घरफिचर्सभौतिकशास्त्रज्ञ जे. जे. थॉमसन

भौतिकशास्त्रज्ञ जे. जे. थॉमसन

Subscribe

सर जोझेफ जॉन थॉमसन उर्फ जे. जे. थॉमसन हे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ होते. थॉमसन यांचा जन्म 18 डिसेंबर 1856 रोजी इंग्लंडमध्ये मँचेस्टरमधील चीटम हील इथे झाला. त्यांच्या वडिलांचा पुस्तक विक्रीचा व्यवसाय होता. थॉमसन यांचे शिक्षण मँचेस्टरमधील ओवेन्स कॉलेजमध्ये (सध्याचे मँचेस्टर विद्यापीठ) झाले. १८७६ मध्ये केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. ते केंब्रिज कॉलेजमध्ये प्रायोगिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक (१८८४-१९१८) व ट्रिनिटी कॉलेजचे ‘मास्टर’ (१९१८-४०) होते.

थॉमसन यांनी अत्यंत कमी दाबाला वायूंमधून होणार्‍या विद्युत धारेच्या संवहनाविषयी संशोधन केले. त्या काळी कॅथोड किरणांच्या बाबतीत वैज्ञानिक वर्तुळात मतभेद होते. कॅथोड किरण हे ऋण विद्युत प्रभार असलेल्या कणांचे बनलेले आहेत, असे काही वैज्ञानिकांचे मत होते; तर काही वैज्ञानिक असे ठामपणे म्हणत होते की, कॅथोड किरण ह्या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. हा मतभेद सोडविण्यासाठी थॉमसन यांनी जॉन एस. टाउनसेंड आणि हेरॉल्ड ए. विल्सन या आपल्या सहकारी संशोधकांच्या मदतीने प्रयोग केले. कॅथोडपासून निघणारे ऋण विद्युत प्रभारित कण हे पदार्थाच्या अणूंमधील मूलभूत कण असले पाहिजेत, असा निष्कर्ष थॉमसन यांनी काढला. अशाप्रकारे इलेक्ट्रॉन या अणुमध्ये असलेल्या मूलभूत कणाचा शोध लागला. थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचे अनेक महत्वाचे गुणधर्मसुद्धा शोधून काढले.

- Advertisement -

इलेक्ट्रॉनच्या या गुणधर्मांचा वापर करून शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी अनेक लहान-मोठी उपकरणे तयार केली. इलेक्ट्रॉनच्या शोधानंतर काही वर्षांनी म्हणजे १९०४ मध्ये थॉमसन यांनी अणुची संरचना स्पष्ट करण्यासाठी अणुचे प्लम पुडिंग मॉडेल प्रस्तावित केले. अणूमधील सर्वांत पहिल्या मूलभूत कणाचा शोध लावण्याचे श्रेय थॉमसन यांना दिले जाते.१९०५ मध्ये त्यांनी पोटॅशियम या मूलद्रव्याच्या नैसर्गिक किरणोत्सारितेचा शोध लावला. १९०६ मध्ये हायड्रोजन अणूमध्ये केवळ एकच इलेक्ट्रॉन असतो, हे त्यांनी सिद्ध केले. त्यापूर्वी हायड्रोजनमध्ये अनेक इलेक्ट्रॉन असावेत, असा समज होता. वायूच्या विद्युत संवहनासंबंधी केलेल्या महत्वाच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक कार्याबद्दल थॉमसन यांना १९०६ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

टॉमसन हे १८८४-१९१८ या काळात कॅव्हेंडिश प्रयोगशाळेचे प्रमुख होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रयोगशाळा भौतिकशास्त्राच्या संशोधनाचे एक जागतिक केंद्र म्हणून नावारूपास आली. १८८४ मध्ये रॉयल सोसायटीने त्यांची सदस्य म्हणून निवड केली आणि ह्यूज (१९०२) व कॉप्ली (१९१४) या पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. १९१५-२० या काळात टॉमसन रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते. ब्रिटिश सरकारने नाइट (१९०८) व ऑर्डर ऑफ मेरिट हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. तसेच १९०८ मध्ये त्यांना सर किताब देऊन गौरवण्यात आले. विद्युत चुंबकत्व व इतर विषयांसंबंधीचे टॉमसन यांचे २३० शोधनिबंध आणि १३ ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अशा या प्रतिभावान शास्त्रज्ञाचे ३० ऑगस्ट १९४० रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -