दीड महिन्यानंतर पुन्हा झाला कोरोनाचा संसर्ग; दिल्लीतील घटनेनं खळबळ

coronavirus cases
प्रातिनिधिक छायाचित्र

एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होत नाही, असा एक समज होता. गेल्या काही दिवसांपासून शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यावर चर्चा देखील करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्यांना पुन्हा कधी संसर्ग होऊ शकतो का? यावर संशोधन सुरु असताना दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या हिंदूराव हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका नर्सला दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर हॉस्पिटलमधील सर्वच कर्मचारी अचंबित झाले आहेत. देशभरात आतापर्यंत हजारो कोविड योद्धे कोरोनापासून संक्रमित झाले होते. त्यापैकी काहींचा मृत्यू झाला तर अनेकांनी कोरोनावर मात करुन पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

हिंदूराव हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करणाऱ्या कृष्णामध्ये २७ मे रोजी कोरोनाचे लक्षण दिसून आले होते. त्यानंतर १ जून रोजी तिची कोरोना टेस्ट करण्यात आली. ४ जूनला तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तब्बल २१ दिवस विलगीकरण कक्षात राहिल्यानंतर कृष्णा कोरोनापासून मुक्त झाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात तिने कामाला देखील सुरुवात केली होती.

कृष्णाने २८ जूनपासून पुन्हा एकदा कोरोना वॉर्डात काम करायला सुरुवात केली होती. १४ दिवस काम केल्यानंतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना पाच दिवस क्वारंटाईन करण्यात येते आणि त्यांची पुन्हा टेस्ट करण्यात येते. १६ जुलै रोजी कृष्णाची पुन्हा टेस्ट करण्यात आली. ज्याचा अहवाल १८ जुलै रोजी आला. यावेळी रिपोर्ट बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण कृष्णा पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह होती.

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कृष्णाची पुन्हा एकदा अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये त्यांच्या शरिरात कोरोना विषाणू विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीची पर्याप्त मात्रा दिसून आली. यावर स्पष्टीकरण देताना डॉक्टरांनी सांगितले की, कदाचित कृष्णाच्या शरिरात मृत कोरोना व्हायरस असू शकतो ज्यामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखविण्यात आला असावा. हा व्हायरस निष्क्रिय असून त्याने शरिराला कोणतेही नुकसान होणार नाही.

एम्सच्या डॉक्टरांचे काय म्हणणे आहे

दिल्लीतील एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्राध्यापक नवल विक्रम यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झालीये, अशी फारशी प्रकरणे समोर आलेली नाहीत. हिंदूराव हॉस्पिटलच्या नर्सच्या शरिरात अँटी बॉडीचे पुरेसे प्रमाण आढळून आले आहे. त्यामुळे तिला कोरोनापासून सध्यातरी काही धोका नाही. तसेच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरी या नर्सपासून इतरांना संक्रमण होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले.