घरफिचर्स‘अटलवादा’ची अक्षय देणगी!

‘अटलवादा’ची अक्षय देणगी!

Subscribe

स्वातंत्र्योत्तर भारतात कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याची राजकीय आणि संसदीय कारकीर्द अटलजींइतकी प्रदीर्घ झालेली नाही.(लालकृष्ण अडवाणी यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ असली, तरी ते संसदेत बरेच उशिरा आले) स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा अटलजी संघाचे प्रचारक होते आणि स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव झाला, तेव्हा पुन्हा पंतप्रधान होण्याच्या तयारीत.

टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी?
अन्तर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी।
हार नहीं मानूँगा,
रार नई ठानूँगा,
काल के कपाल पर लिखता-मिटाता हूँ,।
गीत नया गाता हूँ॥

स्वातंत्र्योत्तर भारतात कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याची राजकीय आणि संसदीय कारकीर्द अटलजींइतकी प्रदीर्घ झालेली नाही.(लालकृष्ण अडवाणी यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ असली, तरी ते संसदेत बरेच उशिरा आले) स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा अटलजी संघाचे प्रचारक होते आणि स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव झाला, तेव्हा पुन्हा पंतप्रधान होण्याच्या तयारीत. एव्हाना त्यांची मातृसंस्था असणारा संघही सत्तरीचा झाला होता. मधल्या काळात अनेक राजकीय हत्या, तीन युध्दे, असंख्य निवडणुका आर्थिक चढउतार, जातीय दंगली, आणीबाणीचे घातचक्र, घराणेशाहीची वाढती पकड, राष्ट्राच्या ऐक्याला बसलेले फुटीर आंदोलनांचे हादरे, सार्वजनिक जीवनातील वाढती असहिष्णुता, विरोधकांच्या ऐक्याचे फसवे प्रयोग, जनसंघ आणि भाजपची पराभवांच्या तडाख्यांमधून विस्तारत गेलेली वाटचाल, आर्थिक धोरणांचे दोन ध्रुव, भ्रष्टाचाराचा अजगरी विळखा, विविध जातीसमूहांना नव्याने सापडणारी लोकशाहीची धीमी पण दमदार वाटचाल… अशा सार्‍या अनुभवांतून ते गेले होते. जनसंघ स्थापन करताना गोळवलकर गुरुजी यांनी रा.स्व.संघाचे जे पूर्णवेळ प्रचारक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या हाती सोपवले, त्यातले बहुतेक कुठल्याही एका राज्यात अडकले नाहीत.

- Advertisement -

पक्षाच्या विस्तारासाठी सर्वत्र फिरत राहिले. अटलजी त्यातलेच एक. ते स्वत:च्या पहिल्यावहिल्या निवडणुकीमध्ये थेट देशाच्या प्रश्नांवर बोलू लागले. त्यामुळे ते लोकसभेत पाऊल टाकताक्षणी ‘राष्ट्रीय नेते’ झाले. लोकसभेत त्यांचे पहिले अवघ्या काही मिनिटांचे भाषण झाल्यानंतर ‘बाटलीतून आता राक्षस बाहेर आला आहे…’, हे पक्षांतर्गत स्पर्धकांनी काढलेले उद्गार अटलजींची क्षमता आणि संभाव्य झेप दाखवणारे होते. या ‘राक्षसा’कडे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांचे लक्ष गेले आणि त्यांनी सभापतींना या तरुण खासदाराला केवळ पक्षबळाचे त्रैराशिक न मांडता बोलण्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती केली. परराष्ट्र संबंधांवर अस्खलित हिंदीत बोलणार्‍या एकमेव अशा अटलजींनी हिंदीतच उत्तरे देण्याची खबरदारी आणि परदेशी पाहुण्यांना ‘संसदेतला माझा कठोर तरुण टीकाकार’, अशी ओळख करून देण्याची उमेदही पंडितजींनी दाखवली. विरोधकांबद्दल काळजातून उदार असण्याचा हा संसदीय संस्कार पुढच्या पिढ्यांनी फारसा मनावर घेतला नाही. पण अटलजींनी मात्र तो निगुतीने जपला. त्याचे प्रसन्न दर्शन वारंवार घडवले. अटलजींच्या स्वभावाशी असे वागणे जुळणारे होते.

अटलजी घरात लहान. आजोबांपासून मोठ्या भावंडांपर्यंत सर्वांचे मन:पूत प्रेम त्यांना मिळाले. वडील तर त्यांना मित्रच मानत. त्यामुळे असुरक्षेच्या भावनेने अटलजी कधी गांगरले नाहीत. त्यांचा आत्मविश्वास पहाडी संकटातही डळमळत नसे. गंगा-यमुनेच्या खोर्‍यांना जे मोकळ्या-ढाकळ्या, ऐसपैस जीवनशैलीचे वरदान लाभले आहे, ती त्यांच्यात उतरली होती. सहवासात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे उबदार स्वागत करून तिला जवळ घेण्याची मानसिक तयारी असणे, हा संघाचा संस्कार अटलजींनी पुरता आत्मसात केला होता. त्यांचे मनही निसर्गत:च स्वागतशील होते. राजकीय धावपळ करताना त्यांच्या अंतर्मनात कविता रुणझुणत असे. विविध आजारांनी आक्रमण केल्यावर कविता म्हणण्याचा आग्रह झाला की, अटलजी म्हणत, ‘अब मै कवि नहीं रहा। कवि का भूत बन गया हूँ…’, हा विनोद असला तरी विलापही असे. ही कविताच त्यांना टवटवीत ठेवत असे,. मुंबईत ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पत्रकारांनी विचारले की, ‘रुग्णशय्येवरचा वेळ कसा गेला?’ तेव्हा अटलजी म्हणाले होते, ‘तावदानांमधून दिसणारा मुंबईचा धुवाँधार पाऊस पाहताना मन हरखून जात होते..’

- Advertisement -

सभोवाराचे साकल्याने आकलन होण्यासाठी जी सखोल सहृदयता लागते, ती अटलजींकडे होती. भावनिक बुध्दीसंपदेचा (इमोशनल इंटलिजन्स) यशातील वाटा आता जगन्मान्य झाला आहे. भारताने अटजींइतकी परिपक्व भावनिक बुध्दीसंपदा असणारे नेते अपवादानेच पाहिले आहेत. जनसंघाच्या दिवसांत एकदा हिंदू-मुस्लीम दंग्यात एक छोटा मुस्लीम मुलगा गोळीबारात मारला गेला. अटलजी त्या भागात गेले, तेव्हा त्यांना हे कळले. हवा तापलेली होती. या मुलाच्या घरी जाण्याचा अटलजींनी जणू हट्टच धरला. ते गेलेही. या कृतीला राजकीय कोन असेलही; तरी वेदनेला, पुत्रशोकाला धर्म, जात नसते, हे अटलजींनी दाखवून दिले होते. ‘राजा के लिए – शासक के लिए प्रजा, प्रजा में कोई भेद नही हो सकता। ना धर्म के आधार पर, ना जाति के आधार पर, ना संप्रदाय के आधार पर..’ हे गुजरात दंगलींनंतरचे त्यांचे प्रसिध्द विधान म्हणजे याच भूमिकेचा पुनरुच्चार होता.

जनसंघ हा कितीही छोटा पक्ष असला, तरी आपण त्याचे राष्ट्रीय पुढारी आहोत, हे अटलजींचे आकलन कदापि सुटले नाही. यामागे त्यांची राजकीय समज होती. तसा पंडित दीनदयाळ यांना त्यांच्याबद्दल वाटणारा विश्वासही होता. संसदेत पंडित नेहरूंशी ते कधी थेट वाद करीत, तर कधी त्यांची प्रशंसा झेलत अटलजींनी स्वत:ची राजकीय उंची वेगाने वाढवत नेली. त्या काळात देशभर काँग्रेसचा एकछत्री अंमल होता. जनसंघाला तगडे उमेदवार मिळण्याची मारामार असे. अशावेळी लोकसभेच्या तीन तीन मतदारसंघांत अर्ज भरण्यासाठी आणि पराभूतही होण्यासाठी जी हिंमत लागते, तीत अटलजी कमी पडले नाहीत. या चिकाटीमागे ‘डॉ. हेडगेवार यांनी पेरलेले बलवान हिंदूराष्ट्राचे स्वप्न’ हीच प्रेरणा होती. पुढे मात्र त्यांची राष्ट्रवादाची संकल्पना अधिक व्यापक, परिष्कृत होत गेली.

मुस्लिमांचा द्वेष न करणारे हिंदुत्व आणि पाकिस्तानचा तिरस्कार न करणारी परराष्ट्रनीती ही अटलजींची खासियत होती. अटलजी ज्या परिवारात वावरत होते, तेथे हा दृष्टीकोन न पटणारे अनेक होते. पण एकदा फाळणी झाल्यावर भारतीय लोकसंख्येचे गणित जसे बदलू शकत नाही, तसेच पाकिस्तान हा कायमचा शेजारी असणार, याची जाणीव अटलजींच्या वागण्या-बोलण्यात दिसत असे. याचबरोबर आपला तत्वविचार किंवा धोरण हे कुणाच्या सापेक्ष असता कामा नये, याची काळजी अटलजी घेत असत. अशी सापेक्षता ही संकुचित होण्यातली पहिली पायरी असते. तिला त्यांनी थारा दिला नाही. त्यामुळे कारगिल झाल्यानंतरही अटलजी पुन्हा पाकिस्तानला चर्चेची दारे कशी उघडतात, याचे अनेकांना नवल वाटले. परवेझ मुशर्रफ यांच्या आडमुठेपणाने आणि एकट्याने पत्रकार परिषद घेण्यामुळे ‘आग्रा परिषद’ फसली, तरी विजेता असूनही भारत बोलायला तयार होता, हा संदेश जगात गेलाच. नाचक्की झाली ती पाकिस्तानची. ही बोलणी करतानाही अटलजी किती सावध होते, याची आठवण त्यांचे सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दिवंगत ब्रिजेश मिश्र सांगत. ते म्हणत, ‘आम्ही मुशर्रफ यांच्यासोबत होणार्‍या चर्चेचे मुद्दे लिहून काढले आणि अटलजींना दाखवले. त्यांनी ते वाचले. त्यात चौथा मुद्दा होता, ‘परस्परांच्या भूमीवरून एकमेकांच्या विरोधात दहशतवादी कृत्ये होणार नाहीत…’ अटलजींनी पेन्सिल घेतली आणि फक्त चौथा मुद्दा वर्तुळ करून पहिल्या क्रमांकावर आणून ठेवला. तेवढ्या एका कृतीने चर्चेचा आरंभच पाकिस्तानला पेचात पकडणारा ठरला होता..’ पुढे ही परिषद फसली. पण बोलणी म्हणजे शरणागती नसते, तर ती एक राजनैतिक लढाईच असते. अटलजींचा या सुसंस्कृत लढाईवर विश्वास होता!

स्वातंत्र्यानंतर जनसंघ, कम्युनिस्ट, अकाली, हिंदू महासभा असे मोजके अपवाद वगळता स्वतंत्र पक्ष, समाजवाद्यांचे पक्षोपपक्ष, पुढे लोकदल या सार्‍यांच्या जन्मखुणा काँग्रेसच्या पत्रिकेत होत्या. अशावेळी गैरकाँग्रेसवादाचा झेंडा विश्वासार्हतेने फडकवत ठेवण्याला महत्त्व होते. जनसंघ, नंतर भाजप हे पक्ष आणि या पक्षांचे नेते म्हणून अटलजी हे ऐतिहासिक उत्तरदायित्व कधी विसरले नाहीत. काळाच्या ओघात साम्यवाद्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. विरोधकांच्या चार सरकारांना (चरणसिंह, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल) काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागला. सत्तेच्या या निसुगपणाच्या खेळात भूमिकेतले सातत्य टिकवणे म्हणजे विश्वासार्हतेत वाढ, हे समीकरण अटलजी जाणत होते. त्यामुळेच ‘आमचे राजकीय चारित्र्य पारदर्शक आहे..’ हे अटलजींचे परवलीचे वाक्य असे. भारतीय राष्ट्रवादाच्या मांडणीमुळे इतर पक्ष आणि जनसंघ यांच्यात जात्याच नैसर्गिक अंतर होते. जनता पक्षाचा फसवा प्रयोग वगळता ते राखण्यात अटलजींनी आणि इतरांनी कधी कसूर केली नाही.

यातून काँग्रेस विरोधकांचा अवकाश भाजप वाढत्या वेगाने व्यापत गेला. अमोघ वक्तृत्वाने समाजाशी चटकन नाते जोडणारा नेता अग्रभागी असल्याने हे सुकर झाले. तरीही ज्या वेगाने काँग्रेसचा र्‍हास होतो आहे, त्या वेगाने आम्ही का वाढत नाही, असा प्रश्न अटलजी आणि अडवाणी अनेकदा स्वत:लाच करत. या अपेक्षेतही काँग्रेसला खराखुरा आणि पुरेपूर पर्याय आम्ही आहोत, हा विश्वास होता. या दृष्टीने १९७७ ते ७९ हा जनता सरकाराचा काळ अटलजींच्या वाटचालीत निर्णायक ठरला. परराष्ट्र मंत्री म्हणून अटलजींनी देशालाच नव्हे, तर जगाला स्वत:चे नवे दर्शन घडवले. चीन दौरा, पाकला दोस्तीचा हात, इस्त्रायलशी अंतर राखून यासर अराफत यांची पाठराखण आणि अलिप्तता चळवळीशी पक्की बांधिलकी यांतली एकही गोष्ट जनसंघाच्या नेत्यांकडून अनेकांना अपेक्षित नव्हती. जनसंघाची प्रतिमा आणि अटलजींची व्यक्तिगत छबी यांच्यातले अंतर वाढत गेले ते इथपासून. अटलजींची प्रतिमा कांकणभर सरस होत गेली.

‘राईट मॅन इन राँग पार्टी’, अशी वर्णने होऊ लागली. पाकशी दोस्ती करण्याची भाषा भारतीय मुस्लिमांना दिलासा देणारी होती. (फाळणी पाहिलेली पिढी अजून होती. भूभाग तुटला असला, तरी नातेसंबंध तुटले नव्हते.) १९७०मध्ये भिवंडी दंगलीनंतर ‘अब हिंदू मार नहीं खायेगा..’ , अशी तिखट भाषा अटलजींनी लोकसभेत वापरली होती. त्यांनी १९७७नंतर अशी थेट भाषा वापरल्याचे उदाहरण अपवादानेच आढळेल. पुढे आयोध्या आंदोलनाच्या काही सभांमध्ये सहभागी होऊनही ते त्या उन्मादापासून कटाक्षाने दूर राहिले. आंदोलनात उतरले नाहीत. ‘आप राम की अयोध्या मे जा रहो होे, रावण की लंका मे नहीं…’, असे कारसेवकांना सुनवायला त्यांनी कमी केले नाही. भाजपने पुन्हा जनसंघाच्या अवतारात शिरावे, असे अटलजींना निश्चितच वाटत नव्हते. या काळात ते पक्षात एकाकी पडले. पण संयम आणि योग्य संधीची चाणाक्ष प्रतीक्षा, हा सर्वच अलौकिक नेत्यांचा गुणविशेष असतो.


(सारंगे दर्शने यांच्या ‘अटलजी या पुस्तकातून साभार )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -