घरफिचर्ससारांशवैद्यकशास्त्रातील भारतीय स्त्रियांच्या कथा

वैद्यकशास्त्रातील भारतीय स्त्रियांच्या कथा

Subscribe

‘लेडी डॉक्टर्स’ हे कविता राव यांनी लिहिलेलं आणि उल्का राऊत यांनी मराठीत अनुवाद केलेलं पुस्तक जुलै २०२२मध्ये मधुश्री पब्लिकेशनने प्रकाशित केलंय. वैद्यकशास्त्रातल्या पहिल्या ६ भारतीय महिलांच्या संघर्षगाथा यात सांगितल्या आहेत. मूळ इंग्रजी पुस्तक ऑक्टोबर २०२१मध्ये westland books या प्रकाशनाने प्रसिद्ध केलंय. पुस्तकाच्या लेखिका आणि पत्रकार कविता राव लंडनमध्ये स्थायिक आहेत. द गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट, मिंट, द हिंदू आणि इतरही अनेक दर्जेदार वृत्तपत्रांमध्ये त्या लेखन करतात. त्यांनी लिहिलेलं ‘लेडी डॉक्टर्स’ हे तिसरं पुस्तक आहे.

–प्रवीण घोडेस्वार

लेडी डॉक्टर्स या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणार्‍या उल्का राऊत यांनी प्रारंभी काही कथांचा अनुवाद केलाय. त्यांचं ‘ऋतुशैशव’ हे पहिलं अनुवादित पुस्तक. आतापर्यंत त्यांची २० अनुवादित पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. वानगीदाखल इकिगाई, सिद्धार्थ, नेमसेक, गाईड, माफिया क्वीन्स ऑफ मुंबई, बिग बिलियन स्टार्टअप, इन द नेम ऑफ ऑनर अशी नावं सांगता येतील. या पुस्तकांत आनंदीबाई जोशी, कदंबिनी गांगुली, रखमाबाई राऊत, हेमावती सेन, मुथुलक्ष्मी रेड्डी आणि मेरी पूनेन लुकास या महिला डॉक्टर्सच्या अज्ञात पैलूंवर प्रकाशझोत टाकलाय. सहापैकी दोन स्त्रिया मराठी आहेत हे विशेष.

- Advertisement -

‘आद्य प्रवर्तक होणं सोपं नाही, पण त्यासारखी चित्ताकर्षक गोष्ट अन्य कोणतीही नाही हे मात्र खरं! दुनियेतील सर्व संपत्ती देऊ केली तरी त्या अनुभवातील एकही क्षण, अगदी वाईटातला वाईट असला तरी गमवायची माझी तयारी नाही’ या अमेरिकेतली पहिली महिला डॉक्टर एलिझाबेथ ब्लेकवेल यांच्या उद्गाराने पुस्तकातलं पहिलं प्रकरण सुरू होतं. यात इतर देशातल्या स्त्री डॉक्टरांनी त्यांना वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी, वैद्यकीय व्यवसायात प्रवेश करण्यासाठी, डॉक्टर म्हणून समाजाची स्वीकृती प्राप्त होण्यासाठी काय काय करावं लागलं याचा विस्तृत मागोवा घेतला आहे.

या स्त्री डॉक्टर्सविषयी अनेक दंतकथा, आख्यायिका जनमानसात प्रचलित होत्या. यांचाही आढावा यात घेतलाय. इजिप्त देशाची मेरीत पिताह, अथेन्स इथली पहिली महिला स्त्रीरोगतज्ज्ञ समजली जाणारी अग्नोडाईज, ब्रिटनमधली शल्यचिकित्सा विशारद डॉ. जेम्स बॅरी, अमेरिकेत वैद्यकीय पदवी मिळवणारी ब्रिटिश डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेळ, ब्रिटनमधलीच एलिझाबेथ अ‍ॅन्डरसन, सोफिया जेक्स ब्लेक आणि एडिनबर्ग विद्यापीठाने पदवी द्यायला नकार दिलेल्या सात जणी यांच्याविषयीची माहिती वाचून त्यांना किती संकटांना समोरं जावं लागलं याची प्रचिती येते. यातल्या काहींनी फक्त स्त्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालयेदेखील सुरू केली होती हे विशेष.

- Advertisement -

मराठमोळ्या आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या स्त्री डॉक्टर समजल्या जातात. त्यांच्यावर अलीकडेच मराठीत चित्रपटही आला आहे. त्यांना पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होण्याचा मान मिळाला ही वस्तुस्थिती आहे, मात्र अकाली निधनामुळे डॉक्टर म्हणून त्यांना काम करता आलं नाही. त्यांचे पती गोपाळराव मनूने सांगितलेल्या आदर्श पत्नीच्या चौकटीत बसण्यासाठी आनंदीबाईंना करावी लागलेली तारेवरची कसरत यामुळे त्यांना अकाली मृत्यू आला, असं मत व्यक्त केलं जातं. निर्माते अनंत महादेवन यांनी २०१६ मध्ये डॉ. रखमाबाई राऊत यांच्या जीवनावर चित्रपट बनवला.

त्यांनी रखमाबाई ह्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर अशी त्यांची दखल घेतली. यास बंगाली जनतेने जोरदार विरोध दर्शवला. कारण त्यांच्या मते कदंबिनी गांगुली ह्या प्रथम भारतीय महिला डॉक्टर होत. त्यांचं आयुष्य रखमाबाई किंवा आनंदीबाई यांच्यासारखं नाट्यमय, संघर्षमय नव्हतं, मात्र भारतीय स्त्री डॉक्टर्सबाबत ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या मनात खोलवर रुजलेला दूषित पूर्वग्रह नष्ट होण्यासाठी त्यांनी लढा दिला. त्यांनी हे सर्व आपल्या ८ अपत्यांना सांभाळून केलं हे विशेषच. १८९१ मध्ये बंगालमधल्या ‘बंगवासी’ नियतकालिकाने त्यांचा चक्क ‘वेश्या’ असा उल्लेख करून त्यांची अवहेलना केली.

शतकानुशतकांपासून अत्याचार सोसावा लागणार्‍या जातीमध्ये जन्मलेल्या डॉ. रखमाबाईंची कहाणी विलक्षण आहे. आनंदीबाई आणि कदंबिनी यांना त्यांच्या नवर्‍याचा संपूर्ण पाठिंबा होता, मात्र त्याचवेळी रखमाबाई नकोशा असलेल्या नवर्‍यापासून सुटका करून घेण्यासाठी निर्धाराने संघर्षरत होत्या. त्यांच्यामुळे हिंदू समाजात फार मोठी दरी पडली होती. एका बाजूला स्त्री शिक्षणासाठी झटणारे उदारमतवादी तर दुसरीकडे स्त्री शिक्षणाला कमालीचा विरोध करणारे सनातनी. रखमाबाईंमुळे बालविवाहासाठी संमती वय वाढवण्याचा कायदा करण्यात आला. टिळक आणि इतर उच्चवर्णीय हिंदू सनातनी लोकांनी रखमाबाईचा अत्यंत अर्वाच्च, हीन भाषेत अपमान केला होता.

हेमावती सेन यांचा वयाच्या ९व्या वर्षी ४५ वर्षांच्या पुरुषासोबत विवाह झाला. अवघ्या १२व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं. कुटुंबाने त्यांना वार्‍यावर सोडलं. शिक्षण नाही. अतिशय हालाखीची परिस्थिती. कोणाचीही प्रेरणा नसताना त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्धार केला. निकृष्ट दर्जाच्या वैद्यकीय विद्यालयात त्या शिकल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं लेखिकेने ‘झुंजार’ या शब्दात केलेलं वर्णन समर्पक असल्याचं वाचकांना जाणवेल.

भारतीय स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी डॉ. मुथूलक्ष्मी रेड्डी यांनी दीर्घकाळ संघर्ष केला. यासाठी त्यांनी केलेलं कार्य अत्यंत प्रेरणादायी होतं. त्यांचं आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांनी देशातली दर्जेदार कर्करोग उपचार संस्था उभी केली. शिवाय भारतातलं लहान मुलांसाठी पहिलं हॉस्पिटलही सुरू केलं. लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांनी बालविवाहबंदी कायदा होण्यासाठी खूप पाठपुरावा केला. सनातनी लोकांचा या कायद्याला तीव्र विरोध होता. सार्वजनिक जीवनात बालविवाहाला विरोध करणारे पुरुष आपल्या मुलींचा बालपणीच गुपचूप विवाह करून टाकत. या दुटप्पी वागण्याचा मुथूलक्ष्मींना संताप येऊन त्या कडाडून टीका करायच्या. त्या स्वत: देवदासीकन्या होत्या. केरळच्या मेरी पूनेन लुकास भारतातल्या किंबहुना जगातल्याही पहिल्या महिला सर्जन जनरल समजल्या जातात. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन’ इथून शिक्षण घेतलं. केरळची असामान्य सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यात मेरी यांचं योगदान अनमोल समजलं जातं.

आज भारतीय महिला मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रात योगदान देताहेत, पण या आद्य डॉक्टर्सच्या वाटेला आलेली परिस्थिती भीषण होती. कुटुंब, जात, धर्माच्या शृंखलांनी त्यांना करकचून बांधून ठेवलं होतं. ह्या बेड्या तोडण्यासाठी त्यांनी केलेला अद्भुत, असामान्य असा खडतर संघर्ष पुस्तकात चितारला आहे. ‘स्त्रियांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याची बौद्धिक क्षमताच नाही’ या गृहितकाला आव्हान देऊन या ६ महिलांनी आपल्या अलौकिक कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला. काळाच्या पडद्याआड गेलेल्या ह्या झुंजार महिलांकडून आजच्या स्त्रियांनाही नक्कीच प्रेरणा घेता येईल. खरं म्हणजे या क्रांतिकारी म्हणता येतील अशा या महिलांच्या थक्क करणार्‍या कथांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे. कविता राव यांच्या इंग्रजी पुस्तकाचा उल्का राऊत यांनी ओघवत्या भाषेत अनुवाद केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -