घरफिचर्ससारांश...आणि त्यानं नोकरीवर पाणी सोडलं!

…आणि त्यानं नोकरीवर पाणी सोडलं!

Subscribe

महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेने अनेक नवोदित कलाकारांना ओळख मिळवून दिली. प्रथमेश शिवलकर हा त्यापैकीच एक. हास्यजत्रेत प्रथमेश-श्रमेश या जोडगोळीने त्यांच्यातील कलागुणांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. त्यात प्रथमेशचा अभिनयच नव्हे तर प्रहसन लेखनाचाही मोलाचा वाटा आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रात त्याची सुरू झालेली इनिंग जेवढी मजेदार आहे तेवढीच धाडसाचीही आहे हे त्याच्यासोबतच्या गप्पांमधून उलगडत गेलं.

-संतोष खामगांवकर

प्रथमेशला जेव्हा विचारण्यात आलं की, तू अभिनेता नसतास तर?…यावर तो पटकन उत्तरला, तर मी बँकेच्या काऊंटरवर दिसलो असतो. याचं स्पष्टीकरण देताना तो सांगतो की, खरंतर या क्षेत्रात मी अपघाताने आलो. रत्नागिरी मध्ये मी, प्रथमेश आणि आमच्या मित्रांचा ग्रुप कॉलेजमध्ये विविध नाट्यस्पर्धा करता करता काही स्वतःची प्रहसन करू लागलो, पण पुढे नक्की काय करायचं हे आम्हाला काहीच क्लियर नव्हतं. त्यामुळे कॉलेज संपल्यानंतर एकीकडे नाटक वगैरे चालू असताना दुसरीकडे मी एका बँकेची प्रवेश परीक्षाही दिली होती.

- Advertisement -

परीक्षेनिमित्त मुंबईला फिरायला मिळावं म्हणून अगदी मजेतच मी ती परीक्षा दिली होती. नशिबानं मी ती परीक्षा पास झालो आणि जॉईनिंग लेटरही मला मिळालं. घरचेही बँकेची नोकरी मिळणार म्हणून खूश झाले. त्यातच भविष्यात त्या बँकेची एक शाखा रत्नागिरीत सुरू होणार असं काही संबंधितांकडून कळलं. म्हणजे प्रथमेशला रत्नागिरी शाखेत चांगल्या हुद्यावर सेटल होण्याची हमीच दिली गेली होती, पण त्याच्या बाबतीत नियतीचा काही वेगळाच डाव ठरलेला होता.

प्रथमेश सांगतो की, तुम्हाला हे थोडं फिल्मी वाटेल पण माझ्यासोबत हे घडलंय. त्याच दरम्यान मी थ्री इडियट्स चित्रपट पाहिला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी वडिलांना सांगितलं की, मला बँकेची नोकरी करायची नाही. मला अभिनय, लेखन यातच करियर करायचं आहे. यावर त्याचे बाबा म्हणाले की, वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत तू तुझ्या पायावर उभा हो एवढीच आमची इच्छा आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर प्रथमेशची पावलं स्वतःच्या आवडीच्या कामाच्या शोधात मुंबईकडे वळली, पण तुझ्या या धाडसी निर्णयाबाबत तुझ्या घरच्यांच्या प्रतिक्रिया एवढ्याच सौम्य होत्या का, असे विचारल्यावर प्रथमेशनं मनमोकळेपणानं म्हटलं की, प्रत्येक अभिनेत्याच्या, लेखकाच्या किंवा या फिल्डमधल्या माणसाच्या घरात एका वाक्य बोललं जातं की, हे भिकेचे डोहाळे आहेत आणि हे वाक्य माझ्याही घरात एक-दोनदा बोललं गेलं, पण खूप टोकाचा विरोध झाला नाही.

दहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आज महाराष्ट्राच्या हास्यजत्रेनं त्याला एक ब्रेक मिळवून दिलाय. त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहचलेला प्रथमेश रस्त्यानं चालतो तेव्हा अनेक चाहत्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया त्याला मिळतात. ते पाहून प्रथमेशच्या आईबाबांना खूप बरं वाटतं. मुख्य म्हणजे प्रथमेश शिवलकरचे आईबाबा म्हणून त्यांना ओळखलं जातं. आमच्या मुलाने जे ठरवलं ते त्यानं करून दाखवलं याचेच त्यांना खूप समाधान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -