घरफिचर्ससारांशयेथे प्रामाणिकपणाची प्रमाणपत्रे मिळतात...

येथे प्रामाणिकपणाची प्रमाणपत्रे मिळतात…

Subscribe

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रामाणिकपणाची प्रमाणपत्रे वाटण्याचा भाजपचा अभिनव प्रयोग प्रथमच होत असल्याने लोकशाहीला मानणार्‍यांचा उर अभिमानाने भरून आला आहे. जयप्रकाश नारायण, नाथ पै, वसंत लिमये, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस आणि हो, अटलबिहारी वाजपेयी यांनासुद्धा जे कधी जमले नाही ते ‘येथे प्रामाणिकपणाची प्रमाणपत्रे वाटली जातात’ काम आताचे भाजपवाले करत आहेत. या कामाबद्दल खरेतर त्यांना नुसता मॅगसेसे पुरस्कार देऊन भागणार नाही. अत्यंत प्रामाणिकपणाचा नोबेल पुरस्कार देऊन भाजप नेत्यांचा सत्कार करायला हवा...

2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठी रांग लागली होती. जगात सर्वात प्रामाणिक लोकांचा एकमेव पक्ष असल्याचे चित्र तयार करण्यात आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी रांगा लावून प्रवेश घेतले. गळ्यात कमळाची शाल घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. रंकाचे राव झाले! भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर प्रामाणिकपणाची प्रमाणपत्रे मिळत असल्याने प्रवेशकर्त्यांच्या सफेद शर्टांवरील डाग कुठल्या कुठे गायब झाले. विरोधक औषधाला आता सापडणार नाहीत, अशा राणा भीमदेवी गर्जना झाल्या. आता भाजप एके भाजप, भाजप दुणे भाजप… असे वातावरण तयार करत ‘मी पुन्हा येईन… मीच पुन्हा येईन…’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या गेल्या. मात्र, हा फुगा फुटला आणि राव जमिनीवर आले. मात्र, महाराष्ट्रात सत्ता नसली म्हणून काय झाले, केंद्रात तर आम्हीच राजे आहोत, याचा फायदा घेऊन विरोधकांच्या मागे ईडी लावण्याचे काम सुरू आहे.

भाजप सोडून अप्रामाणिक, भ्रष्टाचारी माणसे विरोधी पक्षांमध्येच आहेत, हे कालसारखे आजही सांगितले जात आहे. आमच्याबरोबर राहिलात तरच तुम्ही प्रामाणिक आहात, नाही तर या जगात तुमच्यासारखी अप्रमाणिक माणसे शोधून सापडणार नाहीत, असे भाजपवाले शिवसेनेला उठताबसता सांगत आहेत, ते काही उगाच नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, किरीट सोमय्या यांच्या बाजूला तुम्हाला बसायचे असल्यास आधी तुम्ही प्रामाणिक असण्याची नितांत गरज आहे. यांनी आधी रबर स्टॅम्प मारून तुम्हाला प्रामाणिक असल्याचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रामाणिकपणाची प्रमाणपत्रे वाटण्याचा हा अभिनव प्रयोग प्रथमच होत असल्याने लोकशाहीला मानणार्‍यांचा उर अभिमानाने भरून आला आहे. जयप्रकाश नारायण, नाथ पै, वसंत लिमये, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस आणि हो, अटलबिहारी वाजपेयी यांनासुद्धा जे कधी जमले नाही ते ‘येथे प्रामाणिकपणाची प्रमाणपत्रे वाटली जातात’ काम आताचे भाजपवाले करत आहेत. या कामाबद्दल खरेतर त्यांना नुसता मॅगसेसे पुरस्कार देऊन भागणार नाही. अत्यंत प्रामाणिकपणाचा नोबेल पुरस्कार देऊन भाजप नेत्यांचा सत्कार करायला हवा…

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेवटच्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे विधानसभेतील आवेशपूर्ण भाषण ऐकून उर भरून आला. असा नेता आपल्या राज्याला मिळणे हे भाग्य म्हणायला हवे. अर्णब गोस्वामी, अन्वय नाईक आणि दादर नजर हवेलीचे खासदार मोहन डेलकरप्रकरणी मिठाची गुळणी धरणार्‍या फडणवीस यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करताना जो काही आवेश दाखवला तो अवाक करणारा होता. ठाकरे हे वाझेंचे वकील असून आता वाझे यांना आता दुसर्‍या वकिलाची गरज नाही, असे सांगत तपासाआधीच त्यांनी ठाकरे सरकारला अप्रामाणिक असल्याचे प्रमाणपत्र दिले. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी हे सरकार लबाड असल्याचे म्हटले आहे. लोकशाहीत सजग विरोधक हवाच, पण आपण सोडून बाकी चोर कसे? हे काही कळायला मार्ग नाही. अन्वय नाईक प्रकरणात त्यांची पत्नी फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायाची दारे ठोठावत होती, का नाही त्यांना न्याय मिळाला? हे प्रकरण थेट भाजपमित्र अर्णब गोस्वामी यांच्याशी संबंधित आहे म्हणून ते फडणवीस यांना महत्वाचे वाटत नव्हते का? नटमोगरी कंगना रानावत आणि आक्रस्ताळी अर्णब यांच्यासाठी भाजपचा जीव तीळ तीळ तुटतो. त्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर येतात, मग तोच न्याय अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांना का नाही? टीआरपी घोटाळ्यात अर्णब हे संशयित असल्याचे दिसत असताना आता भाजपची चिडीचूप का? तीच गोष्ट डेलकर यांच्या आत्महत्येविषयी सांगता येईल.

सातवेळा खासदार असलेल्या या माणसाला जो काही त्रास सहन करावा लागला तो ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहील. दादरा नगर हवेलीच्या केंद्रशासित प्रशासनाने त्यांचे इतके हाल केले की या त्यांना आत्महत्या करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही. त्यांची सुसाईड नोट हीच गोष्ट सांगत आहे. त्यांना या जगाचा निरोप घ्यावासा वाटला तोसुद्धा मुंबईत येऊन. आपल्याला मरणानंतर महाराष्ट्रच न्याय देईल, असे त्यांना वाटत असेल तर याच राज्यातील फडणवीस यांनी त्यांच्यासाठी दोन अश्रू वाहिले असते तर चालले असते. अन्वय नाईक तर आपला माणूस होता. त्यांच्यासाठी सुद्धा भाजपकडून ना चिरा, ना पणती दिसली… हा काही सत्ताधार्‍यांच्या बाजूने ढोल वाजवण्याचा प्रकार नाही. जे सत्य आहे त्यासाठी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने बोलले पाहिजे. म्हणनूच मनसूख हिरेन यांच्या पत्नीप्रमाणे अन्वय नाईक यांच्या पत्नीना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी आवाज उठवला पाहिले. डेलकर यांच्या पत्नीलाही सत्ताधार्‍यांबरोबर विरोधकांचाही आधार वाटला पाहिजे. लोकशाहीला तेच अपेक्षित आहे.

- Advertisement -

फडणवीसांची विधानसभेतील प्रचंड आवेशपूर्ण भाषणे ऐकली की थक्क व्हायला होते. एका सुरात आणि श्वासही न घेता शंकर महादेवन ब्रेथलेस स्टाईल ते जे काही तास दोन तास भाषण ठोकतात ते ऐकून जगात हेच एकमेव प्रामाणिक असल्याचा भास होतो. पण, डोके ठिकाणावर आल्यावर तो आभास असल्याची खात्री पटते. याच सभागृहात फडणवीस यांनी 2014 पूर्वी विरोधी पक्षनेते असताना मोठ्या आवेशात विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप करुन सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर काय झालं? गावितांची मुलगी 2014 ला भाजप खासदार झाली आणि ते आमदार झाले. याच सभागृहात त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजितदादा आणि तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे दिले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री प्रचंड भ्रष्ट आहेत, असे सांगतच भाजप मग सत्तेवर आले. त्यानंतर काय झालं? स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना अजितदादा किंवा तटकरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या दोघांना जेलमध्ये टाकल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असे सांगणारे फडणवीस सत्ता येताच स्वस्थ झाले. यापेक्षा भयंकर म्हणजे उलट याच अजितदादांसोबत त्यांनी रात्रीच्या अंधारात शपथ घेऊन सरकार स्थापन केले. आहे की नाही प्रामाणिकपणा…!

अगदी याच सभागृहात ते मुख्यमंत्री असताना नारायण राणेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली. त्यावेळी राणेंचा पहाण्यालायक झालेला चेहरा अनेकांना आठवत असेल. त्यानंतर काय झालं? हेच राणे भाजपचे खासदार झाले आणि त्यांचा मुलगा आमदार झाला. याच सभागृहात प्रवीण दरेकर हे संचालक असलेल्या मुंबई बँकमध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत फडणवीस कारवाईची आवाजी मागणी करायचे. त्यानंतर काय झालं? 2014 मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांनाच फडणवीस यांनी भाजपमध्ये घेतले. इतकेच नव्हे तर विधान परिषदेतून आमदार करत त्यांना थेट विधान परिषदेत भाजपचे विरोधीपक्ष नेते बनवले. आहे की नाही प्रामाणिकपणा? याच सभागृहात कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दल फडणवीसांनी एक ना अनेक आरोप केले. त्यानंतर काय झालं? विरोधी पक्षनेता असताना कृपाशंकर यांच्या घोटाळ्याची कागदे नाचवली. पण, मुख्यमंत्री, गृहमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाही, असे प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिले आणि निर्दोष सिद्ध केले. आम्हीच प्रामाणिक असल्याची प्रमाणपत्रे वाटणार, हे भाजपवाले का सांगतात त्याचे ही एक ना अनेक उदाहरणे आहेत.

2014 पूर्वी फडणवीस यांचा आवेश, आवाज आणि माहिती लय भारी वाटायची. पण, आता एक पूर्ण टर्म स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेली आहे. त्यामुळे दरवेळी प्रत्येक विषयात आपल्यालाच कळते आणि बाकीचे सर्व मूर्ख आहेत, हे मी…मी… करत चाललेले त्यांचे आकांडतांडव आता लोकांच्या सहज पचनी पडताना दिसत नाही. उलट ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसत आहेत. कारण यांच्या हातात सत्तासूत्रे असताना हे आधी ज्यांना गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी म्हणायचे त्यांना शिक्षा करायचे सोडून याच लोकांना ते जवळ करत आहेत आणि भाजप वाढवत आहेत. म्हणूनच त्यांचा मुखवटा गळून खरा चेहरा उघडा पडल्याने लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. ठाकरे सरकार सत्तेवर येऊन आता दीड वर्ष होत आले आहे. या काळात दर पंधरा दिवसांनी फडणवीस यांच्यासह भाजप नेते हे महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार, अशी आरोळी ठोकत आहेत. मात्र सरकार काही पडत नसल्याने फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या पदरी प्रचंड निराशा आलेली आहे. ही निराशा त्यांना आक्रस्ताळी करताना दिसते.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -