घरफिचर्ससारांशएकदा येऊन तर बघा...धमाल मनोरंजनाची फोडणी

एकदा येऊन तर बघा…धमाल मनोरंजनाची फोडणी

Subscribe

पदोपदी उत्कंठावर्धक घटना, त्याला दिलेली धमाल विनोदाची जोड, त्यात असलेली आघाडीच्या विनोदवीरांची फळी, त्यामुळे ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटातून उत्तम व सकस विनोदाची मेजवानी आपल्याला अनुभवायला मिळते. याच चित्रपटाचा घेतलेला हा मागोवा.

– आशिष निनगुरकर

एकदा करून बघुया या उमेदीने स्पर्धा करीत एकांकिका, नाटक, टेलिव्हिजन या माध्यमात आपला ठसा उमटवत कलावंत प्रसाद खांडेकर सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर आपली मोहर उमटवण्यास सज्ज झालाय. त्याने दिग्दर्शित केलेला ‘एकदा येऊन तर बघा’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. दादा कोंडके यांच्यापासून अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे ते भारत जाधव, मकरंद अनासपुरेंपर्यंत मराठी चित्रसृष्टीला वेड्या विनोदी चित्रपटांचा वारसा लाभला आहे. गेली काही वर्षे दशक-अर्धदशक तद्दन विनोदी सिनेमांची निर्मिती जवळपास बंद झाली. त्यामुळे तंबूतील अशा सिनेमांचा हक्काचा प्रेक्षक मराठी सिनेमांपासून दूर गेला. हीच तर्‍हा हिंदीत आणि इतर भाषेत पण झाली. (आपण हॉउसफ़ुल्ल, धमाल यांच्या पार्ट्सवरून अंदाज घेऊ शकतो.)

- Advertisement -

या सर्वांची जागा आता ब्रूटल अ‍ॅक्शन सिनेमांनी घेतली आणि असे डोके घरी ठेवून चार घटका वेड्यागत हसायला लावणारे सिनेमे बनायचे कमी झाले. जे काही विनोदी सिनेमे आले तेसुद्धा सोबर सिच्युएशनल कॉमेडीवर बनत होते. (वाळवी, बाईपण) पण तरीही आपण ते सिनेमे मिस करीत होतोच. त्यातच महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू झाली, तशी ही कॉमेडी पुन्हा सुरू झाली पण सिनेमाच्या दारात ही कॉमेडी पोहचत नव्हती आणि मग प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित ‘एकदा येऊन तर बघा’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि मिस करीत असलेल्या वेगळ्याच कॉमेडीच्या त्या चार घटका आनंदाने उपभोगता आल्या.

कॉमेडी मूव्हीजला मिळणारा रिपीट ऑडियन्स दुसर्‍या कुठल्याही प्रकारच्या मूव्हीज किंवा नाटकांना मिळत नाही हे जरी खरे असले तरी एक प्रामाणिक कॉमेडी फिल्म करणे किंवा मी तर म्हणेन आधी ती लिहिणे हा सगळ्यात अवघड टास्क आहे. म्हणूनच कदाचित गेल्या काही वर्षांत आपल्याकडे रुजू झालेल्या ओटीटी नावाच्या मायाजालात कॉमेडी कंटेंट जवळपास नगण्य आहे आणि फक्त क्राईम संबंधित नव्वद टक्के सीरिज येताना दिसतात. प्रियदर्शन, गोविंदा आणि आपल्या मराठीमधल्या विनोदाचे चौरस म्हटले जाणार्‍या सम्राटांचे चित्रपट बघून आपण मोठे झालो. त्यामुळे प्रामाणिक कॉमेडीच्या बाबतीत खूप वेगळ्या अपेक्षा डोक्यात फिट आहेत.

- Advertisement -

त्यामुळेच तर आजदेखील यांच्या चित्रपटांची पारायणे केली असली तरी कुठेही लागला की परत बघत बसू वाटते, पण हा जॉनर फार रेअरली अलीकडे येत असलेल्या चित्रपटांमध्ये बघायला मिळतो. मी मुद्दाम प्रामाणिक कॉमेडी असा उल्लेख केला. कारण त्यामध्ये तो पांचटपणा किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले जोक्स नसून सिच्युएशनल कॉमेडी असते. कित्येक दिवसांनी वर म्हणालो तसे खरी कॉमेडी एन्जॉय करता आली. हा चित्रपट तो शो बघणार्‍या सर्व फॅन्ससाठी तर नक्कीच गिफ्ट आहे. फर्स्ट हाफ तर इतका कमालीचा जमून आला आहे की इंटरवलमध्ये खरंच आपण किती दिवसांनी इतके हसलो याची जाणीव झाली. वर्षाच्या सुरुवातीला ‘वाळवी’ने ती तार थोडीशी छेडली होती, पण ती फार कमी प्रमाणात कारण त्या चित्रपटाचा ट्रॅक वेगळा होता. इथे मात्र संपूर्ण टीमने पडद्यावर धमाल केली आहे.

चित्रपटात कलाकारांची फौज आहे आणि प्रत्येकाने स्वतःच्या यूएसपीने धमाल आणली आहे, पण द ग्रेट गिरीश कुलकर्णी यांचा कॉमिक इलेमेंट बघून अक्षरशः थक्क होते. असला जबरदस्त त्यांनी पूर्ण चित्रपट कॅरी केला आहे. स्वतःच्या टिपिकल टोनमधून जो लाफ्टर कनसिस्टंट ठेवतो. त्यामुळे लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी हुशारीने तो फोकस ठेवला आहे. सिच्युएशनल कॉमेडी आणि त्याला बॅकग्राऊंड वाजत असलेले “आली आली ग भागाबाई” हे मस्त सिंक झाले आहे. हा सिनेमा गिरीश सरांचा होता. यांना सीरियस करायला सांगा टॉप क्लास, खलनायक टॉप क्लास, कॉमेडी टॉपच्या टॉप क्लास केलीय. १०० पैकी ९० गुण गिरीश सर घेऊन जातात सिनेमात. गिरीश सरांना वेगळं ठेवून इतरांचा अभिनय लिहावा म्हणून अभिनय वेगळा पॉईंट मांडला आहे. ओंकार भोजने पूर्वार्धात कल्ला करतो.

नम्रता संभेराव नेहमीसारखीच भारी पण मजा आणली इतर सर्व पाहुण्या कलाकारांनी. भाऊ कदम, सयाजी शिंदे, राजेश सर, पॅडी कांबळे, विशाखा सुभेदार, सावत्या रोहित माने, वनिता खरात सगळे भारी पण या सर्वात माझ्या डोळ्यात अधिक भरला तो म्हणजे शशिकांत कारेकर. हा पोरगा लय कडक आहे राव. प्रसाद खांडेकर यांची दिग्दर्शनाची पहिलीच वेळ. त्या नजरेने पाहिले तर काम कडक केले आहे. चित्रपट लिनियर ठेवायचा प्रयत्न केलाय त्याने लिखाणात आणि दिग्दर्शनातसुद्धा. त्यामुळे डोक्याला खुराक कमी लागून कॉमेडी एन्जॉय करता आली आणि पुन्हा तेच वाक्य वापरतो प्रसाद खांडेकर यांना नॉन स्ट्राईकला उभे राहून समोरच्याला बॅटिंग करू देण्यात वेगळाच आनंद मिळतो. तेच त्याने या सिनेमात केले आहे. उत्तम चेंडू गिरीश सर आणि ओंकारच्या पदरात टाकून दुसर्‍या बाजूने विकेट पडणार नाही याची खात्री घेत तो उभा असतो.

खूप वर्षांनी अशी उत्तम कॉमेडी एन्जॉय केली आहे. डार्क हुमर आणि कॉमेडी ऑफ एररची उत्तम सांगड घालत हा सिनेमा विणलाय. असे सिनेमे थिएटरला जाऊन बघण्यात एक वेगळी मजा असते जशी स्टेडियमला जाऊन क्रिकेट बघण्यात मजा असते तशी. कधी कधी थिएटरमध्ये लोकांसोबत आपण काही मोमेन्ट अधिक एन्जॉय करतो तसेच इथेदेखील काही कॉमेडी पंच तुम्ही थिटरमध्ये अधिक एन्जॉय कराल. सिनेमाचा वेग हा रोलर कोस्टरसारखा होत होता. कधी इतका फास्ट होता की डोळ्यांचे पाते लवते ना लवते घटना घडून जायच्या आणि कधी इतका स्लो व्हायचा की सीन इतका मोठा का आहे वाटायचे.

ओंकार भोजनेचा ग्राफ कधी न आवडलेल्या ऑपशनमध्ये ओंक्याचा ग्राफ टाकेन असे वाटले नव्हते. ह्ये कार्ट (सिनेमातल्या गिरीश सरांच्या भाषेत) निस्त इतक्या उचापती करत असतंय, पण इंटरव्हलआधीचा ओंकार आणि इंटरव्हलनंतरचा ओंकार खूप बदल होता. इंटरव्हलनंतर तो कुठेतरी हरवत गेला. हा, इंटरव्हलआधी त्याच्यासोबत एक घटना होते. आता त्या घटनेमुळे त्याचा मूड अचानक डाऊन झाला असेल असे लिहिले असेल तर उत्तम लिखाण आणि अभिनय होता, पण मग इतर कलाकारांच्या मांडणीला दोष द्यावा लागेल. असो, हे नेक्स्ट टाईम बेटर होणार वाद नाही. भागाबाई वगळता गाणी काहीशी गंडली. चित्रीकरण चुकीचे झाले की नृत्य कशाला गंडलेलं ठरवावे कळत नव्हते, पण काहीतरी मिसिंग होते हे नक्की. बाकी एक इच्छा होती टेक्निकल आहे थोडीशी.

जर तुम्ही गिरीश सर, भाऊ कदम आणि सयाजी शिंदेंना या मॅड कॉमेडीमध्ये घेतले होतेच तर काही टिपिकल संवाद घेतले असते तर चालले असते, म्हणजे सयाजी सरांचा टोन आणि लूक थोडा साधू यादव (शूलमधील व्हिलन) पण कॉमिक वेने किंवा गिरीश सरांचा देऊळमधल्या केश्याचा भोळसटपणा पण पेरोडी प्रकारे घेतला असता तर छान वाटले असते. त्याने विनोदी ढंग अजून उठून आला असता आणि फॅन मोमेन्ट पण क्रियेट झाला असता. बाकी नेहमीप्रमाणे तुम्हाला जे ठरवायचे आहे ते थिएटरमध्ये सिनेमा बघून मग ठरवा. मुलगी बघायच्या आधीच नकार आणि होकार कळवू नका. उत्तम विनोदाची फोडणी आणि धमाल कॉमेडी टीमसोबत वेगळ्याच आनंदात घेऊन जाणारा हा सिनेमा थिएटरमध्ये ‘एकदा जाऊन नक्कीच बघायला हवा’.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -