घरफिचर्ससारांशपेपर फुटीचा ट्रेंड

पेपर फुटीचा ट्रेंड

Subscribe

सरकारी नोकरीच्या अपेक्षेने सर्वसामान्य घरातला तरुणवर्ग रात्रीचा दिवस करीत आणि मानपाठ एकत्र करीत अभ्यास करतो. परीक्षेचा दिवस जसजसा जवळ येतो तसतसे विद्यार्थ्यांचे टेंशन वाढत जाते आणि मग तहानभूक विसरुन ते परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज होतात. पण ऐनवेळी पेपर फुटीचा प्रकार पुढे येतो आणि नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या जातात. आरोग्य विभाग, भारतीय सैन्य दलासह म्हाडाच्या पेपर फुटीनंतर आता हा ट्रेंड रुजू पाहतोय हे समोर येत आहे.

कोरोना महामारीत सर्वच परीक्षांना ब्रेक लागला. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले, त्यातून स्वत:ला कसेबसे सावरून त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. कोरोनाचे संकट हळू हळू कमी व्हायला लागले आणि मागच्या बाकी असलेल्या परीक्षा आणि नवीन परीक्षा घेण्यासाठी आयोगाने हालचाली सुरू केल्या. गाडी परत रुळावर परतणार अशी चिन्हे दिसत असतानाच 24 ऑक्टोबर 2021 रोजी आरोग्य विभागातर्फे घेण्यात येणार्‍या वर्ग क चा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आणि त्यातून सरकारचा नियोजनशून्य कारभार समोर आला. या पेपरफुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी सहसंचालक (तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान)महेश बोटले यांना अटक करत चौकशी केली असता अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. बोटले हे गट ‘क’ आणि गट ‘ड’चे पेपर सेट करण्याच्या समितीवर सदस्य असून त्याने संगणकावर पेपर कॉपी करून तो पेपरच्या केंद्रांवर वितरित होण्याआधी संबंधित व्यक्तीला दिला.

परीक्षा घेणारी न्यासा ही ब्लॅक लिस्टमध्ये असून आरोग्य विभागाने तिला परवानगी दिलीच कशी, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फारसे काहीही न बोलता मौन धारण करत आरोय विभागाच्या चुकांवर सारव-पोतार केली. गेल्या फेब्रुवारीमध्ये भारतीय सैन्य दलातील भारतीचा पेपरही फुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मेजर वसंत किलारीला अटक केली असता त्याने सेनेतील बड्या अधिकार्‍यांच्या मदतीने पेपर फोडल्याचे समोर आले होते, या प्रकरणात समाविष्ट भारतातील सर्व स्थलसेनेच्या अधिकार्‍यांना निलंबित करण्यात येऊन आणि त्याचमुळे फेब्रुवारीत होणारी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. यावरून असे निश्चितपणे सांगता येईल की पेपर फुटीची कीड ही महाराष्ट्रा पुरतीच मर्यादित नसून तिने आपल्या जाळ्यात संपूर्ण भारताला गुरफटले आहे. ही पेपर फुटी म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचेही अपयश आहे.

- Advertisement -

हे प्रकरण ताजे असतानाच म्हाडातर्फे घेण्यात येणार्‍या विविध पदांच्या भारती परीक्षेचे कॉन्ट्रॅक्ट जी.ए. सॉफ्टवेअरला दिले गेले होते. म्हाडाची परीक्षा ही 12 डिसेंबरला मुंबईतील विविध केंद्रांवर घेण्यात येणार होती, मात्र परीक्षेच्या मध्यरात्री दोन वाजता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत तांत्रिक अडचणीमुळे आज होणारे पेपर रद्द करण्यात आले आहेत. परीक्षेची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल असे सांगितले. परंतु ही कुठली तांत्रिक अडचण नसून परीक्षेचे कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या जी.ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. देशमुख याने म्हाडाच्या सर्व परीक्षांचे पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

एका परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या बदल्यात दहा लाख रुपये इतक्या रकमेची मागणी त्याने संबंधित एजंटकडून केली. या सर्व प्रकाराला आव्हाड यांनी तांत्रिक बिघाड झाल्याचे नाव देत स्वत:चे म्हणणे मांडले. सायबर पोलिसांनी डॉ. देशमुखला अटक केली असता चौकशीदरम्यान सर्व प्रकार पुढे आला. त्यांनी सांगितल्यानुसार बुलढाणा येथील अंकुश हरकळ, औरंगाबाद येथील संतोष हरकळ या एजंटकडून त्याने प्रत्येक विद्यार्थ्यामागे दहा लाख रुपयांची मागणी केली, असे चौकशीदरम्यान सांगितले. त्यानंतर या एजंटला अटक केली असता यांनीही सर्व प्रकार कबूल केला. हे रॅकेट फक्त पुणे,औरंगाबाद किंवा महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नसून ते संपूर्ण भारतात विविध ठिकाणी पसरलेले आहे.

- Advertisement -

मध्यरात्री 2 वाजता ट्विटरवर व्हिडिओ प्रसारित करत तांत्रिक अडचणीमुळे पेपर रद्द करण्यात आला, असे ट्विट करताना कदाचित राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सोपे गेले असेल, पण कडकडीत थंडीत शेकडो किलोमीटर अंतरावरून प्रवास करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना किती त्रास सोसावा लागला असेल याची तुम्ही आम्ही कल्पनाही करू शकत नाही. दिवसाचे बारा तास एकाच जागेवर बसून बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनावर याचे किती वाईट परिणाम होत असतील हे त्यांचे त्यांनाच माहीत. फक्त म्हाडा किंवा आरोग्य भरतीच नाही तर पोलीस भरती, शिष्यवृत्तीच्या परीक्षा यामध्येही पेपर फुटीची प्रकरणे समोर येताना दिसतात, मात्र ते फक्त दोन आठ दिवस चर्चेचा विषय ठरतात आणि ते आपापसातच दाबले जातात. काही ऐतखाऊ विद्यार्थी आणि अधिकार्‍यांच्या लालसेपोटी प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस करून अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचे आयुष्य काळोखात जाते.

अभ्यास करूनही परीक्षेत अपयश आल्याने समाजातून मिळणारी वागणूक, कुटुंबाकडून येणारा दबाव या गोष्टींचा सातत्याने विचार करून अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात, तर काही विद्यार्थी या सर्वाचा ताण कमी करण्यासाठी व्यसनांना जवळ करतात आणि या सर्वातून ताण कमी झाला नाही तर सरळ सरळ आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे पुण्यातील राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने कोरोना काळात परीक्षा झाली नाही म्हणून स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि तेव्हा कुठे या सरकारला जाग आली आणि तातडीने रिक्त पदे भरण्यात येणार आणि नवीन पदांसाठी ही भरती करण्यात येणार अशी घोषणा केली, परंतु आता होत असलेल्या परीक्षांचे पेपर फुटत असल्याने विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांवरचा विश्वास उडाल्याचे चित्र दिसत आहे आणि त्याचे परिणाम आपल्या सर्वांना रिक्त झालेल्या अधिकार्‍यांच्या खुर्चीवर लाच देऊन अधिकारी झालेले विद्यार्थीच पाहायला मिळतील.

राजकीय मुद्यांवरून आपापसात भांडणारी नेतेमंडळी अशा वेळेस मौन धारण करतात, मग या विद्यार्थ्यांनी जायचे तरी कोठे असा सवाल सर्वच जनतेमधून केला जात आहे. स्पर्धा परीक्षेच्या नावावर दुकान मांडून बसलेले स्पर्धा-परीक्षांचे व्यापारी मोठमोठे बॅनर लावून किंवा आम्ही सरकारी नोकरी लावून देऊ, असे सामान्य विद्यार्थ्यांना आमिष दाखवून अव्वाच्या सव्वा पैसे हडपतात आणि काही लाचखोर अधिकार्‍यांच्या मदतीने पेपर फोडतात. त्यात मोठ्या बापाची मूल लाखों रुपये आनंदाने भरून अगदी सहजपणे परीक्षा उत्तीर्ण होतात आणि या सर्वात भरडला जातो तो फक्त जिद्दी आणि कष्टाच्या जीवावर परीक्षा पास होणारा विद्यार्थी. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास राज्य व केंद्र सरकारला याचे खूप अनिष्ट परिणाम भोगावे लागू शकतात. सत्यमेव जयते अशी आपल्या भारताची ओळख धुळीत मिळू शकते.

–प्रमोद उगले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -