घरक्रीडानोवाक जोकोविचची बाजी

नोवाक जोकोविचची बाजी

Subscribe

माद्रिद ओपन टेनिस

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासला पराभूत करत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. ही स्पर्धा जिंकण्याची जोकोविचची तिसरी वेळ होती. याआधी त्याने ही स्पर्धा २०११ आणि २०१६मध्ये जिंकली होती. तसेच मास्टर्स स्पर्धेचे हे जोकोविचचे ३३वे जेतेपद होते. त्यामुळे त्याने सर्वाधिक मास्टर्स स्पर्धा जिंकण्याच्या राफेल नदालच्या विक्रमाशी बरोबरी केली.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोविचने त्सीत्सीपासचा ६-३, ६-४ असा पराभव केला. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोविचने चांगला खेळ केला. त्याने आपल्या पहिल्या दोन सर्व्हिस राखत आणि त्सीत्सीपासची पहिलीच सर्व्हिस मोडत ३-० अशी आघाडी मिळवली. यानंतर त्याला त्सीत्सीपासची सर्व्हिस मोडता आली नसली, तरी त्याने आपली सर्व्हिस राखत या सामन्याचा पहिला सेट ६-३ असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये त्सीत्सीपासने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चांगल्या खेळामुळे या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी होती. मात्र, त्सीत्सीपासची पुढील सर्व्हिस मोडत जोकोविचने ५-४ अशी आघाडी मिळवली आणि मग आपली सर्व्हिस राखत त्याने हा सेट जिंकत या स्पर्धेचे जेतेपदही मिळवले. ही स्पर्धा जिंकल्यानंतर जोकोविचने २० वर्षीय त्सीत्सीपासचे कौतुक केले. तो म्हणाला, डॉमिनिक थीमविरुद्धचा उपांत्य फेरीतील सामना जिंकणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. मात्र, त्सीत्सीपासविरुद्धच्या सामन्यात मला माझा खेळ उंचावणे गरजेचे होते. त्सीत्सीपास हा खूपच चांगला युवा खेळाडू आहे. त्याच्यात खूप प्रतिभा आहे. त्याचे या खेळात भविष्य उज्ज्वल आहे.

- Advertisement -

जोकोविच अव्वल स्थानी कायम

नोवाक जोकोविचने पुरुषांच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. माद्रिद ओपन स्पर्धा जिंकल्याचा त्याला फायदा झाला आहे. सध्या त्याच्या खात्यात १२११५ गुण आहेत. दुसर्‍या स्थानी स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल असून, त्याच्या खात्यात ७९४५ गुण आहेत. रॉजर फेडरर ५७७० गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे. ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने चौथ्या स्थानी झेप घेतली असून, त्याच्या खात्यात ४८४५ गुण आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -