घरफिचर्सलाल, केशरी, निळे, पिवळे आंबे वेगवेगळे !

लाल, केशरी, निळे, पिवळे आंबे वेगवेगळे !

Subscribe

2013 साली जपानमध्ये युनेस्कोच्या आशिया पॅसिफिक सांस्कृतिक केंद्राने आयोजित परिसंवादात आंबा संवर्धन योजनेचे कौतुक केले. या योजनेतील एक शिक्षक धोंडीबा कुंभार यांना याविषयी माहिती देण्यासाठी जपानला बोलविण्यात आले होते. हे सर्व सुरू असताना 2014 मध्ये नव्याने सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी ही योजनाच बंद केली. आज 2019 ला ते सांगत आहेत की, त्यांना आंबे खूप आवडतात. हा किती विरोधाभास आहे.

नरेंद्र मोदी यांना आंबे आवडतात. शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन आंबे खायचे. चोरून नाही, मागून खायचे. पण आंबे टिकले पाहिजेत यासाठी काय करतात? मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी आंब्याचे संवर्धन करण्याची सुरू असलेली योजनाच बंद केली. देशातील डोंगराळ प्रदेशाच्या विकासाला चालना देण्यासाठी, राष्ट्रीय विकास मंडळाच्या शिफारसीनुसार, 1974-75 या वर्षापासून महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व गोवा या राज्यामध्ये पश्चिम घाट विकास कार्यक्रम सुरु केला होता. यात महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांतून 63 तालुक्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाअंतर्गत 2011 साली निवडक शाळांमध्ये पश्चिम घाट विशेष इको क्लब ही योजना सुरू करण्यात आली होती. अडीचशे शाळांचा यामध्ये समावेश होता. या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे यांची, योजना अंमलबजावणी करणारी टीम मिळून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम या योजनेतून केले आहेत. याचे कौतुक वनविभागातील अनेक अधिकार्‍यांनी केलं होतं.

- Advertisement -

याच योजनेतून सह्याद्रीपट्ट्यातील रायवळ आंब्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून दोनशेहून अधिक वैशिष्ठ्यपूर्ण रायवळ आंब्यांचे संवर्धन काम हाती घेण्यात आले होते. झाडांची कोयी गोळा करणे, रोपे तयार करणे, कलम बांधणे, गावागावात कलम बांधता येणारे तरुण निर्माण करण्यासाठी कार्यशाळा घेणे, हे सर्व काम जोमाने सुरू होते. 2013 साली जपानमध्ये युनेस्कोच्या आशिया पॅसिफिक सांस्कृतिक केंद्राने आयोजित परिसंवादात या संवर्धन कामाचे कौतुक करण्यात आले. या योजनेतील एक शिक्षक धोंडीबा कुंभार यांना या कामाची माहिती देण्यासाठी जपानला बोलविण्यात आले होते. हे सर्व सुरू असताना 2014 मध्ये नव्याने सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी ही योजनाच बंद केली.

आज 2019 ला ते सांगत आहेत की त्यांना आंबे खूप आवडतात. हा किती विरोधाभास आहे. मात्र त्यांना काळजी करायची गरज नाही. आजही पश्चिम घाट विशेष इको क्लबमध्ये सहभागी झालेले शिक्षक स्वयंप्रेरणेने हे काम पुढे नेण्याचे प्रयत्न करीत आहेत. योजना सुरू असती तर त्यांना थोडं बळ मिळालं असतं. शिक्षकांना अनेकदा अडचणी येतात, माहिती वेळेवर मिळत नाही, डोंगराळ भागात संसाधने उपलब्ध होत नाहीत. या सर्व समस्यांवर शिक्षक मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक चांगली योजना बंद झाल्याची खंत अनेक शिक्षक बोलून दाखवितात.

- Advertisement -

‘फळांचा राजा संकटात’ हा ‘आपलं महानगर’मधील लेख वाचून अनेक प्रतिक्रिया आल्या. काहींनी फोन करून त्यांनी गमविलेल्या आपल्या शेतीतील, बांधावरील आंब्यांबद्दल हळहळ व्यक्त केली. काहींनी सध्या वटण्याच्या वाटेवर असलेला आंबा कसा टिकवायचा याबद्दल चौकशी केली. हा लेख ऋचाने निहारला पाठवला, निहार यांनी लेख वाचून सांगलीमध्ये परसबाग जोपासणारी आपली आई प्रतिमा सप्रे यांना हा लेख पाठवला. लेख वाचून त्यांना आपल्या बागेत जुन्या रायवळ आंब्याचे कलम करायचं आहे. अकोले तालुक्यातील रवी ठोंबाडे यांनी त्याच्या बांधावरील आंबे तोडल्याची खंत बोलून दाखविली. आता गमाविलेल्या आंब्याची खंत तर असणारच, मात्र आता आलेल्या आंब्यांच्या संवर्धनासाठी कोणते प्रयत्न करता येतील याचा विचार करणे गरजेचे आहे.

पुण्यालगत मुळशी तालुक्यातील उरवडे, हे एक छोटे गाव आहे. चार वर्षांपूर्वीच्या अभ्यासात येथे आंब्यांची मोठ्या प्रमाणात विविधता आढळून आली. जवळपास पंचवीस वैशिष्ठ्यपूर्ण आंबे या गावात होते. उरवडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मामांचे गाव. आंबेडकर नेहमी तिथे यायचे. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर, सर्वधर्मांचा अभ्यास त्यांनी याच गावात बसून केलं. गावात मधगोटी नावाचा एक आंबा आहे. आंबेडकर यांनी याच झाडाजवळ आपला तंबू उभारला होता. या झाडाचे आंबे त्यांना खूप आवडायचे. आकाराने छोटा म्हणून गोटी, चवीला मधासारखा म्हणून मधगोटी. सकाळी पडलेले पाड मनसोक्त खाऊन आंबेडकर मग अभ्यासाला लागायचे.

या आंब्याला आता कीड लागली आहे. या झाडाच्या काड्या वापरून काही कलम केली आहेत. त्याची अनेक ठिकाणी लागवडही केली आहेत. एक रोप पुण्यातील यशदा येथे लावले होते. एका वर्षानंतर चांगलं वाढायला सुरू झालेलं रोप कुणीतरी कापून टाकलं. यशदाला हा ठेवा जपता आला नाही. आमचे मित्र प्रवीण थेटे यांच्या प्रयत्नातून, बाणेरच्या टेकडीवर याचेच एक कलम वाढते आहे. प्रवीण नियमित तेथे जाऊन त्याची काळजी घेतात. हिंगोली येथील ‘उगम’ संस्थेच्या आवारातदेखील आंबेडकरांना आवडणार्‍या मधगोटीचे झाड वाढत आहे. सुशीला पाईकराव व जायची पाईकराव मिळून हा ठेवा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. या झाडाची अनेकानेक कलमे व्हायला हवीत. कारण हा आंबा निव्वळ जनुकीय ठेवा नाही. हा एक सांस्कृतिक ठेवादेखील आहे.

उरवडे गावातच चोरघे वस्ती जवळ पिठूळ्या, गोटी, चीकुळ्या, शेप्या, आमट्या, तामट्या, अशी निरनिराळी आंब्याची झाडे आहेत. पिठूळ्या आंब्यामध्ये घट्ट बेसनासारखा गर असतो. खायला जेमतेम गोड. तंतू अजिबात नव्हते. गोटी आंब्याला आंबे मोठ्या प्रमाणात गुच्छात लागत असतात. आकाराला छोटी. चवीला आंबट गोड. माकडमेवा म्हणून खूप छान. परिसरातील पक्षी, माकड, खारुताई या आंब्याचा आस्वाद घेत असतात. जवळच दोन रायवळ आंब्याची झाडे होती. पहिल्याला आंबे कमी मात्र लोणच्यासाठी चांगला आंबा होता. पिकल्या नंतर गोड. तंतू मध्यम प्रमाणात होते. दुसर्‍या रायवळ आंब्याला भरमसाठ आंबे होते. मात्र या आंब्याला लवकर कीड लागते अशी माहिती कळली. यामध्ये तंतू मोठ्या प्रमाणात होते. खायला आंबट गोड होता. चीकुळ्या या आंब्यात मोठ्या प्रमाणत चिक असे. हे आंबे लोणच्यासाठी वापरले जातात अशी माहिती कळली.

अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात येणारे आंबे हे गर्दनी गावातील असतात. गर्दनीच्या आंब्याला मोठी मागणी आहे. चवीला हापूसपेक्षा चांगले आंबे असतात, असे तालुक्यातील लोक सांगतात. दोन वर्षापूर्वीच्या अभ्यासासाठी याच गावात जवळपास 20 प्रकारचे वैशिष्ठ्यपूर्ण आंबे मिळाले होते. खोबर्‍या, आखाड्या, झापाळ्या, गोधड्या, वांगी, आंबा, गुलटी किंवा गोटी आंबा, शेंद्री, हळद्या, खारकी किंवा शेंगोळी, केळ्या. खोबर्‍यासारखी चव असणारा खोबर्‍या. चवीला गोड. आकार मध्यम. आषाढापर्यंत आंबे झाडाला असतात म्हणून आखाडा. फळ मध्यम आकाराचे. खायला आंबट गोड. लोणच्यासाठी आंबे वापरले जातात.

गुलटी किंवा गोटी हा आंबा आकाराने मध्यम. चवीला गोड. रंग पिकल्यावर पूर्ण पिवळा होतो. शेंदरी आंबा आकाराला मध्यम. चवीला गोड. रस करण्यासाठी वापरतात. हळद्या आंबा आकाराला मध्यम व हळदीसारखा रंग. चवीला गोड. खारकी किंवा शेंगोळी आंबा बारीक व लांबट आकाराचा. चवीला गोड. केळ्या आंबा केळ्यासारखा लांब, चवीला मध्यम गोड. याशिवाय याच गावात गोधडी आंबा, वांगी आंबा, झापाळ्या आंबा, पुंगट आंबा अशा विशेष नावांनी ओळख असलेली आंब्याची झाडे आहेत.

बारी हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईच्या कुशीतील गाव. या ठिकाणच्या सह्याद्री डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. तीव्र उताराच्या डोंगरावरील या आंब्यांच्या झाडांचे आंबे सहसा कोणी घरी नेत नाहीत. झाडाजवळ पिकलेले आंबे तेवढे खाल्ले जातात. उरलेले आंबे जंगलातील पशुपक्षी यांच्यासाठी उपलब्ध असतात. या परिसरात दर्‍या, निळ्या किंवा निळा आंबा, गोल आंबा, पुंगट्या, बेसण्या, शेंद्य्रा, जळक्या (गोड), आमट्या असे निरनिराळे आंबे आहेत.

डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांनी दोन वर्षापूर्वी एक नाविन्यपूर्ण काम हाती घेतलं होतं. डॉ. शुक्ला हे कोल्हापूर वनविभागात उपवनसंरक्षक होते. त्यांनी पर्यावरण शिक्षण केंद्राच्या मदतीने शंभरहून अधिक प्रकारच्या गावठी आंब्याच्या कोई गोळा करून त्याची रोपवाटिका बनविली. वनविभागातील अधिकार्‍यांनी मनावर घेतल्यास अशा नाविन्यपूर्ण गोष्टी करू शकतात. जंगलात जर आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणत असतील तर जंगलातील पशुपक्षांना जंगलातच खाद्य उपलब्ध होते. सर्व पशुपक्षी खाऊन उरलेले आंबे परिसरातील गावातील लोक खाण्यासाठी वापरू शकतात.

आज काही हायब्रीड, तथाकथित सुधारित आंब्याच्या बागांमुळे गावठी आब्यांची समृद्ध विविधता आपण गमावत आहोत. गावागावात मोठ्या प्रमाणत असलेल्या आंब्यांचे आमचूर बनवले जाऊ शकते. सध्या बाजारात उपलब्ध आमचूर हे सारासाठी हजार रुपये किलो याप्रमाणे आहे. आंब्याच्या झाडाकडे जैवविविधता संवर्धनाबरोबरच उपजीविका निर्मितीच्या दृष्टीनेही पाहायला हवे. मा. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आंबे आवडतात म्हणून त्याकडे केवळ आवडीचा खाऊ म्हणून न पाहता ग्रामीण जैवसांस्कृतिक जीवनात त्याचे महत्व समजून घ्यावे. आंबा संवर्धन व आंबा आधारित उद्योगाला प्रोत्साहन द्यावे. ग्रामीण शेतकरी बांधव, गावावातील तरुणांनीही या बाबींचा नीट विचार करावा. आपल्या गावातील आंब्याची उपलब्ध झाडे, त्यांची गुणवैशिष्ठ्ये यांची माहिती जमवायला हवी. नोंदी करायला हव्यात. आपण या कामात उत्सुक असाल तर तसे कळवा. पाहूया एकत्रितपणे काय करता येईल.

-बसवंत विठाबाई बाबाराव (लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -