घरफिचर्सदर्दी विलासराव!

दर्दी विलासराव!

Subscribe

दिवस लोकशाहीच्या उत्सवाचे म्हणजे निवडणुकीचे आहेत. राजकारणामधल्या हमरीतुमरीचे आहेत. राजकारणातली माणसं या अशा हमरीतुमरीमुळे स्पष्ट शब्दांत सांगायचं तर कायम आपल्याला भांडखोर वाटतात. हिशेबी वृत्तीची वाटतात आणि म्हणूनच बरीचशी रूक्षही वाटतात. पण राजकारणाचा गाभा जरी भांडखोरपणाचा, हिशेबीपणाचा आणि रूक्षपणाचा असला तरी त्यातली सगळीच माणसं काही तशी नसतात. काही रसिक असतात, दिलदार असतात आणि संगीत, कविता, साहित्य, विनोद यात मनापासून रस घेणारी असतात. म्हणूनच लता मंगेशकरांचं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ऐकल्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंचे डोळे पाणावतात.

तसं पाहिलं तर गाणं कुणाला आवडत नाही! सगळ्यांनाच आवडतं. तसं ते राजकारणातल्या लोकांना आवडतं. पण गाण्यातले, संगीतातले बारकावे कळणारेही काही राजकारणी असतात, जे त्या बारकाव्यानिशी गाण्याचा, संगीताचा काठोकाठ आस्वाद घेत असतात. यातलं एक नाव होतं विलासराव देशमुखांचं. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भुषवलं, केंद्रात ते मंत्री होते. एखाद्या वेळेस राजकारणातला विजनवासही त्यांच्या नशिबी आला. पण या कलासक्त माणसामधला रसिक कधीच लोप पावला नाही. जुन्या-नव्या संगीताशी असलेला त्यांचा सहवास त्यांनी कधी कमी होऊ दिला नाही. राजकारणाच्या धबडग्यातही त्यांनी तशाच जुन्या-नव्या गाण्यांशी असलेलं आपलं नातं विरळ होऊ दिलं नाही.

- Advertisement -

विलासराव मुख्यमंत्री असण्याच्या एका काळात ‘राम शाम गुन गान’ ही कॅसेट बाजारात आली होती. हो, तो जमाना कॅसेटचा होता आणि श्रीनिवास खळेंचं संगीत या कॅसेटला लाभलं होतं आणि या कॅसेटचं खास आकर्षण होतं ते म्हणजे पंडित भीमसेन जोशी आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या संगीतातल्या अत्युच्च शिखरावरच्या दोन महान कलाकारांचं एकत्र येणं, एकत्र गाणं. तो खरोखरच दैवदुर्मीळ योग होता. त्यातलं या दोन्ही महान कलावंतांनी गायलेलं ‘अधर धरे मोहन मुरली पर, होठ पे माया बिराजे, बाजे रे मुरलियाँ बाजे’ हे गाणं तर त्या एका काळात असंख्य दर्दी रसिकांना अतिशय भुरळ घालून गेलं होतं. विलासरावांनी हे गाणं असंच कुठे तरी ऐकलं आणि त्या गाण्याने त्यांना असं काही नादावून सोडलं की कधी फुरसत मिळाली की हे गाणं ऐकल्याशिवाय त्यांचा दिवस जात नसे. बरं, विलासरावांच्या बाबतीत केवळ हे गाणं ऐकणं आणि ते तसंच सोडून देणं असा आणि इतकाच तो मामला नसे. त्या गाण्यात कोणती वाद्यं वापरली आहेत, ती भारतीय आहेत की पाश्चिमात्य आहेत, गायकाने किंंवा गायिकेने एखादी विशिष्ट तान अशीच का घेतली आहे, गाण्यातल्या एखाद्या शब्दाचं प्रयोजन गीतकाराने तसंच का केलं आहे, हा सारा तपशील विलासरावांकडे व्यवस्थित असे.

अशाच एका सुमारास महाराष्ट्राचे लाडके गायक सुरेश वाडकर यांची ‘ओंकार स्वरूपा’ ही कॅसेट रसिकांसमोर आली होती. प्रतिभावंत संगीतकार श्रीधर फडकेंचं कमालीचं रसाळ संगीत लाभलेल्या एकाहून एक सरस अशा संतरचना त्यात होत्या. त्यातल्या ‘ओंकार स्वरूपा’, ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी’, रूपे सुंदर सावळा गे माये’, अशा रचना ऐकता ऐकता विलासरावांचं लक्ष त्यातल्या एका रचनेकडे जरा जास्तच गेलं आणि ती रचना होती ‘विठ्ठल आवडी प्रेमभावो.’ मुळात त्यातली एक ओळ गाताना सुरेश वाडकरांनी वरच्या पट्टीत जो सूर लावला होता त्या ठिकाणी विलासरावांचं मन थबकलं होतं…आणि ती ओळ होती ‘विठ्ठल नामाचा रे टाहो!’. सुरेश वाडकरांनी त्यातला ‘टाहो’ हा शब्द गाताना खरोखरच कमालीच्या आर्ततेने एक सुरेल आणि श्रवणीय असा टाहो फोडला होता. विलासरावांना सुरेश वाडकरांच्या आवाजातला तो हृदयाला आतबाहेर स्पर्श करणारा टाहो पुढे कितीतरी काळ खुणावत राहिला. हे सगळं सांगण्यामागचा हेतू हा की विलासराव हे संगीताचे नुुसतेच चाहते नव्हते तर त्यांच्या पध्दतीने, त्यांच्या परिने ते गाण्याचे एक चिकित्सकही होते.

- Advertisement -

मला आठवतंय, संगीतकार श्रीनिवास खळेंना जेव्हा महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला तेव्हा आपल्या भाषणातून त्यांनी श्रीनिवास खळे नावाच्या कर्तबगार संगीतकाराच्या गाण्यातल्या मुशाफिरीचा जो धांडोळा घेतला होता तो एखाद्या कवितेइतकाच रसाळ होता. ते खळेंबद्दल म्हणाले होते, ‘नदी जशी जगाची कसलीच भ्रांत न बाळगता शांतपणे वाहत असते तसं श्रीनिवास खळेंचं संगीत शांतपणे आमच्या महाराष्ट्राच्या दरीखोर्‍यात गेली बरीच वर्षं वाहत आहे. त्यांच्या आजुबाजूला पाश्चिमात्य संगीताचा धबधबा वाहतो आहे. कानठळ्या बसवतो आहे. पण श्रीनिवास खळेंचं संगीत जसं आहे तसंच आहे, शांत आणि संथ. आमच्या धकाधकीच्या जीवनाला प्रसन्नता देणारं. ‘श्रावणात घननीळा बरसला’ हे त्यांचं गाणं तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला माझ्या या म्हणण्याचा प्रत्यय येईल.

पण शांत रस आमच्यावर शिंपडणारे हेच खळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वीरित्या संपून मंगल कलश महाराष्ट्रात आणला जातो तेव्हा कोणतं गाणं करतात तर ते ’जय जय महाराष्ट्र माझा’ हे आमच्या धमन्यांमधलं रक्त उसळवणारं महाराष्ट्रगीत. शांत रस शिंपडणारा हा संगीतकार तेव्हा आमच्यावर वीररसाचा अभिषेक आम्हाला घालून जातो. ‘कळीदार कपुरी पान’सारखी लावणी करताना हेच खळे आम्हाला संगीतातल्या शृंगाररसाची ओळख करून देतात. माझ्या गावाकडल्या भाषेत बोलायचं झालं तर खळे हे आमच्या मराठी भाषेच्या खळ्यात दाणेदार गाणी उधळणारे एक थोर संगीतकार आहेत. त्यांनी त्यांचा गाण्याचा घेतला वसा कधीच थांबवू नये. महाराष्ट्र त्यांच्या गाण्यांचा रसिक आहेच, पण मी स्वत: त्यांच्या गाण्याचा कायम रसिक आहे!’

विलासरावांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं, ‘कळत्या वयात मला शंकर-जयकिशनची गाणी खूप आवडायची आणि त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या संगीतातलं अ‍ॅकार्डियन माझं लक्ष वेधून घ्यायचं. अ‍ॅकॉर्डियन हे वाद्य दिसतंही सुंदर आणि त्यातून निघणारे सूर तर मला त्याहून मनमोहक वाटायचे, त्यासाठी राज कपूरच्या सिनेमांची माझ्या एका वयात मला ओढ लागली होती. राज कपूरच्या सिनेमांना बहुतेक शंकर-जयकिशनचं संगीत असायचं.’

राजकारणातल्या पराकोटीच्या सत्तास्पर्धेच्या जगात राहूनही संगीत, गाणी नीट कान देऊन, मन लावून ऐकणार्‍या विलासरावांच्या आयुष्यात एक प्रतिकूल काळ येऊन गेला होता. त्यावेळी तनामनाने संपूर्णपणे काँग्रसी असलेले विलासराव शिवसेनेच्या तिकिटावर विधान परिषदेत हरले होते आणि त्यामुळे राजकारणात जवळजवळ त्यांना विजनवास पत्करावा लागला होता. पण त्याही काळात ते मला पंडित अब्दुल हलिम जाफर खाँसाहेबांच्या बिर्ला मातोश्री सभागारमधल्या एका मैफलीला आवर्जुन हजर असल्याचे दिसले होते.

विलासरावांचं राजकारण, त्यांची राजकीय शैली यासाठी ते राजकारणात सगळ्यांच्या लक्षात राहतील, पण राजकारणात असूनही संगीतात नुसते रमणारे नव्हे तर संगीत समजून घेऊन ते ऐकणारे दर्दी विलासरावही कुणाच्या का लक्षात राहणार नाहीत?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -