घरफिचर्सप्रार्थनेचे सामर्थ्य

प्रार्थनेचे सामर्थ्य

Subscribe

समाजात आस्तिक आणि नास्तिक वाद चालूच राहणार विशेषतः हिंदू धर्मात. कारण फक्त हिंदू धर्मानेच चार्वाकाला विचार स्वातंत्र्य दिले आहे, माझे अनुभव आस्तिकाला स्वतःचे वाटतील, नास्तिकाला समजून घेण्यासाठी एकदा मनोभावे प्रार्थना करण्याचा प्रयोग करावा लागेल. कारण या प्रार्थनेचे सामर्थ्य हलव्या मनाला दर्शविणारा माझा हा अनुभव आहे.

घरातील प्रत्येकाची आवडनावड जपत त्यांच्यासाठी घरामध्ये सदैव राबणारी आई २००४ साली अचानक आजारी पडली. विचारच केला नव्हता की तिला कधीतरी ह्रदयविकाराचा झटका येईल. आई-वडील तसे आरोग्याने संपन्न होते. दोघेही कुटुंबाचा गाडा भरभक्कमपणे पुढे रेटत होते. वयाच्या ५५ व्या वर्षीही आई बाजारात जाऊन गहू, तांदूळ, भाज्या असा बाजाराच्या दोन-चार पिशव्या घेऊन तीन माळे चढून यायची. अंधेरी (प.) येथील चार बंगला येथे आम्ही राहत होतो. बिल्डींगपासून बाजार तसा लांबच होता. नेहमी धावपळ करणारी आई पाहण्याची सवय, कधीच शारीरिक तक्रार न करणारी माऊली आम्ही पाहत होतो. त्यामुळे आई-वडिलांची आरोग्य संपन्नता आम्ही सर्व भावंडे गृहीत धरत होतो. मात्र, २००४ साली धक्काच बसला. घरी कोणीही नव्हतं. घरात आई एकटीच होती. अचानक तिच्या छातीत दुखायला लागले, दम लागायला लागला. जागचे हलताच येईना. त्यामुळे दरवाजा उघडून शेजार्‍यांची मदत घेणे अशक्यच होते. अशा वेळी तिच्यासमोर एकच पर्याय दिसत होता, तो म्हणजे ईश्वर.

ती सर्व ताकदीनिशी उठून देव्हार्‍यासमोर गेली आणि अक्षरशः विनवणी करू लागली. या क्षणाला कृष्णा तुझ्या शिवाय माझ्याकडे कुणीही नाही, तूच मला सामर्थ्य दे. काही वेळाने आई झोपून गेली. तब्बल ४ तासांनी बाबा घरी आले आणि सर्व परिस्थिती पाहिली, थोड्या वेळाने भाऊ आला आणि धावपळ सुरू झाली. आईला केईएममध्ये नेण्याचे ठरले. तिथे नेल्यावर ईसीजी काढला. डॉक्टरांनी तो पाहताच तत्काळ अ‍ॅडमिट करून घेतले. वडिलांना बोलावून घेतले आणि तुमच्या पत्नीला ह्रदयविकाराचा झटका आला आहे, दोन मोठे ब्लॉकेज आहेत. तत्काळ बायबास करावी लागेल, तीन लाख रुपयांची तयारी करून ठेवा, असे डॉक्टर बोलून मोकळे झाले. आमच्या कुटुंबावर हे मोठे संकट होते. बाबांनी मला कळवले, मी मुंबईबाहेर गेलो होतो. तत्काळ घरी परतलो आणि थेट केईएम रुग्णालय गाठले. अशा प्रकारे हॉस्पिटलच्या बेडवर आम्ही भावंडांनी आईला कधीच पाहिले नव्हते. तेव्हापासून मात्र आईची ताकद कमी होऊ लागली. बायपास करायची की नाही, यावर आता आमच्या घरामध्ये चर्चा सुरू झाली. ही मोठी शस्त्रक्रिया करून आईला कायमचे कमकुवत बनवायला नको, असा विचार माझ्या मनात सारखा येत होता.

- Advertisement -

मात्र परिस्थिती तशी स्वीकारार्ह नव्हती. मी अधिकाधिक अस्वस्थ होत गेलो. शेवटी मी श्रीकृष्णाला कळकळीने प्रार्थना सुरू केली. कुठला तरी मार्ग दाखव. दुसर्‍या दिवशी प्रेस क्लब येथे एका पत्रकार परिषदेला गेलो. मनात मात्र केईएममधील बेडवर असलेल्या आईचाच विचार होता. तर पत्रकार परिषद नेमकी आयपीसी हार्ट केअर सेंटरची होती. ‘आम्ही आता तुम्हाला ह्रदयविकारावरील अशी आधुनिक उपचार पद्धती सांगणार आहोत, ज्याने बायपासला बायपास करणे शक्य होणार आहे, अर्थात ह्रदयविकाराचा झटका आलेल्यांना बायपास करण्याची गरज भासणार नाही. केवळ काही आठवडे सलाईनमध्ये औषध देऊन त्याद्वारे उपचार केल्यास ब्लॉक निघून जाणे शक्य होणार आहे’, असे डॉ. प्रतिक्षा नामजोशी सांगत होत्या.मी माझी सर्व स्थिती त्यांना सांगितली.

त्यांनी जुहू येथील त्यांच्या सेंटरला बोलावले. मी तत्काळ केईएम गाठले. आईचा डिस्चार्ज करवून घेतला. घरी गेलो. दुसर्‍या दिवशी आईला घेऊन आयपीसी सेंटर गाठले. तिथे आईला सलाईन चढवले आणि उपचारपद्धती सुरु झाली. ही उपचारपद्धती लागू पडली. आज १५ वर्षे झाली आईला या सेंटरमधून उपचार सुरू आहेत आणि ती चालत फिरत आहे. ईश्वरावरील प्रार्थनेमुळे योग्य वेळी योग्य मार्ग कसा सापडतो.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -