घरफिचर्सथोर मार्क्सवादी विचारवंत व्लादिमिर लेनिन

थोर मार्क्सवादी विचारवंत व्लादिमिर लेनिन

Subscribe

व्लादिमिर लेनिन हे थोर मार्क्सवादी विचारवंत आणि रशियातील १९१७ च्या ऑक्टोबर (बोल्शेव्हिक) क्रांतीचे प्रमुख सूत्रधार होते. त्यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह. सायबेरियात हद्दपारीत असताना ते गुप्तपणे पक्षकार्य करीत असत, तेव्हा त्यांनी १९०१ मध्ये लेनिन हे टोपणनाव धारण केले. त्यांचा जन्म २२ एप्रिल १८७० रोजी व्होल्गा नदीकाठी सिम्बिर्स्क येथे उल्यानोव्ह कुटुंबात झाला. लेनिन यांनी सर्वोच्च गुण मिळवून शालेय शिक्षण पूर्ण केले. १८८७ मध्ये कझान विद्यापीठात कायद्याच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांच्या निदर्शनात सहभागी झाल्याच्या आरोपावरून त्यांना पकडण्यात आले व त्यांची विद्यापीठातून हकालपट्टी झाली आणि कझानमधून हद्दपार करण्यात आले. आईचे निवृत्तीवेतन आणि वारसाहक्काने आलेली थोडी मिळकत, यांवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले. पुढे त्यांना कझानला परतण्याची परवानगी मिळाली पण विद्यापीठात प्रवेश नाकारण्यात आला

त्यांनी १८८८ पासून मार्क्सवादाच्या अभ्यासाला आरंभ केला. याशिवाय त्यांच्यावर न्यिचायफ, ब्यल्यिन्स्क, हेर्टसन, चर्निशेफस्क्यई, प्यिसरयिव प्रभुतींच्या लेखनाचाही परिणाम झाला. १८९० मध्ये त्यांनी कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे रशियन भाषेत भाषांतर केले. या काळापासून त्यांच्या क्रांतिकारक राजकीय कार्याची सुरुवात झाली. गुप्त बैठकांमधून मार्क्सवादाचा प्रसार, प्रतिपक्षीयांचा प्रतिवाद, ठिकठिकाणच्या क्रांतिकारकांशी संपर्क असे प्रारंभीच्या काळात त्यांच्या कार्याचे स्वरूप होते. त्या काळात रशियात नारोदनिकी या नावाने क्रांतिकारकांचे अराज्यवादी विचारांचे गट अस्तित्वात होते. लेनिन यांनी त्यांचे विचार खोडून काढून मार्क्सवादी विचारांचा प्रसार करण्यावर भर दिला.

- Advertisement -

लेनिन यांनी मार्क्सवादात जी भर घातली, तिला ‘लेनिनवाद’ (बोल्शेव्हिकवाद) म्हणतात. याची चर्चा, मीमांसा आणि स्पष्टीकरण लेनिन यांनी लिहिलेल्या बहुविध लेखांतून आणि स्वतंत्र ग्रंथांतून पाहावयास मिळते. मार्क्सवाद हा क्रांतिकारकवर्गीय व्यवहार असून कामगारवर्गाने सत्ता संपादन करणे, हा क्रांतिकारक कृतीचा मुख्य हेतू आहे, असे लेनिन यांचे मत होते. अशा या महान मार्क्सवादी विचारवंताचे २१ जानेवारी १९२४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -