घरफिचर्ससारांशशिक्षण वर्गाबाहेर आणायला हवे 

शिक्षण वर्गाबाहेर आणायला हवे 

Subscribe

       निपुण अभियानाची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने शासनाने पावले टाकण्यास सुरुवात      केली आहे. राज्यात सुमारे पाच लाख शिक्षकांना वर्गातील अध्ययनाचे व्यवस्थापन आणि मू्ल्यमापन प्रशिक्षणाची कार्यवाही सुरू झाली आहे. निपुण कार्यक्रमाच्या यशासाठी वर्गातील आंतरक्रियेतील बदल अनिवार्य  ठरणार आहे. आजही आपण शिक्षण हे केवळ वर्गाच्या चार भिंतीपुरते मर्यादित असत नाही असे म्हणत असलो तरी वास्तवात मात्र शिक्षण वर्गाच्या बाहेर येताना दिसत नाही. अशा वेळी शिक्षणाचा व्यापक अर्थ जाणून घेत शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. 

-संदीप वाकचौरे
शिक्षण म्हणजे केवळ बौध्दिक विकास नाही तर त्यापलीकडे जगण्यासाठी सक्षम करण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. त्यामुळे निपुणची ध्येय जाणून घेत त्या दिशेने प्रवास केला तर आपल्याला निश्चित स्वरूपात समाजात परिवर्तन झालेले अनुभवता येईल. त्यामुळे निपुण अंतर्गत देशात २०२६-२७ पर्यंत भाषा आणि गणित विषयाची किमान क्षमता प्राप्त करून देण्याचे आव्हान पेलण्यासाठी शासनाने धोरण घेतले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनेक गोष्टी कालबद्ध पद्धतीने पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने बदलाची वाट चालण्याची गरज व्यक्त केली आहे. अशा वेळी आपल्याला या वाटा समृद्धतेने  चालण्याची गरज आहे.
   निपुण कार्यक्रमांतर्गत  तीन ध्येयांचा विचार करण्यात आला आहे. विकासात्मक ध्येयाचा विचार करता मुले उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य राखतात. मुले प्रभावी संवादक बनतात. मुले सक्रिय अध्ययनार्थी बनतात आणि लगतच्या वातावरणाशी जोडली जातात. या तीन ध्येयांचा विचार केला तर शिक्षणाचा विचार किती विस्तारीत पातळीवर करण्याची गरज आहे हे अधोरेखित होत आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकासासाठीचे प्रयत्न करण्याची गरज शिक्षण प्रक्रियेत सातत्याने अधोरेखित करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात आकृतीबंधात बदल करण्यात आला आहे. त्यातील पहिला स्तर हा पायाभूत स्तर आहे. या स्तरात अंगणवाडी/बालवाडीची तीन वर्षे आणि पहिली दुसरीच्या दोन वर्षांचा समावेश केला आहे. या स्तरावर ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने पावले पडण्याची गरज आहे. खरंतर या स्तरावर आपण जी पेरणी करणार आहोत तीच पेरणी बालकाच्या आयुष्याला आकार देणारी ठरणार आहे.
 बालकांच्या मेंदूचा सुमारे ८५ टक्के विकास हा पायाभूत स्तरावरील वयात होत असतो. त्यामुळे या वयात मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी किती आव्हाने दिली जातात त्यानुसार विकासाची प्रक्रिया घडत असते. मुळात या वयात विकासाच्या दृष्टीने भविष्यासाठीचा पाया घातला जात असतो. त्यामुळे या वयात शारीरिक आणि मानसिक विकासासाठीचे वातावरण मिळण्याची गरज आहे. मुलांच्या आयुष्यभरासाठीचा आरोग्याचा पायादेखील याच स्तरावर घातला जातो. शिक्षणाच्या प्रक्रियेत बालकाच्या पंचज्ञानेंद्रियांचा विकास ही महत्त्वाची गोष्ट आहे. मुळात आपल्याकडे शिक्षणाचा संबंध नेहमीच फक्त कानाशी जोडला जातो. जास्तीत जास्त ऐकणे म्हणजे शिक्षण.
शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांची केवळ श्रवण भक्ती असते आणि त्यात भर म्हणजे काही प्रमाणात पाहणे घडते. शाळेत शिक्षण घेताना जास्तीत जास्त दोन अवयवांचा उपयोग केला जातो. त्यापलीकडे असलेल्या इतर ज्ञान इंद्रियांचे काय? मुळात शिक्षणाचा विचार हे सांगतो की, शिक्षण हे अनुभवाने युक्त असायला हवे. अनुभवशून्य शिक्षण हे बालकाला फार तर मार्क मिळवून देईल, पण जगण्यासाठीची सक्षमता प्राप्त करून देऊ शकणार नाही. जगण्यासाठी लागणारी सक्षमता ही अनुभवातून येते. अनुभव हे पंचज्ञान इंद्रियांद्वारे मिळाले असतील तर ते अधिक काळ स्मरणातही राहतात. केवळ ऐकण्याचा अनुभव असेल तर ते विसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी पंचज्ञानेंद्रियांनी युक्त असलेले अनुभव शाळा स्तरावर देण्याची गरज आहे.
 शिक्षणासाठी बालकाचा शारीरिक विकास महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे बालकांचे आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे. मुळात कुपोषित असलेले कोणतेही बालक उत्तम स्वरूपात शिकू शकणार नाही. आरोग्य जोपासताना कुपोषणाचा विचार केला जाणे महत्त्वाचे आहे. शिकण्यासाठी मेंदू हा अवयव असला तरी त्यासाठीची सक्षमता उत्तम आरोग्यातून लाभत असते. आपल्या राज्यात प्रत्येक मूल शिकू शकते हे कुमठे बीटाने समोर आणले, मात्र त्यासाठी त्यांनी केवळ अध्यापन प्रक्रियेत बदल केला असे नाही, तर
त्यापलीकडे जाऊन आरोग्यासाठीदेखील त्यांना वैद्यकीय सल्ल्याने प्रयत्न केले. शालेय परिसरात परसबाग विकसित करून मुलांचा आहार उत्तम करण्याचा प्रयत्न केला. कुपोषणमुक्तीसाठीचे प्रयत्न झाल्याशिवाय आरोग्य उत्तम राहणार नाही. आरोग्य उत्तम असेल तर उत्साह टिकेल. मानसिक उत्साह असेल तरच शिकणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिकण्याचा पाया आरोग्याच्या पायावर उभा असणार आहे. येथे आरोग्याच्या दृष्टीने जो पाया घातला जाईल तोच भविष्यासाठी कायमचा पाया असणार आहे. त्या दृष्टीने ध्येयात या स्तरावर आरोग्याचा पाया घालण्याबाबत सूचित केले आहे. आपण जेव्हा शिकणे अधिक अनुभवसंपन्नतेच्या दिशेने घेऊन जाणे म्हणतो आहोत याचा अर्थ त्या अनुभवात पंचज्ञानेंद्रियांचे उपयोजन महत्त्वाचे ठरते. या स्तरावर पंचज्ञानेंद्रियांचा उपयोग करायला हवा.
या स्तरावर शरीरातील हाडे, स्नायू बळकटीकरणासाठी आवश्यक त्या संधी प्राप्त करून द्यायला हव्यात. त्या संधी उपलब्ध झाल्या तर डोळे व हाताच्या समन्वयात सुधारणा घडून येण्यास मदत होईल. मुले जेव्हा वाचत असतात, लिहीत असतात तेव्हा डोळे आणि हात काम करतात. हा समन्वय जितका चांगला असेल तितकी शिकण्यास मदत होत असते. त्या अर्थाने शारीरिक विकासाची संधी या स्तरावर मिळाली तर त्याचा उपयोग शिकण्याच्या प्रक्रियेसाठी होईल. त्या अर्थाने पहिले ध्येय अधिक महत्त्वाचे आहे. आपण निपुणमध्ये ज्या क्षमतांचा विचार करीत आहोत त्या साध्यतेसाठी केवळ पुस्तक आणि वर्गातील अध्यापन यांचा विचार करून चालणार नाही. शिक्षणाची प्रक्रिया ही केवळ बौद्धिक प्रक्रिया नाही तर त्यासाठी शारीरिक स्वास्थ्यदेखील महत्त्वाचे असते. मानसिक विकासाची प्रक्रियादेखील उत्तम घडायला हवी तरच शिक्षणाचे अपेक्षित ध्येय साध्य होण्यास मदत होईल.
पायाभूत स्तरावरच सामाजिक कौशल्यांचे विकसन म्हणजे भविष्याची पेरणी आहे. प्रत्येक बालक भविष्यात ज्या  समाजाचा घटक म्हणून काम करणार असतो तो समाज एकोप्याने राहण्यासाठी अधिक गंभीरतेने पावले टाकण्याची गरज आहे. वर्तमानात माणसांचे सामाजिकीकरणाचे मोठे आव्हान आहे. समाज, कुटुंब एकत्रित राहण्याची गरज आहे. एकत्रित राहणे हे मानसिकतेच्या पातळीवरदेखील घडायला हवे. आज माणसं जोडली आहेत, पण ती केवळ औपचारिकता आहे. भावबंधाची वीण अधिक घट्ट असायला हवी. त्या दृष्टीने या स्तरावर पेरणी करण्याचा विचार सूचित केला आहे. इतर मुलांच्या सोबतीने मुले विविध कृती करतील तर सहकार्याची भावना दृढ होण्यास मदत होईल. त्यासाठी मुले शिकताना अधिकाधिक एकत्रित राहणे व सहकार्याचा भाव दृढ होईल यासाठी पायाभूत स्तरावर शिक्षण धोरणातच क्रीडन पद्धतीचा विचार करण्यात आला आहे.
मुले क्रीडन पद्धतीने अधिक गुंतून राहतात. त्यात आनंद जसा आहे तसे एकमेकांच्या मदतीचा सहकार्याचा भावदेखील वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. यात मुले आपल्या जोड्या निश्चित करतात. पुढे पुढे गट निश्चित करतात आणि सहकार्याने शिकणे घडत राहते. यात सहकार्याचा भाव महत्त्वाचा आहे. मुळात शिकण्यात स्वतःची प्रगती जशी अपेक्षित आहे तशी आपल्या सहकार्‍याचीदेखील प्रगती अपेक्षित आहे. शिक्षण एकमेकाला हात देणे शिकवते. आज समाजात एकमेकाला हात दाखविणारी वृत्ती वाढत आहे. अशा वेळी आपण सहकार्याचा भाव विविध शिक्षण अनुभवातून निर्माण करू शकतो, म्हणून हा विचार महत्त्वाचा आहे. इतरांसोबत संवाद हवाच, पण त्यापेक्षा अधिकाधिक सुसंवादी वातावरण असायला हवे.
 माणूस एकटा असला की अधिक चांगले काम करतो आणि समूहात असला की कामाकडे फारसे लक्ष देत नाही. एकटे काम करताना एकट्याला श्रेय मिळते आणि समूहात सर्वांना मिळते. एकदा जपान आणि भारतातील समूहाला एक जबाबदारी देण्यात आली होती. ती जबाबदारी मिळताच जपानी गटाचा नायक पुढे येत म्हणाला, यात तर आम्हीच जिंकणार…भारतीय जिंकू शकणार नाहीत. तेव्हा त्याचे कारण विचारले, तर तो म्हणाला की,  समूहाचे काम असेल तर त्यासाठी लागणारी एकात्मिक, सहकार्याचा भाव हा आम्हा जपानी लोकांमध्ये अधिक आहे, पण हेच काम प्रत्येकाला करण्यास सांगितले तर त्या कामात मात्र प्रत्येक भारतीय जिंकू शकेल.
भारतात इंग्रज आले तेव्हा ते संख्येने फार नव्हते, पण तरी ते जिंकले. त्यांनी येथील माणसांची वृत्ती जाणली होती. त्यामुळे त्यांना सहजतेने राज्य करता आले. त्यामुळे आपल्याला सहकार्याचा भाव जोपासावा लागणार आहे. सामाजिक जीवनाचा, कौशल्यांचा विचार करावा लागेल. आपले सामाजिक जीवन जेवढे एकात्म असेल तेवढ्या वेगाने प्रगतीची झेप घेता येणार आहे. गरज आहे आपल्या सामाजिक जीवनाचा पाया घालण्याची. शिक्षणातून केवळ तात्कालिक फळ नव्हे तर  त्यातून राष्ट्राच्या भविष्याचा पाया घातला जात असतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -