घरफिचर्ससारांशस्त्रीवादी पुरुष? छे छे! दिवास्वप्नच...

स्त्रीवादी पुरुष? छे छे! दिवास्वप्नच…

Subscribe

स्त्रीवाद्यांबद्दल मिथक, गैरसमज आहे की तुम्हीं पुरुष असताना स्त्रियांची बाजू का घेता आणि प्रत्येकवेळी स्त्रियांच्याच बाजूने का बोलता? जेव्हा जेव्हा एकाच गटावर पुन्हा पुन्हा तोच अन्याय होत असतो तेव्हा तो अपवाद नसतो, समाजाची तशी मानसिकता बनलेली असते. पुरुषसत्ता हा फक्त स्त्रियांचं प्रश्न नाही तो पुरुषांचा सुद्धा आहे. दलितांवर अन्याय होतो तेव्हा फक्त दलितांनी त्यावर बोलायचं की इतरांनीही. तर हा प्रश्न दोघांचा आहे आणि दोघांनी त्याच तीव्रतेने बोलणं आवश्यक असतं!

माझ्या पिढीत स्त्रीवाद या नावावरूनच मतभेदाला सुरू होते. स्त्रीवाद म्हणजे पुरुषांच्या विरोधात असणारी स्त्रियांची विचारधारा असा अर्थ प्रचलित आहे. पण प्रत्यक्षात स्त्रीवाद म्हणजे सर्व प्रकारची लिंगावर आधारित विषमता, भेदभाव टाळून समाजामध्ये समतेचं वातावरण निर्माण करणं. लिंगावर आधारित विषमता म्हणजे फक्त स्त्री, पुरुष,एलजीबीटीक्यू यातून तयार होणारा भेदाभेद. पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे लिंगावर आधारित शोषणाला विरोध करून मानव जातीस माणुसपणाची, समतेची वागणूक निर्माण करून देणं. स्त्रीवाद मानवतावाद म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. माझ्या पिढीला ही गोष्ट नेमकी कितपत समजते याबद्दल मी साशंक आहे. स्त्रीवादाबद्दल समाजात असलेली मिथके बर्‍याचदा स्त्रीवादाचे विचार आत्मसात करण्यास मज्जाव करतात. स्वतःच्या आजूबाजूला जरी कुणी समतेनं वागत असेल तरी ती,तो स्त्रीवादी असतो. बर्‍याचदा स्वतःवरती स्त्रीवादाचं लेबल लावायला माझी पिढी कचरते.

स्त्रीवाद्यांबद्दल मिथक, गैरसमज आहे की तुम्हीं पुरुष असताना स्त्रियांची बाजू का घेता आणि प्रत्येकवेळी स्त्रियांच्याच बाजूने का बोलता? जेव्हा जेव्हा एकाच गटावर पुन्हा पुन्हा तोच अन्याय होत असतो तेव्हा तो अपवाद नसतो, समाजाची तशी मानसिकता बनलेली असते. पुरुषसत्ता हा फक्त स्त्रियांचं प्रश्न नाही तो पुरुषांचा सुद्धा आहे. दलितांवर अन्याय होतो तेव्हा फक्त दलितांनी त्यावर बोलायचं की इतरांनीही. तर हा प्रश्न दोघांचा आहे आणि दोघांनी त्याच तीव्रतेने बोलणं आवश्यक असतं!

- Advertisement -

स्त्रीवादी पुरुष होण्याची प्रक्रिया मोठ्या घुसमटीतून नेते. आजूबाजूची समाजव्यवस्था नेहमी या प्रक्रियेत अडथळा आणण्याचं काम करते. कुटुंब, मित्र मैत्रिणी, सांस्कृतिक माध्यमं, कला इथे दिसणार्‍या चुकीच्या गोष्टी मनाला त्रासदायक असतात. आपल्याला दाखवल्या गेलेल्या, रुजवलेल्या गोष्टीवर प्रश्न पडायला सुरुवात होते. कबीर सिंग सारख्या चित्रपटातून पुरुषी मानसिकतेचं गौरवीकरण केलं जातं तसेच पुरुषी पणातून येणार्‍या प्रेमाबद्दलच्या चुकीच्या संकल्पना सांगितल्या जातात. स्रीद्वेषी, लिंगभेदवादी शिव्या रोजच्या जगण्याचा एवढा भाग बनून गेला आहे की बरेच जण अनुकरण करून शिव्या देणं म्हणजे कूल असणं या विचाराने सर्रास अशा शिव्या देत असतात. या स्रीद्वेषी आणि लिंगभेदवादी शिव्यामधून रोजच्या आयुष्यात तणाव येतो. जवळच्या लोकांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारावे लागतात. हा मार्ग अवघड असला तरी अशक्य अजिबातच नाही. रोज नवे प्रश्न पाडत, शब्द आणि कृती यांतील अंतर दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न समाधान देऊन जातो.

स्त्रीवादी व्हायची सुरुवात घरापासून, कुटुंबापासून होते. मी एक माझा अनुभव सांगतो. मला माझी कपडे आईने धुतलेलं काही पटेना. कारण मला ही गोष्ट पटू लागली होती की आपलं काम आहे आणि ते तिनं का करायचं? मी सुरुवातीला माझी अंतर्वस्त्रे आणि नंतर हळूहळू सगळे कपडे धुवायला लागलो. हे पाहून तिची प्रतिक्रिया अत्यंत वाईट होती. म्हणजे अगदी असं की, ‘आम्हीं काय मेलो काय? मी जिवंत असताना तू कपडे धूवूच कसा शकतो? लोकं मला काय म्हणतील? मोठं झालं की बायकोचं लुगडं पण धुणारेस का?’ असे असंख्य प्रश्न. घरातल्या इतर छोट्या मोठ्या गोष्टी करताना सुरुवातीला अवघडलेपण आलं. कुटुंबाकडूनच माझ्यात रुजत चाललेलं स्त्रीवादीपण वेळोवेळी उखडून टाकण्यात येऊ लागलं. मात्र सततच्या संवादाने कुटुंबाचे गैरसमज दूर झाले आणि माझ्या विचारांना, कृतीला कुटुंबाकडून स्वीकारलं गेलं. म्हणजे अगदी असं की आता माझे कुटुंब समाजाला अभिमानाने सांगत असते. कपडे धुणं ही शरमेची बाब ते अभिमान वाटणं माझं स्त्रीवादी पुरुष म्हणून टाकलेलं पहिलं पाऊल किंवा कृती होती. पण हे माझ्याबाबतीत घडलं पण माझ्या इतर मित्र मैत्रिणींच्या बाबतीत घडू शकत नाहीये ही खंत आहे.

- Advertisement -

स्त्रीवादी पुरुष म्हणून प्रक्रियेतून जात असताना आजूबाजूच्या लोकांकडून बरीच विशेषणं लावली जातात. हे स्त्रीवादी पुरुष इतरांना त्यांच्या जाळ्यात ओढण्यासाठी स्वतःला स्त्रीवादी म्हणवून घेतात. स्त्रीवादी हे लैंगिकतेवर बोलतात म्हणून व्यभिचारी, अश्लिल असतात. मुळातच व्यभिचार म्हणजे काय आणि अश्लीलता म्हणजे काय याच्या समाजाच्या व्याख्याच कालबाह्य आहेत. स्वतःच्या आवडीनिवडी विषयी दुसर्‍यांशी बोलणं हे व्यक्त होण्याचं किती प्रभावी माध्यम आहे!

स्त्रीवादाबद्दल असणारं आणखी एक मिथक म्हणजे प्रतीकं. स्त्रीवाद कुठल्याही प्रतिकांमध्ये जखडलेला नाही. तरीही स्त्रीवादी म्हणजे विशेषच कपडे घालणारे, बाकीच्यांच्या कपड्यांना,आभूषणांना विरोध करणारे. पण हा पूर्णतः भ्रम आणि गैरसमज पसरला आहे. स्त्रीवाद वैयक्तिक आवडीचा पुरस्कार करतं. उदाहरण द्यायचं झालं तर पैंजण घालणारी, साडी घालणारी स्त्री स्त्रीवादी नसते का? तर हो ती स्त्रीवादी असते. जर तिने त्या गोष्टी वैयक्तीक आवड म्हणून स्वीकारल्या असतील तर. स्त्रीवाद मानवी स्वातंत्र्याची, वैयक्तीक स्वातंत्र्याची प्रभावीवणे बाजू घेतं.

आमच्या महाविद्यालयांमध्ये ट्रॅडिशनल डे दिवशी काही मित्र मैत्रिणींनी साडी घातली होती. तर त्यांना खूप वाईट प्रतिक्रिया आल्या. मुळातच प्रत्येकाने काय घालायचं आणि काय घालायचं नाही हा प्रत्येकाचा अधिकार असतो. एक लिंग म्हणजे उच्च आणि इतर कनिष्ठ हा भेदच होता कामा नये. मला आठवतंय आम्ही काही मुलांसोबत सहलीला उत्तर भारतात गेलो होतो. आमच्यातीलच एका मित्राला कानातले घालायची खूप आवड होती. त्याने मैत्रिणींकडून कानातले घेतलं आणि तो घालून थोडा अवघडून फिरत होता. त्याच्या त्या आवडीला आम्हीं सगळ्यांनी प्रतिसाद दिला, प्रशंसा केली. त्याला खूप आनंद झाला. त्यांनतर तो बिनधास्तपणे आपल्याकडे स्त्रियांचे समजले जाणारे कर्णभूषणे घालून फिरू लागला. पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्री जर पुरुषासारखी कपडे घालत असेल तर तिला काही वेळा अपवादात्मक परिस्थितीत स्वीकारलं जातं मात्र पुरुषाने जर स्त्री सारखा पेहराव केला तर त्यास चिडवलं जातं. मुळातच या आवडी निवडी लिंगावर आधारित नसायलाच हव्यात. पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये जेवढं शोषण स्त्रियांचं होतं तेवढंच कमी अधिक प्रमाणात पुरुषांचंदेखील होतं. पुरुष रडू शकत नाही, त्याला नको असणार्‍या जबाबदार्‍या लादल्या जाणे अशी कैक उदाहरण देता येतील. मला वाटतं स्त्रीवादी होणं हे सर्वप्रथम स्वतःसाठी आवश्यक आहे.

माझी कविता वाचून एका नवविवाहित जोडप्याने मला जेवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. मी कवितेतून सांगितलेले स्त्रीवादी विचार त्यांना आवडले होते. दोघे सहजीवन समान जबाबदारीने जगत होते. स्वतःमध्ये रुजलेले पुरुषी विचार शक्य तितके बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोस, असं ते सांगत होते. मला हे खूप आशादायी वाटून गेलं.

मी एके दिवशी एका मित्राला फोन केला आणि काय करतोय, कामात आहेस का असं विचारलं आणि त्याचं उत्तर आलं, हो अरे भांडी घासतोय. माझ्या पिढीला एवढं धाडस सहज येवो. ही हजारो वर्षांपासूनची उतरंड मोडीत निघो. स्त्रीवादी असणं अभिमानाने सांगता यावं. ते रोजच्या जगण्यातून आणि कृतीतून बाहेर पडो. प्रेमावर आधारित मानवी व्यवस्था तयार होवो. माणसामाणसातील अंतर दूर होवो. शयनकक्षात,स्वयंपाक घरात बदल झाला तरी ही खूप मोठी क्रांती असेल. माणसामाणसात असलेलं अंतर कमी होणं यापेक्षा सुंदर क्रांतीची व्याख्या असेल काय? माझ्या पिढीला पूर्ण बदलाची स्वप्न पडत असतील तर पहिलं स्वप्न लिंगावर आधारित भेदाभेद दूर होण्याचं पडो!

–नितीन वैशाली धर्मराज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -