घरफिचर्ससारांशकांदळवने मरता मरता पर्यावरणाचा दिवा विझे!

कांदळवने मरता मरता पर्यावरणाचा दिवा विझे!

Subscribe

शहरीकरणाच्या नावाखाली मोठ्या संख्येने वाढत जाणार्‍या झोपड्या, लहानसहान उद्योग, शेततळी, मत्सपालन यासाठी कांदळवनांची राजरोस तोड होत असताना संबंधित महापालिका, वनविभाग, जिल्हाधिकारी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसले आहेत. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, वांद्रे, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा भागात आजही मोठ्या प्रमाणावर होणारी कांदळवनाची अवैध बेसुमार तोड थांबविली नाही तर मुंबई आणि ठाण्याला खूप मोठा फटका सहन करावा लागेल. हा फटका पुराचा असेल, ऑक्सिजन कमतरतेचा असेल आणि मत्स उत्पादन कमी होण्याचाही असेल.

महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मिळून 304 चौ.कि.मी ची कांदळवने आहेत. परंतु कांदळवनाचे एकूण क्षेत्र 30 हजार हेक्टरच्या आसपास आहे. आतापर्यंत 15,088 हेक्टर शासकीय जमिनीवर तसेच 1775 हेक्टर खासगी क्षेत्रावरील कांदळवनांना राखीव वने म्हणून दर्जा देण्यात आला आहे. कांदळवनाचे संरक्षण आणि त्यावर अवलंबून असलेल्या लोकांची उपजीविका याचा मेळ घालून वन विभागाने नुकतीच कांदळवन संरक्षण आणि उपजीविका योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र सरकारी आकडेवारी अशी आवश्यक चित्र दाखवत असली तरी वस्तुस्थिती मात्र काही वेगळी आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा अपवाद वगळता मुंबई शहर,मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये कांदळवनाची म्हणजे तिवरांच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होताना दिसत आहे. दहिसरचे गणपत पाटील नगर आणि विक्रोळी, कन्नमवार नगर येथे गेल्या दोन दशकात उभारलेल्या झोपड्या या हीच कांदळवने नष्ट करून, खाडी बुजवून निसर्गाची केलेली खुलेआम हत्या आहे.

शहरीकरणाच्या नावाखाली मोठ्या संख्येने वाढत जाणार्‍या झोपड्या, लहानसहान उद्योग, शेततळी, मत्सपालन यासाठी कांदळवनांची राजरोस तोड होत असताना संबंधित महापालिका, वनविभाग, जिल्हाधिकारी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसले आहेत. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, वांद्रे, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा भागात आजही मोठ्या प्रमाणावर होणारी कांदळवनाची अवैध बेसुमार तोड थांबविली नाही तर मुंबई आणि ठाण्याला खूप मोठा फटका सहन करावा लागेल. हा फटका पुराचा असेल, ऑक्सिजन कमतरतेचा असेल आणि मत्स उत्पादन कमी होण्याचाही असेल. यातील सर्वात महत्वाचा घटक आहे तो शहराला पुरेशी शुद्ध हवा मिळण्याचा. कांदळवने कापून ही शुद्ध हवा म्हणजे आपणच आपली नैसर्गिक व्हेंटिलेटरची नळी कापून टाकल्यासारखे आहे.

- Advertisement -

वातावरणातील कमालीच्या बदलामुळे आज सारे जग मेटाकुटीला आले असताना आपण आपला नैसर्गिक अधिवास आपल्या हाताने नष्ट करणार असू तर त्यासारखा दुसरा कपाळकरंटेपणा नसेल. आज दिल्लीची अवस्था भयंकर झाली आहे. प्रदूषणाने हाहाकार माजवला असून श्रीमंत दिल्लीकर मोठ्या संख्येने हवे तेवढे पैसे मोजून गोव्यात स्थायिक होत आहेत. हव्यासापोटी आपली जंगले, डोंगर, खाड्या, समुद्र आणि कांदळने नष्ट करणार असू तर निसर्गही आपल्याला माफ करणार नाही. आणि मग कांदळवने मरता मरता… पर्यावरणाचा दिवाही विझे! अशी वेळ येईल.

कांदळवने (खारफुटी) हा एक समुद्राजवळ वाढणारा, अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह आहे. तो चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणार्‍या भागात वाढते. हिची मुळे समुद्राच्या पाण्यातले मिठाचे प्रमाण सहन करू शकतात आणि लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप थांबवतात. खार्‍या जमिनीतही जिची फूट (वाढ) होते ती खारफुटी. तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे. या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात. भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या गुजरात राज्याची किनारपट्टीची लांबी ही सर्वात जास्त आहे. त्या किनारपट्टीवर भारतामधील खारफुटीचे दुसर्‍या क्रमांकाचे जंगल आहे. जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण 73 जाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये 46 जाती आहेत. पश्चिम किनार पट्टीवर 27, तर पूर्व किनार पट्टीवर 40 जाती आहेत. अंदमान आणि निकोबार या बेटावर 38 जाती आहेत.

- Advertisement -

खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र व जमीन तसेच खाडी, किनारा व त्यावरील प्रदेश यांत एक हिरवी भिंत निर्माण होते. त्यामुळे किनार्‍याजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते. भूसंरक्षणाच्या दृष्टीने या वनस्पती अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे इतर वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण होते. जलचर प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, झिंगे वगैरे प्राणी येथे अंडी घालतात. पिले मोठी झाली की समुद्राकडे जातात. या वनस्पतीसमूहात झिंगे चांगले वाढतात. खारफुटीची वने असलेल्या सर्व ठिकाणी सागरी लाटांपासून संरक्षण मिळते.सागरकिनार्‍याचे रक्षण करण्यासाठी खारफुटीची, तिवरांची जंगले खर्‍या अर्थाने तटरक्षकाची भूमिका चोख बजावतात. तिवरांच्या जतनाची गरज केवळ जमिनीची धूप थांबवण्यासाठी नसून खचणारे समुद्रकिनारे आणि मासे वाचवण्यासाठीही आहे.

किनारपट्टीपासून थोडे आत, पुळणीच्या किंवा खाडीच्या भागाकडे बर्‍याचदा कोणत्या ना कोणत्या नदीचे मुख येऊन मिळालेले असते. या मुखापाशी माशांची पैदास चांगली होते. तसेच माशांना आवश्यक असणारे प्लँक्टनसारखे एकपेशीय जीवही इथे चांगल्या प्रकारे वाढतात. शिवाय विविध प्रकारचे कोळी, पक्षी, पाणकावळे, पाणबगळे, गरुड, साप यांची वाढही इथे चांगली होते. एकंदरीत संपूर्ण जीवसाखळी या भागात आकाराला येऊ शकते. त्यामुळे पुळणीचा किंवा खाडीचा भाग तिवरांनी समृद्ध असणे आवश्यक आहे. बॅक वॉटर, खाडी किंवा पुळण या भागात केवळ तिवरांच्या अस्तित्वामुळे किती जैवविविविधतता असू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालचा सुंदरबन प्रदेश.

तिवरांमुळे वादळांचा तडाखा सौम्य होऊ शकतो. हा अनुभव ओरिसा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारपट्टीवर येऊन थडकणार्‍या वादळांच्या वेळी आलेला आहे. ओरिसाच्या किनारपट्टीवर 29 ऑक्टोबर 1999 रोजी ताशी 260 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाच्या वार्‍याचे वादळ आले होते. या वादळाचा तडाखा ओरिसाच्या 10 जिल्ह्यांना बसला होता. जिथे तिवरांची वाढ झाली होती, तिथे हा वेग बर्‍यापैकी रोखला गेला. इतर ठिकाणी तिवरे नसल्याने अधिक नुकसान झाले. तिवरांमुळे जीवसृष्टीही टिकून राहते. समशीतोष्ण हवामानात उत्पन्न होणार्‍या सागरी माशांपैकी 90 टक्के माशांच्या जीवनसाखळीत तिवरांचा संबंध एकदा तरी येतोच. सुंदरबन भागातल्या सागरी मगरींचे तिवर किंवा खारफुटी हे मोठे आश्रयस्थान आहे.

खारफुटीच्या जंगलात जन्माला आलेली सागरी मगर 8 मीटरपर्यंत वाढू शकते, अनेक परजीवी वनस्पती खारफुटीच्या आधाराने वाढतात. खारफुटी वाचविण्यासाठी सुंदरबन परिसरात 1991 पासून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हा परिसर वाचला आहे. आता कांदळवने वाचवण्याची महाराष्ट्राची मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे थोरले चिरंजीव आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री असल्याने आता ते ही जबाबदारी कशी पार पाडतात त्यावर राज्याचा नेसर्गिक अधिवास टिकणार आहे. आदित्य यांनी याबाबत सुरुवातीपासून सजगता दाखवली असल्याने आशेचा किरण निर्माण झाला आहे. आदित्य यांचा धाकटा बंधू तेजस ठाकरे सुद्धा निसर्गप्रेमी असून वेगवेगळ्या प्राणी-पक्ष्यांच्या प्रजाती शोधून काढण्यासाठी तो राज्यात सर्वत्र फिरत असतो. या निमित्ताने आदित्य आणि तेजस हे ठाकरे बंधू कांदळवने संरक्षित करण्यासाठी मोठा हातभार लावतील, अशी आशा करूया.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मंत्रिमंडळ बैठकीत कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजनेस मंजुरी देण्यात आली होती. खेकडा शेती, कालवे शेती, मत्स्य व्यवसाय, मधुमक्षिका पालन यासारख्या अनेक रोजगारांच्या संधी या कांदळवन शेतीत दडल्या आहेत. सागरी जैवविविधता सांभाळून स्थानिक जनतेच्या उपजीविका चालण्यासाठी प्रोत्साहन देणारी ही योजना आहे. यामुळे कांदळवन पर्यटनाची संकल्पना रुजते आहे. वेंगुर्ले येथे उभादांडा परिसरातील महिला बचत गटाने एकत्र येत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली असून या महिला पर्यटकांना कांदळवनाने बहरलेल्या मानसी खाडीतून फेरफटका मारून आणतात. परिसरातील निसर्गाचे महत्व सांगतात तेव्हा निसर्ग अशा दुर्गांच्या हाती सुरक्षित असल्याची खात्री पटते. कांदळवन संरक्षक योजनेमुळे खेकडा, कालवे, मधुमक्षिका पालन तसेच पर्यटन विकास यासारखे रोजगार निर्माण झाले आहेत. स्थानिकांनी त्याचा फायदा घेऊन आपल्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवताना निसर्ग वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शेवटी तो निसर्ग वाचला तर माणूस वाचणार आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -