घरफिचर्ससारांशरंगप्रतिभेचा वारसा - सविता मालपेकर

रंगप्रतिभेचा वारसा – सविता मालपेकर

Subscribe

–संतोष खामगांवकर

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेकडून दिला जाणारा यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘रंगप्रतिभा’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांना देण्यात आला. त्यानिमित्त आपलं महानगर – My Mahanagar च्या स्टुडिओमध्ये सविताताईंसोबत गप्पा मारण्याचा योग्य आला. या पुरस्काराबद्दल त्या म्हणाल्या की, नाट्य परिषदेनं ‘रंगप्रतिभा’ पुरस्कार मला दिलाय त्याचा वेगळा आनंद हा आहे की माझ्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवर झाली. याचीच दखल घेऊन नाट्य परिषदेसारख्या आपल्या मातृसंस्थेनं मला हा सन्मान दिला आहे. त्यामुळे कुठेही कुठलीही सेटिंग न करता माझ्या माणसांनी मला दिलेला हा पुरस्कार आहे. या पुरस्कारात माझ्याबरोबर मी ज्या-ज्या निर्मात्यांनी मला काम दिलं, ज्या दिग्दर्शकांसोबत-कलाकारांसोबत मी काम केलं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बॅकस्टेज कामगारांनी मला साथ दिली त्यांचंही योगदान आहे. कारण ही मंडळी जर नसती तर आज सविता मालपेकर नसती.

- Advertisement -

खासगी जीवनात सविताताईंना ‘आक्का’ म्हणूनच सगळे हाक मारतात. आक्का म्हणजे मोठी बहीण, त्यालाच अनुसरून सविताताईसुद्धा ‘ताई’च्याच खाक्यात वावरत असतात. मुळातच कोकणाशी रक्ताचं नातं असलेल्या सविताताई वरून कितीही फणसासारख्या भासल्या तरी आतून मात्र फणसाच्या गरांचा गोडवा त्यांच्यात ठासून भरला आहे. आज मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहचलेल्या सविताताईंनी वयाच्या चौदाव्या वर्षी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. अगदी लहान वयातच त्या कोकणातील गावागावांतून चालणार्‍या नाटकांतून कोकणापासून ते थेट गोव्यापर्यंत पोहचल्या होत्या. यात त्यांना मुख्य साथ मिळाली ती त्यांच्या कलाप्रेमी बाबांची!

सविताताई सांगत होत्या, खरंतर त्यांना नृत्याची प्रचंड आवड होती. शाळा-कॉलेजातून आणि समारंभातून रेकॉर्ड डान्स करण्याची एकही संधी त्या सोडत नसत, पण बाबांची इच्छा होती की सविताने मोठ्ठी अभिनेत्री व्हावं. त्यांच्या राजापुरात घरासमोरच नाट्यगृह असल्यामुळे नाटकांच्या प्रयोगासाठी आलेल्या सर्व कलाकारांची त्यांच्या घरी ऊठबस असायची. ज्येष्ठ दिवंगत हास्य अभिनेते राजा गोसावी तर बाबांचे खास मित्र होते. सविताने व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईस यावं असं राजाभाऊंनी सुचवलं होतं. बाबांचं अकस्मात निधन झालं आणि सर्व भावंडांची जबाबदारी सवितावर पडली. राजाभाऊंनी सुचवल्याप्रमाणे सविताची पावलं व्यावसायिक नाटकांत कामं करण्यासाठी म्हणून मुंबईकडे वळली.

- Advertisement -

सविताताई सांगत होत्या, मुंबईत आल्यावर त्यांना खरी साथ दिली ती त्यांच्या मामा आणि मावशींनी. मुंबईत आल्यावर आणखी एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे १९७६ साली त्यांना ‘डार्लिंग डार्लिंग’ हे पाहिलं नाटक राजा गोसावींसोबत करायला मिळालं. याच नाटकात त्यांना अशोक सराफ आणि नयना आपटे या दिग्गजांचीही साथ लाभली. त्यासाठी त्या स्वतःला भाग्यवान समजतात. रंगभूमीला एक वाकबगार अभिनेत्री मिळाली होती. हे सविताताईंनी त्याच वेळी सिद्ध केलं होतं. रंगभूमीवर सुरू झालेली कारकीर्द अशीच पुढे सुरू राहिली.

सविताताईंना शरद तळवळकर, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, मधुकर तोरडमल, भक्ती बर्वे, रमेश भाटकर, मोहन जोशी या आणि अशा कित्येक कलाकारांसोबत रंगभूमीवर वावरायला मिळालं. सविताताईंना कामं जरी मिळत असली तरी त्यावेळी नाटकाच्या एका प्रयोगाचे तीस-पस्तीस रुपयेच मानधन मिळायचं. त्यात गावी भावंडांना पैसे पाठवण्याची जबाबदारी होतीच. परिणामी सविताताई दौर्‍यात बर्‍याचदा दुपारचं जेवण-नाश्ता टाळायच्या. अशा संघर्षाच्या वाटेवरून जात असताना अनेक नाटकं, चित्रपट, मालिका सविताताईंना मिळत गेल्या.

वेळप्रसंगी चांगलं काम स्वतःहून मागण्याची तयारीही सविताताईंनी दर्शवली. ‘काकस्पर्श’मधील त्यांनी साकारलेली विधवा नमुआत्या हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. महेश मांजरेकरांसोबत झालेल्या एका अपघाती भेटीत त्यांनी मांजरेकरांकडे चांगल्या भूमिकेची मागणी केली. लागलीच महेशनी तुला टक्कल करावं लागेल म्हटलं आणि त्याला होकार देऊन त्या चक्क दुसर्‍याच दिवशी मांजरेकरांसमोर टक्कल करूनच उभ्या राहिल्या. जिद्द आणि भूमिकेला जिवंत करण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते.

आजपर्यंतच्या कामांपैकी तुमच्या कामाला लाभलेली अविस्मरणीय दाद कोणती? असं सविताताईंना विचारलं असता त्या म्हणाल्या की, अमोल कोल्हेंची ‘संभाजी’ मालिका करीत असताना जो शेवटचा सीन साकारला त्यावर खास सुलोचनादीदींचा निरोप आला की, “तुझी भूमिका छोटीशीच असली तरी सविता तू छान करते आहेस!” ज्या सुलोचनादीदींनी शिवाजी महाराजांशी संबंधित भूमिका अनेकदा पडद्यावर साकारल्या त्यांचे हे शब्द माझ्यासाठी
अवॉर्डसारखे आहेत.

अभिनयचं नव्हे तर समाजकारणही सविताताईंच्या रक्तात आहे. अनेक पडद्यावरील व पडद्यामागच्या कलाकारांचे प्रश्न त्या कळकळीने मांडत असतात. जोपर्यंत मराठी चित्रपटसृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत कलाकारांचे प्रश्न सुटणार नाहीत असे त्यांचे ठाम मत आहे. सविताताईंसोबतच्या या गप्पा My Mahanagar Liveच्या यू ट्यूब चॅनेलवर https://www.youtube.com/@mymahanagarlive या लिंकवर उपलब्ध आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -