नव्या पिढीच्या प्रेमाचे धागे!

वर्ष २०१५ हे वरुण ग्रोव्हरसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं, ज्यातलं पहिलं कारण होतं ते म्हणजे दम लगा के हैशा सिनेमा, पण दुसरं कारण म्हणजे अनेक प्रेमवीरांसाठीची आठवण... प्रेमाची आगळी वेगळी परिभाषा मांडणार्‍या वरुण ग्रोव्हर लिखित आणि नीरज घेवान दिग्दर्शित मसान हा सिनेमादेखील याच वर्षी रिलीज झाला होता. ज्यातील तू किसी रेल सी गुजरती है हे गाणं सदाबहार गाणं बनलं. हे एक असं गाणं आहे जे आजपासून ५० किंवा १०० वर्षांनंतरही प्रेमवीरांसाठी खास गाणं असेल. याच वर्षी वरुणला दम लगा के हैशा सिनेमातील मोह मोह के धागे सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.

–अनिकेत म्हस्के

लेखकाला एक भूमिका असते, काही गीतकारांनादेखील ती भूमिका असतेच, पण गीत लिहिताना तो भूमिका बाजूला ठेवतो, पण काही गीतकार असतात ज्यांची भूमिका कधीही बदलत नाही आणि त्यांनी लिहिलेल्या गाण्याच्या माध्यमातून ती भूमिका झळकत असते. गेल्या काही वर्षांत एक गीतकार असा आहे, ज्याची गाणी तर गाजतातच, पण गाण्यांशिवाय त्याचं स्टँडअप, त्याचं लेखक म्हणून लिखाणदेखील आवडणारा एक मोठा वर्ग आहे. विद्यमान सरकारच्या विरोधात भूमिका घेणारा आणि त्यांच्यावर टीका करणारा गीतकार म्हणून अनेकांना हा परिचित असेल, पण त्याने लिहिलेली गाणी ही अनेकांच्या काळजात घर करून राहिलीत. त्याने लिहिलेल्या गाण्यांची संख्या भलेही शेकडोंच्या घरात नसेल, पण त्याने लिहिलेलं प्रत्येक गाणं हे खास असतं. त्याच्या प्रत्येक गाण्यात काहीतरी वेगळं असतं. त्याचं तू किसी रेल सी गुजरती है असो किंवा जिया हो बिहार के लाला गाणं असो, प्रत्येक गाण्यामुळे तो लक्षात राहतो.

आयआयटीमधून शिक्षण घेऊन पुण्यात कोडिंग करून पुन्हा मुंबईची वाट धरणार्‍या या गीतकाराचे नाव आहे वरुण ग्रोव्हर. अनुराग कश्यपच्या आवडीचा गीतकार, ये मोह मोह के धागेचा गीतकार म्हणून हे नाव आधी परिचित होतं, पण आता मोनिका ओ माय डार्लिंग, कलासारख्या सिनेमांच्या गाण्यातूनही तो प्रसिद्ध झालाय. रीलवर गाजणारं बिखरने का मुझको शौक है बडा हे गाणंदेखील वरुण ग्रोव्हरच्याच लेखणीतून आलंय, जे सध्या चांगलंच चर्चेत आहे. हिमालयाच्या कुशीत सुंदरनगरमध्ये जन्मलेल्या वरुणला डेहराडून, लखनऊपासून या क्षेत्रात आवड निर्माण झाली होती.

कॉलेजमध्ये थिएटरसाठी नाटकं लिहिल्यानंतर हीच आवड अजूनच वाढली आणि पुण्यात कोडिंग करून बोअर झालेल्या वरुण ग्रोव्हरने मुंबईची वाट धरली. सुरुवातीला टीव्हीसाठी लिहिण्याचं काम केलं, ज्यात अनेक सुपरहिट मालिकांचा आणि शोजचा समावेश होता. अगदी द ग्रेट इंडियन कॉमेडी शो, दस का दम, सबका भेजा फ्राय, जय हिंद, ओय इट्स फ्रायडेसारख्या शोजचा समावेश होता. घूम, ऍक्सिडेंट ऑन हिल रोडसारख्या सिनेमांचं लेखन केलं, पण ते सिनेमे चालले नाहीत. शेवटी एका फिल्म वेबसाईटच्या प्रमोशनदरम्यान वरुणची भेट अनुराग कश्यपसोबत झाली. तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि पुढचा प्रवास अविस्मरणीय बनला.

वरुण ग्रोव्हर इंडस्ट्रीत लेखक म्हणून आला होता, पण अनुराग कश्यपच्या भेटीनंतर त्याच्यातला गीतकार पुन्हा जागा झाला. तर हा किस्सा आहे गर्ल इन येलो बूट्स या अनुराग कश्यपच्या सिनेमादरम्यानचा, जेव्हा स्वतः वरुणने अनुरागकडे या सिनेमासाठी गाणं लिहिण्याची संधी मागितली होती, पण अनुराग म्हणाला की, सिनेमात गाण्यासाठी जागा नाही. तेव्हा वरुणने थोडा हट्ट केला की, बघा जमलं तर एंड क्रेडिटमध्ये एखादं गाणं टाका. अनुरागने काही दिवसांनी त्याला बोलावलं आणि म्हणाला की, आधी सिनेमा पाहून घे. वरुण ग्रोवरने विना एडिटेड कट पाहिला आणि त्यात एंड क्रेडिटमध्ये गीतकार म्हणून त्याला स्वतःचं नाव दिसलं.

म्हणजे गाणं लिहिण्याअगोदरच अनुरागने त्याचं नाव टाकून दिलं आणि त्याच्यावर विश्वासदेखील दाखवला. हा तो काळ होता जेव्हा वरुण ग्रोवरने सिनेमासाठी एकही गाणं लिहिलं नव्हतं. केवळ वरुणच्या कविता वाचूनच अनुरागने त्याला ही संधी दिली आणि पहिल्यांदा लडखडाया नावाचं एक छोटंसं गाणं वरुण ग्रोव्हरने लिहिलं. त्यांची मैत्री जमली आणि पुढे जन्माला आला गँग्स ऑफ वासेपूर अल्बम, ज्यात वरुण ग्रोव्हरने लिहिलेली सगळीच गाणी सुपरहिट झाली. जिया हो बिहार के लाला, भूस के ढेर में राई का दाना, ओ वूमनिया असो किंवा मग हंटर, टॅ टॅ टू सारखं गाणं सिनेमात त्याची आणि स्नेहा खानवलकरची जोडी सगळ्यांनाच आवडली. आजही जिया हो बिहार के लाला हे त्याचं गाणं कुठे ना कुठे नक्कीच ऐकायला मिळतं.

या गाण्याच्या जन्मामागेदेखील इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कारण या गाण्याची मुख्य ओळ ही वरुण ग्रोव्हरने लिहिलेली नाही, तर ती स्नेहा खानवलकरने बिहारमध्ये एका गावातील कजरीच्या कार्यक्रमात ऐकली होती आणि त्या एका ओळीवर पुढे वरुण ग्रोवरने संपूर्ण गीत लिहिलं. गँग्सनंतरदेखील त्याने आँखो देखी, प्रागसारख्या सिनेमांसाठी गाणी लिहिली, पण त्याच्या करियरमध्ये सर्वात खास ठरलं ते वर्ष २०१५. कारण याच वर्षी आलेल्या २ सिनेमांतील त्याची गाणी सुपरडुपर हिट ठरली. त्यातला पहिला सिनेमा, ज्या गाण्यामुळे सामान्य प्रेक्षकांनादेखील वरुण ग्रोव्हर माहिती झालाय, तो सिनेमा म्हणजे दम लगा के हैशा आणि त्यातील ते गाणं म्हणजे ये मोह मोह के धागे, ज्या गाण्याने वरुणला इतकी प्रसिद्धी दिली. ते गाणं नवीन नव्हतं, तर वरुणने त्याच्या प्रेयसीसाठी एक कविता लिहिली होती, ज्यात बदल करून या गाण्याचा जन्म झाला. याच सिनेमातलं तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा हे गाणंदेखील लोकांना आवडलं होतं.

२०१५ हे वर्ष वरुण ग्रोव्हरसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं, ज्यातलं पहिलं कारण होतं ते म्हणजे दम लगा के हैशा सिनेमा, पण दुसरं कारण म्हणजे अनेक प्रेमवीरांसाठीची आठवण… प्रेमाची आगळी वेगळी परिभाषा मांडणार्‍या वरुण ग्रोव्हर लिखित आणि नीरज घेवान दिग्दर्शित मसान हा सिनेमादेखील याच वर्षी रिलीज झाला होता. ज्यातील तू किसी रेल सी गुजरती है हे गाणं सदाबहार गाणं बनलं. हे एक असं गाणं आहे जे आजपासून ५० किंवा १०० वर्षांनंतरही प्रेमवीरांसाठी खास गाणं असेल. याच वर्षी वरुणला दम लगा के हैशा सिनेमातील मोह मोह के धागे सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. पुढच्याच वर्षी रिलीज झालेल्या उडता पंजाब सिनेमासाठीच टायटल ट्रॅकदेखील वरुण ग्रोव्हरने लिहिलंय, जे हिट झालं. २०१६ सालचा शाहरुख खानचा एक सिनेमा आला होता, जो फ्लॉप ठरला, पण त्या सिनेमाचं टायटल ट्रॅक सुपरहिट ठरलं. तो सिनेमा म्हणजे फॅन आणि ते गाणं म्हणजे, मै तो तेरा हाय रे जबरा, होय रे जबरा फॅन हो गया.

यानंतर न्यूटन, काला, सुई धागा, सोनचिडिया, संदीप और पिंकी फरार, सम्राट पृथ्वीराज, मोनिका ओ माय डार्लिंग, बधाई दो अशा विविध सिनेमांसाठी गाणी लिहिलीत. यातलं ये एक जिंदगी काफी नही है, बिखरने का मुझको शौक है बडा ही गाणी तर गाजलीच, पण अजून एक सिनेमा आहे, ज्याची विश्व स्तरावर चर्चा झाली. तो सिनेमा म्हणजे आर आर आर. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमधील अंबर से तोडा, कुमडम भिमुडो ही गाणीदेखील वरुण ग्रोव्हरने लिहिली आहेत. वरुण ग्रोवर हा इंडस्ट्रीतील त्या मोजक्या गीतकारांपैकी आहे, ज्याच्या लिखाणात त्याचे स्वतःचे विचारदेखील दिसतात. जो फार जास्त उथळ लिहिणं टाळतो, जो स्वतःच्या टर्मवर काम करतो आणि केवळ गीतकार ही एकच त्याची ओळख नाही. तो एक लेखक, एक स्टॅण्डअप कॉमेडियन, दिग्दर्शक आहे, ज्याचे अनेक जबरा फॅन पाहायला मिळतील.