घरफिचर्ससंजय राऊत तुमचे चुकलेच!

संजय राऊत तुमचे चुकलेच!

Subscribe

राऊत यांना आजही बाळासाहेब संपादक आहेत, असे वाटते. त्यामुळे त्यांनी त्याच जोशात लिहिले, पण आता उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षाची आणि मुखपत्राची जबाबदारी आहे. आदेश त्यांचाच चालतो. बाळासाहेबांकडे दिलदारपणा आणि मीच लिहिले आहे, अशी सांगण्याची धमक होती. माझ्या लिहिण्याने वाद होणार असतील तर होऊ दे, खरे आहे तेच लिहिणाार आणि बोलणार, असा बाळासाहेबांचा शिरस्ता होता. आता मात्र तसे चित्र नाही.

शिवसेना आणि बाळासाहेब या नऊ अक्षरांची ओळख उभ्या महाराष्ट्रासह देशाला आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. शिवसेना म्हटल्यावर आपसुकच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव तोंडात येते. एक वचनी, आपल्या बोलण्यावर ठाम, मी असे बोललोच नाही किंवा शिवसेनेची ही भूमिका नाही अशी वेळ बाळासाहेबांवर कधीच आली नाही, कारण ते विचार करूनच बोलत असत. बोलल्यानंतर कुठलाही पश्चाताप नसायचा. आता शिवसेनाप्रमुखांची आठवण येण्याचे कारण म्हणजे मागील आठवड्यात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकात बुरखा बंदीच्या मुद्यावरून संपादकीय पानावरील अग्रलेखात श्रीलंकेप्रमाणे भारतातही बुरखा बंदी करण्याबाबत संपादक संजय राऊत यांनी भूमिका मांडली होती. आतापर्यंत असा समज होता की सामनात जे छापून येते ती शिवसेनेची भूमिका असते. यापूर्वी बाळासाहेब हयात असेपर्यंत संपादक म्हणून बाळासाहेबांचे नाव असायचे. आता मात्र संपादक म्हणून उद्धव ठाकरे आणि कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांची प्रिंटलाइन.

- Advertisement -

आता बाळासाहेब नाहीत आणि शिवसेनाप्रमुखांची ती ठोस भूमिकाही राहिलेली नाही. त्यामुळेच गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेने विशेषत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा, त्यांच्या यू- टर्नचीच चर्चा जास्त होते. चुकले तरी चालेल, आपल्या भूमिकेवर ठाम रहा ही प्रबोधनकारांची शिकवण बाळासाहेबांनी अंगिकारली. मात्र, उद्धव यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. स्वबळाची भाषा, कुणाशी निवडणूकपूर्व यूती करणार नाही किंवा भाजपवर इतकी कठोर आणि खालच्या पातळीवर टीका करूनही सत्तेसाठी भाजपसमोर घातलेल्या लोटांगणमुळे शिवसेनेची भूमिका दशकभरात लवचिक बनलेली बघायला मिळत आहे.

नुकतेच श्रीलंकेत बॉम्बस्फोट झाले. 250 हून अधिक निष्पापांनी जीव गमावला. श्रीलंकेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तिथल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मुस्लीम महिलांना बुरखा घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून भारतातही बुरखा बंदी केली पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली होती. ‘रावणाच्या लंकेत घडले, रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असे अग्रलेखातून विचारण्यात आले. अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

- Advertisement -

अग्रलेख प्रसिद्ध होताच शिवसेनेचे प्रवक्ते बुचकळ्यात पडले. बुरखा बंदी करावी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे का, कधी ठरली भूमिका यावर व्हॉट्सअ‍ॅप कॉल झाले आणि कुणालाच माहीत नसताना राऊत यांनी परस्पर भूमिका मांडलीच कशी यावर खलबते सुरू झाली. हळूच पक्षप्रमुखांना याबाबतची माहिती देण्यात आली. राज्यातील चारही टप्प्याचा प्रचार आणि निवडणुका संपवून ठाकरे कुटुंबिय परदेशात स्थिरावणार तोपर्यंत राऊत यांनी पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका मांडली आहे, हे पटवून देतानाच अजून लोकसभेचे तीन टप्पे शिल्लक असताना आता उगाचच कडी कशाला करायची यावर महत्त्वाचे नेते यांच्यात एकवाक्यता झाली आणि तसे पक्षप्रमुखांना कळविण्यातही आले. उद्धव हे राऊत यांच्यावर प्रचंड चिडल्याचेही सांगण्यात आले. उद्धव हे संजय राऊत यांना ओळखून असल्याने त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ प्रवक्ते आणि मीडियासॅव्ही असलेल्या डॉ. निलम गोर्‍हे यांच्यावर बुरखा बंदीची मागणी शिवसेनेची नाही हे सांगण्याची जबाबदारी टाकली. त्यामुळे लगेचच गोर्‍हे यांनी आपले मीडियातले सर्व कॉन्टॅक्ट वापरत पक्षाची अधिकृत भूमिका मांडली. शिवसेना पक्षाच्या भूमिका नेत्यांच्या बैठकीतून ठरत असतात. पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अंतिम स्वरूप येते.

’सामना’च्या संपादकीयमधील भूमिका चर्चेतून आलेली नाही त्यामुळे कदाचित हे चालू घडामोडींवर वैयक्तिक मत असू शकेल. बुरखा बंदी शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या, विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले. हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार? विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’ विरोधात कायदा करून पीडित मुस्लीम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे, असेही राऊत यांनी म्हटले होते. बुरखा बंदीच्या मागणीवरून राजकारण तापत असल्याचे दिसताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता घुमजाव केले आहे.

‘बुरखा बंदीची जितकी चर्चा श्रीलंकेत झाली नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा आपल्या देशात झाली. एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, ‘बुरखा बंदीची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण सामनाने छापले इतकाच हा विषय’ असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिल्याने मागील 30 वर्षांत पहिल्यांदाच राऊत यांना त्यांच्याच रोखठोक कॉलममध्ये खुलासा करण्याची वेळ आली. यापूर्वीही मराठा समाजाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा बोलल्याचे व्यंगचित्र मुखपत्रात छापले होते. सर्वच स्तरातून टीका झाल्यामुळे नतंर माफीही मागण्यात आली. चार वर्षांपूर्वीही महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच गुजराती आणि मारवाडींबद्दल ‘दोपहर का सामना’तून संभ्रम निर्माण करण्यात आला होता.

यावर एका शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया समर्पक होती. ज्या ज्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परदेशात असतात नेमकी तीच वेळ साधून संपादक राऊत यांची लेखणी जोरदार कशी चालते, असा सवाल विचारला जातोय. तर शिवाजीपार्कवरील एका कट्टर शिवसैनिकाची प्रतिक्रिया तिरकस पण जोरदार होती. राऊत यांचे चुकलेच. राऊत यांना आजही बाळासाहेब संपादक आहेत असे वाटते. त्यामुळे त्यांनी त्याच जोशात लिहले, पण आता उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षाची आणि मुखपत्राची जबाबदारी आहे. आदेश त्यांचाच चालतो. बाळासाहेबांकडे दिलदारपणा आणि मीच लिहले आहे, अशी सांगण्याची धमक होती. माझ्या लिहिण्याने वाद होणार असतील तर होऊ दे, खरे आहे तेच लिहणाार आणि बोलणार, असा बाळासाहेबांचा शिरस्ता होता. त्यामुळेच बाबरी मशीद पाडल्यानंतर 1992 -९३ मध्ये चौकशी सुरू झाली, तेव्हा अनेक मोठ्या नेत्यांनी एकतर ‘मी तिथे नव्हतो’ किंवा ‘कुणी केलं माहीत नाही’ किंवा ‘पाडा असं मी बोललोच नाही’ अशी भूमिका घेतली.

नंतर अचानक कुणीतरी कुजबुज सुरू केली की, मशिद पाडण्यामध्ये शिवसैनिक होते असे आम्हाला वाटते. ही कुजबुज बाळासाहेबांपर्यंत पोहोचली. जर ही मशिद पाडण्यात शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे,अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली. हे कोणत्याही मुरलेल्या राजकारण्याचं लक्षण नसेल तर त्या अर्थाने बाळासाहेब राजकारणी नव्हते. कारण ज्या वेळी सर्व भाजप, विहिंप, आरएसएसचे वरिष्ठ आपण त्यात नाही असे सांगण्यात बिझी होते तेव्हा बाळासाहेबांनी ठणकावून सांगितले होते.

काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी सांगितलेला हा किस्सा आठवला. ९० च्या दशकात जे. जे. हॉस्पिटलच्या डीनना शिवसैनिकांनी उचलले होते. बाळासाहेबांना फोन गेला. फोन ठेऊन बाळासाहेब मनोहर जोशींना म्हणाले, विचारल्याशिवाय ही मुले असे का करतात? मात्र, त्यानंतर थोड्यावेळाने मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना बाळासाहेबांनी माझ्या सैनिकांनी जे केले ते योग्यच केले, अशी भूमिका घेतली. आपल्या मागे आपला सर्वोच्च नेता आहे ही बाबच कार्यकर्त्याला तेव्हा आत्मिक बळ द्यायची आणि तो सैनिक व्हायचा. त्यामुळे राऊत तुमचे चुकलेच. तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर पक्षप्रमुख म्हणून आणि संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचाच अंतिम शब्द आहे.

2002 साली शिवसेनेने प्रवक्ता नेमले. कारण बाळासाहेबांशिवाय मीडियाशी कुणीही बोलत नसायचे. राज ठाकरे काही सिलेक्टेड मीडियाशी बोलायचे. उद्धव ठाकरे हे एरियल शूटिंग आणि फोटोग्राफीतच गुंग असायचे. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी चार प्रवक्ते नेमले. ते होते शिवसेना नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, संजय राऊत आणि डॉ. निलम गोर्‍हे. आजपर्यंत शिवसेनेत एका प्रवक्त्याने मांडलेले मत दुसर्‍या प्रवक्त्याने खोडून काढल्याचे किंवा ते त्याचे वैयक्तिक मत आहे असे सांगितल्याचे ऐकिवात नाही. राऊत बोलतील तेच खरे. तीच पक्षाची भूमिका असायची. मात्र, भाजपशी उद्धव ठाकरे यांनी जुळवून घेतल्याने शिवसेनेत राऊत सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे, पण तरीही बुरखा बंदी ही शिवसेनाप्रमुखांचीच भूमिका होती, असे सांगत राऊत यांना पक्षातील नव्या समीकरणांमुळे बुरखा बंदीच्या विषयावरून माघार घ्यावी लागली हे विशेष.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -