घरफिचर्ससारांशतुमी खाता त्या भाकरीवर...

तुमी खाता त्या भाकरीवर…

Subscribe

लोकसंस्कृतीपासून लोकशाहीपर्यंतच्या प्रवासावरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाचा अमिट ठसा उमटलेला आहे. सांस्कृतिक कला सोहळ्यातील मंचावर केवळ औषधाला लोककलेचे सत्कारसोहळे आयोजित करण्यामागे लोककलेच्या संवर्धनाचे कोडकौतूक असते. मात्र, लोककलेचे कौतूक करताना संस्कृतीच्या मूळ प्रवाहापासून तिला वेगळे ठेवण्याच्या समांतर प्रयत्नामागे अभिजन आणि बहुजनांची संस्कृती वेगळी असल्याचे स्पष्ट करण्याचा सुप्त हेतूच उघड असतो. एका विशिष्ट समुदायांची लोककला ही दुसर्‍या विशिष्ट समुदायांच्या लोककलेपेक्षा भिन्नच असते. दोन संस्कृतीमधील हा फरक, हा संघर्ष जातीव्यवस्थेमुळे गडद होतो. त्यामुळे जातीअंताच्या संघर्षातही लोककलेच्या माध्यमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला पर्याय नसतो. गावकुसाबाहेरच्या वस्तीत आजही घराघराच्या अंगणात बाबासाहेबांवर आधारीत कवनं, छक्कड, पदांचा आशय हाच असतो.

माझा वर्तमानपत्रातील लेख, माझे एखादे पुस्तक यातून विचारांचा जो परिणाम साध्य होऊ शकत नाहीत, तो परिणाम जलशातल्या तुमच्या एका गाण्यातून साध्य होतो. असा गौरवपूर्ण उल्लेख लोककलावंतांचे कौतूक करताना डॉ. आंबेडकरांनी केला होता. लोककला हा लोकचळवळ रुजवण्याचे सर्वात प्रभावी माध्यम असतेच. मार्क्सवादी, साम्यवादी चळवळीतही लोककलेच्या माध्यमाचा उपयोग झाला. म्हणूनच तेलंगणात लोकशाहीर गदरच्या लोकगीतांचा चळवळीवरील प्रभाव किंवा महाराष्ट्रात आपल्या लेखणी आणि खड्या आवाजातून शाहीर विलास घोगरेंनी शेतकरी कामगारांना जाग रे बंधो म्हणून दिलेली हाक महत्वाची ठरते. मात्र, ही हाक माता घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरातील गोळीबारानंतर आत्महत्येच्या टोकाच्या शोकांतिकेत बदलते. परंतु आंबेडकरी चळवळीत निराशावादाला जागाच नसते, जग बदलण्यासाठी घाव घालण्याची शिकवण लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना बाबासाहेबांकडून मिळालेली असते. मात्र हे घाव कुठल्याही शारीरिक, मानसिक, वैचारिक हिंसेचे नसतात. देहाचा आजार दूर करणार्‍या शस्त्रक्रियेसारखी त्यात बुद्धाची असीम करुणा काठोकाठ भरलेली असते.

आपला मार्ग सत्य आणि मानवी आत्मसन्मानाचा असल्यामुळे आपल्या पराभवाचा प्रश्नच निर्माण होत नाही, असा दुर्दम्य आशावाद महाड चवदार तळ्यावरील मानवमुक्तीच्या संगरावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करतात, वेदनेची मळवाट टाळून या नव्या प्रकाशाच्या वाटेवर चालण्याचा मानवी आत्मसन्मान लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतून उतरतो.

- Advertisement -

मला दावलेली तुझी पायवाट
झाली आता ही विकासाची वाट
वदे आज भारत कालची तुझी ती
पेरणी उद्याच्या विकासात होती

कुठल्याही शोषणाविरोधातील मानवी आत्मसन्मानाचा हा संघर्ष पुढे लोककलेतून झिरपत पुढील पिढ्यांपर्यंत पोहचतो आणि कडूबाई खरात यांच्या निर्मळ आवाजातील गाण्यामुळे बाबासाहेबांवरील आधारीत लोकगीतांचे बावनकशी सोने बनते. बाबासाहेबांच्या संविधानातील एका सहीनं वर्षानुवर्षाची पिढीजात निरंकुश गुलामी कायमची नष्ट केली. त्यामुळे या सहीचं लोककलावंतांना मोठं कौतूक असतं. ते शाहीरी लेखणीतूनही उतरतं.

- Advertisement -

मायबापाहून भिमाच्या उपकार लई हाय रं
तुमी खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय रं

भूकेपासून सन्मानाच्या कष्टाच्या भाकरीपर्यंतचा पिढ्यांचा हा प्रवास बाबासाहेबांमुळेच शक्य झालेल्याचा चळवळीचा इतिहास या दोन ओळीतच स्पष्ट होतो. या गाण्यात शाहिरी डॉ. महामानवाने केलेले परिवर्तनच नाही तर प्रवर्तनाची सूचक असते. त्याचे श्रेय अर्थातच गायिका कडूबाई खरात, संविधान मनोहारे, मनोजराजा गोसावी यांचे असते.

डॉ. आंबेडकरांची चळवळ जनसामान्यात रुजवण्याचे काम चळवळीच्या इतिहासात शाहिरी जलशांनी चोखपणे केलेले असते. साहित्य, कविता, पुस्तके, नियतकालिकातील लेखांसोबतच शाहिरी जलशांचे आंबेडकरी चळवळ रुजवण्यात मोलाचा वाटा असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी पहिली महार मातंग परिषद ज्या उस्मानाबाद जिल्ह्यात झाली तेथील तडवळकरांचा जलसा प्रसिद्ध होताच, त्यातील एक महत्वाचा प्रसंग आहे.

हैदराबाद संस्थानाच्या ताब्यात असलेल्या या गावात जवळपास शे-सव्वाशे घरांची वस्ती होती. शोषितांचे मराठवाड्यातील हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्याचे महत्व मोलाचे होते. मुंबई इलाख्यात बाबासाहेबांवर भाषणबंदी असल्याने हैदराबाद सीमेवर ही परिषद घेण्यात आली. डॉ. आंबेडकर गावात येणार असल्यामुळे गावात उत्सव आणि उत्साहाचे वातावरण होते. कळंब रोड रेल्वे स्टेशनपासून कसबे तडवळे गावापर्यंत रस्त्यावर कमानी उभारण्यात आल्या होत्या. उस्मानाबादेतील सांजा रोडवरील सारोळा गावातील लोककलावंत आणि स्त्रियांचे पात्रही तेवढ्याच ताकदीने सादर करणारे किणी गावच्या यादवराव जलसा समूहाचे ग्यानबा आणि ढोलकीपटू आंबादास माधव कठारे हे सारोळा गावातून अधिवेशनाला दोन दिवस असताना पायीच तडवळ्याकडे निघाले.

हे गाव तमाशा कलावंत आणि ढोलकीपटू आंबादास कठारे यांची पत्नी राधिका सोनवणे (तडवळकर) यांचेही जन्मगाव होते. या गावाला भारतीय सैन्यातील मराठा, महार बटालियनमधील शूर, शहीद सैनिकांसोबतच लोककलेचीही परंपरा आहे. ढोलकीपटू आंबादास कठारे गावात दाखल झाल्यावर जलसाकार तडवळकरांनी त्यांच्याशी लोककलेतून चळवळीची गाणी सादर करण्याचे ठरवले. जलशातील ग्यानबा मलकापूरकर यांनी स्त्री पात्रासाठी कंबरेइतके केस निगा राखून वाढवले होते. गरिबी, जाती व्यवस्थेत शोषित, पीडित महिलेची भूमिका त्यांच्या वाट्याला येत असे. आंबेडकरांच्या काळातच लोककलेतील पौराणिक संदर्भ कमी होऊन जलशात सामाजिक, राजकीय विषय वाढीस लागल्याची माहिती आंबादास कठारे यांनी दिली होती. औरंगाबाद, परभणी, सोलापूर, लातूर अशा जवळपासच्या जिल्ह्यातून भालेराव, सोनवणे, कठारे, निकाळजे आदी घराण्यातील लोककलावंत केवळ डॉ. आंबेडकरांच्या ओढीने या गावात रातोरात बैलगाडी, पायी चालत दाखल झाले होते. यातील लोककलावंतांच्याच भाषेतून उलगडणारा हा प्रसंग…

शाहीर आंबादास सांगे बाबाची कथा
ऐका जनहो, माह्या बापाची व्यथा

जलशाच्या सुरुवातीला बाबा टेजवर आलं, नि काय म्हन्ल…तर बाबांनो ही पांडर्‍या टोपीची बगळं (काँग्रेसचे तत्कालीन नेते) मी गेल्यावर हितं ईतील, आसं बाबा सांगत्यात तेवड्यात बाबाला काँग्रेसचं पत्र आलं, एका पठ्ट्यानं टेजवर त्याच्या (आंबेडकरांच्या) हाती दिलं. बाबा म्हन्लं, ही पांडर्‍या टोपीची बगळं मी गेल्यावर तुम्हाला गावात येऊन इचारतील काय ठरलांव तुमचं, तर आदी मीच त्यांना सांगून येतो, असं बोलून बाबा टेजवरून उतरलं, बाया, बापडं कालवा करू लागल्यावर बाबा पुन्यांदा टेजवर गेलं, माईकवर म्हनलं, ही पांडर्‍या टोपीची कोन हाईती, ही हायती बगळं आन तुम्ही हाव मासं, ती तुमाला गिळायला डोळं मिटून बसल्याती…तवा त्यांच्यापासून सावध व्हावं, आपल्यावर लक्ष ठिवलेल्या या बगळ्यास्नी आदी हुसकावतो, मंग आपली पुडं परिषद चालू द्या..बाबासाहेबांच्या भाषणातील मुद्यांचे आंबादास कठारे यांनी त्याच ठिकाणी ताबडतोब, बाबा आलं बगळं गेलं…हे कवन ढोलकीवर जमून आणलं. बाबासाहेबांच्या सूटबूट आणि टाय कोटाचं, मोठं अप्रूप मराठवाड्यातल्या गोरगरीब समुदायाला आणि लोककलावंतांना होतं. दिवंगत आंबादास कठारे या तत्कालीन पिढीतल्या लोककलावंताने महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे कराराचे केलेले वर्णन या गाण्यातून सांगितले.

कोट खिशाला पेन माझ्या भीमानं लावला
करारावर सही करन्या पुन्याला धावला
सही करून ठेवला भारत देशाचा मान
माज्या भीमानं वाचवला गांधींचा प्राण

स्वतः बाबासाहेबांनाच जयभीम घालणारे जसे त्या काळात होते. त्या काळात अशी कित्येक लोकगीतं बाबासाहेबांच्या हयातीतच बाबासाहेबांवर चळवळीत गायली जात होती. यातील अनेक लोकगीतांचा संग्रह करण्याचे प्रयत्न नंतरच्या पिढीने केले. हा केवळ लोकगीत किंवा लोककलेचा इतिहास नव्हता तर तो चळवळीचाही इतिहास होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आधारीत लोकगीतांची संख्या ही कित्येक हजारोंच्या घरात आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यातही बाबासाहेबांची चळवळ पोहचवण्याचे काम लोकगीतातून केले जात आहे. लोककलेची ही चळवळ आता नव्या पिढीने हाती घेतली आहे. यातील भीमराव सोनवणे, दिलराज पवार, मानवेल गायकवाड, विश्वास गायकवाड, सुरेश शिंदे, अशोक निकाळजे, प्रभाकर पोखरीकर, मदन गाडे, बन्सी साळवे, बबन सरवदे, रंगराज ढंगाळे, कवीश्वर आवसरे, सुनील खरे, विश्वास गायकवाड, दामोदर शिरवाळे, कुंदन कांबळे, प्रतापसिंह बोदडे, समदूर सारंग, तारका जाधव, सुषमा देवी, रेश्मा सोनवणे, शकुंतला जाधव ही काही नावे प्रातिनिधीक आहेत. या शिवाय मराठीत कविता राम, आदर्श शिंदे यांच्याशिवाय पंजाबी भाषेतील गिनी माही तर कानडीत सिद्धार्थ चिम्माडिलाई ही काही नावे आहेत.

इंग्रजी भाषेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आधारीत गाणी रचली, गायली जात आहेत. इंटरनेट, युट्युब यासारखी नवी माध्यम डॉ. आंबेडकरांच्या चळवळीतील नव्या पिढीने आत्मसात केली आहेत. त्याला भाषेचं, प्रदेशाचं असं कुठलंही बंधन नाही, म्हणून डॉ. आंबेडकरांवर आधारीत हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेतील गाणी यूट्युबर रोज नव्याने अपलोड होत असतात. संपूर्ण अंतराळ प्रकाशमान करणार्‍या सूर्याला ज्याप्रमाणे एका कक्षेत बांधता येत नाही तसंच बाबासाहेब नावाच्या महासूर्यालाही संस्कृती, विचार, लोककलेत बांधता येणं शक्य नसतं. या सूर्याच्या प्रकाशाखाली स्वतःला माणूस म्हणून ओळखणं एवढंच हाती असतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -