घरमुंबईआयआयटी मुंबईची ‘डोकॅलिटी’;पोलिसांसाठी भारतीय बनावटीचे हेल्मेट

आयआयटी मुंबईची ‘डोकॅलिटी’;पोलिसांसाठी भारतीय बनावटीचे हेल्मेट

Subscribe

जमावाने भिरकावलेल्या दगडापासून ते हिंसक जमावाला पांगवताना जखमी होणार्‍या पोलिसांच्या डोक्याला आता अधिक सुरक्षित कवच मिळणार आहे. चिनी हेल्मेट इंडस्ट्रीची मोनोपोली मोडीत काढत आता आयआयटी मुंबईचे भारतीय बनावटीचे हेल्मेट तयार करण्यात यश मिळाले आहे.

जमावाने भिरकावलेल्या दगडापासून ते हिंसक जमावाला पांगवताना जखमी होणार्‍या पोलिसांच्या डोक्याला आता अधिक सुरक्षित कवच मिळणार आहे. या क्षेत्रात असलेली चिनी हेल्मेट इंडस्ट्रीची मोनोपोली मोडीत काढत आता आयआयटी मुंबईचे भारतीय बनावटीचे हेल्मेट तयार करण्यात यश मिळाले आहे. वापरासाठी सुलभ आणि अधिक सक्षम असे या हेल्मेटचे वैशिष्ठ्य आहे. महत्त्वाचे म्हणजे चिनी बनावटीच्या हेल्मेटच्या तुलनेत हे हेल्मेट वजनाने अधिक हलके आहे. तसेच आपत्कालीन स्थितीत मोठा आघात सहन करण्याची हेल्मेटची क्षमता आहे. आयआयटी मुंबईने या हेल्मेटला अ‍ॅन्टी रायट पोलीस हेल्मेट असे नाव दिले आहे.

चिनी बनावटीच्या हेल्मेटची सध्या मार्केटमध्ये मक्तेदारी आहे. चिनी हेल्मेट वजनाने जड आहे; पण त्याचा वापर केल्याने डोक्याला घामही अधिक येतो, अशी तक्रार पोलिसांकडून अनेकदा आली होती. सीआरपीएफ तसेच रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स, दंगल नियंत्रण पथक अशा यंत्रणेतील पोलिसांकडून हेल्मेटबाबतचा प्रतिसाद आयआयटी मुंबईने अभ्यासला होता. अधिक वेळ वापरासाठी हेल्मेट गैरसोयीचे आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळेच आयआयटी मुंबईने तयार केलेले हेल्मेट वजनाने अधिक हलके तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

चिनी हेल्मेटचे वजन जिथे १५०० ग्रॅम इतके होते. तिथेच आयआयटी मुंबईने तयार केलेले हेल्मेट १२०० ग्रॅम इतके आहे. पॉलिकार्बोनेटचा वापर हेल्मेट डिझाईनसाठी करण्यात आला आहे. चिनी बनावटीच्या हेल्मेटच्या तुलनेत काही गोष्टी हेल्मेटमधून वगळण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही गोष्टी थ्री डी प्रिटींगचा वापर करूनच डिझाईन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हेल्मेटचे वजन हलके होण्यासाठी मदत झाली आहे. हेल्मेटच्या ग्रीपसाठी रिब्जचा वापर करण्यात आला आहे. हेल्मेटमध्ये अधिक हवा खेळती राहील, याचीही काळजी घेण्यात आली आहे.

भारतीय लोकांच्या डोक्यांचा अभ्यास

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय लोकांच्या डोक्याचा आकार मोठा असतो. त्यामुळे चिनी बनावटीची हेल्मेट वापरासाठी अतिशय गैरसोयीची आहेत, असे आढळले होते. त्यामुळेच आयआयटी मुंबईच्या टीमने हेल्मेटच्या निमित्ताने भारतीय डोक्यांचा म्हणजे अर्गोनॉमिक अभ्यास केला. एबीएस पॉलिकार्बोनेटचा वापर करत हेल्मेटची थ्री डी डिझाईन करण्यात आली आहे. त्यामुळे हेल्मेट वापरासाठी अधिक सोयीस्कर झाले आहे. तसेच हेल्मेटमध्ये हवा खेळती राहण्यासाठीही मदत झाली. हेल्मेटवर आघात सहन करण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचण्यांमध्ये आयआयटीचे हेल्मेट उत्तीर्ण झाल्यानेच आता या हेल्मेटचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील पोलिसांसाठी हेल्मेट उपयुक्त ठरेल, असा विश्वास डिझाईन इनोव्हेशन सेंटरचे प्रकल्प व्यवस्थापक आशिष थुळकर यांनी व्यक्त केला. इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर विभागाचे प्रमुख बी. के. चक्रवर्ती यांनीही या प्रकल्पात महत्त्वाचे योगदान दिले आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत हा अभ्यास पूर्ण करण्यात आला आहे. तर हेल्मेटच्या कॅड मॉडेलिंगसाठी अनिकेत भगत याने मेहनत घेतली.

- Advertisement -

पेटंट दाखल

चिनी हेल्मेटच्या तुलनेत या हेल्मेटची क्षमता, आकार, वापरासाठीची सुलभता, वजनातील घट यासारख्या गोष्टींसाठी आयआयटी मुंबईने पेटंट दाखल केले आहे. भारतीय वापरकर्त्यांच्या गरजांनुसार हे हेल्मेट तयार करण्यात आल्याचा आयआयटी मुंबईचा दावा आहे. भारतीयांच्या गरजांनुसार हेल्मेट तयार करतानाच इतर देशातील हेल्मेटचा अभ्यासही आयआयटीने केला आहे. त्यामध्ये अमेरिका, जर्मनी आणि चीन यासारख्या देशांचा समावेश आहे.

काय आहेत हेल्मेटची वैशिष्ठ्ये

– वजनास हलके
– हवा खेळती राहण्याची सुविधा
– मोठा आघात सहन करण्याची क्षमता
– वापरासाठी सुलभ

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -