तुमचं बॅडमिंटन,आमचं टेनिस

Raj Thackeray

राजेश कोचरेकर

स्व. बाळासाहेब, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मनसे प्रमुख राज, युवासेना प्रमुख आदित्य ही सगळी मंडळी खेळ आणि खेळाडूंच्या बाबत खूपच सिरियस असतात. आपल्याकडे राजकारणातील अनेकजण क्रीडा क्षेत्रात वावरताना दिसतात. त्यातली मोजकीच मंडळी फक्त खेळ आणि खेळाचा विचार करतात. किंवा क्रीडा संघटनांच्या भल्याचा विचार करतात. त्यात शरद पवार, अजित पवार आणि गजानन किर्तीकर अशा मोजक्यांचा समावेश आहे.बाकी तर मिरवण्यासाठीच मैदानावर आणि कोर्टवर पोहचलेले असतात. उध्दव यांनी आपल्या वयाच्या 35व्या वर्षी बॅडमिंटनची रॅकेट घेऊन वांद्य्राच्या एमआयजीमध्ये खेळायला सुरुवात केली.

तुमची शिवसेना तर आमची मनसेना…तुमची मातोश्री तर आमचा कृष्णकुंज… तुमचा आदित्य तर आमचा अमित… तुमच्या रश्मीवहिनी तर आमच्या शर्मिला वहिनी…तुमची विधानसभा तर आमची जनसभा… अशीच काहीशी वाटणी शिवसैनिक आणि मनसैनिकांनी गेल्या काही काळात करुन घेतली आहे. त्यात आता नव्या गोष्टींची भर पडली आहे आणि ती आहे खेळांची आणि खेळाच्या संस्थांची. याच वाटणी युध्दात आता खेळांचीही वाटणी झाली आहे. ते म्हणजे तुमचं बॅडमिंटन तर आमचं टेनिस आणि तुमचे एमआयजी तर आमचा एसपीजी…

त्याचं झालं असं सोमवारी शिवाजी पार्क जिमखान्यात टेनिस खेळताना राज ठाकरेंचा तोल गेला. त्यांच्या डाव्या हाताला मार लागून फ्रॅक्चर झालं. त्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मंगळवारी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची बैठक एमआयजीमध्ये बोलावली होती. त्या बैठकीला राज डावा हात गळ्यात घेऊनच कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिले होते चॅनेलवरून राज ठाकरे यांच्या झालेल्या दर्शनाने चर्चांना ऊत आला आणि दुखापतीच्या कैकपटीने राज यांच्या फ्रॅक्चरची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यानंतर ठाकरे आणि त्यांचे खेळ याच्याही चर्चा झडू लागल्या.
संपूर्ण ठाकरे कुटुंब तसं क्रीडाप्रेमी. बाळासाहेब ठाकरे तर निस्सीम क्रिकेटप्रेमी. बापू नाडकर्णी, पॉली उम्रीगर, रमाकांत देसाई यांच्या बरोबर बाळासाहेबांचा खास दोस्ताना. अनेक खेळाडूंना चौकटीबाहेर जाऊन बाळासाहेबांनी मनमोकळ्या पध्दतीने मदत केली. तेही या हाताचं त्या हाताला कळू दिलं नाही. उध्दव आणि राज या दोघांनाही आणि त्यानंतरच्याही त्यांच्या पिढीलाही खेळाबद्दल एक विशेष प्रेम आहे. दोघांचाही काही खेळाडूंबरोबर विशेष दोस्ताना आहे. उद्धव ठाकरे यांनी भारताचा वेगवान गोलंदाज राजू कुलकर्णी बरोबर ‘सुप्रीमो’ नावाचा क्रीडासाहित्याचा स्पोर्टस् ब्रॅण्ड सुरू केला होता. बाळासाहेब ठाकरे यांना इंग्रजी मीडियाने दिलेल्या विशेषणातून ही ‘सुप्रिमो’ची कल्पना उध्दव यांना नव्वदच्या दशकात सुचली होती. राज ठाकरे यांची आणि सचिन तेंडुलकरची मैत्री तर खूपच खास समजली जाते. सचिन राज्यसभेत खासदार झाल्यावर त्याला राहुल गांधी यांच्या शेजारचा बंगला मिळाला. पण आपल्या बंगल्याच्या खर्चाचा भार सरकारवर नको म्हणून सचिनने हा बंगला नाकारण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय सचिनने लंडनला सुट्टीसाठी जाण्याआधी मुंबई विमानतळावरुनच स्वतः मला कळवला. लंडनला जाण्याच्या आदल्यादिवशी सचिन राज ठाकरे यांच्याबरोबर जेवायला एकत्र होता.(सुज्ञांस अधिक सांगणे नको.)

स्व. बाळासाहेब, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मनसे प्रमुख राज, युवासेना प्रमुख आदित्य ही सगळी मंडळी खेळ आणि खेळाडूंच्या बाबत खूपच सिरियस असतात. आपल्याकडे राजकारणातील अनेकजण क्रीडा क्षेत्रात वावरताना दिसतात. त्यातली मोजकीच मंडळी फक्त खेळ आणि खेळाचा विचार करतात. किंवा क्रीडा संघटनांच्या भल्याचा विचार करतात. त्यात शरद पवार, अजित पवार आणि गजानन किर्तीकर अशा मोजक्यांचा समावेश आहे.बाकी तर मिरवण्यासाठीच मैदानावर आणि कोर्टवर पोहचलेले असतात. उध्दव यांनी आपल्या वयाच्या 35व्या वर्षी बॅडमिंटनची रॅकेट घेऊन वांद्य्राच्या एमआयजीमध्ये खेळायला सुरुवात केली. तो काळ होता पहिल्यांदा युतीचं सरकार आलं तेव्हाचा. उदय पै हा त्यांचा ट्रेनर होता. अनेकांना तेव्हा वाटलं थोडे दिवस खेळातून विरंगुळा मिळाला की उध्दवजी कंटाळून शांत बसतील. पण ते रोज वेळेवर एमआयजीत बॅडमिंटनसाठी पोहचत असत. त्यांचा मूडही छान असायचा. पण ते तिथे रमतात, खेळाचा आनंद लुटतात हे कळल्यावर मात्र तिथेही फाईली घेऊन, कामं घेऊन येणार्‍यांची संख्या वाढायला लागली आणि सरतेशेवटी उध्दव यांना बॅडमिंटन पासून लांब जावं लागलं.त्यांच्या खेळाबद्दल सुप्रसिद्ध बॅडमिंटन गुरु श्रीकांत वाड म्हणतात, हा खेळ वयाच्या पस्तिशीत सुरुवात करुन इतकं सिरियसली खेळून त्यात प्राविण्य मिळवणारा हा पहिला खेळाडू मी पाहिलाय.

तीच गोष्ट राज यांची. वयाची पन्नाशी पार केलेल्या राज यांनी टेनिस खेळण्याची इच्छा शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर यांना बोलून दाखवली. संजीव यांचे वडील दादा खानोलकर हे टेनिसचे खूप मोठे संघटक होते. सहाजिकच टेनिस खेळणार्‍या कुणालाही संजीव यांच्याकडून प्रोत्साहनच मिळतं तसं ते राज यांना पण मिळालं. अर्थात राज यांच्यासाठी प्रशिक्षकाची गरज होती ती कशी मिळवायची हा एक प्रश्न होता. याबाबत महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे सुधीर अय्यंगार यांना विचारण्यात आलं. त्यांनी पुण्याच्या आदित्य चौगुलेंचे नाव सुचवलं. शिवाजी पार्क जिमखाना टेनिस सेक्रेटरी योगेश परुळकर हा खरं तर राज समर्थक. कित्येकदा तोच त्यांचा टेनिस कोर्टवर पार्टनर असतो. राज ठाकरे एखाद्या कुटुंबात खासगी कार्यक्रमासाठी गेले तरी तिथे गर्दी उसळते. ती समस्या इथेही येणारच होती. पण राज यांनी पक्षात ताकीद देऊन टाकली. माझ्या परवानगीशिवाय मी खेळत असताना जिमखान्याजवळ कुणी फिरकलात तर माझ्याशी गाठ आहे. त्यामुळे कुणाचाच व्यत्यय नसल्यानं राज ठाकरेंचं अख्ख कुटुंब टेनिसमध्ये रमायला लागलं. त्यांनी टेनिस ज्या सिरियसली घेतलंय ते बघून अनेकांनी तोंडात बोट घातलीत. त्यांचं बॉलवर जाणं, फोरहँड, बॅकहॅन्ड यावर त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराला टेनिस एल्बोचा त्रास होतोय. तरी त्यांनी खेळ सुरुच ठेवलाय. सोमवारी संध्याकाळी राज ठाकरे टेनिस खेळताना त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यांच्या हाताला प्लास्टर करण्यात आलं आणि सोशल मीडियावर राज ठाकरे यांची दुखापत आणि त्यांचे टेनिस याची चर्चा झाली.
राज आणि उद्धव या दोन्ही भावांच्या संघटना मुंबई ठाण्यामध्ये काहीशा प्रभावशाली आहेत. पण तरीही या दोघांनी मिळून या शहराच्या क्रीडा विश्वाला जे द्यायला हवं ते अजूनही त्यांना देता आलेलं नाही. उध्दव यांची शिवसेना 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्ता राखून आहे. मात्र सत्तेतल्या शिवसेनेला स्टॅडिंग पलीकडे कशातच अडरस्टँडिंग नाही. सेनेचा कारभार केव्हाच आदित्य ठाकरे यांनी आपल्या हाती घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील वरकरणी ची रंगरंगोटी असू द्या किंवा स्टँडिंगमधील मोठ्या टेंडरांचा मामला सगळ्यावर आदित्य यांची छाप असते. स्वतः आदित्य ठाकरे हे मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्याआधी त्यांनाही क्रिकेटमध्ये रुची होती. एमसीएमधील एका क्लबचे ते स्वतः मालक आहेत. त्यांचे वडीलही एमसीएच्या राजकारणात सक्रिय आहेत.त्यांच्या वडिलांचे पीए, सेना सचिव मिलिंद नार्वेकर मुंबई प्रिमियर लीगचे अध्यक्ष आहेत. काही वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे कांगालीग खेळत असत. आपलं नाव स्कोअरशीटवर लिहितानाही ते टी. आदित्य असं लिहायचे. याचं कारण तेव्हा त्यांना प्रसिद्धीचा चसका नव्हता तसा तो आजही नाही. पण आज त्यांचं राजकारण काहीसं सर्वव्यापी होत नाहीय असं खेदानं म्हणावं लागतंय. कारण ते बघत असलेल्या मुंबई महानगरपालिकेत साधारण 70 ते 80 लहान-मोठी मैदाने आणि हजाराहून जास्त लहान-मोठी उद्यानं आणि बगीचे आहेत. मुंबई महापालिकेच्या तीस हजार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकापैकी क्रीडा विभागावर जेमतेम पंधरा कोटी रुपये खर्च होतात. तर दरवर्षी घेण्यात येणार्‍या महापौर क्रीडा स्पर्धांसाठी जेमतेम चार-पाच कोटींवर बोळवण केली जाते. त्यातही अनेक घोळ असतात. मुंबईमध्ये असलेल्या 70-80 लहान-मोठ्या मैदानांपैकी किती मैदान खेळांसाठी योग्य आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे. आदित्य ठाकरे मुंबई फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून एरवी प्रसिद्धीपासून आणि राजकीय वरदहस्तापासून लांब असलेल्या फुटबॉलसाठी खूपच काम करतायत.असंच काम सर्वसामान्यांच्या मुलांसाठी खेळल्या जाणार्‍या कबड्डी, खो-खो, कॅरम, किंवा स्विमिंगसाठी घसघशीत पध्दतीने ते कधी करणार हा प्रश्न दिवसागणिक गंभीर होतोय. आता थोड्याच दिवसांत महापालिका निवडणुकीचा धुरळा उडेल. मग कोणी अस्मिता बोलेल आणि कुणी मराठी माणसाला साद घालेल. कुणी विकासाची ब्ल्यू प्रिंट देईल तर कुणी नाईट लाईफ आणि पर्यटनाचा खेळ मांडेल. पण एरव्ही स्वतःच्या बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल कडे गांभीर्याने बघणार्‍या ठाकरेंनी मुंबई-ठाणे-पुणे-नवी मुंबई आणि नाशिककरांच्या क्रीडाप्रेमाकडे तितकंच गांभीर्याने विचार केला तर ती नव्या वर्षाची भेटच ठरेल.