घरफिचर्ससारांशअस्वस्थ वर्तमानाचे प्रतिबिंब!

अस्वस्थ वर्तमानाचे प्रतिबिंब!

Subscribe

‘गॅस चेंबर’ हा कथासंग्रह वाचताना लेखक रत्नाकर मतकरी यांनी आपल्या लेखणीतून सामाजिक वास्तव मांडताना येणार्‍या भविष्यातील भय संकेत दिले आहेत. समाजातील एक वर्ग हा नेहमीच उपेक्षितांचे दमन करत असतो, त्यांचा आवाज दाबला जात असतो. त्यामुळे त्यांच्या मनात खदखद आणि अस्वस्थता निर्माण होत असते. परिणामी त्यांचे जीवन हेच जणू एक गॅस चेंबर बनते. त्यातील गॅसमध्ये सामान्यांची घुसमट आणि कोंडमारा होत असतो, त्याला मतकरींनी शब्दरुप दिलेले आहे.

आपल्या अवतीभवती घडणार्‍या सामाजिक बदलांचेे पडसाद आपल्या लेखणीतून अचूक टिपणार्‍या रत्नाकर मतकरी यांचा ‘गॅस चेंबर’ या कथासंग्रहाचे अलीकडेच प्रकाशन झाले आहे. यामधील कथा या सध्याची जी काही सामाजिक आणि राजकीय स्थिती आहे. त्यामध्ये नेते म्हणून वावरणारी मंडळी आहेत, त्यांच्या एकाधिकारशाही आणि आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा या वृत्तीची पोलखोल करणार्‍या आहेत. त्यांच्या या कथासंग्रहाला गणेश मतकरी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, ‘रत्नाकरी मतकरी यांनी अनेक गूढ कथा लिहिल्या आहेत, त्यासाठी ते ओळखले जातात. पण या कथा संग्रहात त्यांनी ज्या कथा लिहिल्या आहेत, या समाजात सध्या ज्या काही गूढरित्या गोष्टी घडत आहेत, त्याचे भविष्यकालीन सूचन करणार्‍या भयकथा आहेत.’ गणेश मतकरी त्यांचे हे म्हणणे हा कथासंग्रह वाचताना शब्दोशब्दी आपल्या लक्षात येते. कारण सध्या समाजामध्ये असे काही वातावरण निर्माण झालेले आहे की, जे सत्याची कास धरत आहेत, त्यांना जगणे अवघड होऊन बसले आहे. त्यांना एकतर नामोहरम करून स्वत:च आत्महत्या करायला भाग पाडले जात आहे, नाही तर गूढरित्या त्यांना गायब केले जाते. समाजही इतका घाबरलेला आहे की, थेट पुढे येऊन कुणी साक्ष द्यायचे धाडस करत नाही. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पावलोपावली गळचेपी होत आहे. जी व्यक्ती विवेकी विचाराने जगत आहे, त्यांच्यापुढे जगण्याचे आव्हान उभे राहिलेले आहे.

गॅस चेंबर असे या कथासंग्रहाला नाव दिले आहे, ते यातील कथा वाचताना सूचक अर्थाने दिले आहे, असे वाटल्यावाचून राहत नाही. गॅस चेंबर हा शब्द वाचला किंवा ऐकला की, आपल्या नजरेसमोर थेट हिटलरने लाखो ज्यूंची गॅस चेंबरमध्ये कोंडून केलेल्या हत्येचे भयकारी चित्र उभे राहते. हिटलरची हुकुमशाही आणि त्याला न पटणार्‍या गोष्टींचा आणि माणसांचा त्याने गॅस चेंबरमध्ये निप्पात केला. गॅस चेंबर हे या ठिकाणी प्रतिकात्मकतेने वापरण्यात आले आहे. त्या माध्यमातून मतकरी यांनी भारतात अलीकडच्या काळात सत्तेवर आलेली मंडळी आणि एकाधिकारशाहीचे समर्थन करणारी यांची विचारसरणी देशाला कशी गॅस चेंबरच्या दिशेने नेत आहे, असे प्रत्येक कथेतून ते सूचवताना दिसतात. कथांची जरी वेगळी नावे असली तरी त्यांच्यामध्ये भयसूचन करणारे एक समान सूत्र आहे. त्या वाचताना सावध ऐका पुढल्या हाका, असा आवाज आपल्याला सतत ऐकू येत राहतो. गॅस चेंबर हे या कथासंग्रहाचे नाव असले तरी यातील पहिल्या कथेचे नावही गॅस चेंबर आहे. त्यानंतर न बजेगी बाँसुरी, रश्शीवाला, अलीकडे त्यांच्या हत्या नाही करत, सुरक्षित, सर्वेसर्वा, डोरोथीची गोष्ट अशा या कथा आहेत.

- Advertisement -

गॅस चेंबर या पहिल्या कथेत शर्वरी ही युवती आपल्या विद्यार्थ्यांना खरा इतिहास काय आहे, ते शिकवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत असते. पण काही अदृृष्य राजकीय शक्ती तिला विरोध करत असतात. त्यामध्ये धर्मवीर या शिक्षण संस्था चालकाचा समावेश आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, देशाचा इतिहास शुद्ध हवा, त्याशिवाय देशाचं भवितव्य उज्ज्वल होणार नाही. मधल्या अनेक वर्षांत अनेकांनी इतिहास गढूळ करून टाकला आहे. तो आपल्याला शुद्ध करून जगासमोर मांडायचा आहे. सध्याच्या सरकारकडून सुरू असलेला इतिहास बदलण्याचा आणि तो पाठ्यपुस्तकातून नव्या पिढीला शिकवण्याचा जो काही आटापिटा सुरू आहेत, त्याचे या कथेतून सूचन होते. शर्वरी एका गोडाऊनमध्ये तिच्या विद्यार्थ्यांचा क्लास घ्यायची, तिचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ती क्लास घेत असलेल्या गोडाऊनमध्ये नळ्यांमधून गुपचूप गॅस सोडला जातो, त्यानंतर तिथे स्फोट घडवला जातो. त्यात शर्वरीसह वीसजण ठार होतात. शेवटी हा गॅस सिलिंडरचा स्फोट होता, असा निष्कर्ष काढून हे प्रकरण दाबून टाकले जाते.

नाईलाजाने शर्वरीचा मित्र अमेरिकेला निघून जातो. यातून एक स्पष्ट होते, जो आपल्या मताप्रमाणे चालत नाही, त्याला संपवायचे किंवा नामोहरम करून इथे राहणे अशक्य करून टाकायचे. न बजेगी बाँसुरी या कथेत किरण वेद या नावाने वावरणारी महिला आणि तिला मदत करण्यासाठी धडपडणारे वकील आनंद यांची शोकांतिका आहे. किरण वेदचं खरं नाव रेवा पराशर आहे, तिचा पती रघू पराशर आणि त्यांचा ग्रुप हा शहरातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असतात. हे दोघे पत्रकार असतात. पुनीत मेहता या राजकीय नेत्याची तेे पोलखोल करत असतात. पराशरने माहितीच्या अधिकारात मेहताने किती जमिनी विकत घेतल्या, केव्हा घेतल्या, आताची त्यांची किंमत, मूळ मालकांची नावे, पत्ते, सगळी माहिती गोळा केलेली असते. मेहताने जमीन मालकांना आणि सरकारलाही हजारो कोटींचा गंडा घातला असावा, असा संशय असल्यामुळे पराशरला त्याच्या गैरव्यवहार उघड करायचा होता. त्यामुळे तो खडानखडा माहिती मिळवत होता. पण पुढे पराशरच्या मोटार सायकला अचानक अपघात होतो आणि त्याचा त्यात संशयास्पदरित्या मृत्यू होतो.

- Advertisement -

रेवाची बाजू घेऊन लढणारे वकील आनंद यांना गर्दीत विषारी सुई टोचण्यात येतेे. पण त्यांचा हृदयविकाच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात येते. किरण वेद हे नाव घेऊन न्यायाची लढाई लढणार्‍या रेवाला शेवटी पोलीस अटक करतात. कथांचा हा धक्कादायक पट उलगडत जातो. प्रत्यक्ष वाचताना त्याचा प्रकर्षाने प्रत्यय येत राहतो. या कथांमध्ये समाजातील एका विशिष्ट वर्गाकडून उपेक्षितांची होणार पिळवणूक अधोरेखित करण्यात आली आहे, शेवटी डोरोथी या कथेपर्यंत आपण पोहोचल्यानंतर विझार्ड आणि त्याचा मित्र यांनी सगळ्या व्यवस्थेलाच कसे वेठीस धरले आहे आणि आपल्या तालावर नाचवत आहेत, हे दाखविण्यात आले आहे. या कथा वाचताना आजूबाजूच्या भवतालात घडणार्‍या घटना आणि त्या घडवणार्‍या व्यक्ती आपल्याला जाणवू लागतात. रत्नाकर मतकरी यांचे आजवरचे एकूणच लिखाण पाहिले तर त्यात नेहमीच एक कसदारपणा असतो, तशाच या कथा आहेत, पण त्यांची दुसरी बाजू पाहिली तर त्यात एकाच गोष्टीची सातत्याने झोड काढण्यात आलेली दिसून येते. सत्ताधारी हे नेहमीच वाईट असतात आणि ते काहीच चांगले करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना कायम झोडूनच काढले पाहिजे, असा जो लोकांना खूश करण्याचा आणि टाळ्या मिळवण्याचा कल अनेक लेखकांचा असतो,त्यातून मतकरींनाही स्वत:ला वेगळे करत आले नाही. तरीही गॅस चेंबर हा कथासंग्रह जरूर वाचण्यासारखा आहे.

-लेखक – रत्नाकर मतकरी
-समकालीन प्रकाशन,
-पृृष्ठे – १४३, मूल्य – २०० रुपये

-पुस्तक परीक्षक आपलं महानगरचे वरिष्ठ उपसंपादक आहेत.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -