घरफिचर्ससारांश...तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे!

…तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे!

Subscribe

मुंबईत बाजारात विक्रीसाठी ठेवलेले गणपती पाहिल्यावर गावच्या गणपतीसाठी सुतारशाळेत पाट दिला असेल का, याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. कोरोनामुळे अनेकांना मागच्या वर्षी गणपतीला गावी जात आले नाही. गेले तरी पंधरा दिवस गावाच्या बाहेर रहावे लागले. सगळीच उदासीनता आणि नैराश्याचा कोळोख होता. आता जसे वर्ष उलटले तसे लसीकरणामुळे कोरोनाचा प्रभाव ओसरला आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाने पुन्हा सगळे उल्हासित होत आहे. शेवटी आरती प्रभूंच्या शब्दात सांगायचे झाले तर, कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून, जगतात येथे कुणी मनात कुजून, तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे.

उन्हाचा त्रास जाणवायला लागला. तशी देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली.कोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत होती, तेव्हा होळी,गुढीपाडवा हे सण आभासी माध्यमातून साजरे होत होते. चैत्राची चाहूल कधी लागली आणि नवीन पालवी झाडावर केव्हा दिसू लागली याचा अंदाज आलाच नाही. निसर्ग आपला नियम चोख बजावीत होता.लॉकडाऊन असो किंवा अनलॉक असो. त्याचं असं बहरणं चालू होतं. कुठेतरी माणूस ह्या सणाच्या आनंदापासून बाजूला होता.

कोकणी माणसाला ह्या वर्षी शिमगा अनुभवता आला नाही. शिमग्याची पालखी खांद्यावर जोजवता आली नाही,याची रुखरुख त्याच्या मनाला लागली होती. कोकणात ऐन आंबे-फणस पिकत होते आणि त्या मातीचा सुगंध हुंगायला त्याला जाता येत नव्हतं. ही खंत गेली दीड वर्ष सगळ्यांना जाचत होती. एका काळोख्या रात्री कुठल्यातरी बेटावर आपण राहतो आहोत, असा भास व्हावा अशा प्रकारे माणसं वावरत होती.

- Advertisement -

आजूबाजूला शुकशुकाट पसरलेला असायचा. कोणी तरी जीवाच्या आकांताने आपल्या गावची वाट धरत चाललेले आहेत. तिथेही त्यांना थारा मिळेल असे वातावरण नाही. वेशीच्या बाहेर त्यांना अडवून धरले आहे. तरीही या कोलाहलात इकडून निघून त्यांना गावच्या ठिकाणी जाऊन रहाणे त्यांना श्रेयस्कर वाटते. आजूबाजूला मृत्यूची भीती दिवसेंदिवस वाढत जात होती,आपला जीव राहिलं की जाईल अशी परिस्थिती असताना कधी एकदा तोंडावरची मुखपट्टी काढली जाईल याची सर्व वाट बघत असताना,कोरोना प्रतिबंधक लस आली.आणि झाकोळलेले गेलेलं आभाळ हळूहळू मोकळं होतं गेलं.

जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना पावलोपावली गेल्या दीडवर्षाच्या पाऊलखुणा कुठेना कुठे दृष्टीस पडतात. जे कधी कधी अनुभवाला येत आहे ते कधीतरी भयानक वाटते. महिन्याभरापूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन लेक्चर्स घेत होतो. लेक्चर्सच्या वेळी बहुतेक मुलं आपला व्हिडीओ कॅमेरा बंद ठेवतात. त्यादिवशी परीक्षा होती म्हणून त्यांनी आपले कॅमेरा चालू ठेवावेत ही अपेक्षा असल्याने ज्या मुलाने कॅमेरा बंद करून ठेवला आहे, त्यांना त्याच्या नावाने ओरडून कॅमेरा चालू ठेवा म्हणून सांगितले, बहुतेकांनी कॅमेरा चालू केला, पण एक मुलगा काही केल्या कॅमेरा चालू करत नव्हता. शेवटी परीक्षेचे मार्क्स देणार नाही म्हटल्यावर त्याने कॅमेरा चालू केला. त्या कॅमेराच्या मागे त्याचे घर बघितले, आणि कशाला ह्या मुलाला कॅमेरा चालू करायला सांगितला हा प्रश्न मला पडला. गेल्या वर्षभरात वडिलांची नोकरी गेलेली, आईचा व्यवसाय बंद पडलेला. आधीच हातातोंडाशी गाठ असलेलं कुटुंब, ह्या परिस्थितीत गांगरून गेलेलं. एका पत्र्याच्या चाळीत राहणारे कुटुंब ह्या यातना भोगत होतं. ही परिस्थिती खूप कुटुंबाची असेल. आता ती प्रकर्षाने पुढे येते आहे.

- Advertisement -

पण आता पुन्हा एकदा जीवन पूर्वपदावर येत असताना कुठेतरी तिसर्‍या लाटेची चिंता मनात घर करून आहे. आभाळ आता मोकळं होईल असं वाटतं खरं, पण दुसर्‍या क्षणाला एखादे मळभ समोर येतेच. त्या मळभटीमुळे बैचेन व्हायला होते. आता आषाढातला अंधाधुंद बरसणारा पाऊस ओसरला आहे. श्रावणसरी कोसळत आहेत. उन-पावसाचा खेळ सुरू आहे. श्रावण सुरू झाला आणि लॉकडाऊन हळूहळू संपला. दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर, हॉटेल्स सुरू झाल्या. बंद असलेले उद्योगधंदे सुरू झाले. लोकांचे रोजगार सुरू झाले. चैतन्याचे वारे पुन्हा वाहू लागले. मुख्य म्हणजे मुंबईसारख्या शहरात लोकांची जीवनवाहिनी असलेली रेल्वे दोन्ही लसीकरण झालेल्या सामान्य लोकांसाठी धावू लागली, आणि शहर पुन्हा गजबजू लागलं. बसमध्ये बाहेर लटकून किंवा उभ्याने प्रवास करणारे प्रवासी दिसू लागले.

वारुळात असलेल्या नागोबाला पुजायला माय भगिनी जाताना दिसू लागल्या. गेल्या आठवड्यात रक्षाबंधनासाठी बहिणी आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी बाहेर पडताना दिसू लागल्या. इतके दिवस इमारतीच्या बाहेरच्या मैदानात पाऊलं टाकले नव्हते. पण गेल्या आठवड्यात मैदाने खुली झाली आणि पुन्हा मैदानात वाढलेली सृष्टीची हिरवळ अनुभवयाला मिळाली. गुडघ्यापर्यंत वाढलेले गवत मनाला आणि पायाला गुदगुल्या करू लागले. आता खर्‍या अर्थाने लॉकडाऊन संपला. ही भावना मनात खुलवून गेली. समोरच्या वाढलेल्या फुलझाडांकडे लक्ष गेले आणि मन किती प्रफुल्लीत झाले म्हणून सांगू !. इतक्या दिवस ह्या झाडांकडे लक्ष गेले नव्हते. निसर्गाच्या अविरत चाललेल्या ह्या चक्राला मात्र लॉकडाऊन बाधलेला नाही.

आता ह्या वातावरणात कुठेतरी सकारात्मकता आली आहे. निसर्ग आणि माणूस दोघेही आता येणार्‍या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी सिद्ध झाला आहे. ह्या काळात गर्दीचे समायोजन करण्यासाठी चार थराची का होईना पण दहीहंडी बांधण्यास परवानगी देण्यात येत आहे. एवढा मोठा निर्णय जेव्हा समोर येतो तेव्हा व्यवस्था कुठेतरी पुढे धोका नाही याची जाणीव तर करून देत नाही ना?. समाजात पुन्हा सकारात्मकता यायला हवी तर सण साजरे करण्याशिवाय पर्याय नाही. ह्याबाबतीत मला सारखे तुकोबा आठवतात.

झाली झडपणी खडतर देवा । संचरली आता निघो नये ॥ मज उपचार झणी उपचार झणी आता करा । न साहे दुसरा भार काही ॥ धृ ॥ नेउनिया घाला चंद्रभागे तीरी । जीवा नाही उरी काही आता ॥ 1 ॥ तुका म्हणे कळो आले वर्तमान । माझे तो वचन आच्छादले ॥2 ॥.

काय होईल ते होवो पण आता ह्या सगळ्यात मिसळल्याशिवाय आता दुसरा उपाय नाही. माणूस हा समाजशील प्राणी आहे त्यामुळे तो अजून इथून लांब राहू शकत नाही. गेल्यावर्षी गणपती उत्सव तोंडावर आला आणि कोकणात विलगीकरणाचे नियम कडक करण्यात आले. कोकणी चाकरमानी त्याच्या गावच्या गणपतीपासून दूर राहिला. पण यंदा तो पुन्हा आपल्या गावच्या गणपतीला जाण्यासाठी सज्ज झाला आहे. तिथली लाल माती त्याला साद घालते आहे. आता पुन्हा कोकणात जाणार्‍या गाड्या फुल्ल होत आहेत. ह्या चाकरमान्याच्या डोळ्यासमोर त्याच्या सुतारशाळेत तयार होत असलेला गणपती येत आहे. यंदा गणपतीला जाण्यासाठी कुठल्या मार्गाने जावे याची आखणी करायला त्याने सुरुवात केली आहे.

तिथला निसर्ग कसा फुलला असेल याचे मनोमन त्याने अंदाज बांधले असतील. खळ्याच्या बाजूला केलेल्या आळी आता मांडवावर चढल्या असतील. त्यांना बारक्या बारक्या किरल्या लागल्या असतील. पडवळ किती लांब झाले असतील याचा त्याच्या मनात विचार येऊन गेला असेल. श्रावणसरी पिऊन गाव सुजलाम सुफलाम झाला आहे. सगळ्या आनंदाची ओढ ही माणसाला एकमेकांमध्ये मिसळण्याची आहे. लोक जसे एकमेकात मिसळत जातील तसे मनातलं धुंक धूसर होत जाईल. ह्या मनाच्या धुक्याच्या पलीकडे जे अंतर्मन आहे ते प्रफुल्लीत होणार आहे ते केवळ ह्या सणांच्या आगमनाने.

इमारतीच्या खाली उतरलं की, थोडी पाच पावलं चाललं की गणपतीची कार्यशाळा लागते. बाहेरून बघितलं की, दोन-चार मूर्तिकार गणपती रंगवून फळीवर ठेवत असलेले दिसतात. तेव्हा नकळत आपल्या गावच्या गणपतीसाठी सुतारशाळेत पाट दिला असेल का याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. अज्ञानाचे धुके जसजसे निघून जाते तसतसे ज्ञानाचा प्रकाश दिसू लागतो. त्यासाठी बहिर्मनाची सांगड अंतर्मनाशी घालावी लागते. कसलाही प्रसंग येवो, ह्या सणाच्या आगमनाने पुन्हा सगळे उल्हासित होतेच. शेवटी आरती प्रभूंच्या शब्दात सांगायचे झाले तर, कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून, जगतात येथे कुणी मनात कुजून, तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे. असाच अनुभव येतो आहे. कोरोनाचे सावट आता हळूहळू विरळ होऊ लागले आहे. मानवी हृदयातल्या आभाळात मळभ आले होते, आता मानवाच्या उर्जत्सलतेने ते मळभ हळूहळू दूर केले, त्यामुळे आभाळ आता मोकळे होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -