घरमुंबईनेत्रहिनांसाठी बोरिवलीत ब्रेल इन्फॉर्मेशन सिस्टम

नेत्रहिनांसाठी बोरिवलीत ब्रेल इन्फॉर्मेशन सिस्टम

Subscribe
  • रेल्वेस्थानकात स्पर्शाच्या आधारे फलाट शोधण्यास मदत
  • बोरिवली ठरले राज्यातले पहिले रेल्वे स्थानक

नेत्रहीन व्यक्तींना रेल्वेस्थानकातील गर्दीतून वाट काढत योग्य फलाटावर जाताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा त्यांना अन्य प्रवाशांना विचारत फलाट गाठावे लागते. परंतु, आता कोणत्याही मदतीशिवाय त्यांना योग्य त्या फलाटावर सहज ये-जा करता येणार आहे. पश्चिम रेल्वेने बोरिवली स्थानकामध्ये पुलांवर बसलेल्या ‘ब्रेल इन्फॉर्मेशन सिस्टम’मुळे दृष्टीहीन व्यक्तींना फलाट शोधणे सहज शक्य होणार आहे. ही सिस्टिम लावण्यात आलेले बोरिवली स्थानक हे देशातील तिसरे तर महाराष्ट्रातील पहिले स्थानक ठरले आहे.

नेत्रहीन व्यक्तींनी रेल्वे प्रवासात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. गर्दीवेळी जिन्याहून चढउतार करताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बर्‍याचदा त्यांची लोकल मिळत नाही. फलाटावर पोहचण्यास विलंब होत असल्याने अनेकदा ते धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे अपघात होण्याची शक्यता वाढते. तसेच त्यांना रेल्वेस्थानकावर असलेल्या अन्य सुविधांबाबतही माहिती मिळत नसते. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने नेत्रहीन व्यक्तींसाठी बोरिवली स्थानकात ‘ब्रेल इन्फॉर्मेशन सिस्टम’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सिस्टिममधील ब्रेल लिपीमधील इंडिकेटरमुळे या दोन्ही समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. स्थानकावरील जिने, भुयारी मार्ग, आणि प्रत्येक फलाटावर ही सिस्टिम बसवली आहे. या सिस्टिमला स्पर्श करून नेत्रहीनांना आपला मार्ग निवडू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींना विचारपूर करण्यासाठी लागणार्‍या वेळेत बचत होऊन त्यांना कोणाच्याही मदतीशिवाय योग्य मार्ग मिळण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

मुंबई बाहेेर जाणारे प्रवाशी व उपनगरीय सेवेने प्रवास करणारे प्रवासी बोरिवली स्थानकात मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे या रेल्वेस्थानकाची निवड करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबईसह राज्यात नेत्रहीन व्यक्तींची संख्या मोठी आहे. रेल्वे प्रवासादरम्यान त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीला धावपळीत मदत करायला शक्य होत नाही. त्यामुळे रेल्वे फलाटावर व जिन्यांवर बसवलेली सिस्टिम आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास नेत्रहीन व्यक्तींनी व्यक्त केला. तसेच ही सेवा संपूर्ण देशभरात राबवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

बोरिवली रेल्वेस्थानकात बसवलेल्या ब्रेल इन्फॉर्मेशन सिस्टिममुळे नेत्रहीन व्यक्तींना याचा मोठा फायदा होणार आहे. बोरिवलीबरोबरच अंधेरी स्थानकातही ही सिस्टिम बसवण्यात येणार असून, लवकरच हे काम सुरु होईल. जसजशी मान्यता मिळेल तसे अन्य स्थानकांवरही ही सिस्टिम राबवण्यात येणार आहे.
– गजानन महात्पूरकर, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

- Advertisement -

प्रवासादरम्यान फलाटाबाबत नेहमी अन्य प्रवाशांकडे विचारणा करावी लागत असे. परंतु, यापुढे कोणाच्याही मदतीशिवाय फलाटावर जाणे शक्य होणार आहे. तसेच फलाटावरील अन्य सोईसुविधांचीही माहिती सहज मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दुसर्‍यावर अवलंबून राहावे लागणार नसल्याने रेल्वे प्रशासनाने आम्हाला एक नेत्रच दिले आहे.
– अबुल कलाम सिद्धकी,नेत्रहीन प्रवासी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -