घरफिचर्ससारांशपत्रांचा अनमोल खजिना!

पत्रांचा अनमोल खजिना!

Subscribe

पत्रास कारण की.... या पुस्तकाच्या माध्यमातून एका वेगळ्या साहित्य निर्मितीचे धाडस त्यांनी केलं आहे. अलीकडे लोप पावत चाललेले पत्र हे पुन्हा नव्याने संग्रही ठेवून ते कशा प्रकारचं लेखन होतं याचा दस्तऐवज त्यांनी या पुस्तकातून प्रकाशित केला आहे. एकंदर ४५०हून अधिक पत्रे त्यांनी या पुस्तकात प्रकाशित केली आहेत. त्यात अनेक मान्यवरांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा, संदेश, आशीर्वाद आहेत. तसेच साहित्य क्षेत्रात गेली ५० वर्षे कार्यरत असताना कार्यक्रमासाठी आलेली निमंत्रणे, त्यासाठीचा पत्रव्यवहार यात आहे. यामध्ये अनेक नामवंत मान्यवरांची उल्लेखनीय पत्रे आहेत.

टेलिफोन, मोबाईल, स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ई-मेल, इन्स्टाग्राम या अद्ययावत सुविधा अस्तित्वात येईपर्यंत संवादाचं (कम्युनिकेशन) प्रमुख साधन म्हणून पत्रव्यवहार केला जात असे. हा पत्रव्यवहार करण्यासाठी वापरले जाणारे माध्यम म्हणजे साधं पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्र जास्त लोकप्रिय होते. अलीकडच्या काळातील नवयुवक, तरुण-तरुणींना पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र माहिती नाही किंवा आता त्यांना ते उपयोगात आणण्याची गरज वाटत नाही. कारण ही प्रक्रिया जास्त वेळखाऊ आहे. पूर्वी आताच्या एवढी सुविधा नसल्याने नाईलाजास्तव पत्र लिहिण्यासाठी संवादाचे माध्यम म्हणून पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्र अत्यंत प्रचलित असं साधन मानलं जायचं. आता झपाट्याने वैज्ञानिक, अभियांत्रिकी विकास होत गेला तसं ही साधने मागे पडत चाललेली दिसतात.

आता त्यांचा फारसा वापर होत नाही. विशेषकरून प्रेमपत्रातून अतिशय कुतूहलाचा आणि जिव्हाळ्याचा विषय रेखाटला जायचा. वृत्तवाहिन्यांच्या सुरुवातीच्या काळात आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर आपल्या आवडीचा काही कार्यक्रम व्हावा हे कळवण्यासाठी किंवा आपल्याला कोणते कार्यक्रम आवडले हे सांगण्यासाठीसुद्धा पोस्टकार्डचा वापर करून पत्राद्वारे कळविले जायचे. विशेष म्हणजे पत्र त्या कार्यक्रमात वाचून दाखवले जायचे, पत्र लिहिणं हीसुद्धा एक कलात्मकता आहे. त्यातून आपली समृद्धता स्पष्ट होत असते. अभ्यासक्रमातही पत्रलेखन हा १० गुणांचा अनिवार्य प्रश्न होता. तो याचसाठी की पत्र लिहिता आलं पाहिजे. पत्र कसं लिहावं, त्यात काय मजकूर लिहावा हे शिकवलं जायचं.

- Advertisement -

३० वर्षांपूर्वी ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील ‘कबूतर जा जा’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं होतं. प्रियकर-प्रेयसी आपल्या भावना कबूतरामार्फत चिठ्ठीने व्यक्त करत म्हणून चिठ्ठीचं वजन आणि महत्त्व वाढलं होतं. चिठ्ठी आणि पत्र ही कालपरत्वे लोकप्रिय असलेली साधनं होती. पूर्वी आपल्याकडे लांबच्या गावाहून एखादा मित्र, पाहुणा आला, तो काही दिवस राहिला की आपण त्याला एसटी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर सोडायला जायचो. गाडी सुटल्यानंतर आपण त्याच्या गाडीच्या पाठीमागे धावत जाऊन घरी पोहचल्यावर पत्र पाठव, असं आवर्जून सांगायचो. पत्र ही जरी विविध प्रकारची असली, पत्राचा मजकूर वेगवेगळा असला तरी पत्राची सुरुवात मात्र सारखी असायची. पहिल्या ओळीत स. न. वि. वि. पत्रास कारण की……

पत्रास कारण की… हे प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेलं पन्नासावं पुस्तक. साहित्य विश्वात वेगळं स्थान निर्माण करणार्‍या प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांची आतापर्यंत कविता, नाटक, गझल, वैचारिक लेख, चारोळी, प्रस्तावना, समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारातील छोटी छोटी सुमारे ५० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सतत नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत ते आपली साहित्यकृती घेऊन येत असतात. १९९१ साली त्यांचा ‘निंबार’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्या नावाची साहित्य वर्तुळात चर्चा झाली.

- Advertisement -

वास्तविक पाहता निंबार हा शब्द फार लौकिक नसला तरी कोकणामध्ये निंबार म्हणजे ‘ऊन’ असा अर्थ समजला जातो. निंबार या काव्यसंग्रहात उन्हातान्हात राबणार्‍या, काबाडकष्ट करणार्‍या शेतकरी, शेतमजूर, कष्टकर्‍यांच्या जीवनाचं दर्शन आहे. निंबार उपेक्षित घटकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचं प्रतिनिधित्व करतो. त्यांची ‘रविवार हवा मला रविवार हवा’ ही बालगीतांची सीडी. आताची आघाडीची गायिका मुग्धा वैशंपायन यांनी ही गीतं गायली असून ही अभिनय गीते खूप गाजली आहेत. शुक्राचार्य गायकवाड यांचे एकंदरीत साहित्य म्हणजे बालकांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच आपलंसं करणारं आहे.

पत्रास कारण की…. या पुस्तकाच्या माध्यमातून एका वेगळ्या साहित्य निर्मितीचे धाडस त्यांनी केलं आहे. अलीकडे लोप पावत चाललेले पत्र हे पुन्हा नव्याने संग्रही ठेवून ते कशा प्रकारचं लेखन होतं याचा दस्तऐवज त्यांनी या पुस्तकातून प्रकाशित केला आहे. एकंदर ४५०हून अधिक पत्रे त्यांनी या पुस्तकात प्रकाशित केली आहेत. त्यात अनेक मान्यवरांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा, संदेश, आशीर्वाद आहेत. तसेच साहित्य क्षेत्रात गेली ५० वर्षे कार्यरत असताना कार्यक्रमासाठी आलेली निमंत्रणे, त्यासाठीचा पत्रव्यवहार यात आहे. वास्तविक पाहता ५० वर्षे जपून ठेवून पुस्तकरूपाने प्रकाशित केलेली पत्रे वाचताना वाचकांना नक्कीच आवडतील. यामध्ये अनेक नामवंत मान्यवरांची उल्लेखनीय पत्रे आहेत.

महान साहित्यिक, थोर विचारवंत वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी गायकवाड सर यांना शुभेच्छा देऊन, अभिनंदन करून आशीर्वाद दिले आहेत ते अत्यंत मोलाचे आहेत. महान कवी असं आपण ज्यांना मानतो ते नारायण सुर्वे यांनीसुद्धा आपल्या पत्रातून ‘आपल्या कविता चांगल्या आहेत. कवितांना विविध बाजही आहे,’ अशा शब्दांत अभिनंदन करून शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले आहेत. प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ‘आयुष्यातल्या उरलेल्या वाटचालीसाठी तुमच्या सद्भावनांचा मला फार मोठा आधार लाभला आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.’ साहित्य आणि साहित्यिक यांच्यात वैचारिक परिवर्तन व्हावे यासाठी क्रांतिकारी लेखन करणारे ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस लिहितात की, ‘तुमच्या कविता खूप आवडल्या. प्रस्तावना मनापासून लिहिली. खूप वेगळे मुद्दे सुचलेत. हे श्रेय तुमच्या कवितेचेच. भट्टी जाम छान जमली. मला प्रचंड समाधान वाटतं,’ अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले आहे.

प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा. हरी नरके यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, आपले लेखन परिवर्तनवादी चळवळीला कसदार बनवणारे आणि फुले-आंबेडकरी साहित्यात महत्त्वपूर्ण भर घालणारे आहे. दलित पँथरच्या संस्थापकांपैकी एक राजा ढाले यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत पहिल्याच पत्रात प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांचे कान टोचले आहेत. ते आपल्या पत्रात लिहितात की, ‘साहित्यिक हा समाजाचा दूरगामी पाहण्याचा डोळा असतो. तोच जर आंधळा गतानुगतिकतेची झापडं पांघरणारा असेल, तर समाजाला दृष्टी देऊ शकेल काय? ते पुढे असं म्हणतात की, मी आपणास हात जोडून विनंती करेन की समाजात आधीच आघाद अज्ञान पसरलेले आहे. ते वाढवण्यासाठी व जोपासण्यासाठी तुम्ही माझा वापर करू नका, तर ते कमी करण्यासाठी व त्याचा समूळ उच्छेद करण्यासाठी माझा वापर करा. म्हणजेच मी तिथे यायचे असेल तर त्या आपल्या संस्थेचे नाव तर्कशुद्ध व विचारपूर्वक ठेवले असले पाहिजे.’

या पुस्तकात अनेक मान्यवरांची बोलकी पत्रे आहेत. त्यात ज्येष्ठ साहित्यिक प्र. श्री. नेरुरकर, रवींद्र पिंगे, प्रा. भगवान भोईर, डॉ. विलास तायडे, जयवंत दळवी, भाऊ पंचभाई, दया पवार, वसंत अबाजी डहाके, वसंत बापट, प्रा. केशव मेश्राम, डॉ. गंगाधर पानतावणे, शं. ना. नवरे, प्रा. शंकर वैद्य, प्रा. भीमसेन देठे, यशवंत गायकवाड आणि मलपृष्ठावर केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं पत्र आहे.

अनेक मान्यवर साहित्यिकांनी आपल्या शुभेच्छा संदेश, अभिनंदन आणि आशीर्वाद दिलेली पत्रे जशीच्या तशी मूळ स्वरूपात छापल्याने पत्रास कारण की… या पुस्तकाची उंची वाढवली आहे. शब्द अगदी मोजके असले तरी त्या पत्रातून मिळालेला संदेश, शुभेच्छा आणि अभिप्राय या सगळ्यांचे एकत्र केलेलं गाठोडं म्हणजे प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या आयुष्याची शिदोरी आहे. एकेक पत्र वाचताना गतकाळातील आठवणी समोर उभ्या राहतील. त्यामुळे पत्रास कारण की …या पुस्तकाला फार महत्त्व आहे.

गायकवाड आणि त्यांच्या येणार्‍या पुढच्या पिढीसाठी ते दस्तऐवज असू शकेल. कारण अलीकडच्या काळात मोबाईल फोनवर संभाषण होत असल्याने लिखित स्वरूपात काहीच शिल्लक राहत नाही. पुढची पिढी जेव्हा पत्रास कारण की…हे पुस्तक वाचेल तेव्हा प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांना आलेली पत्रे कशी होती, आपण पत्र कसे लिहावे याची नोंद घेतली जाईल. हे पुस्तक वेगळ्या शैलीचं असून मला वाटतं हा गायकवाड सरांनी केलेला पहिला प्रयोग असावा. गायकवाड यांच्याकडे धनसंपत्तीचा साठा नसेल, पण पत्रांच्या खजिन्याने ते गर्भश्रीमंत आहेत हे मात्र नक्की. मुखपृष्ठ अत्यंत साजेसं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी साहित्यात नव्या साहित्यकृतीची भर पडेल आणि म्हणूनच स्वागत होईल.

— प्रदीप जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -