घरफिचर्ससारांशसुपर वुमनची रंजक कथा बाईपण भारी देवा...

सुपर वुमनची रंजक कथा बाईपण भारी देवा…

Subscribe

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट म्हणजे आयुष्यात येणार्‍या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणार्‍या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा सार्‍यांच्या भावना मांडणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणारा आहे, म्हणूनच हा चित्रपट मनाचा ठाव घेतो व अंतर्मनाला एक वेगळी साद घालतो.

–आशिष निनगुरकर

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खुमासदार शैलीने नटलेला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट भन्नाट अनुभव देणारा आहे. या चित्रपटाची निर्मिती एमव्हीबी मीडियाच्या माधुरी भोसले यांनी केली असून बेला शिंदे आणि अजित भुरे याचे सहनिर्माते आहेत. स्त्रीची अनेक रूपे असतात. भलेही हा चित्रपट स्त्रियांच्या विश्वात रमणारा असला तरी तिच्याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येक पुरुषाला उत्सुकता असणारच आणि त्यातून बरेच काही शिकण्यासारखेही सापडेल. स्त्रियांच्या मनातील ओळखणारा नायक या अनोख्या संकल्पनेवर ‘अगं बाई अरेच्चा’ हा यशस्वी चित्रपट बनवणार्‍या दिग्दर्शक केदार शिंदेने पुन्हा स्त्रियांच्या भावविश्वावर सिनेमा बनवला आहे. अनपेक्षित नाट्यमय वळणं घेत पुढे जाणारी पटकथा आणि सर्वच कलाकारांचा अफलातून अभिनय या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेतो.

- Advertisement -

चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. जया, शशी, साधना, पल्लवी, केतकी आणि चारू या मतभेदांमुळे एकमेकींपासून दुरावलेल्या सख्ख्या बहिणींची ही कथा आहे. आपापल्या विश्वात रमलेल्या प्रत्येकीची वेगळी स्टोरी आहे. गैरसमजांमुळे सर्व जणी दुरावलेल्या असतात. अशातच शशीची विहीण एका मंगळागौर स्पर्धेत भाग घेते. तिला टक्कर देण्यासाठी आपणही स्पर्धेत सहभागी व्हावं असं शशीला वाटतं, पण तिच्याकडे टीम

नसते. यासाठी ती वेगवेगळ्या कारणांमुळे एकमेकांपासून दुरावलेल्या आपल्या पाच बहिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. यात तिला कितपत यश मिळतं आणि मंगळागौर स्पर्धा कोण जिंकतं ते चित्रपटात आहे. दिग्दर्शकाचा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम सहाही जणींनी सहजपणे केलं आहे. आज स्त्रियांनी व्यसनं करणं सामान्य झालं असलं तरी काही वर्गातील प्रेक्षकांना ते कितपत रुचेल हे सांगता येत नाही. काही लांबलचक दृश्यांना आटोपशीर घेऊन लांबी आणखी कमी करता आली असती. कथानकाला पोषक वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. ‘पिंगा’ गाणं चांगलं आहे.

- Advertisement -

शीर्षक गीत ठीक आहे. मंगळागौरीची गाणी जुन्या आठवणी जागवणारी आहेत. रोहिणी हट्टंगडी यांच्या अभिनयाच्या भिन्न छटा यात पाहायला मिळतात. वंदना गुप्तेंनी साकारलेली शशी हरहुन्नरी आहे. सुकन्या मोनेंनी नोकरदार आदर्श सून आणि सासूचा सुरेख मेळ घातला आहे. घर सांभाळून करिअर करणार्‍या स्त्रियांचे अचूक प्रतिनिधित्व दीपा परबने केलं आहे. शिल्पा नवलकर यांनी नेहमीच्याच शैलीत सहजसुंदर केतकी साकारली आहे. नवर्‍याच्या जीवावर बढाया मारणार्‍या स्त्रियांचं रूप सुचित्रा बांदेकरांनी सादर केलं आहे. बर्‍याच दिवसांनी दिसलेल्या सुरूची आडारकरनेही चांगलं काम केलं आहे. शरद पोंक्षे, स्वप्निल राजशेखर, पीयूष रानडे, तुषार दळवी यांनी चांगली साथ दिली आहे.

काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोर्‍या जाणार्‍या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या त्यांच्या पातळीवर बजावत असतात, पण आपलंच कळत नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. ‘बाईपण’ समजून घ्यायचं असेल तर बाईच व्हायला हवं का, हा प्रश्न आयुष्यात कधीतरी तुमच्याही मनात डोकावला असेल. स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाकं असल्याचं म्हटलं जातं खरं; परंतु संसारथाचा तोल सावरला जातो तो स्त्रीमुळेच, बाईपणामुळेच. म्हणूनच ‘बाईपण भारी देवा’ असं आजही एकविसाव्या शतकातील २०२३ मध्ये लेखिका वैशाली नाईक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांना लिहावं आणि पडद्यावर दाखवावं लागतंय. हे वास्तव सत्य डोळ्यांत अंजन घालणारे आहे.

वेगवेगळ्या वयोगटातील, भिन्न मानसिकतेच्या, विभिन्न परिस्थितील, सामाजिक-आर्थिक स्तरातील स्त्रीचं भावविश्व लेखिकेनं मार्मिकतेनं लिहिलं आहे. सिनेमा अनेकदा बुरसटलेल्या समाजाला चपराक लागवतो आणि प्रसंगी बारीक चिमटेदेखील काढतो. १९ वर्षांपूर्वी केदार शिंदेनं ‘अग्गबाई अरेच्चा’ या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. या सिनेमाच्या निमित्तानं त्यानं ‘बाईपण भारी देवा!’ या कहाणीची पायाभरणी यापूर्वीच केलीय. ‘पुरुषाला बाईच्या मनातील ऐकू येणं आणि तिचं बाईपण समजून घेण्याचा प्रयत्न कथानायकानं त्या सिनेमात केला होता.’

हाच धागा पकडून बाईच्या मनातील ‘भाष्य’ आता थेट तिच्या तोंडून सांगण्याचा प्रयत्न ‘बाईपण भारी देवा’ सिनेमात करण्यात आलाय. सिनेकथानकात सहा मुख्य पात्रं आहेत. या सहा स्त्रीव्यक्तिरेखांचा स्वतःचा असा ‘बाईपणा’चा प्रवास आहे. जया (रोहिणी हट्टंगडी), शशी (वंदना गुप्ते), साधना (सुकन्या कुलकर्णी), पल्लवी (सुचित्रा बांदेकर), केतकी (शिल्पा नवलकर), चारू (दीपा परब) या सहा बहिणींच्या सहा वेगवेगळ्या तर्‍हा आहेत. सिनेकथानकात त्यांचा स्वतःचा विविधरंगी जीवन प्रवास आहे, जो सिनेमाच्या उपकथानकात समर्पकपणे लेखक-दिग्दर्शकानं दाखवला आहे. या सहा बहिणींचे रंगांचे स्वतःचे असे काही प्रश्न, अडचणी आणि द्वंद्व आहेत, ज्याचं उत्तरं हुडकण्याचा प्रयत्न हे सहा ‘रंग’ या ‘स्त्री’ या करताहेत.

बाईपण समजावून सांगताना दिग्दर्शकानं कुठेही ‘स्पून फिडिंग’ केलेलं नाही. सिनेमात कथा, उपकथानकांचा गोतावळा मोठा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी आपल्या बुद्धीला पटेल, समजेल आणि पूर्वानुभावानं उमजेल या दृष्टीनं सिनेमा पाहावा. काही प्रसंग जरा जास्तच ताणलेले आहेत किंबहुना सिनेमा पूर्वार्धात आपला ‘ट्रॅक’ सोडतोय का असंही वाटत राहतं, परंतु पडद्यावरील सहा अभिनेत्रींची जुगलबंदी आपल्याला सिनेमाशी जोडून ठेवते. सहा सख्ख्या बहिणींची तोंडं वेगवेगळ्या दिशांना असतात. कोणाचं कोणाशी पटतं तर कोणाशी नाही. वेगवेगळ्या वयोगटातील प्रामुख्यानं चाळीशी पार असलेल्या या सहा जणींच्या आयुष्यात प्रत्येकीचा एक वेगळा संघर्ष सुरू असतो. दरम्यान, मंगळागौर खेळण्याची एक स्पर्धा त्यांच्या वाट्याला येते आणि त्या सहा जणींचा एकत्र प्रवास सुरू होतो. हा प्रवास त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनातील प्रश्न सोडवण्यात कसा मदत करतो? हे जाणून आणि समजून घेण्यासाठी सिनेमा पाहावा लागेल.

वंदना गुप्ते यांच्या अभिनय कौशल्याची ताकद या सिनेमात दिसते. बर्‍याच वर्षांनी अशी ‘एकहाती’ भूमिका त्यांच्या वाट्याला आली आहे. संपूर्ण सिनेमाभर त्या प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. अगदी मोजके संवाद असूनही केवळ पडद्यावरील अस्तित्वातून रोहिणी हट्टंगडी यांनी कथानकाला आधार दिला आहे. सुकन्या मोने यांची पडद्यावरील एनर्जी अफलातून आहे. दोन टोकांच्या दोन स्वभावाचे चित्रण शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर करतात. त्यांच्या अभिनयातील जागा अधोरेखित करण्याजोगी आहे. आजच्या चाळिशीतील कुटुंबवत्सल ‘वर्किंग वुमनला’ सर्वाधिक रिलेट होईल अशी व्यक्तिरेखा दीपा परबनं उत्कृष्टपणे साकारली आहे. तिच्या भूमिकेतील चढउतार प्रेक्षकांना हळवं करतात. संवाद, पटकथा उत्तम जमून आली आहे. कलादिग्दर्शकानं सर्व दृश्यपट छान उभा केला आहे. सिनेमातील गाणी आणि पार्श्वसंगीत कथानकातील रिकाम्या जागा भरण्याचं काम चोख करतात.

सिनेमात एक संवाद आहे, ‘अर्ध आयुष्य संपलं आणि लक्षात आलं, आपण स्वतःसाठी जगलोच नाही. कधीच कोणी म्हटलं नाही… थांब श्वास घे!’ हाच ‘स्वतःसाठी श्वास’ घेण्याची प्रेरणा देण्याचं काम सिनेमा करतो. हा सिनेमा जितका स्त्रियांचा आहे तितकाच तो पुरुषांचादेखील आहे. कारण तिचं ‘बाईपण’ त्याला समजून घ्यायचं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे आपण सर्व जाणून आहोत. स्त्री किंवा बाई यांचे प्रत्येकाच्या जीवनातील स्थान खूप महत्त्वाचे असते. बायकांमध्ये असलेली सुप्त शक्ती कुटुंबांना अनेक संकटांवर मात करायला मदत करते. हीच स्त्री शक्ती प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार असल्याचे दिसते. त्यामुळे या चित्रपटाचा आनंद नक्की घ्या.

–(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -