घरफिचर्सप्रतिसाद

प्रतिसाद

Subscribe

कर्तव्याची जाणीव करणारे हिंदू अधिवेशन
लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या आहे. मात्र, लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी तुपाशी आणि जनता उपाशी अशी स्थिती आहे. अशा लोकप्रतिनिधींवर जनतेचा अंकुश असला पाहिजे. तो कुठेच दिसत नाही. परिणामी आपल्याला कोणीही विचारणारे नाही, अशी भावना भ्रष्ट, सुस्त लोकप्रतिनिधींमध्ये रुजली आहे. भ्रष्टाचार, लाचखोरी आदी गोष्टींत सुधारणा होणारच नाही, हे असेच चालणार, आपण कुठे यांच्याशी वाद घालत बसणार?, अशी लोकभावना सिद्ध झाली आहे. मात्र, या अन्यायाविरुद्ध सनदशीरपणे लढण्यास पुढे आले पाहिजे आणि त्यांना धडा शिकवला पाहिजे, असा साधा विचारही केला जात नाही. त्यामुळे लोकशाहीत सुधारणा होत नाही. भारताची लोकसंख्या १३० कोटींहून अधिक आहे. संख्येने शेकडो कोटींत असूनही काही हजार लोकप्रतिनिधींवर जनता अंकुश ठेवू शकत नाही, हे विचार करण्यासारखे आहे. जागृत नागरिक म्हणून काय केले पाहिजे ?, राष्ट्रपती कर्तव्य कोणती? आदी गोष्टींवर मार्गदर्शन घेण्यासाठी हिंदू अधिवेशनाकडे लक्ष लागलेले असते. असे अधिवेशन २८ मे पासून गोवा येथे चालू होणार असल्याचे सोशल मीडियावरून कळले. -शकुंतला बद्दी खारघर, नवी मुंबई

पालघरवासीयांना भूकंपाची धास्ती
सातत्याने भूकंपाच्या छायेखाली वावरणार्‍या पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंप झाला आहे. रविवारी १२ मे रोजी सकाळी सात वाजता भूकंपाचे तीन धक्के या भागात जाणवले. पालघरमध्ये भूकंपाचा हा पहिलाच धक्का नाही. गेल्या चार महिन्यात पालघर, तलासरी, डहाणू या भागात भूकंपाचे ६०० हून अधिक लहान सौम्य धक्के बसले आहेत. काही महिन्यांपूर्वी या भागात सलग सहा भूकंपाचे धक्केे जाणवले होते. यावेळी आपला जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पडताना एका चिमुकलीचा जीव गेला होता. अशा तर्‍हेने सातत्याने होणार्‍या भूकंपाने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. भूकंपाचा धक्का कधी बसेल याचा नेम नसल्याने येथील नागरिक रात्री घरात न झोपता उघड्यावर झोपतात. घरापेक्षा घराबाहेरच हे लोक जास्त वेळ असतात. इतकेच काय पण या भागातील शाळादेखील वर्गखोल्यात न भरता उघड्यावर भरते. भूकंपाच्या भीतीने अनेक नागरिकांनी येथून स्थलांतर केले आहे. सुरुवातीला सौम्य वाटणार्‍या या भूकंपाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन ४.३ रिष्टर स्केलपर्यंत पोहोचली आहे. सातत्याने होणार्‍या या भूकंपाने शास्त्रज्ञदेखील बुचकळ्यात पडले आहेत. कारण या भूकंपाचा केंद्रबिंदू सातत्याने स्थलांतरित होत असल्याचे आढळून येत आहे. गुजरात राज्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ सेस्मोलॉजिकल रिसर्च (आय एस आर )तसेच नॅशनल जिओफिजीकल रिसर्च इन्स्टिट्यूट ( एन जी आर आय ) यांच्याकडील उपलब्ध माहितीनुसार प्रत्येक भूकंपाचा केंद्रबिंदू ३० ते ५० किलोमीटरच्या परिघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होत असल्याचे दिसून येत आहे. पालघरमधील भूकंप प्रवणता ही आधीच निश्चित केली असली, तरी जोवर या भूकंपाचा केंद्रबिंदू स्थिर होत नाही. तोवर भविष्यात होऊ शकणार्‍या धक्क्यांचा अंदाज वर्तवणे आणि त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे जिकरीचे होऊन बसले आहे. त्यामुळेच या भागातील नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत.
-श्याम बसप्पा ठाणेदार दौंड, पुणे

- Advertisement -

नो डाएट डे वरील लेख डोळ्यात अंजन घालणारा
६ मे २०१९च्या आपला महानगरच्या अंकात विश्व विशेष सदरात नो डाएट डे वर प्रसिद्ध झालेला ठराविक कालावधीने आहार करा हा लेख डोळ्यात अंजन घालणारा ठरला. आज धकाधकीच्या जीवनात जंक फूड, वाढलेले कामाचे तास, ताणतणाव आदी कारणांमुळे तब्येतीची हेळसांड होत आहे. परिणामी वजन वाढणे, निद्रानाश, हृदयाचे विकार आदी तब्येतीच्या तक्रारी वाढत आहेत. वाढते वजन, पोटाचा सुटलेला घेर यावर उपाय म्हणून आपण डाएट चा पर्याय निवडतो. आपले पूर्वीचे छायाचित्र पाहून आपल्याला आपल्या आजच्या तब्येतीची कीव येते. मग आपण स्वतःची पूर्वीची प्रतिमा मिळविण्यासाठी नो डाएटच्या आहारी जातो. उपाशी राहू लागतो. लेखातील मेरी इव्हान्स यंग यांची नो डाएटचा पुकार करणारी चळवळ खरोखर प्रेरणादायी आहे. सुदौल बांध्यासाठी स्वतः उपाशी राहून तब्येतीची हेळसांड करण्यात काय उपयोग? असा प्रश्न प्रत्येक डाएट फ्रेक व्यक्तीने स्वतःला विचारणे गरजेचे आहे.
-अपर्णा पाटील, नाहूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -