घरताज्या घडामोडीक्रौर्याला पोसणारा भवताल!

क्रौर्याला पोसणारा भवताल!

Subscribe

आपल्या जोडीदाराची क्रूरपणे हत्या करून त्याच्या मृतदेहाची अमानुषपणे विल्हेवाट लावण्याचे जे प्रकार घडत आहेत, त्यामुुळे यामागील कारणे काय असावीत, असा विचारशील नागरिकांना प्रश्न पडतो. नैतिक धाक नसल्याने बेजबाबदार वागणे तसेच विवेकी विचारशक्तीवर परिणाम करणारी व्यसने सो कॉल्ड आधुनिकतेच्या नावावर चालूच असतात. अशा प्रकारच्या परिस्थितीला किंवा नात्यांमधील ताणतणावांना विकृत व खूनशी पद्धतीने दाखवणारे चित्रपट, वेबसीरिज तणावग्रस्त व्यक्तींना मार्ग दाखवतात. नात्यांमधील अपयशाला संपवण्याऐवजी जोडीदारालाच संपवणे असे दाखवणार्‍या चित्रपट, मालिकांसोबत अशा व्यक्ती जोडल्या जातात. अशा कथानकांना मिळणारी लोकप्रियतेची मान्यता तणावग्रस्त व्यक्तींचा मेंदू अंगीकारून अविचाराने धाडसी होतो. त्यानंतर अशा अमानवी पद्धतींनी हत्या करून मोकळा होतो हे त्या व्यक्तीला कळतदेखील नाही. बरं अशा हत्या केल्यानंतरदेखील या व्यक्ती जणूकाही झालंच नाही अशा थंडपणे मृतदेहांची विल्हेवाट लावताना दिसतात.

– डॉ. शैलेंद्र गायकवाड

अलीकडच्या काळात दिल्लीतील एका युवतीचा तिच्या प्रियकराने चाकूने अनेकदा भोसकून आणि दगडाने ठेचून केलेला खून, तसेच मुंबईत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणार्‍या पुरुषाने महिलेचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवून विल्हेवाट लावण्याच्या घटनांनी संपूर्ण देशाचे समाजमन ढवळून निघाले आहे. अशा प्रकारच्या घटनांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. म्हणून या दुर्दैवी तसेच चिंता निर्माण करणार्‍या घटनांमागील मानसिक, सामाजिक कारणांची चर्चा होणं व त्यावर तातडीची उपाययोजना करण्याची कधी नव्हे इतकी गरज निर्माण झाली आहे. अशा घटना घडण्यामागे काही विशिष्ट पार्श्वभूमी प्रामुख्याने दिसून आली आहे. ती म्हणजे प्रेम प्रकरणं, प्रेमविवाह, लिव्ह इन रिलेशन्स, एकतर्फी प्रेम. यामध्ये अधोरेखीत करावे लागते ते प्रेम!

- Advertisement -

प्रेमाची व्याख्या तशी अवघड आहे, परंतु सोपं करून सांगायचं तर एकमेकांच्या अस्तित्वाचा बिनशर्त स्वीकार आणि सन्मान. हे फक्त परस्परांपुरतेच नाही तर प्रेम ही एक जबाबदारी आहे. ती दोन्ही बाजूंनी सारखी सांभाळली गेली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जबाबदारी फक्त एकमेकांपुरतीच मर्यादित नसते याचे सदोदित भान असावे. कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक भान राखून खुलत जाते तेच खरे प्रेम म्हणावे लागेल. इथेच गल्लत झाली म्हणजे अशा घटना प्रेमासारख्या पवित्र भावनेला बदनाम तर करतातच, परंतु प्रेम भावनेवरील विश्वासालाही तडा देतात. दहशत, भय आणि संशय वाढवतात.

खरं निर्मळ प्रेम भावनेला अनुभवण्याइतकी समज आजकाल खूप दुर्मीळ झाली आहे असे दिसून येते. मुळात आजकाल जे प्रेम होतं ते खरंच प्रेम आहे का, हाच खरा प्रश्न आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर जे काही प्रेम वाटतं हे निव्वळ शारीरिक आकर्षण असतं. तो हार्मोन्सचा प्रभाव असतो हे सर्वांना माहीत आहे. तरीही या आकर्षणाला प्रेम म्हणून प्रोत्साहित करणार्‍या कितीतरी गोष्टी समाजात घडत असतात. यामध्ये चित्रपट, मालिका, वेबसीरिज आजकाल रिल्स, गाणी, अनेक जाहिराती. कोवळी मनं गोंधळणार नाही तर काय होईल. ही परिस्थिती म्हणजे एखाद्या अजगराच्या जबड्यात जाण्यासारखी आहे. समवयस्क किशोरवयीन मुलामुलींना बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड आहे म्हणून आपल्यालाही असावे असं वाटणं हा केवळ प्रभावाचाच नव्हे तर मित्रमैत्रिणींकडून होणार्‍या दबावाचादेखील परिणाम आहे. नाहीतर सरळ राहू इच्छिणार्‍यांना लूजर म्हणून हेटाळणी किंवा वाळीत टाकण्याचे प्रकार सर्रास शाळा-कॉलेजेसमध्ये बघायला मिळतात. यामध्ये अनेकदा एकतर्फी प्रेमाची बळजबरी एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यापर्यंतचे प्रकार घडतात. आत्महत्या, हत्या, हल्ले, अ‍ॅसिड हल्ले किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे बदनामी करण्याच्या घटना घडणे यातूनच होते. हे झाले किशोरवयीन आणि शैक्षणिक वयात घडणारे विपर्यस्त प्रेमाचे नकारात्मक परिणाम.

- Advertisement -

यानंतर जरा मोठे झाले, जसे करियरला सुरुवात झाली की मुलगा किंवा मुलीच्या प्रेमात पडणे किंवा अधिक धाडसी (आता अविचाराने धाडसी म्हणायला हवे) असाल तर थेट लिव्ह इन रिलेशनमध्ये जाणे किंवा थेट प्रेमविवाह करून टाकणे. अशी मुलं आईवडिलांचेदेखील ऐकत नाहीत. आता आम्हाला समज आली आहे किंवा सगळं कळतं असं म्हणून पालकांना गप्प करतात. मुळात लिव्ह इन रिलेशन हेदेखील प्रेम आहे की एकमेकांसोबत आयुष्यभर गुण्यागोविंदाने राहता येईल का हे चाचपण्याची एक चाचणी? कारण मानवतेला काळीमा फासणार्‍या हत्यांचे प्रकार लिव्ह इन रिलेशन्स आणि लव्ह मॅरेजेसमध्ये जास्त दिसून आलेत. यामागचे खरे मानसशास्र आणि सामाजिक फॅक्टर्स बघायला हवेत. मुळात लग्न व्यवस्था ही एक जबाबदारीची गोष्ट आहे. दररोजच्या दैनंदिन गरजा, आर्थिक गरजा, कामांचे नियोजन, भविष्याचे प्लॅनिंग, तसेच कुटुंबातील इतर सभासद, नातेवाईक, समाजातील सर्वांसोबत एक चांगला संवाद आणि त्यांच्या प्रतिच्या जबाबदार्‍या सहज पार पाडता यायला हव्यात, पण तसे निरोगी वातावरण लव्ह मॅरेज किंवा लिव्ह इन रिलेशनमध्ये नसते ही वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीचा भाग प्रगल्भ जोडपी नीट पाळू शकतील, परंतु निव्वळ सोयीने किंवा सोयीसाठी झालेले किंवा केलेले प्रेम हे निश्चितपणे अपयशी ठरते. कारण लग्नाआधी केवळ एकमेकांना प्रभावित करणारे फिल्मी फंडे आणि मौजमजा लग्नानंतर ना परवडत नाही आवडत. कारण वास्तविक जबाबदार्‍या या मोठ्या होतात. मग दाखवलेली किंवा बघितलेली स्वप्ने वास्तव जगात खोटी ठरायला लागल्यानंतर सुरू होतात वादविवाद.

संयम सुटायला लागतो. फसवले गेल्याची, वापरले गेल्याची किंवा अपेक्षाभंगाची भावना जोर धरू लागते. खरंतर या ठिकाणी हवा असतो संवाद, परंतु ज्या नात्यांचा आधारच मुळी सोय किंवा सुखेनैव जीवनशैलीची आस असेल तिथे फक्त भांडण आणि ताणतणाव वाढत राहतात. स्वार्थासाठी आणि सोयीसाठी निर्माण झालेल्या या नात्यांमध्ये परानुभूतीविषयी पराकोटीची असंवेदनशीलता दिसून येते. परस्परांविषयी टोकाचे विचार आणि धारणा बनत राहतात. लव्ह स्टोरी कधी हेट स्टोरी बनते हे कळत नाही. अर्थात समाजमान्य लग्न व्यवस्थेतसुद्धा असे प्रसंग येतात, मात्र त्यावेळी कुटुंबातील समजूतदार लोक वेळोवेळी समज वाढविण्यासाठी, संवाद ठेवण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी उपलब्ध असतात, मात्र लव्ह मॅरेज किंवा लिव्ह इन रिलेशन्समध्ये ही संधी अभावानेच मिळते. उलट दोघांमधील तणाव व द्वेष वाढण्यासाठीचे सर्व मटेरियल आजूबाजूला उपलब्ध असतेच. मुळात वडीलधार्‍यांचा नैतिक धाक नसल्याने बेजबाबदार वागणे, विवेकी विचारशक्तीवर परिणाम करणारी व्यसने सो कॉल्ड आधुनिकतेच्या नावावर चालूच असतात.

अशा प्रकारच्या परिस्थितीला किंवा ताणतणावांना विकृत व खूनशी पद्धतीने दाखवणारे चित्रपट, वेबसीरिज तणावग्रस्त व्यक्तींना मार्ग दाखवतात. दृकश्राव्य माध्यमांचा प्रभाव किती जबरदस्त आहे हे आपण सर्वजण जाणतोच. नात्यांमधील अपयशाला संपवण्याऐवजी जोडीदारालाच संपवणे असे दाखवणार्‍या अशा चित्रपट, मालिकांसोबत अशा व्यक्ती जोडल्या जातात. अशा कथानकांना मिळणारी लोकप्रियतेची मान्यता तणावग्रस्त व्यक्तींचा मेंदू अंगीकारून अविचाराने धाडसी होतो आणि अशा अमानवी पद्धतींनी हत्या करून मोकळा होतो हे कळतदेखील नाही. बरं अशा हत्या केल्यानंतरदेखील या व्यक्ती जणूकाही झालंच नाही अशा थंडपणे मृतदेहांची विल्हेवाट लावताना दिसतात.

बाह्य गोष्टींनी उत्तेजित होऊन हत्या जरी होत असल्या तरी बहुतेकदा असे खुनी एकतर सराईत असतात, सावज टिपण्यासाठी टपलेले असतात किंवा कट्टर विचारांनी प्रेरित असतात. कधी मनोरुग्णदेखील असतात. त्याशिवाय प्रेम केलंय म्हणून सोबत राहिलेल्या व्यक्तीविषयी इतकी क्रूरता येईलच कशी? सारांश म्हणून सांगायचे झाले तर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात सर्वात जास्त गरज निर्माण झालीय ती भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता जपण्याची आणि वाढविण्याची. याला दुसरा पर्याय नाही, अन्यथा सर्वच नाती संशय, भय, दहशतीच्या विळख्यात सापडतील आणि पराकोटीच्या असुरक्षिततेतून सर्व प्रकारचे गुन्हे वाढतील. मित्रांनो, दिल्ली-मुंबईतील या घटना माणूस माणसापासून दूर जाऊ नये आणि माणसाने माणसाशी माणसांसारखे वागण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची किती गरज निर्माण झाली आहे हेच सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -