घरफिचर्ससारांशमिशन रानीगंज : मृत्यूच्या अंधारावर आशेच्या प्रकाशाचा विजय

मिशन रानीगंज : मृत्यूच्या अंधारावर आशेच्या प्रकाशाचा विजय

Subscribe

–संजय सोनवणे 

‘मिशन रानीगंज’ ३०-३५ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेवर आधारित आहे. कोल इंडिया या सरकारी संस्थेतील राजकारण, कोळशाच्या खाणीतील कामगारांप्रति असलेली सरकारी प्रशासकीय स्तरावरची अनास्था, कामगारांची दयनीय परिस्थिती, धोकादायक आणि संवेदनशील स्थितीतही केलेले राजकारण, कुठल्याही वाईट घटनेची जबाबदारी ढकलणे आणि चांगल्या गोष्टीचे श्रेय मिळवण्याची धडपड, मृत्यू समोर दिसत असताना निर्माण झालेली हतबल परिस्थिती, कामगारांची भयानक मानसिकता हिटलरच्या छळ छावणीची आठवण करून देते.

- Advertisement -

कोळशाच्या खदाणीत जमिनीखाली कित्येक फूट अंधार गुहेत, मिथेन आणि कार्बनडाय ऑक्साईडच्या धोक्यात जरी ही छळ छावणी असली तरी जमिनीवरील जगातही वेगळी परिस्थिती नसते. इथला धोका आणि अंधार तुलनेने जास्त भेसूर असतो. इथे माणुसकी मेलेली असते. जिवंत असतात ते फक्त पांढरपेशी नोकरशहा. या प्रशासकीय जमातीला गोरगरीब कामगारांच्या जगण्या-मरण्याशी काहीही देणं घेणं नसतं. ‘मिशन रानीगंज’ पाहताना एक गोष्ट ध्यानात येते. भारतातील मरणाच्या खाईत काम करणार्‍या कामगारांचे मूल्य माणूस म्हणून शून्य असते. देशाच्या विकासात ऊर्जा आणि पायाभूत सुविधांसाठी मोलाचे योगदान देणार्‍या कोळसा खाणी व्यवस्थापनाचा कारभार अतिशय ढिसाळ असतो. मिशन रानीगंज हा सगळा ढिसाळ व्यवस्थापट समोर मांडतो.

भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात जिथे मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत अशा परिस्थितीत तडजोड म्हणजेच जगणं असतं. पोटासाठी ही तडजोड कायम मृत्यूशी केलेली असते. ‘मिशन रानीगंज’ अक्षय कुमारच्या संयत अभिनयासाठी पाहावा. हा चित्रपट सरकारची छबी उजळण्यासाठी केल्यासारखा प्रचारकी झालेला नाही. टॉयलेट एक प्रेमकथा, मिशन मंगलमधील सरकारी श्रेयवादाला ‘मिशन रानीगंज’मध्ये बर्‍यापैकी आवरते घेतले आहे. पंजाबच्या धरतीवर अनाठाई देशभक्ती, उपदेशाचे डोस चित्रपटात नाहीत.

- Advertisement -

संवाद मोजकेच आणि गरजेइतकेच आहेत. दिग्दर्शक टिनू देसाईने पटकथेवरील पकड कायम ठेवली आहे. त्यामुळे योग्य तो परिणाम साधला जातो. चित्रपटातील छोट्या व्यक्तिरेखाही लक्षात राहतात. मिशन रानीगंजमध्ये संवेदनशीलता कायम ठेवून भावनिकतेला नियंत्रणात आणल्यामुळे गाण्यांचा इमोशनल अत्याचार नाही. जरी अक्षय कुमार नायक असला तरी अवास्तव आणि अवाजवी प्रकार नाहीत.

जन्म आणि मृत्यू यामध्ये सुरू असलेली रस्सीखेच, प्रत्येक क्षणाची घेऊन आलेली संदिग्धता असं सगळं काही ‘मिशन रानीगंज’मध्ये पाहायला मिळेल. टिनू देसाईचे दिग्दर्शन, पटकथेची उत्तम बांधणी, टाळली गेलेली सिनेमॅटिक भावनिकता या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. चित्रपटाचा कॅमेरा दगड कोळसा खाणीतले अंधारे कोपरे टिपत जातो. त्यामुळे अर्धाअधिक सिनेमा अंधारातच घडलेला आहे. अनियंत्रित परिस्थितीमध्ये जगण्याने मृत्यूवर केलेली मात असं ‘मिशन रानीगंज’चे वर्णन करता येईल.

दगडखान्यातील लिफ्ट, पाण्याचा आवाज, पार्श्वसंगीत हाताळणीमुळे सिनेमा उत्तम जमून आलेला आहे. अभिनयाच्या बाबतीत अक्षय कुमारच्या बिघडलेल्या कारकिर्दीला रुळावर आणण्याचे काम ‘मिशन रानीगंज’ करू शकतो. बंगालमधल्या कोळशाच्या खाणीत कोळसा काढणारे कामगार हजारो फूट खाली दगडी कोळसा काढण्याचे काम करीत असतात. त्यावेळी अचानक खाणीमध्ये पाणी भरू लागते. अशा परिस्थितीत आपत्कालीन बचावात उपयुक्त साधने नाहीत. दुर्घटनेची पूर्वसूचना देणारी कुठलीही व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत कामगारांनी जगण्यासाठी दिलेला लढा ७०च्या दशकातल्या अमिताभच्या काला पत्थरची आठवण करून देतो. ८०च्या दशकात द बर्निंग ट्रेन आठवत राहतो. सोबतच इंग्रजीतला स्पीड, टायटॅनिक आदी रेस्क्यूपटांची आठवण काही प्रसंग करून देतात. आपत्कालीन बचाव पथकाचे अधिकारी जसवंत सिंह गिल यांनी १९८९ मध्ये कोळशाच्या खाणीत अडकलेल्या ६०हून अधिक खाण कामगारांना वाचवले होते. पडद्यावरही हा संघर्ष उत्तम जमून आलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -