गोलमेज परिषद

कुठे बाहेर फिरायला गेले तरी त्या कारमध्ये काय किंवा कोणत्याही वाहतूक मार्गाने गेले तरी आजूबाजूला मागे पळणारी झाडे, डोंगर, निसर्ग, खरं म्हणजे सृष्टीसौंदर्य न बघता सगळ्यांचे लक्ष त्या मोबाईल गेममध्येच. काही सांगायला जा तर ओरडतात, अगं आई थांब ना जरा. तो ग्री बर्ड गेम खेळतो आहे ना यार. काही राऊंड राहिले आहेत आणि मला नाही निसर्ग बघण्यात इंटरेस्ट. खरंतर गरजेपुरता मोबाईलचा वापर करावा. सगळे एकत्र आले की मग तो बाजूला ठेवून मस्त वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. गमतीत सांगायचे तर रोज गोलमेज परिषद भरली पाहिजे घरात.

–अर्चना दीक्षित

माझा हा लेख म्हणजे जरा याआधीच्या लेखाचा पार्ट टू म्हटलात तरी चालेल हं. खरंतर या ऑनलाईन गेम्सवर खूप काही लिहिता येईल. हा विषयच असा आहे. सो कॉल्ड आजकालची फॅशन. फॅड म्हणा ना.

पण खरोखर घराघरात हे दृश्य बघायला मिळते. जो येतो तो त्याच्या नादाला लागला आहे. त्यामुळे कोणाला बोलायचे आणि काय समजावून सांगायचे, हादेखील एक प्रश्न पडतो. त्यामुळे होणारे परिणाम किंवा दुष्परिणाम यांचा विचारसुद्धा केला जात नाही. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे या जगात पार रममाण होऊन गेले आहेत. इतकेच काय गमतीत सांगायचे झाले तर कोणाच्या घरी गेले तरी ‘अहो जरा वायफायचा पासवर्ड मिळेल का हो’ हे विचारायला पण मागे पुढे पाहत नाहीत.

काही जण तर जणू कोणी भेटायला आले तर ट्रेमध्ये पाण्याच्या ग्लासऐवजी वायफायचाच पासवर्ड देत असावेत. हा हा… जोक्स अपार्ट हे असले व्हायला फार काही वेळ लागणार नाही असे वाटते.

म्हणजे मोठ्या उत्साहात एखादे स्नेहसंमेलन आयोजित करतात. बरं का. ‘खूप दिवस झाले बाई आपण त्या अमक्या अमक्या लोकांना घरी बोलावलेच नाही ना. या शनिवारी बोलवायचे का हो? मागे त्यांनी आपल्याला बोलावले होते ना. आपण पण उरकून टाकू. म्हणजे उगाच बोलायला नको कोणी, आपण बोलावलं नाही म्हणून आणि हो बाहेरून काही पदार्थ ऑर्डर करूयात. म्हणजे त्या स्वयंपाकघरात मी अडकून नाही राहणार. हो ना हो, तुमचं काय मत आहे?’ तो नवरा पण फोनमधून डोकं वर काढत काही बोलणं समजलं नसलं तरी बायको काही बोलायला नको म्हणून दुजोरा देऊन मोकळा होतो.

ज्येष्ठ नागरिक तर नवीन मोबाईल हातात आला तर एक मिनिटही सोडत नाहीत. जणू एका दिवसात त्यांना शिकायचा आहे तो कसा वापरतात ते. मग काय तेदेखील तासन्तास त्या मोबाईलवर वेळ घालवायला सुरुवात करतात. नातवंडांना तेवढंच फावतं. आजी-आजोबांना नवी गॅजेट्स शिकवायच्या निमित्ताने आपणही वेळ वाया घालवत बसतात.

त्यामुळे एकमेकांमध्ये संवाद कमी होऊ लागला आहे हे लक्षातच येत नाही कोणाच्या. मुलं तर एकलकोंडी बनत आहेत. हे वेळीच लक्षात आले तर ठीक, नाहीतर नुकसान व्हायला फार काळ लागत नाही.

कुठे बाहेर फिरायला गेले तरी त्या कारमध्ये काय किंवा कोणत्याही वाहतूक मार्गाने गेले तरी आजूबाजूला मागे पळणारी झाडे, डोंगर, निसर्ग, खरं म्हणजे सृष्टीसौंदर्य न बघता सगळ्यांचे लक्ष त्या मोबाईल गेममध्येच. काही सांगायला जा तर ओरडतात, अगं आई थांब ना जरा. तो ग्री बर्ड गेम खेळतो आहे ना यार. काही राऊंड राहिले आहेत आणि मला नाही त्या निसर्ग बघण्यात इंटरेस्ट. कसलं बोअर आहे बाहेरचं दृश्य. त्याच गेममध्ये धाकटी बहीण किंवा भाऊदेखील मग्न होऊन जातात.

कोणाच्या घरी गेले तरी हाच प्रकार, पण मग त्यामुळे ही मुले संवाद साधण्याच्या दृष्टीने कमी पडत जातात. कोणाशी काय आणि कसे बोलायचे हे त्यांना कळतच नाही. कारण विषयही समजत नाही त्यांना. यामुळे कुठे जायची त्यांना इच्छा नसते. कोणी घरी आलेले नको असते. हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शाळेतील डीबेट्समध्ये ती इतर विषयांवर चर्चा करण्यात कमी पडतात, पण मग आपल्याला एखाद्या विषयावर बोलता येत नाही याचा मनात कुठेतरी न्यूनगंड निर्माण होत जातो.

म्हणून तर मग एखाद्या मार्गदर्शकाची मदत घ्यावी लागते. मला काय वाटतं, या अशा सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा घरात नियम केला पाहिजे. काही अगदीच गरजेपुरता मोबाईलचा वापर करावा. सगळे एकत्र आले की मग तो बाजूला ठेवून मस्त वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. गमतीत सांगायचे तर रोज गोलमेज परिषद भरली पाहिजे घरात.

मला माहीत आहे एकदम बदल घडवणे शक्य नाही, पण हळूहळू रोज रूटीन बनवत गेले तर अशक्य असे काहीच नाही.
काय मग भरवायची गोलमेज परिषद आपापल्या परीने आपापल्या घरी?