घरफिचर्ससारांशपुरोगामी चळवळी जिवंत राहणे काळाची गरज पंखास नवे बळ दे...

पुरोगामी चळवळी जिवंत राहणे काळाची गरज पंखास नवे बळ दे…

Subscribe

आमटे परिवार, बंग कुटुंबीय, डॉ. नरेंद्र दाभोलकर, श्याम मानव, मेधा पाटकर, सुरेखा दळवी, प्रतिभा शिंदे, चंद्रकांत वानखेडे, उल्का महाजन, अरुण शिवकर या आणि यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी कुष्ठरोगी, आदिवासी, शेतकरी, कामगार, शोषित, वंचित आणि अंधश्रद्धेच्या दलदलीत अडकलेला समाज या सार्‍यांना मुख्य प्रवाहात आणले. पण, थोर विचारांच्या या समाजवादी चळवळींना एक शाप आहे दुहीचा, मतभेदांचा. माणसे पराकोटीची चांगली असून फार काळ एकत्र नांदत नाहीत तेव्हा गडबड होते आणि त्यांच्या कार्यावर टीका करण्यासाठी टपून बसलेल्या कावळ्यांची कावकाव वाढते. डॉ. शीतल आमटे करजगी यांच्या आत्महत्येनंतर अशीच कावकाव ऐकू येत आहे. एक शंका मनी उभी राहते, अशी थोर माणसे, त्यांचे विचार आता काळाच्या ओघात नष्ट होतील का? पण, सजग मन सांगते. समाजवादी विचार कधीच मरणार नाहीत. नवे नेतृत्व नव्या जोशाने उभे राहील...

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या आणि आनंदवनचा कारभार याविषयी गेले आठवडाभर प्रसारमाध्यमांमध्ये भरभरून लिहिले गेले आणि चर्चाही झाल्या. विशेष म्हणजे शीतलने मृत्यूपूर्वी फक्त आपल्याशी कसा संवाद साधला होता हेसुद्धा काही गरज नसताना दाखवले गेले. या घटनेच्या आधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वादही समोर आला होता. नरेंद्र दाभोलकर यांची मुले मुक्ता, हमीद आणि समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्यातील धुसफूस मनाला वेदना देणारी आहे. जशी शीतलच्या आत्महत्येने झाली तशीच. आयुष्यभर एका कार्याला वाहून घेतल्यावर ते काम, चळवळ उभी राहते. या कार्याचा पाया रचणार्‍या योद्ध्यांची तळमळ म्हणजे आपल्या घरदारावर तुळशीपत्र ठेवणार्‍या फकिराची कहाणी असते. सुरुवातीला कोणी त्यांच्याबरोबर नसते. त्यांचा प्रवास हा एकट्या माणसाची गोष्ट ठरते. हळूहळू चळवळ समाजमनात रुजते. त्याला आकार येतो. छोट्या रोपट्याचा वटवृक्ष होतो. त्याखाली अनेक माणसे विसाव्याला येतात. विचाराने, आचाराने. ही माणसे समाजमन ढवळून काढतात. एक नवा विचार रुजवला जातो.

ही एक प्रकारची क्रांती असते. क्रांतीच्या या अंगारातून जुनाट प्रथा, रूढी नष्ट होऊन स्वच्छ आकाश आकाराला येते. त्यामधून आलेली किरणे माणसांच्या तनामनाला नव्या प्रकाशवाटा दाखवतात… साठ, सत्तर आणि ऐंशीच्या दक्षकात महाराष्ट्रात अशा अनेक समाजवादी चळवळी आणि संस्थांनी राज्याला नवा आयाम दिला. थोर संतांच्या वाटेवरून जात आणि जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी आखून दिलेल्या मार्गाला आपल्या जीवनाचा एक भाग करत समाजवादी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची पुरोगामी चळवळ ठळकपणे अधोरेखित केली. याचवेळी डॉ. राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी विचारांच्या आखणीला जयप्रकाश यांच्या आंदोलनाने आणीबाणीनंतर देशभरातील युवक समाजासाठी अंधारातील प्रकाश ठरले… आमटे परिवार, बंग कुटुंबीय, डॉ. नरेंद्र दाभोलकर, श्याम मानव, मेधा पाटकर, सुरेखा दळवी, प्रतिभा शिंदे, चंद्रकांत वानखेडे, उल्का महाजन, अरुण शिवकर या आणि यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी कुष्ठरोगी, आदिवासी, शेतकरी, कामगार, शोषित, वंचित आणि अंधश्रद्धेच्या दलदलीत अडकलेला समाज या सार्‍यांना मुख्य प्रवाहात आणले.

- Advertisement -

एक समाजभान तयार केले. त्यामधून आजचा प्रगत महाराष्ट्र घडला. थोर विचार, प्रामाणिकपणा, शेवटच्या श्वासापर्यंत झगडण्याची जीवापाड धडपड यामुळे हे सारे उभे राहिले. त्यात काही त्रुटी असतील, वादही उभे राहिले असतील, मतभेदांचा माहोल तयार झाला असेल, पण त्यांनी उभारलेल्या कामाचे काय? त्याचे मोल कशातच होऊ शकत नाही. लोक अशा माणसांच्या कामांविषयी शंका घेतात, प्रश्न उभे करतात तेव्हा त्यांच्याविषयी किव येते. स्वतःच्या मुलाबाळांच्या आणि स्वमग्न विश्वाच्या पलीकडे ज्यांची उडी नाही ते जेव्हा त्यांच्यावर बोलतात तेव्हा या लोकांनी फार नको एक महिना त्यांच्यासारखे स्वतःला गाडून घेऊन काम करावे. मग लक्षात येते, स्वतःला पुरून घेणे म्हणजे फुकाच्या गप्पा नव्हेत… पण, थोर विचारांच्या या समाजवादी चळवळींना एक शाप आहे दुहीचा, मतभेदांचा. माणसे पराकोटीची चांगली असून फार काळ एकत्र नांदत नाहीत तेव्हा गडबड होते आणि त्यांच्या कार्यावर टीका करण्यासाठी टपून बसलेल्या कावळ्यांची कावकाव वाढते. एक शंका मनी उभी राहते, अशी थोर माणसे, त्यांचे विचार आता काळाच्या ओघात नष्ट होतील का? पण, सजग मन सांगते. समाजवादी विचार कधीच मरणार नाहीत. नवे नेतृत्व नव्या जोशाने उभे राहील…

हा सारा आपलाच वाद, आपणाशी करताना दोन घटनांवर एक नजर टाकू. आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या आमटे परिवाराच्या मोठ्या कामासाठी धक्का ठरला. बाबा आमटे यांनी आनंदवनचा विस्तार करताना पुढच्या आपल्या पिढ्यांसाठी समाजसेवेचा एक मार्ग आखून दिला. डॉ. विकास आणि भारती आमटे यांनी आनंदवनला एक आकार देत हे कार्य पुढे नेले. विशेष म्हणजे बाबा असताना गडचिरोलीच्या निबीड अरण्यात डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांनी आदिवासींच्या जीवनात हेमलकसा येथे पहाट आणली. प्रकाश यांचे हे काम बाबांच्या तोडीचे आणि आजही ते याच तळमळीने चालवले जात आहे. विशेष म्हणजे प्रकाश आणि मंदा यांच्या पावलावर पाऊल ठेवत डॉ. दिगंत आणि अनिकेत ते कार्य पुढे नेत आहेत. अर्थातच दोघांना त्यांच्या जोडीदारांची समर्थ साथ आहे. पण, तेच विकास यांच्या मुलांबाबत झाले नाही, असे दिसते. कौस्तुभ आणि शीतल यांच्या सुरुवातीचा काही काळ वगळता वाटा वेगवेगळ्या दिशेने गेल्या. पांढरकवडा, यवतमाळ या भागात प्रभावी काम करणारी शीतल यांनी आनंदवनचा कारभार एकहाती घेतल्यानंतर कुटुंबात आणि आनंदवनात धुसफूस सुरू झाली.

- Advertisement -

शीतलच्या टोकाच्या निर्णयाचे बीज याच धुसफुशीत रुजले गेले. शीतलने 20 नोव्हेंबरला फेसबुक लाईव्हच्या माध्यमाद्वारे आमटे कुटुंबीयांवर आरोप केले. त्यावर आमटे कुटुंबीयांनी एक पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला. सोशल मीडियावर महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणार्‍या कामावर आणि विश्वस्तांवर अनुचित वक्तव्यं केली. त्यांचं सर्व भाष्य हे तथ्यहीन असून कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचे आमटे कुटुंबीयांनी सांगितले. वाईट म्हणजे शीतलने तिच्या संभाषणात तिचा भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बेछुट आरोप केले. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केलं.आमटे कुटुंबीयांच्या सर्व सामाजिक संस्था या महारोगी सेवा समितीच्या नावाखालीच काम करतात आणि त्यांचं बँक अकाऊंटही एकच आहे. 2016 ला महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारणी जाहीर झाली. यात डॉ. शीतल आमटे-करजगी आणि त्यांचे पती गौतम करजगी यांना स्थान देण्यात आलं. याच दरम्यान कौस्तुभ आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या सहसचिव पदावरून राजीनामा दिला.

पुण्यात पाणीप्रश्नावर काम करण्यासाठी आनंदवनातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केलं. दरम्यान डॉ. शीतल आमटे-करजगी यांना आनंदवनात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पद देण्यात आले आणि त्यांचे पती गौतम-करजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली. मल्टी नॅशनल कंपनीत कामाचा अनुभव असणार्‍या गौतम यांनी आनंदवनाच्या कारभारात कार्पोरेट कंपनीसारखी आधुनिकता आणि शिस्त स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असल्याचं सांगत अनेक नवे नियम लागू केले. नवी कार्यकारिणी आपल्या पद्धतीने काम करत असतानाच आनंदवनात राहणार्‍या दोघांनी नाराजी उघड केली आणि वादाची ठिगणी पडली. डॉ. विकास आमटे यांचा सहाय्यक आणि सावलीसारखा त्यांच्या सोबत राहणार्‍या राजू सौसागडे यांनी नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेणं सुरू केलं. माजी सरपंच असलेल्या आणि सध्या आनंदवनातील ग्रामपंचायतीचे सदस्य राजू सौसागडे यांनी या वादानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आनंदवन आश्रमाच्या व्यवस्थापनाकडून आपल्याला हीन दर्जाची वागणूक मिळाल्याचं पोलीस तक्रारीत सौसागडे यांनी सांगितलं.

दरम्यान, बाबा आमटे यांचे सहकारी शंकरदादा जुमडे यांचा मुलगा विजय जुमडे यांनीही नव्या प्रशासनावर आरोप केले. गेल्या 72 वर्षापासून महारोगी सेवा समितीच्या आनंदवन प्रकल्पात कुष्ठरुग्णांवर उपचार केले जातात. कुष्ठरुग्णांचे कुटुंबीय जर असतील तर त्यांना आनंदवनातच वेगळं घर देऊन त्याचं पुनर्वसन केलं जातं. जर कुष्ठरुग्ण एकटे असतील तर त्यांची वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली जाते. आजमितीस आनंदवनात एकूण 1500 लोक वास्तव्यास आहेत. यातील 450 कुटंबीय आहेत तर 400 लोक एकटे आहेत. ही वर्षानुवर्षांची आखलेली वाट कॉर्पोरेट व्यावसायिकतेच्या नावाखाली उद्ध्वस्त होत गेल्याने सुरुवातीच्या धुसफुशीचा वणवा पेटला आणि त्यात शीतलने स्वतःला संपवले. एका चांगल्या कार्यकर्तीला महाराष्ट्र मुकला.

दुसरीकडे महाराष्ट्रातील अनिष्ट प्रथांविरुद्ध गेली काही दशके लढा देणार्‍या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधील मतभेद आता विकोपाला गेले असून, समितीमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. सध्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कुटुंबीय व समर्थक असे दोन गट पडले आहेत. समितीचा कारभार कसा चालवावा येथपासून ते आर्थिक नियोजन काय असावे, असे मतभेदाचे मुद्दे आहेत. आधी 1989 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये फूट पडली होती. त्यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. दुसरीकडे श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत राहिली. पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती होण्याची भीती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी अनेक दशके जोडलेले जुने कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

गेली दीड-दोन वर्षे समितीमध्ये विविध पातळ्यांवर या मतभेदांबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. डॉ. दाभोलकर हयात असतानाच म्हणजे 2010 च्या जून महिन्यामध्ये संघटनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी अविनाश पाटील यांच्याकडे आली. प्रामुख्याने संघटनात्मक कामावर त्यांनी पहिल्यापासून लक्ष केंद्रित केले. समितीची स्थापना झाल्यानंतर समितीला आर्थिक व कायदेशीर बाबींसाठी स्वतंत्र यंत्रणा म्हणून डॉ. दाभोलकर यांनी समितीच्या नावानेच एक ट्रस्ट स्थापन केला होता. संघटनेच्या कामासाठी येणार्‍या देणग्या या ट्रस्टमध्ये गोळा होत. त्याचा कारभार डॉक्टर हयात असेपर्यंत संपूर्णपणे तेच बघत होते. 2005 च्या दरम्यान अंधश्रद्धाविरोधी कायद्यासाठी हालचाली सुरू झाल्या. शैक्षणिक स्तरावर वैज्ञानिक जाणिवा, प्रशिक्षण असेही काही उपक्रम राबवले. मात्र हे संघटनेच्या कक्षेत सुरू होतं. येणार्‍या देणग्या त्यातून होणारे खर्च, हिशेब, ऑडिटिंग हे सगळं ट्रस्टमध्ये डॉ. दाभोलकर बघत होते. या सर्व देणग्या संघटनेचे कार्यकर्ते उभे करत होते. दरम्यानच्या काळात एक मासिक सुरू झाले होते, त्याला मिळणार्‍या जाहिरातींतून येणारा पैसाही ट्रस्टकडेच जमा होत होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपर्यंत ही स्थिती अशीच राहिली.

डॉक्टर हयात असतानाच नेहमीप्रमाणे काही तक्रारी झाल्या. संघटनेमध्ये आर्थिक गैरव्यवहार आहेत, अशा स्वरूपाच्या त्या तक्रारी होत्या. संघटनेला परदेशातून देणग्या येतात वगैरे आरोपही झाले. डॉ. दाभोलकर यांनी, संघटनेने वेळोवेळी त्यावर खुलासे दिले होते. त्यादरम्यान एक गोष्ट ध्यानात आली की ट्रस्ट आणि संघटना यांच्यात समन्वय साधणारा कोणताही दुवा नव्हता. 2010 नंतर संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते. डॉक्टर फक्त ट्रस्टचे कार्याध्यक्ष होते. 2013 ला डॉक्टरांनंतर संघटनेविरोधातील तक्रारींना अविनाश आणि त्यांच्या सहकार्‍यांना सामोरे जावे लागले. यामुळे त्यांनी कागदपत्रांचा अभ्यास केला. पाचएक वर्षांच्या अभ्यासानंतर काही तांत्रिक त्रुटी दिसून आल्याचे पाटील कबूल करतात. तर दुसरीकडे आम्ही याआधीही अंनिसचे सामान्य कार्यकर्तेच होतो, आजही आहोत आणि यापुढेही आम्ही सामान्य कार्यकर्तेच राहू. संघटनेतील वादविवाद संघटनेच्या अंतर्गत सुटावेत, असे आमचे मत आहे. समाजाच्या विवेकबुद्धीवर आमचा विश्वास आहे, असे मुक्ता आणि हमीद दाभोलकर या दोघांना वाटते. सध्या ट्रस्टमध्ये पाच ते सहा कोटी रुपये जमा आहेत. हा पैसा लोकांनी विश्वासाने ट्रस्टकडे जमा केला आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी आहोत. ट्रस्टच्या विश्वस्तांना नव्हे. संघटना आणि ट्रस्ट यांच्यामध्ये काही सांधा असला पाहिजे, हा विचार आधीपासून होताच. दाभोलकरांच्या हत्येनंतर आम्ही हा प्रयत्न केला, तेव्हा त्याला विरोध झाला’, असे अविनाश पाटील सांगतात तेव्हा दुहीचा शाप आज समितीच्या भोवती आ वासून उभा आहे का, असे वाटून या वादाने पुढे टोक गाठू नये, असे मनोमनी वाटत राहते.

आम्ही चालवू हा पुढे वारसा…असे वागणे सोपे नाही. पण, पुरोगामी आणि समाजवादी विचारांच्या बांधिलकीला असंख्य कार्यकर्ते मानत असतील तर हे वाद येथेच संपायला हवेत. त्याचा वणवा पेटता कामा नये. आधीच शीतलला गमावल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रतिगामी शक्ती या देशावर पकड घट्ट करत असताना पुरोगामी विचारांच्या आधाराची आज सर्व समाजाला मोठी गरज आहे. ही गरज, हा मार्ग फुटीचा शाप भेदून नव्याने शोधावा लागेल.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -