घरफिचर्सकोरोनातील नरभक्षी गिधाडे...

कोरोनातील नरभक्षी गिधाडे…

Subscribe

गिधाडं माणसाच्या किंवा जनावरांच्या मरणाची वाट पाहतात, असं म्हटलं जातं. परंतु माणसांमधली गिधाडं ही त्याहीपेक्षा वाईट आणि विकृत असतात, ही गिधाडं माणूस मरण्याआधी त्यांना जिवंत ठेवण्याचा थेट सौदा करतात. हा सौदा जिवंत राहणार्‍याच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून असतो. जो जास्त पैसे देऊ शकतो, त्याच्या जिवाचे मोल जास्त आणि त्याच्या जगण्याचा अधिकार इतरांच्या तुलनेत अधिक मोलाचा ठरवला जातो. हा अधिकार काळ्याबाजारात विकणार्‍या सात जणांच्या टोळीला पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. कोरोनावरील उपचारात महत्त्वाच्या असलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या अशाच काही गिधाडांना एफडीए आणि पोलिसांनी पकडले. मात्र गिधाडांची ही संख्या एवढीच नाही. कोरोनाच्या विषाणूपेक्षा ही गिधाडे जास्त धोकादायक आहेत. कोरोनाची लस येण्याआधीच त्यांचा बंदोबस्त व्हायला हवा.

कोरोनावरील रेमिडीसीवीर औषधांचा काळाबाजार करणारी टोळी अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबई पोलिसांच्या मदतीने नुकतीच पकडली. या टोळीचे सात सदस्य सुरुवातीला आरोपी होते. या प्रकरणात आणखी कोण गुंतलेले आहेत. आरोपींना कोणाचा वरदहस्त आहे. या टोळीमागे कोणते घटक काम करत आहेत, याचा तपास केला जात आहे. या टोळीतील आरोपी हे मेडिकल स्टोअर्स, वैद्यकीय औषधे, इंजेक्शन पुरवणारे कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे उघड होत आहे. मात्र एफडीएच्या जाळ्यात अडकलेले हे छोटे मासे आहेत.

- Advertisement -

कोरोना संकटाची देशात चाहूल लागताक्षणीच मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या लांडग्यांच्या झुंडींनी कोरोनाकडे आपलं उखळ पांढरं करण्याची आणि या परिस्थितीत कोरोनाआधीच माणसांची आर्थिक शिकार करण्याची संधी म्हणून पाहिलं होतं. शंभर कोटींपेक्षा जास्त असलेली लोकसंख्या असलेल्या देशात आणि एक कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबईसारख्या शहरात कोरोनावरील औषधासाठी रांगा लागणार हे स्पष्ट होतंच. ज्या देशात रॉकेल, इंधन, धान्य, तेल अशा जीवनावश्यक पदार्थांचा काळाबाजार ही सामान्य बाब असते त्या देशात औषधांचा काळाबाजार होणार नाही, हे खचितच शक्य नव्हतं.

व्यवस्था एखाद्याची आर्थिक क्षमता कमालीची कमी करते किंवा त्याची अशी क्षमता वाढूच नये यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या धोरणातून ही क्षमता मर्यादित ठेवली जाते. मग अशा दरिद्री झालेल्यांचे शोषण करणे त्यांच्या गरजांच्या बदल्यात त्यांना आपल्या फायद्यासाठी वापरून घेणे व्यवस्थेला सोपे जात असते. हा फायदा असा वापर करणार्‍यांसाठी थेट गुणाकारपटीत वाढत जात असतो. जगण्यासाठी आवश्यक गोष्ट घेण्याची किंवा उपलब्ध करण्याची ज्याची आर्थिक कुवत नसते त्यांना थोड्या वस्तूंचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवणे सोपे असते. अशा माणसाला व्यवस्थेकडून गरीब म्हटले जाते. अशा व्यवस्थेसाठी कोरोनासारखे संकट हे सुवर्णच नव्हे त्याहून मोलाची संधी असते. मग हे संकट कॅश करण्यासाठी समाजातील गिधाडांकडून कट केले जातात. त्यात कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनाही कोरोनाची चाचणी करण्याचे सांगितले जाते. त्यासाठी आवर्जून खासगी लॅब सुचवली जाते. या खासगी लॅबमध्ये कोरोनाची तपासणी केल्यास संदिग्धता संपुष्टात येते. संबंधित व्यक्ती निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह ठरवली जाते.

- Advertisement -

जर संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर त्यांना उपचाराचे बंधन असतेच. सोबत त्यांच्या संपर्कात येणार्‍यांचीही तपासणी करणे बंधनकारक ठरते. पुढे त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी आवश्यकतेनुसार करावी लागते. नेटवर्क मार्केटिंग किंवा मनी चेन सारख्या योजना आपण ऐकलेल्या असतात, ज्यात एका व्यक्तीने पहिल्यांदा गुंतवणूक करायची असते. त्यानंतर त्या व्यक्तीने आणखी दोन किंवा तीन किंवा पाच व्यक्तींना आपल्यासोबत संबंधित संस्थेत विशिष्ट रकमेची गुंतवणूक करायची असते, त्यानंतर पहिल्या व्यक्तीला पुढील व्यक्तींच्या गुंतवणुकीतूनही विशिष्ट हिस्सा मिळणार असल्याचे आमिष दाखवले जाते. यातील अनेक फसवणुकीच्या साखळ्या या बेकायदा पद्धतीने यंत्रणचे आर्थिक नियम डावलून चालवल्या जात असतात. कोरोनाच्या धास्तीही चाचणीच्या नावाखाली अशाच साखळी पद्धतीने पसरवून आपले उखळ पांढरे करण्याचे प्रकार सुरू असण्याची दाट शक्यता आहे. हे भीतीचे नेटवर्क मार्केटिंग काही जणांनी सुरू केले आहे. कोरोना चाचणीसाठी आलेल्या प्रत्येकाला पॉझिटिव्ह रिपोर्ट देऊन त्यांचा विशिष्ट दवाखानाच उपचारासाठी सुचवला जात होता. यात पहिल्यांदा रुग्णाची तपासणी करणारा डॉक्टर, लॅबमध्ये तपासणी करणारे आणि रिपोर्टनंतर उपचार करणारे अशी ही साखळी होती. कोरोनाच्या भीतीमध्ये आर्थिक फायद्याची संधी शोधणारी ही गिधाडं पोलिसांनी जाळ्यात पकडली होती.

अशीच आणखी काही गिधाडं भिवंडी परिसरातून पकडली होती. कोरोनाचा पहिला पेशंट केरळात आढळला नाही तोच या गिधाडांनीही संधीच्या अवकाशात घिरट्या मारणं सुरूं केलं. सुरुवात कोरोना बचावाच्या मास्कपासून झाली. वापरलेले किंवा जुने झालेले मास्क धुवून पुन्हा वापरण्याचा प्रयत्न भिवंडी पोलिसांनी हाणून पाडला होता. यावेळी अशा बेकायदा आणि निकृष्ट दर्जाच्या मास्कचे साठे पोलिसांनी जप्त केले होते. कोरोनाच्या या हतबल परिस्थितीत काही किराणा दुकानदारांमधली गिधाडंही बाहेर निघाली होती. ही गिधाडं जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला आणि धान्याची साठेबाजी करून लॉकडाऊनचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्नात होती. त्यांच्याही मुसक्या पोलिसांनी वेळीच आवळल्या होत्या. एका बाजूला डॉक्टर्स, सुरक्षा कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस यंत्रणा करोनाविरोधात जीव धोक्यात घालून लढत असताना काही गिधाडांना मात्र करोना आणि करोनाची भीती वाढण्याची प्रतीक्षा करत होते. कोरोनाच्या भीतीसोबतच त्यांचे बेकायदा धंदेही वाढणार होतेच. लॉकडाऊन काळात गरजेच्या गोष्टी ज्यात अगदी धान्यापासून मद्यापर्यंत असलेल्या वस्तू महाग झाल्या होत्या. आपले उखळ पांढरी करणारी गिधाडं अशा सर्वच ठिकाणी माणसांच्या वेषात वावरत होती. यातल्या काहींनी थेट देव मानल्या जाणार्‍या डॉक्टरांचा वेष परिधान केलेला असेल, काहींनी तपासणी करणार्‍यांचा तर काही त्यांचे मदतगार असू शकतात.

जनावर किंवा माणूस मेल्यानंतर गिधाडं त्यांना खातात. परंतु कोरोनाच्या टाळूवरचंही लोणी ओरपणारी काही गिधाडं आता थेट नरभक्षी झाली आहेत. रेमिडेसीवीर औषधाचा काळाबाजार करणार्‍या गिधाडांना एफडीआय आणि पोलिसांनी वेळीच जेरबंद केले. परंतु कोरोनाच्या भीतीच्या काळ्याकुट्ट अवकाशात आणखी काही गिधाडं दबा धरून बसलेली असतील त्यांचाही बंदोबस्त व्हायला हवाच. देशात समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची भीती देशातल्या वैद्यकीय संस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाच्या औषधांचा काळाबाजार आणि साठेबाजी होण्याची दाट शक्यता असल्याने सरकारने अशा गिधाडांवर बारीक लक्ष ठेवायला हवे. दोन चार हजारांचे किंबहुना त्याहून कमी किमतीचे उपचारातील हे महत्त्वाचे इंजेक्शन चाळीस हजारांना विकण्याचा प्रयत्न मुंबईत नुकताच उघडकीस आला.

रशियामध्ये कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी झाल्याची बातमी आली आहे. मात्र ही लस रशियातील काही धनिकांना, राजकारण्यांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींनी एप्रिल महिन्यातच दिल्याची बातमी आहे. त्यानंतर सामान्य नागरिकांसाठी ही येत्या काही दिवसात उपलब्ध होणार आहे. माणसांच्या जीवाच्या किमतीचा हा फरक साम्यवादी रशियालाही टाळता आलेला नाही. जगभरातील मानवी जीवांचे मूल्य कागदावर एकच असले तरी व्यवहारात मात्र ते कायम वेगवेगळे असते. भारतासारख्या कमालीच्या तफावतीच्या देशात तर मोठा फरक असतो. कोरोना मास्क, औषधांच्या पुरवठ्याबाबत आलेल्या अनुभवानंतर या आजाराच्या लस आल्यावर त्याची निर्मिती आणि पुरवठ्याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. घिरट्या मारणारी गिधाडं अवकाशात अजूनही आहेतच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -