घरफिचर्सयुतीचा खेळ चाले...

युतीचा खेळ चाले…

Subscribe

पडदा उघडतो. अमित शहा यांची सुरुवातीलाच एन्ट्री. त्यांच्या देहबोलीत 2014 चा रुबाब आता चार वर्षांनी दिसत नाही. खांदे पडलेले. सतत दाढीवरून हात फिरवत येर्‍याझार्‍या घालत ते फिरताना दिसतात. मनातल्या मनात त्या नरेंद्र यांच्यामुळे या देवेंद्रला चार वर्षे मनात नसताना मुख्यमंत्रीपदी बसवावे लागले. माझ्या कोल्हापूरच्या सासुरवाडीचा चंद्रकांतदादा किती चांगला आहे, पण काही करता येत नाही,असे स्वगत गातात.

देशात निवडणुका आल्या की दोन गोष्टी समोर येतात. एक राममंदिर आणि दुसरी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांची युती होणार की नाही… दोन्ही पक्षांनी युतीच्या या खेळाचा पडदा नुकताच उघडला. नमनाला घडाभर तेल ओतायला सुधीर मुनगंटीवार आणि संजय राऊत यांना नाटकाच्या मालकांनी पुढे पाठवले होते. दोघांनी चेहर्‍यावर रंग फासून आपापली भूमिका चोख बजावली. नमन नटवरा करत सुधीरभाऊ गायले. आमची युतीची तयारी आहे. निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. तर, चाणक्य राऊत सुरुवातीलाच भैरवी गायले. देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरेल!

महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या कानी हे नमन गेल्याने 2014 चा तोच खेळ आता नव्याने सुरू झालाय… भाजपला कुठल्याही परिस्थितीत केंद्रात सत्ता हवी आहे आणि शिवसेनेला राज्यात. पण, दोघांनाही एकमेकांच्या मदतीशिवाय ते शक्य नाही. या वाटाघाटीत कोण आपल्या पदरात अधिकचे दान पाडून घेतो, यावर आता पुढचा खेळ रंगणार आहे… चला तर आपणही त्यांचा हा खेळ कसा रंगू शकतो, याच्या तालमी पाहू….

- Advertisement -

स्थळ : भाजपचे वसंतराव भागवत सभागृह, दादर.

पात्र : देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे, किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील. विशेष भूमिका : अमित शहा.
पडदा उघडतो. अमित शहा यांची सुरुवातीलाच एन्ट्री. त्यांच्या देहबोलीत 2014 चा रुबाब आता चार वर्षांनी दिसत नाही. खांदे पडलेले. सतत दाढीवरून हात फिरवत येर्‍याझार्‍या घालत ते फिरताना दिसतात. मनातल्या मनात त्या नरेंद्र यांच्यामुळे या देवेंद्रला चार वर्षे मनात नसताना मुख्यमंत्रीपदी बसवावे लागले. माझ्या कोल्हापूरच्या सासुरवाडीचा चंद्रकांतदादा किती चांगला आहे, पण काही करता येत नाही, असे स्वगत गातात. दुसरी मोठी अडचण आहे ती म्हणजे केंद्रातील सत्ता पुन्हा राखण्याचे. उत्तर प्रदेशनंतर खासदारांचे सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा 42 जागा राखण्याचे. शिवसेनेच्या मदतीशिवाय ते शक्य नसल्याने अस्वस्थतेच्या नादात त्यांचा हात आता दाढीवरून डोक्यावर जातो.
अमित शहा : कोण आहे रे तिकडे.
चंद्रकांतदादा : मी आहे हुजूर.
अमित शहा : सारखे सारखे वाकू नका. 2019 ला मराठा कार्ड खेळवून मुख्यमंत्री करता येतो का ते पाहतो. जा आता. त्या देवेंद्र यांना पाठवून द्या.
शंकर महादेवन ब्रेथलेस गातो तसे श्वास रोखून नॉनस्टॉप भाषण करणारे नेते म्हणून उदयाला आलेले देवेंद्र फडणवीस विंगेत अशाच भाषणाचा सराव करत असतानाच त्यांची एंट्री होते. आपल्याच प्रेमात असल्यासारखे ते स्वगत म्हणत असतात. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणार्‍यांची आम्ही औलाद आहोत…
देवेंद्रना जागे करताना अमित शहा. अहो, कोणाचे दात मोजताय. इथे आमचे दात पडायची वेळ आलीय. ही नॉन स्टॉप भाषणे स्टेजवर. आधी युतीचे काय झाले ते बोला?
फडणवीस : (चार वर्षे राज्य केल्याने एकूणच वागण्यात कमालीचा आत्मविश्वास आलेला. तोच बोलण्यातून दिसतो) साहेब तुम्ही काळजी करू नका. मैं हू ना! तुम्ही उरलेल्या राज्यांची काळजी घ्या. माझ्यावर महाराष्ट्र सोडा.
अमित शहा : अहो, सोडा काय? असेच मी सर्वांना सोडत चाललो, तर मलाच राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावे लागेल. तुम्ही मुद्याचे बोला.
फडणवीस : साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. गेली चार वर्षे मी त्यांना चांगले ओळखतो. ते फार बोलत नाही. फक्त कामाचे बोलतात आणि त्यांना काय हवे आहे आता मी त्यांच्या नजरेतून ओळखू शकतो. ते लोकसभेसाठी आपल्या बरोबर असतील, हा माझा शब्द आहे. पुढे विधानसभेचे काय करायचे ते आता बोलायचे नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.
अमित शहा : बघा हा, पुढचे मुख्यमंत्रीपद पाहिजे असेल तर लोकसभा हातून जाता कामा नये.
फडणवीस : साहेब तुम्ही निर्धास्त राहा.
अमित शहा : आता मी पुढच्या राज्यांत जातो. येथे लगेच बरोबरच्या सहकार्‍यांची तातडीची बैठक घ्या आणि मला अहवाल पाठवून द्या.
( पहिला अंक संपतो)
दुसरा अंक : प्रवेश पहिला : फडणवीस- कोण आहे रे तिकडे. असे बोलताच प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, प्रशांत ठाकूर हे धावत येतात. बाहेरून येऊन निष्ठावंत झालेल्यांची ही धाव पाहून विंगेत उभे असलेले माधव भंडारी यांच्या चेहर्‍यावरील नाराजी लपता लपत नाही.
फडणवीस : त्या रावसाहेब दानवे यांना पाठवून द्या. (होय साहेब, होय साहेब, करत लाड, दरेकर, ठाकूर सर्वात आधी दानवे यांना निरोप कोण देतो, यासाठी आल्या पावलांनिशी सुसाट पळत जातात.)
दानवे : (देशात आग लागो किंवा राज्यात पूर येवो, कुठलीच गोष्ट फार मनावर न घेता राजेश खन्नासारखे आपल्याच प्रेमात) बोला, फडणवीस साहेब, काय काम काढले.
फडणवीस : अहो, काय चालले आहे तुमचे. राज्यावर लक्ष आहे की नाही. प्रदेशाध्यक्ष आहात. तोंडावर निवडणुका आल्यात.
दानवे : आता माझ्या हातात काय आहे राव. सब कुछ तुम हो. तुम्हीच चालक आणि मालक. आदेश द्या!
फडणवीस : बस, पुरे. जरा जिभेला लगाम द्या. मुद्याचेच बोलत चला. (दानवेंना जाता जाता मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादा यांना बोलावण्याचे आदेश दिले जातात.)
मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादा : साहेब आदेश.
फडणवीस : जरा बसा. भाऊ, युतीच्या प्राथमिक बोलणीची जबाबदारी तुमची. नाटक बरोबर रंगले पाहिजे. नमनाला दोन घडे आणखी तेल ओता, पण ते रंगले पाहिजे. मुख्य अंक रंगवायला मी आहेच. दादा, तुम्ही मराठा समाजावर लक्ष द्या. ते म्हणे निवडणुका लढवतायत. त्यांच्यात आपली माणसे घुसवा. पैसा पाणी ओता. काँग्रेस आघाडीची मते मराठा मोर्चाला मिळाली पाहिजेत. जा आता. (मुंडे बाईंना पाठवण्याच्या सूचना दिल्या जातात)
फडणवीस : (मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून चेहर्‍यावरची नाराजी लपता लपत नाही. मुख्यमंत्र्यांच्या चाणाक्ष नजरेने ते बरोबर हेरलेले असते). या, ताई. काय म्हणतोय आपला बहुजन समाज. सोडू नका. पकड घट्ट पाहिजे. विकासकामांसाठी हवा तेवढा पैसा घ्या. (फडणवीस यांचे बोलणे या कानातून ऐकत आणि त्या कानाने सोडून देत त्या घुश्यातच निघून जातात).
आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांना बोलावणे जाते.
फडणवीस : काय चालले आहे मुंबईत.
शेलार : साहेब, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे चाललंय. शिवसेनेशी जुळवून घेतोय. वांद्रे येथे आमच्याकडे गणपतीला संजय राऊत आले होते. छान फोटो झाले. ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ हे गाणेही आम्ही गायले. आमच्या भेटीचा कार्यक्रम असल्याने त्या दिवशी कुठलाच मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला नाही.
फडणवीस : तावडे यांना जमत नाही ते तुम्ही करता. बरे वाटले. मंत्रीमंडळ विस्तार झाला की तुमचे कॅबिनेटपद नक्की.
(खाली मान घालून बसलेल्या सोमय्या यांच्याकडे पाहत) फडणवीस : किरीटजी काय झाले. तोंड का पाडले.
सोमय्या : वर मलाच विचारा. भ्रष्टाचाराचे आरोप करून त्या सेनेचे जीणे हराम केले असताना माझाच आवाज तुम्ही दाबला. आता काय बोलू
फडणवीस : आता तुम्ही काय बोलू नका. मी सांगेन तेव्हाच बोला… या आता.
(सर्वजण गेल्यावर फडणवीस यांच्या सोफ्याच्या मागे लपून बसलेले गिरीश महाजन अचानक उभे राहतात).
फडणवीस : महाजन या सार्‍यांवर लक्ष ठेवा. मला वेळच्या वेळी रिपोर्ट करत जा.
महाजन : होय, साहेब!

- Advertisement -

स्थळ : मातोश्री, वांद्रे

पात्र : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते, नीलम गोर्‍हे, अनिल देसाई, विनायक राऊत.
(सदरा लेंगा असा साधा पेहराव, उजवा पाय डाव्या पायावर टाकलेला आणि उजव्या हातावर चेहरा तोललेला. धीर गंभीर मुद्रा. बाजूला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे बसून राजकारणातील डावपेच शिकून घेताना दिसतात. साहेबांचा मूड पाहून बाजूला उभे असलेले मिलिंद नार्वेकर पुढे येतात )
नार्वेकर : बरे वाटत नाही का, साहेब.
उद्धव : मिलिंद, सारखे सारखे छातीत दुखते, असे दहावेळा विचारून मला तुम्ही आणखी आजारी पाडाल. ते संजय राऊत कुठे गेले बोलवा त्यांना.
राऊत : इतके तातडीने बोलावले. काय महत्त्वाचे आहे का?
उद्धव : दरबार भरवून खूषमस्करीत रमणारा मी नव्हे. निवडणुका तोंडावर आल्यात, काय तयारी आहे आपली.
राऊत : साहेब, आपण आदेश द्या. लागतो कामाला.
उद्धव : अहो, अग्रलेखातून आणि भाषणातून भाजपला ठोकायला मी सांगत नाही. युती करायची ना.
राऊत : तुम्ही सांगितल्याप्रमाणे आशिष शेलार यांना भेटून युतीच्या नाटकाचा पहिला अंक व्यवस्थित रंगवला आहे. आता नाटक तुम्ही सांगाल तसे करूया. (या आता आणि जाताना देसाई, कदम, रावते यांना आत पाठवा अशा सूचना दिल्या जातात).
देसाई : काय, कसे चालले आहे. सर्व ठीक ना.
उद्धव : अहो, देसाई मागच्या वेळी तुमचा मतदारसंघ तुम्हाला राखता आला नव्हता आणि आता सर्व ठीकठाक असल्याचे काय विचारता. ते काय सभागृहात बेचव भाषण देण्याएवढे सोपे आहे का. निवडणुकांच्या कामाला लागा.
देसाई : होय पाहतो. बघतो.
उद्धव : गेली चार वर्षे राज्यभरातील सेनेचे पदाधिकारी आणि सैनिक मंत्रालयात हेच ऐकत आलेत. एक शिंदे सोडले तर तुमच्यासकट सेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या तक्रारी आहेत. काय कदम, रावते बरोबर आहे की नाही.
कदम : साहेब, माझ्या खात्याला काय अर्थ नाही. सर्व महत्त्वाचे अधिकार काढून घेतले. नामधारी मंत्री आहे मी. आता पर्यावरणरक्षकासारखा प्लास्टिक हटाव करत धाडी मारत फिरतोय. माझे तेवढे तोंड दिसते.
उद्धव : हे तोंड सांभाळले असते तर ही वेळ आली नसती. त्या कल्याण-डोंबिवली निवडणुकीत कोणी सांगितले होते, भाजपवाल्यांचा बाप काढायला. ते फडणवीस म्हणजे कोब्रा आहेत, संधी मिळताच डसणारच. आता ते मागचे सोडा. कामाला लागा. (रावते बोलायला उत्सुक दिसतात)
उद्धव : तुम्ही फडणवीसांबरोबर जुळवून घेतलेले दिसते. बरे आहे, पण जरा शिवसैनिकांचीही कामे करत चला. आपल्याला भाजप नाही, शिवसेना वाढवायची आहे.
रावते : तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आदेश द्या. निघतो मराठवाडा आणि विदर्भाच्या दौर्‍यावर. कापूस पिंजल्यासारखा खेडोपाडी पिंजून काढतो.
उद्धव : बस, बस. आदेश देऊ.
(सेनेच्या तालमीला मध्यंतर नसल्याने दुसरा अंक लगेच सुरू होतो)
शिंदे : जय महाराष्ट्र! आदेश सांगा फक्त साहेब
उद्धव : तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आता ठाणे, पालघरबरोबर संपूर्ण कोकणावर लक्ष ठेवा. बालेकिल्ला हातचा जाता कामा नये. जैतापूर, नाणारविरोधात उभी असलेली माणसे आपली आहेत. त्यांची समजूत काढा. (जाताना विनायक राऊत यांना पाठवा)
विनायक राऊत : पदाधिकार्‍यांची बैठक बोलवायची काय?
उद्धव : बैठका कसल्या बोलवताय. आधी कोकण सांभाळा. कोकणची माणसे निष्ठावंत आहेत. आज शिवसेना मोठी होण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मग ती मुंबईतील चाकरमानी असोत की कोकणातील भूमीपुत्र. ते नाराज होता कामा नये. आता फक्त राणे नाही तर भाजपवालेही फटाके लावणार. (अनिल देसाई आणि नीलम गोर्‍हे यांना बोलवा).
नीलम गोर्‍हे (अनिल देसाई काही बोलण्याआधी लगेच बोलायला सुरुवात करतात) : महिलांवरील अत्याचार, कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा यावर मी राज्यभर बोलत असते.
उद्धव : ताई, हे सगळे विधान परिषद आणि टीव्हीवर बोलायला सोपे आहे. आता निवडणुकांची तुम्ही काय जबाबदारी घेता ते सांगा.
नीलम गोर्‍हे : लागते तयारीला (अनिल देसाईंकडे पाहत, बोलण्यास सांगतात)
अनिल देसाई : दिल्लीत मी कोणाशी बोलू.
उद्धव : दिल्ली आणि मुंबई सोडून महाराष्ट्रही बघा. मोठा विचार करा. मला निवडणूक प्लॅन द्या.
(अनिल देसाई जाताच बाळराजे आदित्य उद्धव यांच्याकडे उत्सुकतेने पाहत असतात)
उद्धव : भविष्यात हे तुम्हाला करायचे आहे. मुंबईची नाईट लाईफ म्हणजे महाराष्ट्र नव्हे, हे लक्षात ठेवा.
(तुतारी फुंकल्याचा आवाज येतो आणि मागे पडद्यावर घोड्यांच्या टापांचा आवाज येत तालमीवर पडदा पडतो)
……..

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -