घरफिचर्सआई तुझंही चुकतंय...

आई तुझंही चुकतंय…

Subscribe

सर्वच तरुण माणसांची आपल्या आई बापांबद्दल तक्रार आहे. आपला तोलही सांभाळता येत नसताना फूल तोडायला जाणे, पाण्यातली कामं करणे.. प्रचंड ट्रॅफिकमधे एकट्यानं प्रवास करणे.. नाही पाहवत. आपलं स्वावलंबन हरवत चाललेल्याची चेहर्‍यावर गडद होत जाणारी हताशा लपवण्यासाठीचे प्रयत्न जिवावरही बेतू शकतात. आईसाहेब, थोडं आमचंही ऐका!

तरुणपणात दागदागिने करताना मागेपुढं न पाहणारे नवरा बायको पूर्ण म्हातारपण आल्यावर श्रवणयंत्राचे पैसे खर्च करताना, 25 हजार.. बापरे.. एवढे पैसे… अजून किती जगणारे मी… चाललंय ना तितकं चालू देत.. उगाच काय पैसे वर आलेत का?, असं म्हणतात. जो दागिना (श्रवणयंत्र) घातल्यावर आपल्याला नीट ऐकू येईल, आपण चारचौघांसारखं पुन्हा गप्पाटप्पा करू शकू, हे होणार असेल तर हरकत काय रे ते दोन कानांचे मिळून 50 हजार गेले तर. घरात पूजा करायला, भिकार्‍यांना द्यायला, अह्येर करायला, अन्नभोजन घालायला, नातेवाइकांच्या अडचणीत द्यायला पैसे असतात म्हातार्‍या माणसांकडे ! पण स्वत:च्या उपचाराकर्ता किंवा घरात एक फूलटाइम काळजी घेणारी बाई ठेवण्याकर्ता पैसे खर्च करायचं की झालं सुरू, बापरे ना बाबारे.. हा म्हंजे वायफळ खर्च.. का बुवा? आपण कमावलेलं आपल्या उतारवयात स्वत:वरच खर्च करताना पाच लाख वेळा विचार कायको? एक दिवस सर्वांना वर जायचंच आहे, तर मस्त एंजॉय करावं आणि मग मरावं ना रे. सतत सगळ्याचा भाव करायचा.. आमच्या काळात हे असं नव्हतं, तसं नव्हतं.. ठीकाय. पण आता काळ बदललेला आहे. पूर्वी अमूक पैशांत बाई काम करत असे, अजूनही घरकामाची बाई 200 रु. रेटमध्ये काम करत राहिली तर तिला भाकरीऐवजी दगड नैत का खावे लागणार.. क्या ऐसा करते हो यार.. गोची म्हणजे, घरातली ही पिकली बकुळफुलं कसली क्यूट असतात. साला त्यांना ओरडलं तर नंतर आपल्या घशाखाली घास जात नाही. पण आपल्या डोळ्यातून नद्या वाहूद्या, समुद्र रिकामे हौद्या… ही लोणच्यासारखी मुरलेली माणसं आपलं ते सोडत नाहीत.

का काहो आईबाप ज्जर्रा फ्लेक्झिबल नसतात.. का..का यांना कळत नाही की अमकं करू नकोस, हे सांगताना आपल्या मुलांनाही जड जातंय.. का का हे कळत नाही की आपले आईवडील झिजत असताना पाहवत नाही. त्यांचं पडणं झडणं आणि त्यापुढचे हाल मुलांना सहन होत नाहीत, म्हणून ती पोटतिडकीने तोंडाची मडकी वाजवत राहतात. पण ती फुटली तरी म्हातारी माणसं, तेच तेच सतत का का म्हणत राहतात की… बाबरे तूही म्हातारा झालास की माझ्यासारखा अस्साच पागल, हट्टी आणि तुझ्या मुलाचं काहीही न ऐकणारा होणारेस. म्हातारी माणसं डोळ्यातून पाणी काढतात, मुलांचं ऐकावं लागतं म्हणून. त्यांच्यापुढे नमतं घ्यावं लागतं, असं वाटतं त्यांना. ठार चूक आहे हे. यांनी मुलांना वाढवताना किती खस्ता खाल्या हे यांना सतत आठवतं. पण त्या खस्ता खात असताना मिळेल त्यात समाधान मानणारी ही मुलंच त्यांच्या आनंदाचं, उभं राहण्याचं एकमात्र कारण होती. मूल आईला जन्म देतं, असं म्हणतात. अशा मुलांनी काही सांगितलं तर ओरखडा आल्यासारखं वागायचं.  थोडंसं काम करून थकलेल्या वयस्कर आईवडिलांची जागी शरीरं आणि बंद डोळे पाहून पदरात असलेला सारा पैसा हरल्यासारखा वाटतो. हे आणू का, ते आणू का.. काही विचारलं तरी उत्तर ठरलेलं असतं… नाही. साला आपण आपल्या पैशांनी घेतो काय काय त्याची नवलाईच वाटत नाही. पण लहान असताना आईबाप आणायचे ते बिनाफिटींगचे ढगळे फ्रॉक किंवा अपरेटिपरे शर्ट.. त्या नव्या कापडाचा वास, स्पर्श.. डोकं प्याक व्हायचं आनंदाने ! ! आम्हांला पैसे खर्च करायचेत तुमच्यावर. सतत वर जायची भाषा कशाकर्ता… वर बुकिंग फूल्ल आहे !

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -