घरफिचर्ससारांशमृत्यूच्या पोटातून मजुरांची मुक्तता!

मृत्यूच्या पोटातून मजुरांची मुक्तता!

Subscribe

उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यातून ४१ मजूर सुरक्षित बाहेर आल्यानंतर देशातील सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यासाठी परदेशी तज्ज्ञ मंडळींकडूनही भारतीय बचाव पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. सर्वच्या सर्व मजुरांचे जीव वाचविणे ही कामगिरी कौतुकास्पद आहेच यात काही शंका नाही, परंतु संकटकालीन परिस्थिती ही नेहमी सर्वांना काही ना काही तरी धडा देऊन जाते. त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण तसे करणे म्हणजे नव्याने संकटाला निमंत्रण देण्यासारखेच असते. म्हणूनच सिलक्यारा बोगदा दुर्घटनेनंतरही यातून धडा घेणे येथे क्रमप्राप्त ठरते. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेसारखे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी काही प्रयत्न होणे गरजेचे आहेत. यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असून नियमावली तयार करायला हवी.

-रामचंद्र नाईक

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा येथे चारधाम यात्रेसाठी निर्माण करण्यात येणार्‍या बोगद्यात १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. विविध यंत्रणा, तज्ज्ञ मंडळी, खोदकाम करणार्‍या मजुरांचे अथक प्रयत्न, सरकारी पाठबळ आणि प्रशासकीय हातभार आदींच्या जोरावर या संकटावर मात करता आली. खरेतर या बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ मजुरांना बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंतचा वेळ जाईल या वृत्ताने अनेकांच्या चिंतेत भर घातली होती, परंतु ठरावीक अंतरानंतर मशीनद्वारे खोदकाम करण्यात अपयश येत असल्याचे जाणवताच ऐनवेळी ‘रॅट-होल मायनिंग’ पद्धतीचा वापर करत सर्व मजुरांना १७व्या दिवशी बाहेर काढत बचाव पथकांनी जगासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

- Advertisement -

परदेशी तज्ज्ञ मंडळींकडूनही भारतीय बचाव पथकाच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. सर्वच्या सर्व मजुरांचे जीव वाचविणे ही कामगिरी कौतुकास्पद आहेच यात काही शंका नाही, परंतु संकटकालीन परिस्थिती ही नेहमी सर्वांना काही ना काही तरी धडा देऊन जाते. त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण तसे करणे म्हणजे नव्याने संकटाला निमंत्रण देण्यासारखेच असते. म्हणूनच सिलक्यारा बोगदा दुर्घटनेनंतरही यातून धडा घेणे येथे क्रमप्राप्त ठरते. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेसारखे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी काही प्रयत्न होणे गरजेचे आहेत. यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असून नियमावली तयार करायला हवी.

विकसनशील भारतात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक ठिकाणी बोगदे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. भुयारी मेट्रो, महामार्ग, रेल्वे मार्ग आदींसाठी बोगदे निर्माण केले जातात. सध्याच्या काळात सर्वसाधारणपणे टनेल बोरिंग मशीनद्वारेच (टीबीएम) बोगदे निर्माण करण्यासाठी खोदकाम केले जाते. बोगदे निर्माण करण्यासाठी ही फार सोपी आणि सुरक्षित पद्धत असून केवळ भारतच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये टीबीएमद्वारेच बोगद्यांचे खोदकाम केले जाते. टीबीएमचा वापर हा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला, परंतु त्यापूर्वी बोगदा किंवा विविध प्रकारच्या खाणकामांदरम्यान खोदकाम करण्यासाठी विविध प्रकारच्या भूसुरूंग स्फोटकांचा (डीबीएम) रीतसर परवानगीने वापर होत असे. स्फोटकांच्या वापरानंतर मजुरांच्या सहाय्याने उर्वरित काम केले जायचे, मात्र ही पद्धत फार घातक ठरत असे.

- Advertisement -

या पद्धतीदरम्यान अनेकदा बोगदा किंवा खाणीत भूस्खलन होऊन अथवा माती, खडकांचा ढिगारा कोसळून अनेक मजुरांचे बळी जात असत. अशा दुर्घटनेत होणारी जीवितहानी मोठ्या प्रमाणावर असते. यात एका दोघांचे नाही तर एकाच वेळी अनेकांचे बळी जाण्याची शक्यता असते. म्हणूनच बोगदे निर्माणादरम्यान आणि खाणी, खदानींच्या ठिकाणी खोदकामादरम्यान मजुरांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना करणे कालांतराने बंधनकारक करण्यात आले. एकदा का स्फोट घडविण्याची प्रक्रिया पार पडली की त्या ठिकाणी मजुरांनी खोदकाम सुरू करण्यापूर्वी सुरक्षेचा उपाय म्हणून लाकडी किंवा लोखंडी आवरण बसविण्यात येत असे, जेणेकरून खोदकामादरम्यान भूस्खलन किंवा माती आणि खडकांचा ढिगारा कोसळण्याच्या घटना घडल्या तरी त्या ठिकाणी असलेले मजूर सुरक्षित राहतील. त्यांना त्यांचे जीव वाचविता येतील.

सरकारने सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे कंत्राटदार कंपन्यांना बंधनकारक केल्याने अशा दुर्घटनांमध्ये होणारी जीवितहानी कमी होण्यास मदत झाली. अगदी विहिरी खोदतानादेखील सुरक्षेसाठी या पद्धतीचा वापर करण्यात येऊ लागला. ही पद्धत यशस्वी असल्याचे पटताच सर्वत्र त्याचा वापर होऊ लागला, परंतु अनेकदा सुरक्षेच्या उपाययोजना बंधनकारक असतानाही काही वेळा कंत्राटदारांकडून याकडे कानाडोळा करण्यात येत आल्याने तसेच अनेक मजुरांना याबाबतचे गांभीर्य नसल्याने अशा घटनांमध्ये जीवितहानी घडण्याचे प्रकार सुरूच राहतात. बोगद्यात किंवा खाणी, खदानींच्या ठिकाणी आतापर्यंत झालेले बहुतांश मृत्यू या सुरक्षा व्यवस्था योग्य पद्धतीने न करण्यात आल्यामुळेच होतात असेच आतापर्यंतच्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.

अलीकडच्या काळात टीबीएम मशीन येताच बोगदे निर्माण करण्यासाठी भूसुरुंग स्फोट करण्याच्या जुन्या पद्धती लोप पावल्या. टीबीएम मशीन सोपी आणि सुरक्षित पद्धतीने खोदकाम करत त्याभोवती सिमेंटचे आवरण तयार करते. त्यामुळे बोगदे निर्मितीचे कामही सुरक्षितरित्या होते. एकदा का टीबीएमने आपले खोदकामाचे काम केले की त्यानंतर मजुरांना बोगद्यातील इतर कामे सुरक्षितरित्या करणे सोपे जाते. त्यामुळे या पद्धतीचा वापर केल्यास सहजासहजी दुर्घटना घडत नाहीत असाच आतापर्यंतचा तरी अनुभव आहे. त्यामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक विकसित देशांकडून बोगदे निर्मितीच्या कामांसाठी टीबीएमलाच प्राधान्य दिले जाते.

सिलक्यारा बोगद्यासाठीही टीबीएम यंत्रणेचा वापर करण्यात आला होता, मात्र येथील भूगर्भीय परिस्थिती पाहता टीबीएमद्वारे इतका मोठा बोगदा खोदण्यासाठी बराच वेळ खर्ची जात असल्याचे जाणवताच टीबीएमसह अन्यही काही सक्षम यंत्रणांद्वारे बोगदा निर्मितीचे काम सुरू करण्यात आले. खरेतर या बोगद्याच्या निर्मितीसाठी शासकीय स्तरावरच्या सर्व परवानग्या या २०१८ सालीच मिळाल्या होत्या. त्यानंतर एका भारतीय कंपनीने येथे प्रत्यक्ष काम सुरू केले होते, मात्र त्या कंपनीने येथील भूगर्भीय परिस्थिती पाहता या ठिकाणी बोगदा निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध अन्य परदेशी कंपन्यांची गरज असल्याचे सांगताच जर्मन आणि ऑस्ट्रेलियाच्या कंपन्यांनाही येथे सामावून घेण्यात आले.

खरेतर २०२२ मध्येच हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु कोरोना काळात काम संथगतीने झाल्याने हा प्रकल्प रखडला होता. तसेच कोरोनानंतर काम पुन्हा नव्याने सुरू झाल्यापासून या ठिकाणची भूगर्भीय परिस्थिती ही अपेक्षेपेक्षाही आव्हानात्मक असल्याचे बोगदा निर्माण करणार्‍या कंपन्यांना वाटू लागले. याच गतीने काम सुरू राहिल्यास २०२५ पर्यंतही हा प्रकल्प पूर्ण होणार नाही अशी भीती अनेकांना वाटत होती. कारण येथे असलेल्या खडकाळ भागामुळे खोदकाम करण्यास प्रचंड वेळ लागतो हे आतापर्यंत अनेकांनी अनुभवले आहे. येथील खडक इतके टणक आहेत की अमेरिकी तंत्रज्ञानाच्या ऑगर मशीनचे ब्लेडसुद्धा यापुढे निकामी झाल्याचे मजुरांच्या बचावकार्यादरम्यान समोर आले होते. त्यामुळे अशा जागी बोगदा निर्माण करणे हे प्रचंड आव्हानात्मक आहे यात दुमत नाही.

सिलक्यारा बोगदा निर्मितीस अपेक्षेपेक्षाही अधिक वेळ लागत असल्याने या ठिकाणी काही जणांकडून जुन्या पद्धतीचा म्हणजेच डीबीएमचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जाते. स्फोटके वापरण्याच्या डीबीएम पद्धतीचा वापर झाल्याचे कोणीही अधिकृतरित्या मान्य करायला तयार नाही, परंतु अनेकदा स्थानिकांनी घटनास्थळी स्फोटकांचे आवाज ऐकल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे येथे डीबीएमचा वापर झालाच नाही हे पूर्णपणे नाकारताही येणार नाही. खोदकाम लवकर पूर्ण करण्यासाठी डीबीएमचा वापर झाला आणि तेथेच नेमका घात झाला, असे काही जणांकडून सांगण्यात येते. स्फोटकांनी आपले काम केले. बोगद्याचे खोदकाम काही अंशी पुढे नेण्यास मदत झाली, परंतु त्यानंतर तेथे भूस्खलन झाले आणि ४१ मजूर अडकून पडले.

जुन्या पद्धतीचा या ठिकाणी सोयीस्कररित्या वापर झाला, परंतु यासाठी आवश्यक असणार्‍या सुरक्षेच्या उपाययोजना न करण्यात आल्याने ४१ मजूर अडकून पडले. विशेष म्हणजे निर्माणाधीन बोगद्यातून धोक्याच्या परिस्थितीत मजुरांना बाहेर पडण्यासाठी मार्गही तयार करण्यात येतो, परंतु हा मार्गही तयार करण्यात आला नव्हता असे समजते. त्यामुळे या मजुरांचे बाहेर निघणेच अवघड होऊन बसले. एक, दोन नव्हे तर तब्बल १७ दिवस या मजुरांना येथून बाहेर काढण्यास लागले. बोगदा निर्मितीच्या कामादरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी आधीपासून टाकण्यात आलेला ६ इंचाचा पाईप असल्याने या मजुरांना तग धरून राहता आले. या पाईपद्वारेच त्यांना अन्न-पाणी तसेच इतर साहित्य आणि सुविधांचा पुरवठा करता आला.

अडकलेल्या सर्व मजुरांना सुखरूपपणे बाहेर काढणे हे आव्हानात्मक असण्यामागे येथे सुरक्षेच्या उपाययोजना नसण्याकडेही काही परदेशी बोगदा तज्ज्ञ मंडळींनी अंगुलिनिर्देश केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डीक्स यांनी ऑगर मशीनही निकामी झाल्यानंतर मजुरांना बाहेर काढण्यासाठी नाताळपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अंदाज वर्तविला होता. कारण या ठिकाणी ऑगर मशिनीआधी प्लाझ्मा कटर मशीनही वापरण्यात आली होती, परंतु तेही प्रयत्न असफल ठरले होते. तसेच या ठिकाणी वारंवार भूस्खलन होऊन माती आणि खडकांचा ढिगारा कोसळण्याचे प्रमाण वाढत असल्याने बोगद्याच्या वरच्या बाजूने खोदकाम करणे हे फार धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे होते.

ऑगर मशीनने ९० टक्के काम केले होते, परंतु उर्वरित १० टक्के काम करताना ही मशीन सक्षम ठरत नव्हती. अखेरीस ‘रॅट-होल मायनिंग’ पद्धतीने खोदकाम करून या सर्वांना जीवनदान देण्यात आले. या पद्धतीने खोदकाम करणार्‍या मजुरांची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. कारण ज्या गतीने त्यांनी काम केले हे कौतुकास्पद आहे. आपल्याप्रमाणेच काम करणारे मजूर बांधव तेथे अडकल्याची तळमळ या ‘रॅट-होल मायनिंग’ पद्धतीने खोदकाम करणार्‍यांना थांबू देत नव्हती. दिवसरात्र काही न पाहता टप्प्याटप्प्याने किंचित आराम घेत हे सर्व जण तेथे कार्यरत होते.

अडकलेल्या मजुरांना आपल्यालाही काही देता यावे या भावनेतून ‘रॅट-होल मायनिंग’ पद्धतीत काम करणार्‍यांनी आपल्या खिशात बदाम, काजू भरून ठेवले होते, जेणेकरून अडकलेल्यांना ते देता येतील. खोदकाम पूर्ण होताच दोन्हीकडच्या मजुरांनी सर्वात आधी एकमेकांना आलिंगन दिले. आपल्याला वाचविणारे हे देवदूत असल्याची भावना अडकलेल्यांनी व्यक्त केली. आपण १७ दिवसांपासून अडकलेलो असताना काय काय हालअपेष्टा सहन केल्या या सांगण्याऐवजी आम्हाला वाचविणारे हे सर्व देवदूत असून त्यांचे मानावे तितके आभार कमी असल्याची भावना व्यक्त करण्यात त्यांनी धन्यता मानली. म्हणूनच मेरा भारत महान, हे आजही प्रत्येक भारतीय अशा कठीण प्रसंगीही तितक्याच अभिमानाने का म्हणतो याचा पुन्हा एकदा अनुभव आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -