घरफिचर्सशहरात कुठून आणायचं शिवार?

शहरात कुठून आणायचं शिवार?

Subscribe

आपण शहरात जन्माला आलो, मात्र शहरं आत्ता आहेत, तशीच थोडी जन्माला आलीत? शहरं हळूहळू वसतात, वाढतात आणि विकास पावतात. शहराच्या वाढण्याचा इतिहास हा इथल्या परिसरातील डोंगर, छोटे-मोठे नदी नाले, मोकळी जागा, छोटी मोठी तळी, झाडे, रानमेवा, रानभाजी यांच्या संपण्याचा इतिहास असतो. हा इतिहास तसा कोणी शिकवणार नाही. प्राधान्याने कोणी हा इतिहास नोंदवणारदेखील नाही.

‘शिवाराशी नाळ जोडणारं शिक्षण’, हा १४ जुलैच्या ‘आपलं महानगर’मधील लेख वाचून अनेकांचे फोन आले. ग्रामीण भागातील शिक्षकांना हा लेख खूपच भावला. अनेकानी नवीन उपक्रम सुरु करण्याबद्दल त्यांचे नियोजन सांगितले. मात्र शहरी भागातील एका शिक्षकाचा एक मूलभूत प्रश्न होता. शहरात कुठून आणायचं शिवार? शहरात जर शिवारच नसेल तर नसलेल्या शिवाराशी विद्यार्थ्यांचं नाळ कसं जोडणार? या महत्वपूर्ण प्रश्नाने नवीन विषय समोर आणला. हा प्रश्न अनेक शिक्षकांचे प्रातिनिधिक प्रश्न असू शकतो. त्याबद्दल आजच्या लेखामध्ये चर्चा करूया.

अनेकदा शहरात वाढलेल्या मुलांवर विनोद होतात. शहरातील मुलांना हेही माहिती नसते की, दूध कुठून येते. दूध दुधवाला देतो किंवा पाकिटातून येते, कंपनीतून येते. हा विनोद वस्तुस्थिती थोडी रंजक करून सांगण्यासाठी वापरले जात असेल, अशी माझी धारणा होती. मात्र एका उदाहरणाने शहरातील वाढलेली मुलं आपलं परिसर, आपण खातो ते अन्न याबद्दल इतके तुटलेले असू शकतील याचं आश्चर्य वाटलं.

- Advertisement -

प्रसंग असा होता, एकदा ज्वारीमध्ये सोंडे (एका प्रकारची किडी) झाली होती, म्हणून गच्चीवर वाळत टाकली होती. एक सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा माझा शेजारी गच्चीवर आला. मला गच्चीवर ज्वारी पसरवत असतांना बघून विचारला की हे काय आहे? मला त्याचा नेमका प्रश्न उमगलाच नाही. मी म्हटलं यात किडी झालीत म्हणून हे वाळत टाकली आहे. मात्र त्याने परत प्रश्न विचारला की, हे काय आहे? त्याच्या सोबत त्याचा दुसरा एक मित्र होता. त्यालाही ज्वारी माहिती नव्हती. मला हे वास्तव समजल्यावर खूपच धक्का बसला. मात्र ज्वारी माहिती नसणे, हे वास्तव समजल्यावर याबद्दल अधिक विचार करू लागलो. थोडा वेळ विचार केला की, त्याचं क्षेत्र वेगळं, माझं क्षेत्र वेगळं. मला कुठे माहिती आहेत सॉफ्टवेअर क्षेत्रातील अशा बारीक सारीक गोष्टी. पण नंतर विचार केला, एखाद्याला आपले रोज खात असलेलं अन्न कसे काय निर्माण होते याची माहिती असू नये. मग शहरात राहणार्‍या, शहरातील शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचं शाळेमधील शिक्षणातून, शहरातील परिसर, शहराची व्यवस्था, शहराचे प्रश्न याबद्दलचं, किती समज विकसित होते. काही मोजक्या प्रयोगशील शाळांचा अपवाद वगळता याबद्दल सार्वत्रिक उदासीनता दिसून येते.

काही साधे साधे प्रश्न आहेत. जसे शहरात पाणी कुठून येतं? शहरात भाजीपाला कुठून येते? आपण वापरून झालेलं सांडपाणी नेमकं जातं कुठं? आपण रोज प्रवास करून जातो ती वाहतूक व्यवस्था कधी व कशी विकसित होत गेली? रस्त्यावर वाहनांची इतकी गर्दी आधीपासूनच आहे का? शहरातील घरे ही अशी बहुमजली कधीपासून तयार झालीत? शहरात जुनं गावठाण होतं का? ते सध्या कसं आहे? जुन्या घरांची रचना कशी होती? उन, वारा, पाऊस, थंडी आणि उकाडा यापासून वाचण्यासाठी ही आत्ताची घरे चांगली आहेत की आधीची जुनी घरे चांगली होती? हे असे साधे साधे प्रश्न घेऊन विद्यार्थ्यांचे शहरातील परिसराशी नातं जोडलं जाऊ शकतं.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना छोटी मोठी प्रकल्प कामे देता येऊ शकतात. आपल्या गल्लीतील किरणा दुकानांत किती व कोण कोणत्या प्रकारचे तांदूळ, डाळी, ज्वारी बाजरी व इतर धान्य मिळतात? आपले आई बाबा किंवा ताई, मावशी जिथून रोज भाजीपाला घेऊन येतात, तिथल्या मंडी किंवा मंडईत किती प्रकारचा इतर भाजीपाला येतो? मंडईत गेल्या काही वर्षात भाजीपाल्यांच्या प्रकारात काही बदल होत आहेत का? हा सर्व भाजीपाला आपल्या शहराच्या किती लांब वरून येतो. भाजीपाला त्यांच्या मूळच्या ठिकाणाहून आपल्यापर्यंत पोहचायला किती दिवस लागतात? कोणत्या वाहनातून येतात? त्यांना ताजे ठेवण्यासाठी कोणत्या व्यवस्थेचा वापर केला जातो? हे सगळे प्रश्न निव्वळ पर्यावरण किंवा भाजीपाला याबद्दल माहिती देणारे आहेत इतकेच नाही. या प्रश्नांचा शोध घेताना विद्यार्थी गणित, भूगोल, विज्ञान, भाषा इत्यादी विषय शिकत असतात.

बहुतेक शाळेत, खोटी खोटी आकडे, उसनवारीचे प्रसंग घेऊन शिकवलं जातं. ‘समजा अमूक याचा वेग इतका तर तमूक ठिकाणी किती वेळेत पोहचेल?’ असे गणिते सोडविण्यास सांगितली जातात. या अशा आपल्या अनुभवविश्वाच्या पलीकडील उसनवारीच्या प्रश्नापेक्षा आपल्या जीवनाशी निगडित प्रसंग, अनुभव, प्रश्न, घेऊन त्यावर चर्चा केली गेली तर शिकणं किती अर्थपूर्ण होईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील, त्याच्या स्वतःच्या परिसरातील गोष्टी येत असल्यामुळे शिकण्यात आनंद निर्माण होईल. शहराच्या परिसरात असे प्रसंग, आकडेवारी, अनुभव मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यालाच शिक्षणाचे साधन बनवलं गेलं पाहिजे.

आपण शहरात जन्माला आलो, मात्र शहरं आत्ता आहेत, तशीच थोडी जन्माला आलीत? शहरं हळूहळू वसतात, वाढतात आणि विकास पावतात. शहराच्या वाढण्याचा इतिहास हा इथल्या परिसरातील डोंगर, छोटे-मोठे नदी नाले, मोकळी जागा, छोटी मोठी तळी, झाडे, रानमेवा, रानभाजी यांच्या संपण्याचा इतिहास असतो. हा इतिहास तसा कोणी शिकवणार नाही. प्राधान्याने कोणी हा इतिहास नोंदवणारदेखील नाही. मात्र काही लोकं तरी त्या-त्या पिढीत अशी येतात, जे असे मूलभूत प्रश्न विचारतील. त्यांचा शोध घेतील. नवीन पिढीसोबत हा संवाद होणे गरजेचे आहे. शाळा ही एक अशी जागा आहे, जिथे या प्रश्नांच्या चर्चेची सुरुवात होऊ शकते.

पुणे शहरातील पाणी पुरवठा याबद्दल पाच वर्षापूर्वी अभ्यास करीत होतो. तेव्हा एक गमतीशीर बाब समजली. पाणी पुरवठा करण्यासाठी जमिनीखालून जी पाईपलाईन केलेली असते त्याची माहिती सध्या या विभागात काम करीत असणार्‍या कुणालाही नीटशी माहिती नाही. जेव्हा केव्हा एखाद्या भागातील पाणी पुरवठ्यामध्ये अडचणी येतात, पाण्याचा दाब कमी होतो किंवा पाणीच येत नाही, तेव्हा या विभागातील निवृत्त कर्मचार्‍यांना बोलावून त्यांच्याकडून यावर तोडगा शोधला जातो. आपण व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आणि व्यवस्था म्हणून आधीच्या पिढीशी किती तुटलेलो आहोत याचं हे एक उदाहरण आहे.

विज्ञान तंत्रज्ञानाने विकसित वस्तू व सेवा या शहरात पहिल्यांदा आल्या. मात्र एक काळ असा होता जेव्हा शहरातही याशिवाय लोकं राहत होते, जगत होते. त्यांचे सर्व नित्याचे व्यवहार सुरळीत सुरू होते. हे समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. आजच्या इतके प्लास्टिक प्रचलित झाले नव्हते तेव्हा लोक दूध कसे आणायचे? भाजीपाला, गिरणीला धान्य, किराणा समान हे सर्व कशातून आणायचे? या सर्व प्रश्नांचा शोध घेणे म्हणजे निव्वळ स्मृतीरंजन नाही. प्लास्टिक कचर्‍याचे डोंगर कमी करणे व त्यापासूनचे वेगवेगळ्या प्रदूषण प्रश्नांचा तोडगा कदाचित या अशा प्रश्नातून सुटू शकतो.

शहरातील वेगेवगळ्या भागाला वेगवेगळी नावं असतात. जसे हौसखास, एरंडवणे, भांबुर्डे, वडाचा स्टॉप, नळ स्टॉप अशी नावे काय सांगतात? एरंडवने परिसराचा एरंडच्या झाडांशी काही संबंध आहे का? नळ स्टॉप येथे नळ होते का? असे त्या-त्या छोट्या मोठ्या शहरातील नावे, त्यांचा अर्थ, त्याचं इतिहास शोधणे हा चांगला प्रकल्प होऊ शकतो.

शहरातून वाहणार्‍या मोठ्या नद्या तितक्या आपल्याला माहिती असतात. या नद्यांना मिळणार्‍या छोट्या मोठ्या कैक उपनद्या असतील, या उपनद्यांना मिळणारे झरे असतील, त्या कुठे लुप्त झाल्या? अनेक पाण्याने भरून असणारी डबकी, तलावे, मोकळी जागा कुठे गेल्या? सध्या तिथे कोणत्या व कुणाच्या इमारती उभ्या आहेत? हे प्रश्न तसे प्रस्थापितांच्या हितसंबंधाची पोलखोल करणारे आहेत. मात्र कधीतरी हे विचारावे लागतील. ते समजून घ्यावे लागतील.

अलीकडेच पुण्यात स्मार्ट सिटी अंतर्गत जे रस्ते बनविले जात आहेत, त्यासाठी टेकड्या तोडल्या जात आहेत. त्या विरोधात पुण्यातील पर्यावरणप्रेमी, टेकडी प्रेमी लोकांनी आंदोलन केलं. टेकडी फोडण्याचे काम थांबवलं. मग व्यवस्थेकडून लोकांच्या तक्रारी ऐकून त्यांना उत्तर देण्यासाठी आलेल्या स्मार्ट सिटीच्या सीईओ राजेंद्र जगताप यांनी जमलेल्या लोकांना प्रतीप्रश्न विचारला, तुम्ही टेकडी वाचवण्यासाठी आंदोलन करीत आहात. पण शहराला, तुम्हाला रस्तेही हवे आहेत. सध्या तुम्ही राहत असलेली सगळी घरे ही कधी काळी शेतीजमिनी होत्या. तुमची घरे ही शेतीचा बळी देऊनच उभी आहेत. असे अनेक अंतरविरोध पुढे येतील.

आताची आपली शहरं कशी वाढली आहेत? त्यांनी कोणकोणत्या गोष्टी मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टींचा बळी दिलेला आहे. याची माहिती, जाणीव पुढच्या पिढीला असायला हवी. माझी मैत्रीण सारिका थोरवे तिची आठवण सांगत होती. तिच्या भागात टोपलीतून बोरं विकायला येणारा माणूस ‘बाणेरी बोरं’ अशी हाक देत, बोरं विकायचा. ती आता बाणेर भागात ती बोरं कुठे आहेत याचा शोध घेते. तिला आता ती बोरं मिळणार नाहीत. पण तिला याची जाणीव झाली की आपण आपलं शहर वाढवत असताना आपण खात असलेली आंबट गोड चवीची पौष्टिक बोरं गमवली आहेत.

विद्यार्थ्याचे वय, त्याची इयत्तानिहाय विषयक्षमता ध्यानात घेऊन यापैकी एक एक विषय घेऊन त्याचा उलगडा शहरातील शिक्षक, पालक यांनी करायला हवा. त्यातून कदाचित या नवीन पिढीला विकासाचं नवीन स्वरूप ध्यानात येईल. आपल्या इतिहासाच्या, आठवणीच्या, प्रेरणेतून वेगळ्या विकासाचे वेगळे मार्ग धुंडाळतील.

-बसवंत विठाबाई बाबाराव: (लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -