घरफिचर्ससारांशपवित्र स्त्रीशक्ती !

पवित्र स्त्रीशक्ती !

Subscribe

यंदाच्या नवरात्रोत्सवाची मुख्य थीम ही स्त्री सक्षमीकरण आहे. ज्याप्रमाणे आपण नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या विविध रुपांची आराधना करतो, भक्तिभावाने पूजा अर्चा करतो, त्याचप्रमाणे आपल्या घरात असणार्‍या प्रत्येक स्त्रीला पूजले तर नक्कीच आपल्यावर सुख समृद्धीचा वर्षाव झाल्याशिवाय राहणार नाही. अग्निपेक्षाही पवित्र असणार्‍या स्त्रीला आपण तिच्या मासिक पाळीच्या काळात अपवित्र ठरवतो, परंतु माझ्या मते ते मासिक पाळीचे दिवस सर्वात पवित्र असतात. कारण त्या दिवसांमुळेच तुम्ही आम्ही हे जग पाहू शकलो. ज्याअर्थी आपण देवीला जगतजननी म्हणतो ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आपल्याच घरातील स्त्री आहे.

लाडक्या गणरायाच्या विसर्जनानंतर सर्वानाच ओढ लागते ती म्हणजे नवरात्रोत्सवाची. या वर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना असून, यानंतर नवरात्रारंभ होत आहे. नवरात्रात देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करून संपूर्ण नऊ दिवस दुर्गा पूजन केले जाते. मागच्या दोन वर्षांपासून नवरात्रावर कोरोना महामारीचे संकट असल्याने ते साजरे होऊ शकले नव्हते, परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाचे सावट कमी झाल्याने नवरात्रोत्सव जोमात साजरा होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तामसी, क्रूर वृत्तीच्या दुर्जनांचे प्राबल्य जेव्हा भूतलावर वाढले तेव्हा त्या दुर्जनांपासून साधू सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देवीने अवतार धारण केला. ती म्हणते, भक्तांनो, मी तुमच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहे.

तुम्ही मला शरण आलात की, मी प्रगट होईन, तुम्हास दुःखमुक्त करेन. त्यासाठी तुम्ही अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस माझा उत्सव साजरा करत घटपूजा, होमहवन आदी करून माझे पूजन करा. जे माझ्यावर अचल निष्ठा ठेवतील, त्यांच्यामागे मी नेहमीच असेन. त्यामुळे नवरात्रोत्सवाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शारदीय नवरात्रातील नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसर्‍या दिवशी ब्रह्मचारिणी देवी, तिसर्‍या दिवशी चंद्रघटा देवी, चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी, पाचव्या दिवशी स्कंदमाता देवी, सहाव्या दिवशी कात्यायणी देवी, सातव्या दिवशी कालरात्रि देवी, आठव्या दिवशी महागौरी देवी, नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी विधिवत घटस्थापना केली जाते. देवीच्या भक्तीमुळे सर्व पापे धुतली जाऊन घरात सुख शांती समृद्धी येते असे अनेक प्राचीन धर्म ग्रंथात सांगितले गेले आहे.

- Advertisement -

नवरात्रोत्सव हा फक्त देवीचाच सण नसून तो संपूर्ण महिला वर्गाचा सण आहे. पुराणात नवरात्रोत्सवाच्या विविध कथा प्रचलित आहेत. पौराणिक कथेनुसार महिषासुर नावाचा एक राक्षस होता. तो ब्रम्हदेवाचा मोठा भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडे अमरत्वाचा वर मागितला. ब्रह्मदेवाने त्याला तो वर दिला. वरदान मिळाल्यावर महिषासुराने संपर्ण ब्रम्हांडात विध्वंस करायला सुरुवात केली. त्याची दहशत एवढी वाढली की देवी-देवताही चिंतेत पडले. अशा स्थितीत ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी मिळून माता दुर्गेला जन्म दिला. यानंतर संपूर्ण नऊ दिवस दुर्गा माता आणि महिषासुर यांच्यात घनघोर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला.

ही दुर्गा माता दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या आजूबाजूला असणारी स्त्रीच आहे. मग ती आपली आई असू शकते, बहीण असू शकते, बायको असू शकते किंवा ती आपली प्रेयसीदेखील असू शकते. ज्याला स्त्री रूपी दुर्गेचं देवत्व समजले त्याला खर्‍या अर्थाने देवी पावली असे म्हणता येऊ शकते. एका बाजूला स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहतो आणि दुसरीकडे त्याच स्त्रीची नवरात्राचे नऊ दिवस पूजा करतो. ज्याला स्त्रीमधले देवत्व समजले तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री मधले देवत्व समजले तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, इतिहास साक्ष आहे आजपर्यंत ज्याने स्त्रीमधले देवत्व ओळखून तिचा सन्मान केला तो त्याच्या जीवनात यशस्वी झाला.अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत.

- Advertisement -

नवरात्रोत्सव म्हटले की आपल्या समोर चटकन उभा राहतो तो गरबा दांडिया. कोरोनामुळे मागची दोन वर्षे गरबा दांडिया पूर्णपणे बंद होता, परंतु यंदाच्या वर्षी सर्व नियम अटी शिथिल झाल्याने यंदा गरबा जल्लोषात साजरा करता येणार आहे. दोन वर्षांनंतर यंदा गरबा, दांडियावर निर्बंध नसल्याने मागच्या महिनाभरापासून गरबा, दांडियाचे क्लास सुरू झाले आहेत. अनेक सभागृह, मंदिरात सायंकाळच्या वेळला तरुणाई, महिला गरब्यांच्या गीतांवर ताल धरताना दिसून येत आहेत. काही ठिकाणी तर चक्क थेट गुजरात राज्यातून गरबा प्रशिक्षक बोलावण्यात आले आहेत. गरबा या संकल्पनेचा उगम प्रथम गुजरात राज्यातून झाला असला तरी मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह देशभरातल्या बाळगोपाळांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या गरब्याची भुरळ पडली आहे. या गरबा दांडियामुळे अनेक लोकांना रोजगारदेखील मिळत आहे. गुजरात, राजस्थान राज्यांतून अनेक नागरिक दांडिया विकण्यासाठी महाराष्ट्रात येत असतात. गरबा दांडिया म्हटले तर त्यासाठी लागणारा गुजराथी चनिया चोलीला विसरून कसे चालेल.

दोन वर्षांच्या कालावधी नंतर बाजारपेठा पुन्हा गजबजल्या आहेत. गरब्यासाठी लागणारे कपडे, दागिने अन्य मॅचिंग वस्तू खरेदी करण्यासाठी सर्व लोकांची बाजारात एकच गर्दी पाहायला मिळत आहे. नवरात्री हा विशेष करुन गुजराती लोकांचा सण जरी असला तरी त्याची क्रेझ महाराष्ट्रातही प्रचंड असते. यंदा बाजारपेठेत युनिसेक्स धोतींचे क्रेझ मोठ्या प्रमाणावर दिसून येतय. धोती ही फॅशन केवळ पुरुषांपुरती मर्यादित न राहता आता मुलींसाठीही रेडिमेंड आणि फॅन्सी धोतीची फॅशन बाजारात आलेली आहे. त्याचबरोबर आकर्षक नक्षीकाम केलेले जॅकेट्स, गुजराथी कलेने तयार केलेले केडीयू पेहराव, घागरा आणि चनियाचोलीवर मॅचिंग ऑक्साइडची ज्वेलरी, लोकर आणि मोत्यांपासून बनवलेल्या ज्वेलरीचादेखील आगळा वेगळा ट्रेंड यंदाच्या वर्षी दिसून येतोय. हे तर झाले कपडे आणि इतर गोष्टींबद्दल, परंतु यंदा एक आगळा वेगळा ट्रेंड दिसण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे आणि तो ट्रेंड म्हणजे बॉलीवूड गाण्यांवर दांडिया नृत्य. अगदी बरोबर ऐकले आपण गुजराथी आणि राजस्थानी गण्यांना मागे सारत यंदा गरब्याच्या पंडालमध्ये बॉलीवूडची गाणी ऐकू येणार आहेत.

एका पाहणीदरम्यान दांडियांच्या क्लासमध्ये युवक बॉलीवूड गाण्यावर सराव करताना दिसून आले आहेत. त्यामुळे या वर्षी हा नवीन ट्रेंड रुजू होतो की काय यावर अनेक तर्कवितर्क केले जाताना समोर येत आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवाची मुख्य थीम ही स्त्री सक्षमीकरण आहे. ज्याप्रमाणे आपण नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या विविध रुपांची आराधना करतो, भक्तिभावाने पूजा अर्चा करतो, त्याचप्रमाणे आपल्या घरात असणार्‍या प्रत्येक स्त्रीला पूजले तर नक्कीच आपल्यावर सुख समृद्धीचा वर्षाव झाल्याशिवाय राहणार नाही. अग्निपेक्षाही पवित्र असणार्‍या स्त्रीला आपण तिच्या मासिक पाळीच्या काळात अपवित्र ठरवतो, परंतु माझ्या मते ते मासिक पाळीचे दिवस सर्वात पवित्र असतात. कारण त्या दिवसांमुळेच तुम्ही आम्ही हे जग पाहू शकलो. ज्याअर्थी आपण देवीला जगतजननी म्हणतो ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आपल्याच घरातील स्त्री आहे.

म्हणतात ना, एका स्त्रीला माता होण्यासाठी २६ हाडं तुटल्यावर जो त्रास होतो तो एका बाळाला जन्म देण्यासाठी सोसावा लागतो. त्यामुळे एक वेळ त्या पाषाणरूपी देवीची पूजा केली नाही तरी चालेल, परंतु आपल्या घरात असणार्‍या खर्‍या देवीचा सन्मान करण्यात स्वत: कुठेही कमी पडू नका. ज्याप्रमाणे आपण आपल्या लहान मुलांना चालायला, बोलायला शिकवतो, त्याचप्रमाणे मुलामुलींमध्ये भेदभाव न करता स्त्रियांचा सन्मान करायला त्यांना लहानपणापासूनच शिकवले पाहिजे. माता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्त्रियांचा सन्मान करायला शिकवले आणि त्यामुळे सामान्य शिवबा जनतेचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. हीच आहे स्त्री सन्मानाची खरी शक्ती. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात आपण सर्वांनी हा निश्चय करुया, की मी स्त्रीचा सन्मान करेन आणि माझ्या परिवारासोबतच समाजाला स्त्रीचा सन्मान करायला शिकवेन.

–प्रमोद उगले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -