घरफिचर्ससारांशनिवृत्तीनाथ ः भक्ती आंदोलनाचे प्रणेते

निवृत्तीनाथ ः भक्ती आंदोलनाचे प्रणेते

Subscribe

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून येत्या २ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे. त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्तीनाथांची संजीवन समाधी आहे. याच ठिकाणी एकीकडे ज्योतिर्लिंग त्र्यंबकराज विराजमान आहेत आणि शेजारीच निवृत्तीनाथ समाधीस्थ आहेत. संत ज्ञानेश्वरांचे वडील बंधू आणि गुरू म्हणून जनमानसाला ठाऊक असणारे निवृत्तीनाथ एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत, तर मध्ययुगीन कालखंडात तत्कालीन धर्मव्यवस्थेविरुद्ध जी भूमिका निवृत्तीनाथांनी घेतली आणि जे प्रचंड भक्ती आंदोलन मधल्या काळात सुरू झालं त्याचे प्रणेते निवृत्तीनाथ आहेत. आणखीही बरेच पैलू निवृत्तीनाथांच्या व्यक्तिमत्त्वात आपल्याला दिसतात. हे सर्व पुढील काही लेखांमधून सविस्तरपणे येणारच आहे. दरम्यान, या लेखात निवृत्तीनाथांची वैचारिक पार्श्वभूमी, पूर्वपिठीका व त्यांच्या कार्याचा घेतलेला हा वेध.

–प्रा. अमर ठोंबरे

निवृत्तीनाथांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या आजोबांपासून अर्थात त्र्यंबकपंत कुलकर्णी यांच्यापासून नाथपरंपरेचा वारसा होता. नाथ संप्रदायातील गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरू, एका अर्थाने ते आजे गुरूही होते. आदिनाथ भगवान शंकरापासून चालत आलेली गुरुपरंपरा ही परंपरेप्रमाणे मच्छिंद्रनाथांपासून गोरक्षनाथ, गहिनीनाथ, मग निवृत्तीनाथ पुढे ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि पुढे निळोबांपर्यंत ही नाथपरंपरा अखंडितपणे प्रवाहित झालेली आपल्याला दिसते. कोणत्याही धर्माची प्रामुख्याने दोन अंगं असतात. एक म्हणजे त्या धर्माची विचारधारा अर्थात त्या धर्माचे तत्त्वज्ञान व दुसरे म्हणजे त्या धर्माचे आचरण, आचारधर्म यावर त्या त्या धर्माची लोकप्रियता अवलंबून असते. निवृत्तीनाथांच्या कालखंडात अनेक पंथ व उपपंथांचा गजबजाट झालेला होता.

- Advertisement -

खरा धर्म क्षीण झालेला होता. एकीकडे महानुभावांच्या मठांमधून चालणार्‍या गुप्त चर्चा, त्यांचे मुलखावेगळे काळे कपडे, सांकेतिक लिपी, त्यामुळे यादवकाळात महानुभाव पंथ तग धरू शकला नाही. दुसरीकडे याच पंथाच्या बरोबरीने वीरशैव संप्रदाय, शाक्त, जैन, आधी संप्रदायही उदयास आले, मात्र सर्वसामान्य तळागाळातील श्रमकरी वर्गाला कवेत घेऊ शकणारा समुदाय कोणत्याही धर्मपंथांमध्ये अस्तित्वात आलेला नव्हता, मात्र याच कालखंडात नाथ संप्रदायाने महाराष्ट्रात आपले भक्कम स्थान निर्माण केले होते.

खरा तर तो देशभरच होता, मात्र नाथ संप्रदायातील हठयोग हा सामान्यांच्या पलीकडे असल्याने तो केवळ योगी लोकांचाच विषय राहिला. अशा तर्‍हेने अनेक पंथ आणि उपपंथ हे तत्त्वज्ञानाने जरी मोठे असले तरीही ते लोकचळवळ बनू शकले नाहीत हे त्यांचं अपयश म्हणावं लागेल. याचवेळी महाराष्ट्रातली ही वैचारिक पडझड मराठी संतांनी ओळखली आणि सनातन अशा भागवत धर्माचे नवे विकसित रूप मध्ययुगीन काळात निर्माण केले, अधिष्ठित केले आणि भागवत धर्माची स्थापना केली. या भागवत धर्माच्या केंद्रस्थानी होते निवृत्तीनाथ आणि इथूनच पुढे खर्‍या धर्मक्रांतीला सुरुवात झाली. ती आजतागायत सुरूच आहे.

- Advertisement -

मध्ययुगीन कालखंडात यादवांची सत्ता होती. राजा रामदेवराय हा यादव काळातीलच होता, परंतु या काळामध्ये जी धर्मसत्ता होती त्या धर्मसत्तेत सामान्य माणूस हा दिशाहीन अगतिक झालेला होता. निवृत्तीनाथ आणि एकूणच संतांची मांदियाळी भागवत धर्म संप्रदायाच्या निमित्ताने या ठिकाणी अवतरली आणि तिथून पुढे यज्ञ संस्कृतीचा लोप व्हायला सुरुवात झाली. संस्कृत भाषा मागे पडून प्राकृत मराठीचा उदय झाला. लोकभाषा उदयाला आली. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, अशी प्रतिज्ञा ज्ञानदेवांनी केली. अर्थात त्यासाठी विठ्ठलपंतांना तत्कालीन धर्मरक्षकांनी ठोठावलेला मृत्युदंड हा या भागवत धर्म संस्थापनेमागचेही एक कारण ठरले.

आपल्या पित्याला स्वजातीत जन्माला येऊनसुद्धा कर्मठ धर्मरक्षकांनी मृत्युपंथाला लावले हे विष पचवूनदेखील ही भावंडं धर्माचरणाने वागत होती. धर्म केवळ काटेरी कुंपणांचा नसतो, तर त्याला मानवी मायेची एक किनार असते आणि धर्माच्या पखाली वाहून नेणारी माणसं रेड्यासारखी नसतात. माणसाच्या सुखदुःखांचा स्पर्श धर्माच्या व्यासपीठाला असावा यासाठी कर्मठांच्या बाजूला पर्यायी धर्मव्यवस्था भागवत धर्माच्या रूपाने संतांनी उभी केली. निवृत्तीनाथ हे त्यातले पहिले प्रतिनिधी होते. जी धर्मव्यवस्था पुरोहितांच्या स्वार्थाच्या तत्त्वज्ञानावर उभी होती, ती मुळासकट उखडून फेकून देणे या मूलभूत ध्येयावर भागवत धर्माची इमारत उभी होती.

यज्ञ संस्कृतीचा बिमोड करून अठरा पगड जाती-जमातीतली माणसं एका छताखाली आणण्यासाठी याच संतांना वेगळे धर्मपीठ निर्माण करावे लागले. कारण पैठणच्या धर्मपीठात वर्णाश्रम धगधगत होता आणि त्यात सामान्य माणूस होरपळून निघत होता. वेगळ्या धर्मपीठासोबत वेगळा देव निर्माण करावा लागला. त्यांचे धर्मपीठ होते पंढरपूरचे वाळवंट आणि देव होता पंढरपूरचा सावळा विठुराया. कोणतेही सिद्धांत, कोणतेही जपतप या भक्ती चळवळीला ठाऊक नव्हते. उघडा मंत्र रामकृष्ण हरी हीच या चळवळीची ऊर्जा होती. निवृत्तीनाथ या भागवत धर्माच्या अग्रस्थानी होते. वारकरी संतांचा धर्म म्हणून त्याकडे पाहिले जाते. या भक्ती चळवळीने स्वतःचे कायदेकानून तयार केले, ज्याला समाजाच्या खालच्या थरातून पाठिंबा मिळत होता.

धार्मिक पडझडीच्या या काळात इस्लामचे आक्रमण हासुद्धा चिंतेचा विषय बनत चालला होता, तर दुसरीकडे प्रचलित धर्माची शोषण व्यवस्था लोकांच्या मानगुटीवर बसलेली होती. नाथपंथाने हे अधःपतन ओळखून या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथांच्या रूपाने पहिला प्रतिनिधी महाराष्ट्राला दिला आणि तेथून पुढे ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ता या ज्योती उजळत गेल्या आणि आध्यत्मिक लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले. मराठी भाषेत साहित्य निर्मितीला सुरुवात झाली. अभंग निर्मिती होऊ लागली. निवृत्तीनाथ हे तर मुळात पहिले अभंगाचे निर्माते आहेत. अभंग हा वाङ्मय प्रकार निवृत्तीनाथांनी प्रथम सुरू केला. निवृत्तीनाथांच्या नावावर आज ३७४ अभंग उपलब्ध आहेत. निवृत्तेश्वरी हादेखील एक ग्रंथ आहे. त्याचे हस्तलिखित उपलब्ध आहे, मात्र तो अप्रकाशित आहे. खर्‍या अर्थाने या भक्ती चळवळीला अवैदिक स्वरूपावरच पाहावे लागते. कारण निवृत्तीनाथ आपल्या अभंगात म्हणतात,खुंटले वेदांत हरपले सिद्धांत, बोलणे धादांत तेही नाही.

दुसर्‍या एका अभंगात ते म्हणतात,
निगम आगम वेदादीक सम श्रुतीचा उपक्रम हरपला

ते रूप साजिरे नंदाचे गोजिरे यशोदा श्रीधरे प्रेमभेटी. मुळात निवृत्तीनाथ हे विठ्ठलपंतांना देहदंड झाल्यामुळे प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध मनोमन भांडत होते. श्रुती, स्मृती आणि वेद हे प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षा कमी आहेत. केवळ वेद जाणतो तोच मोठा आहे या भूमिकेविरुद्ध निवृत्तीनाथ होते. ब्राह्मण सभेकडून मिळणारे शुद्धिपत्र त्यांना नकोच होते. म्हणून ते ज्ञानदेवांना म्हणतात,

नाही जाती कुळ वर्ण अधिकार, क्षेत्री वैश्य, शूद्र द्विज नव्हो
नव्हो किन्नर ऋषी निशाचर तेही नव्हो
ते आम्ही अविनाश अव्यक्त
जुनाट निजबोधे इष्ट स्वरूप माझे

नव्हे मी सगुण नव्हे मी निर्गुण, अनुभूती भजन होऊन नव्हे निवृत्ती म्हणत असे ऐक ज्ञानेश्वरा माझी परंपरा ऐसी आहे.

संत नामदेव निवृत्तीनाथांच्या बरोबरीनेच या भागवत धर्माच्या इमारतीचे साक्षीदार आहेत. भागवत धर्म म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा धर्म. भगवतगीता हा भागवत धर्माचा प्रमाण ग्रंथ आणि कीर्तनसंस्था हे मुक्त व्यासपीठ.

इथपर्यंत ढोबळमानाने ही पार्श्वभूमी सांगता येईल. निवृत्तीनाथांच्या एकूणच साहित्याचा धावता आढावा पुढील लेखात घेऊया.

–(लेखक संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -