धा गोंधळ दिसत नव्हता. किंबहुना त्यांचे विचार पुढे नेऊ शकतील अशी स्वतःची टीमसुद्धा त्यांनी उभी केली होती. अमेरिका हे जगामधले सर्वात प्रबळ राष्ट्र असल्यामुळे तिथे निवडून आलेल्या नव्या अध्यक्षांकडे जगाचे डोळे सहाजिकच लागलेले असतात पण ट्रम्प आजवरच्या अमेरिकन धोरणामध्ये उलथापालथ घडवून आणणार अशी चुणूक त्यांनी पहिल्याच दोन आठवड्यात दिली. अमेरिकेला धोका अर्थातच मूलतत्ववादी इस्लामी शक्तींचा. या शक्तींच्या प्राबल्यामुळे अमेरिकेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे असे स्पष्ट मत ट्रम्प आणि त्यांचे सहकारी मांडत होते. अमेरिकन सांस्कृतिक जीवनाशी मिळते जुळते घेऊ न शकणार्‍या ह्या शक्तींना समूळ नष्ट करावे लागेल असेही त्यांचे ठाम मत होते.

- Advertisement -

खरे म्हणजे मूलतत्त्ववादी इस्लामबद्दल इतके स्पष्ट आकलन आणि तेवढेच स्पष्ट प्रतिपादन आजवर कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाने केल्याचे दिसणार नाही. ९/११ चा दहशतवादी हल्ला ज्यांच्या कारकिर्दीत झाला ते जॉर्ज डब्ल्यू बुश या आकलनाच्या बाबतीत अगदी स्पष्ट होते असे दिसून आले. २००१ मध्ये अमेरिका मध्य पूर्वेतून येणार्‍या तेलाच्या पुरवठ्यावर अवलंबून होती. त्यामुळे बुश यांना सुसरी बाई तुझी पाठ मऊ म्हणतच सर्व प्रश्नाला सामोरे जावे लागले. २६/११ चा हल्ला २००८ साली झाला तेव्हा बुश यांच्या जागी अमेरिकन जनतेने ओबामा यांची निवड केलेली होती. बुश ह्यांच्या कारकिर्दीचे ते शेवटचे काही आठवडे होते. हल्ला झाला तेव्हा हिंदूंबद्दल सहानुभूती बाळगणार्‍या बुश यांनी कधी नव्हे ते अमेरिकेतर्फे भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. त्यामुळे या हल्ल्यामधला पाकिस्तानचा हात निःसंदेह सिद्ध करण्याइतके पुरावे भारताच्या हातात आले. पुढे २००९ मध्ये ते भारत भेटीसाठी आले असता हॉटेल ताजच्या कर्मचार्‍यांना आवर्जून भेटले. ते कर्मचार्‍यांना भेटले नसते तरी चालले असते कोणी त्यांच्यावर टीका केली नसती. पण त्यातून याविषयातली त्यांची आस्था मात्र जरूर दिसून येते. तेलाच्या बाबतीमध्ये अमेरिका स्वयंपूर्ण व्हावी म्हणून ट्रम्प यांनी दमदार पावले उचलली. आज त्याचे फळ म्हणून अमेरिकेचे तेलाच्या बाबतीतले मध्यपूर्वेवरील परावलंबित्व नगण्य झाले आहे. त्यामुळे अमेरिकन जनताही ट्रम्प यांच्या बाजूने होती. बायडन यांचा निवडणुकीत झालेला विजय हा ट्रम्प यांच्या अतिआत्मविश्वास आणि कोरोना काळात झालेली हयगय याचा परिपाक होता. तसेच उदारमतवाद्यांच्या एका मोठ्या षङ्यंत्राचा तो भाग होता. अशावेळी ही चाल ओळखून ट्रम्प यांनी पावले उचलायला हवी होती. ट्रम्प यांना बदनामा करून राष्ट्राध्यक्षपदावरून त्यांचा पायउतार करावा ही मोहीम ट्रम्प यांच्या उतावीळपणामुळे यशस्वी झाले. ‘ब्लॅक लाईफ मॅटर’ हिंसाचारात सहभागी झालेले अनेक उदारमतवादी त्या दिवशी अमेरिकन संसदेत झालेल्या हिंंसाचारातही सहभागी असल्याचे आढळून आले. यावरून ट्रम्प यांच्यासाठी जाळे फेकण्यात आले होते. त्यात ट्रम्प अलगद फसले हे उघड होते. त्यामुळे आता तरी ट्रम्प आपल्यावर महाभियोग चालवला जाईल असे काही करणार नाहीत. ते स्वत:हून राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार होऊन उदारमतवाद्यांच्या कटाचा भांडफोड करतील, अशी अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -