घरफिचर्ससारांशस्वदेशी कोकण...

स्वदेशी कोकण…

Subscribe

कोकणातील स्वदेशी वृत्ती ही इथल्या जीवनशैलीतून निर्माण झाली आहे. इथे स्वदेशी व्हा म्हणून कोणी भाषण द्यायला आला नाही किंवा स्वदेशीचे कौतुक करायला कोणी संघटना स्थापन केली नाही. इथल्या एकंदरीत परिस्थितीने, इथल्या वार्‍या वादळाने, निसर्गाने इथली स्वदेशी मोहीम नेहमीच धगधगत ठेवली. स्वदेशी म्हणजे केवळ परंपरा जपणे असं नाही. ह्या मातीत जे पिकतं, ह्या निसर्गाशी दोन हात करण्यासाठी केलेली जी व्यवस्था उपयोगी पडू शकते, त्यातून स्वदेशीचा जागर उत्पन्न झाला आहे.

स्वदेशी चळवळ कोणी, कशासाठी सुरू केली हे सांगता येत नसलं तरी स्वदेशी वस्तू वापरण्याचा हट्ट हा काही नवीन नाही. विदेशी वस्तूंच्या होळ्या केल्या याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत, पण आजच्या आधुनिकतेच्या काळात ह्या स्वदेशीचा जागर हा एकतर देशीय चळवळी जागृत झाल्याने किंवा चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून त्यांची अर्थव्यवस्था कोसळून टाकण्याचा भाग असू शकतो.

आज अगदी भारतीय तथा स्वदेशी व्यापार पुन्हा एकदा जोरात चालण्यासाठी पुन्हा एकदा मोबाईल कंपनी असू दे किंवा मोबाईलवर असणारी निरनिराळी अ‍ॅप्स ही भारतीय बनावटीची असावीत यासाठी आपण आग्रही असतो. यात जेवढा देशाविषयी अभिमान आहे त्याचप्रमाणे आपण स्वदेशी वापरतो हा एक ब्रॅण्डदेखील आपण आपला तयार करीत असतो.

- Advertisement -

देशात उपलब्ध असणारी टूथपेस्ट, साबण, अगदी कपड्याचे निरनिराळे प्रकार यात कुठेतरी विदेशीपण जपलेले आहेच, पण कोरोनाचा काळ आपण सर्वांनी अनुभवला आणि पुन्हा एकदा आपलं पाऊल स्वदेशीकडे वळताना दिसतं, परंतु ज्या काळाचा आपण विचार करीत आहोत, त्याच्याही पुढे मागे ठिकठिकाणी कळत नकळत स्वदेशीचा जागर चालू होता.

पाच वर्षांपूर्वी डॉ. महेश केळुसकर, कवी शशिकांत तिरोडकर आणि मी, मधु मंगेश कर्णिक यांच्या करूळ गावातल्या हायस्कूलचा कार्यक्रम संपवून माझ्या गावी आयनलला आलो. गाडी करूळहून सुटली ती थेट कोळोशीपर्यंत हमरस्ता असल्याने सुसाट आली. गाडीने कोळोशीच्या फाट्यावरून माझ्या गावात जाण्यासाठी जसं वळण घेतलं आणि कोकणातल्या खेड्याचा अनुभव आला. त्या खडखडत्या रस्त्यावरून जशी गाडी जाऊ लागली तशी रस्त्यालगत असणार्‍या घराच्या खळ्यातून कोणी कपाळावर आडवा हात करून कोणाची गाडी इली ….खय जातत, असं म्हणत बाहेर येताना दिसत होतं.

- Advertisement -

कुठेतरी आंब्याच्या झाडाखाली बसून गावातली मुलं आंबे खात होती. एकेका मुलाच्या हातात बिटकीचे पाच- सहा आंबे बघून लगेच तिरोडकर म्हणाले की, वा, अशी आंबे खाणारी पोरा आता बगूक गावत नाय….तुझ्या आयनलात बिटकी आंबे शिल्लक हत आजून? हल्ली जो तो कलमाच्या मागे लागल्याने घराच्या बाजूला मोठी बिटकी आंब्याची झाडं तशी बघायला मिळत नाहीत. हल्ली मंगलोरी, आफ्रिकन अशी फणसाची छोट्या आकाराची झाडं बघायला मिळतात, पण देशी झाडं दिसणं मात्र दुर्मीळ झालं आहे. लाल मातीच्या त्या कच्च्या पक्क्या रस्त्यावरून वळणं घेत आम्ही माझ्या घराच्या दारात पोहचलो.

घराच्या समोर प्रशस्त खळं, त्या खळ्यावर घातलेली वाळवणं, खळ्याच्या वरच्या पेळेवर लावलेली देशी गुलाबाची आणि झेंडूची झाडं, खळ्याच्या एका कोपर्‍यात टांगणीला लावलेली कांबळी आणि लटे बघून डॉ. महेश केळुसकर उत्स्फूर्तपणे म्हणाले की, तुझ्या गावात स्वदेशीचा जागर मोठा आहे रे.

डॉ. केळुसकरांच्या वाक्यात अजिबात अतिशयोक्ती नव्हती. माझे मोठे चुलते गावात पोष्ट चालवायचे. त्यामुळे घरात कोणाचे ना कोणाचे येणे जाणे असायचे. त्यांच्या मनावर तसं बघितलं तर आप्पासाहेब पटवर्धनांच्या विचारांचा पगडा होता. पुढे समाजवादी विचारसरणी अवलंबिली तरी स्वदेशीचा जागर मनात कायम राहिला.

गेल्या कित्येक वर्षांत गावात भात पेरणीच्या मोसमात अनेक विलायती, देशी बियाणी येतात. कुठलं म्हांद बियाणं, कुठलं हळवं बियाणं, पण आजही रत्नागिरी २४ हे बियाणं कित्येक वर्षे चालू आहे. हीच तर्‍हा धान्य साठवणीच्या बाबतीत. घरात धान्य साठवायला अनेक पिंप असतील, मोठी खोकी असतील तरी भाताची कणगी नाहीतर बिवळा असतोच. ही देशी साठवण्याची साधनं आजही लोक केवळ परंपरा म्हणून वापरत नाहीत, तर त्याचा टिकाऊपणा लक्षात घेऊन वापरतात. त्यात कळत नकळत देशीपणा जपल्याची एक वेगळी झाकदेखील असतेच.

आमच्या गावात चाकरमानी आले की कधीतरी चला आज टीपीन करू म्हणून कोणतरी टूम सोडायचा. टीपीन करायची तर कोणाच्या घरात किंवा परसात नाही तर शेतात. मग काय कोणी तांदूळ आणले, कोणी शिजवायला मटण आणलं, मटण रांधायला टोप आणला. तीन दगडाची चूल मांडली, त्यावर मटण शिजायला ठेवलं. सगळी तयारी झाली. तेवढ्यात कोणाच्या लक्षात आलं, अरे मटण शिजवायला टोप आणला, आता भात कशात शिजवणार? भातासाठी टोप हवाच. तेवढ्यात टोप आणायला कोणाला पाठवणार इतक्यात समोर भाऊ उभे होते ते म्हणाले की, अरे रानात भात रांधूचो तो टोपात? ता नाय जमाचा. आमच्या घरात्सून सोरकुल हाडतंय, असं म्हणत उड्या मारत जाऊन दहा मिनिटांत मातीचे भांडे ज्याला सोरकुल म्हणतात ते घेऊन आले.

तांदूळ धुवून सोरकुलात शिजायला ठेवून सगळे गजाली करायला बसले. कोणतरी तेवढ्यात म्हणाले की, ही अ‍ॅल्युमिनियम, स्टीलची भांडी आता इली. पूर्वी लोकांकडे असली भांडी हुती? लोका सोरकुलात जेवान बनवीत. अरे, गावातलो कुंभार संक्रांतीक मडकी बनवून द्यायचो. लोका ती भात देवन इकत घ्यायचे नी गिमभर त्या मडक्यात जेवान बनवायची.

गजालीत लोक म्हणत होते ते काय खोटं नव्हतं. आजही गावात अनेक लोकांकडे बसायला डाळी (बांबूची चटई) होती. कोंबडी झाकायला मोठे झाप होते. परसातला कचरा गोळा करायला मडकूल आणि भांगेरा बहुतेक गावातल्या सगळ्या घरात असतो. गावातली जमीन नांगरायला हल्ली काही जणांनी ट्रॅक्टर घेतले तरी टॅ्रक्टर जमिनीला लागत नाही म्हणून शेवटी आजही बैलाला औताला बांधावे लागते, पण बैल तरी कुठल्या जातीचे? हलम नाही…खिल्लारी नाही..अगदी गावठी जोडी. जर्सी बैलाच्या वाटेलादेखील हे लोक आजच्या घडीला जात नाहीत.

कोंबडीच्या जातीत तर मध्यंतरी अनेक प्रजाती आल्या, पण गाववाले आजही गावठी कोंबडी पसंत करतात. त्यांना सुखसोयी नकोत असं नाही, पण देशीपणाच्या वापरावर त्यांचा भरवसा आहे. ह्या जगण्यातील सत्त्व आणि स्वत्व ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी पुरेपूर उपभोगल्या आहेत. सकाळी उठून बाहेरच्या पाणंदीत कोणतरी सकाळी तोंडात एरंडाची काडी घेऊन आजही दात साफ करताना दिसतोच. ह्याचा अर्थ त्याला टूथपेस्ट परवडत नाही असं नाही, पण त्याला ह्या देशी मंजनाची ख्याती माहीत आहे.

आजही कावीळ किंवा सर्दी-खोकला-पडसं झालं की सोनामुखी काढा लोक रामबाण औषध म्हणून घेतात किंवा उकड्या तांदळाची पेज पोटात उबारा मिळेपर्यंत घोटतात. यांना स्वदेशीचा जागर करा म्हणून कोणी सांगितलं नाही, पण टोपातल्या भातापेक्षा सोरकुलातल्या भाताला अधिक चव लागते हे त्यांना कळते. पिंपातल्यापेक्षा कणगी किंवा बिवळ्यात भात किंवा धान्य अधिक सुरक्षित राहते. इथल्या मातीमुळे इथली बियाणी ही स्वदेशी राहिली. ह्या स्वदेशी बियाणांनी इथल्या जमिनीचा कस कायम ठेवला हेदेखील इथे नमूद करावेसे वाटते.

इथली स्वदेशी वृत्ती ही इथल्या जीवनशैलीतून निर्माण झाली आहे. इथे स्वदेशी व्हा म्हणून कोणी भाषण द्यायला आला नाही किंवा स्वदेशीचे कौतुक करायला कोणी संघटना स्थापन केली नाही. इथल्या एकंदरीत परिस्थितीने, इथल्या वार्‍या वादळाने, निसर्गाने इथली स्वदेशी मोहीम नेहमीच धगधगत ठेवली. स्वदेशी म्हणजे केवळ परंपरा जपणे असं नाही. ह्या मातीत जे पिकतं, ह्या निसर्गाशी दोन हात करण्यासाठी केलेली जी व्यवस्था उपयोगी पडू शकते, त्यातून स्वदेशीचा जागर उत्पन्न झाला आहे. हा जागर म्हणजे शेवटी स्वतःचा स्वतःशी असलेला संवादच आहे. अगदी तुकोबांच्या शब्दांत सांगायचे तर…

तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाची वाद आपणाशी ….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -