घरताज्या घडामोडीसिनेमा कसा बघावा ?

सिनेमा कसा बघावा ?

Subscribe

पैसा, स्टारडम, मोठमोठे सेट्स, लोकेशन्स यापलिकडे जोपर्यंत सिनेमा जनमानसाच्या मनाची पकड घेत नाही तोपर्यंत तो यशस्वी होत नाही, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. तुम्ही म्हणाल आज हे सिनेमाज्ञान कशासाठी ? तर नुकतेच प्रदर्शित झालेल्या द काश्मीर फाईल्स, पावनखिंड आणि झुंड या सिनेमांवरून निर्माण झालेला वाद, हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. भारतीय सिनेमाचा इतिहास बघितला तर असे वेळोवेळी लक्षात येईल की आजवर वेगवेगळ्या विचारसरणीच्या मंडळींचा सिनेमा जगतावर प्रभाव राहिला आहे. स्वातंत्र्य लढा, समाजवादी भूमिका ते मुक्त विचाराससरणी, परंतु आजवर कट्टरतावादाचा वरचष्मा सिनेमासृष्टीवर कधीच नव्हता.

सिनेमाला आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात एक महत्वाची जागा आहे. मग ती केवळ मनोरंजन ते सिनेमा म्हणजेच आयुष्य या प्रचंड मोठ्या कॅनव्हासवर कमी अधिक प्रमाणात आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकत असते. सिनेमाचे आशयानुसार सामाजिक सिनेमा, आर्ट फिल्म, विनोदी सिनेमा, ऐतिहासिक सिनेमा, व्यक्तिनिष्ठ सिनेमा, भयपट, एक्शन सिनेमा, बालचित्रपट असे आणि अजून काही प्रकार पडतात.

प्रत्येक सिनेमा बघताना आपल्याला वेगवेगळा अनुभव येत असतो, प्रत्येक सिनेमा बघताना आपल्या स्वतःची एक मनोभूमिका आणि अभ्यास असावा लागतो, कारण जर आपण प्रत्येक सिनेमाकडून सारखीच अपेक्षा करू लागलो तर आपला भ्रमनिरास होण्याची शक्यता फार जास्त असते. असो तर आपला मुद्दा हा होता की सिनेमा कसा बघावा, तो बघताना आपला किमान अभ्यास असावा, तर तुम्ही म्हणाल की एक तर रोजच्या दगदगीतून, स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून सिनेमाला जा आणि त्यात पण पुन्हा अभ्यास करा. तर स्पष्ट करतो की हा काही पाठ्यक्रमिक अभ्यास नाही तर जर आपण ऐतिहासिक सिनेमा बघायला जाणार असाल तर त्या ऐतिहासिक कालखंडाची आपल्याला किमान माहिती असणे आवश्यक आहे तसे नसेल तर आपण पडद्यावर जे बघू तेच खरं मानू, ही नागरिक म्हणून चुकीची बाब आहे. आपण कॉमेडी किंवा फिक्शन चित्रपटाकडून खूप लॉगिकची अपेक्षा करू तर तिथे आपला अपेक्षाभंग होईल. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक हे कुठल्यातरी विचारांनी प्रभावित असतात याची आपल्याला जाण असेल तर चित्रपटातील काही ठोकताळे आपल्याला बांधता येतात, अजून काही गोष्टी सांगता येतील पण हेतू एव्हढच आहे की आपण आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या सिनेमा या क्षेत्राविषयी अगदीच अनभिज्ञ रहाणे योग्य नाही.

- Advertisement -

असं म्हटलं जातं की सिनेमा हा समाजाचा आरसा आहे, ते योग्यच आहे. कारण सिनेमाचे विषय हे कोणालातरी स्वप्न पडलं आणि सुचले असे होत नाही तर ते लेखकाच्या अनुभव आणि चिंतनातून येत असतात आणि त्यासाठी त्याला समाजाशी एकरूप व्हावं लागतं, समाज समजून घ्यावा लागतो. त्यामुळेच सिनेमा आपल्याला जगाकडे कसं बघावं ? हे दाखवतो तर जगाच्या दृष्टीने स्वतःकडे कसं बघावं ? हे ही शिकवतो.

भारतीय सिनेमाचा इतिहास बघितला तर 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी पहिला मुकपट राजा हरिश्चंद्र तयार केला ते शंभर वर्षानंतर आज तयार होणारे सिनेमे, अक्षरशः आश्चर्य चकित करणारी प्रगती आहे. आज भारतात अनेक प्रादेशिक भाषेत चित्रपट तयार होतात. मुख्यप्रवाहातील चित्रपटांपेक्षा ही काही प्रादेशिक सिनिमे अनेक संवेदनशील विषयांना हात घालतांना आपल्या लक्षात येतं आणि त्याची जागतिक पातळीवर ही नोंद घेतली जाते अशी कितीतरी उदाहरणं आहेत.

- Advertisement -

सिनेमा हे मनोरंजनाचे, समाजप्रबोधनाच एक प्रभावी साधन असलं तरी त्याला इंडस्ट्री म्हटलं जातं ते त्यांच्यातील प्रचंड मोठ्या गुंतवणुकीमुळे आणि त्यातून घडणार्‍या आर्थिक उलढालीमुळे. आजमितीला भारतात दरवर्षी 1500 ते 2000 सिनिमे तयार होतात. तर भारतभरात साधारण 6000 सिंगल स्क्रीन आणि 4000 मल्टिप्लेक्स सिनेमागृहात ते दाखवले जातात. परंतु यास्पर्धेत कोण जास्त गुंतवणूक करू शकतो त्याचाच बोलबाला राहिला आहे. मागील काही वर्षात मात्र जढढ प्लॅटफॉर्म ने काही कमी गुंतवणूक करू शकणार्‍या आणि छोटया छोट्या विषयांवर सिनेमा बनवनार्‍या सिनेमाकारांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे.

पैसा, स्टारडम, मोठमोठे सेट्स, लोकेशन्स यापलिकडे जोपर्यंत सिनेमा जनमानसाच्या मनाची पकड घेत नाही तोपर्यंत तो यशस्वी होत नाही, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. तुम्ही म्हणाल आज हे सिनेमाज्ञान कशासाठी ? तर नुकतेच प्रदर्शित झालेल्या द काश्मीर फाईल्स, पावनखिंड आणि झुंड या सिनेमांवरून निर्माण झालेला वाद, हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. भारतीय सिनेमाचा इतिहास बघितला तर असे वेळोवेळी लक्षात येईल की आजवर वेगवेगळ्या विचारसरणीच्या मंडळींचा सिनेमा जगतावर प्रभाव राहिला आहे. स्वातंत्र्य लढा, समाजवादी भूमिका ते मुक्त विचाराससरणी, परंतु आजवर कट्टरतावादाचा वरचष्मा सिनेमासृष्टीवर कधीच नव्हता

या 3 सिनेमांच्या वादात मात्र आम्ही ठरवून विशिष्ट सिनेमा पहिला नाही पासून ते बळजबरीने सिनेमा पहायला लावण्यापर्यंत, तुम्ही विशिष्ट सिनेमा बघितला नाही तर तुम्ही विरोधी पक्षातले इथपर्यंत जे काही घडले, त्यातून समाजात जो काही फूट पडण्याचा प्रयत्न झाला. ही भारतासारख्या विशाल, विविधतेने नटलेल्या, विविध परंपरांना जपणार्‍या देशात अतीव चिंतेची बाब आहे. प्रेक्षकांमध्ये पडलेली ही फूट आणि कोणत्या बाजूला प्रेक्षकवर्ग जास्त आहे, हे सिनेमा इंडस्ट्रीतील गुंतवणूकदार लगेचच हेरतील आणि उद्या समाजाची एकच बाजू सिनेमाच्या माध्यमातून आपल्यासमोर येईल त्यातील विविधता संपुष्टात येईल, हे विसरता कामा नये. शेवटी सिनेमा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे एक मूर्त रूप आहे. त्यात व्यक्त होणं जितकं महत्वाचं आहे तितकंच ते कोणी बघावं कोणी बघू नये याचं स्वातंत्र्य जपणंही महत्वाचं आहे.

लेखक – डॉ. समीर अहिरे 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -