घरफिचर्ससारांशतैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी ....

तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी ….

Subscribe

मुंबई, नवी मुंबई आणि रत्नागिरीच्या दिवाळीपेक्षा तळकोकणातील दिवाळी वेगळी. इथे दिवाळीला चावदीस म्हणतात. पंधरवड्यातला चौदावा दिवस म्हणून चावदीस. चावदीसाचा आदल्यादिवशी पर्यंत चक्कीवर पोहे कुटून आणण्यासाठी गर्दी असते. नवीन भाताचे पोहे करण्यासाठी सगळ्यांची गर्दी. एव्हाना तळकोकणात भात कापून, भात झोडून, त्याचे मुडी, बिवळे (आता कोण मुडी, बिवळे बांधत नाही तरी एक परंपरा म्हणून उल्लेख झाला.) बांधून एकावर रचून नवीन धान्य घरात आलं आहे. मध्यंतरी ऑक्टोबरमधील उन्हाने हैराण झालेला कोकणी शेतकरी हल्ली गारठवून टाकणारी सकाळची थंडी अनुभवतो आहे. एकूण वातावरण प्रफुल्लित करणारं आहे.

वैभव, उठ लवकर…चल ….लवकर आंघोळ कर आणि मैदानात जाऊन फटाके फोडून या ….उठ, उठ लवकर….आज दिवाळी रे….लवकर उठ… अशा प्रातःकाळी आईची ही साद कानावर यायची आणि अस्मादिक अंथरुणातून उठून अंघोळ करून, अंगाला उटण लावून गॅलरीत तुळशीपुढे कारीट फोडायला सज्ज व्हायचे. बाहेर येऊन बघतो तर काय दातावर दात आपटत समोरची बिल्डिंग बघायचो तर संपूर्ण बिल्डिंग कंदिलाच्या प्रकाशात उजळून गेलेली असायची. सगळ्यांच्या गॅलरीत एकाच रंगाचे आणि एकाच आकाराचे कंदील.

मुंबईतली दिवाळी ही अशी आठवते. पण दिवाळीच्या दिवसापेक्षा दिवाळी येण्याची चाहूल लागायची ते दिवस अधिक रोमांचित करणारे होते. आठवणीचा हा कॅलिडोस्कोप पुन्हा पुन्हा उघडावा वाटतो, कारण त्याला एक सुखाची जरीकिनार आहे. ट्रंकेच्या तळाशी ठेवलेले कपडे खूप दिवसांनी काढले की, त्याचा येणारा सुवास जेवढा मोहक असतो तसाच काहीसा भाग या आठवणींना जोडला आहे. त्यामुळे मुंबईतला दिवाळसण तसा हवा हवासा वाटतो.

- Advertisement -

दिवाळीचे वेध लागायला आणि सहामाही परीक्षा सुरू व्हायला एकच खुणगाठ. या सहामाही परीक्षेचा अभ्यास आणि घरातली साफसफाई यांची वेळ एकच. पण घरातला आणि आमच्या विक्रोळीतल्या समोरासमोरच्या दोन्ही बिल्डिंगमधील उत्साह शिगेला पोचलेला असायचा. विक्रोळी, त्यात कन्नमवार नगर म्हणजे आमची कामगार वस्ती. या कामगार वस्तीतली दिवाळी कंपनीतून मिळणार्‍या बोनसवर अवलंबून असायची.

दिवाळीच्या आठ दिवस अगोदर प्रवीण वाण्याकडून दिवाळीच्या फराळाचे सामान आले की, फराळ करायला समोरच्या आणि आमच्या बिल्डिंगमधल्या सात आठजणी शेजारणी तर नक्की यायच्या. सगळ्या मिळून तो फराळ करायच्या, त्यावेळी एकसंध पद्धतीला कोणी काही नाव दिले नव्हते, पण त्याकाळी लोक त्याला शेजारधर्म म्हणत. सहामाही परीक्षा संपल्या की, दोन्ही बिल्डिंगमधील मुलं, बिल्डिंगच्या खालच्या कट्ट्यावर बसून दोन बिल्डिंगच्या मध्ये कोणता कंदील लावायचा याबाबत चर्चा करत. त्या चर्चेचा सूर राजकीय नव्हता पण सामाजिकसुद्धा नसायचा. कारण बरीच चर्चा केल्यावर गाडी पुन्हा दोन बिल्डिंगच्या मध्ये चांदणी लावयाची यावर शिक्कामोर्तब करायची. फक्त चांदणीचा आकार लहान मोठा व्हायचा, दोन्ही बिल्डिंगमधल्या ऐंशी खोल्यांच्या समोर भगव्या रंगाचा लांब शेपटी असलेला कंदील लावायचा हे कित्येक वर्षं ठरलेलं गणित.

- Advertisement -

दसर्‍याच्या आधीच बाबा आम्हा दोन्ही भावांना घेऊन सिलेक्शन टेलरकडे जाऊन कपडे शिवायला देत. बाबा, मी आणि भाऊ हे तिघेही एकाच रंगाच्या कपड्यात रंगलेलो असायचो, त्यावेळी पद्धतच ती होती. एकच मोठा कपड्याचा तग घ्यायचा आणि त्या तागाचे कपडे घरातल्या सगळ्यांना असायचे. दिवाळी पहाट म्हणजे फक्त फटाके एवढचं काय ते गणित. दारासमोर घातलेल्या टिपक्यांच्या रांगोळ्या दरदिवशी नवीन असायच्या. दिवाळी ही सांस्कृतिक देवाणघेवाण होती. ही दिवाळी हळूहळू मुंबईतून नवी मुंबईत सरकली तरी या सांस्कृतिक वैभवात काही विशेष फरक पडला नाही.

आरोग्याच्या या सुसाट कल्पनेत फटाक्यांना वर्ज करता येते, काहींनी फराळाला वर्जता केली आहे. त्यामुळे या दिवाळीपेक्षा आरोग्याच्या मायिक कल्पनेच्या पुढे आपण दिवाळी बघतो आहोत. नवी मुंबईच्या दिवाळीत साहित्याची भर पडली आणि दिवाळी बरोबर यावेळी कोणते दिवाळी अंक येणार ..कोणाच्या कविता वाचायला मिळणार..कोणाच्या कथा वाचायला मिळणार याची उत्सुकता चाळवली जाऊ लागली. त्या सृजनशील वातावरणात दिवाळी म्हणजे अंध:कारातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा सण ही संकल्पना रुजू होऊ लागली. एकेका साहित्यिक अंकातून लिखाणाची उर्जा बाहेर येऊ लागली, त्यामुळे दिवाळी हा काळ सृजनशीलतेचा काळ वाटू लागला.

कोणी दिवाळीच्या या संकल्पनेला सांस्कृतिकदृष्ठ्या बघताना दारासमोर लावलेला हा दिवा, अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा दिवा लावू असं म्हणताना आढळतात. त्यामुळे रोजचा दिवस हा दिवाळीच की, काय असे एक उदात्तीकरण होताना दिसत आहे, हे सामजिक प्रगतीचे लक्षण आहे असेच म्हणावे लागेल. तम निशेचा सरला …अरुणप्रभा प्राचीवर फुलले …. ही कल्पना ह्या संकल्पनेचा एक भाग होऊन बसली आहे.

दिवाळीच्या कार्यक्रमानिमित्त रायगडवरून रत्नागिरीत गेलो असता, खाली केळशी-आंजर्लेकडे उतरलो आणि दिवाळीच्या त्या गोड थंडीत समोर शेकोटी पेटवली गेली. रानातून-शेतातून कंदमुळे आणून त्याचा ढीग समोर ठेवला होता. त्या शेकोटीवर आधण ठेऊन त्यात करांदे. रताळी उकडायला ठेवली. तिथे प्रसिद्ध चीना किंवा चून हे सुरणासारखे कंदमूळ मिळते, त्याच्या वरच्या एकेक पापुद्रा कापून आमच्या हातावर ठेवला आणि हे खाऊन बघा…किती गोड आहे… असं सांगितलं…मी त्या कंदमूळाची एक भेस तोंडात टाकली खरी….पण कंदमूळ हे एवढं गोड असू शकते यावर माझा विश्वास बसेना….तिथली पद्धतच तशी दिवाळीच्या त्या कडाक्याच्या थंडीत भात कापून झालं की, बाजूच्या एका कुणग्यात रताळी किंवा बरमुळा लावून ती दिवाळीच्या दिवशी उकडण्याची पद्धत आहे.

तिथल्या गावकर्‍यांना त्याबाबत विचारले तेव्हा त्यांनी याबाबत सांगताना सांगितलं की, इथे पूर्वीपासून ज्या दिवशी आपण घरातल्या गायी गुरांची पूजा करतो तर निदान त्यादिवशी त्यांच्या कष्टाचे काही खाऊ नये म्हणून कंदमुळे खायची पद्धत आहे. हा एक सांस्कृतिक संघर्ष इथे बघायला मिळाला. बाकी दिवाळी म्हणून इथल्या खेड्यात विशेष काही नसले तरी कृषीसंस्कृतीत किती वेगळेपणा बघायला मिळतो. हीच गोष्ट प्रभानवल्ली गावात बघायला मिळाली. कोण म्हणाले की, चीना हे कंदमूळ रामाच्या आवडीचे म्हणून नरकचतुर्दशीच्या दिवशी ते खाण्याची इथे पद्धत आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि रत्नागिरीच्या दिवाळीपेक्षा तळकोकणातील दिवाळी वेगळी. इथे दिवाळीला चावदीस म्हणतात. पंधरवड्यातला चौदावा दिवस म्हणून चावदीस. चावदीसाचा आदल्यादिवशी पर्यंत चक्कीवर पोहे कुटून आणण्यासाठी गर्दी असते. नवीन भाताचे पोहे करण्यासाठी सगळ्यांची गर्दी. एव्हाना तळकोकणात भात कापून, भात झोडून, त्याचे मुडी, बिवळे (आता कोण मुडी, बिवळे बांधत नाही तरी एक परंपरा म्हणून उल्लेख झाला.) बांधून एकावर रचून नवीन धान्य घरात आलं आहे. मध्यंतरी ऑक्टोबरमधील उन्हाने हैराण झालेला कोकणी शेतकरी हल्ली गारठवून टाकणारी सकाळची थंडी अनुभवतो आहे. एकूण वातावरण प्रफुल्लित करणारं आहे. सकाळच्या वातावरणात पक्ष्यांचे विविध आवाज ऐकायला मिळतात, थोडंस धुकं ओसरल्यावर मग शेताच्या मेरेवर कवडे छाती पुढे काढून बसलेले आहेत. भात कापून झाल्याने शेत संपूर्ण ओस दिसतंय. यावर्षी भात कसा आसा? असा प्रश्न कोणी कोकणी शेतकर्‍यांना विचारावा. कोकण्याचं उत्तर ठरलेलं गुदस्ता बरा हुता, ह्यावर्षी काय राम नाय. भले शेती पिको वा ना पिको. गेली पस्तीस वर्षे हे उत्तर मी कायम ऐकत आलोय.
शेतावरून फेरफटका मारून भावाच्या चक्कीवर (गिरणीवर) आलो की, पिशव्यांची एक भलीमोठी रांग बघायला मिळते. बाहेर गिरणीवरची गिर्‍हाईके बोलत बसलीत. त्यातलाच कोणतरी ओळखीचा विचारतो काय वो चाकरमान्यानु ! मधीसशे इलास
कॉलेजाक सुट्टी आसा म्हनान इलय
बरा केलास, परवा चावदिस आसा, आता फॉव खाऊन जावा

चावदीसाच्या आदल्यादिवशीपासून या सोहळ्याला सुरुवात होते. कार्तिक महिन्यातली थंडी हिव भरवत असते, ही थंडी मुंबईत अनुभवता येत नाही. दातावर दात आपटत एकमेकांशी बोलणेदेखील कठीण होते. यादिवशी सर्वात आधी पूजा केली जाते ती न्हाणीघरातल्या मडक्याची, आदल्यादिवशीच मडक्याच्या तोंडाला झेंडू आणि आंब्याच्या पानांनी बनवलेले तोरण बांधलं जातं. हल्ली दारोदारी आकाशकंदील लावले जातात, तुळशीवृंदावनाजवळ पणत्यांची रोषणाई करून घरातल्या लेकी सुना या वृंदावनाजवळ रांगोळी काढतात. इथपर्यंत सर्व पारंपरिक पद्धतीने जसे इतरत्र होते तसेच तळकोकणात देखील होते.

यादिवशी बैलाच्या शिंगांना रंग लावण्याची पध्दत आहे. अगदी गोठ्यातील लहान वासरांनादेखील नुकतीच शिंग फुटत असतील तर त्यांच्यादेखील त्या छोट्या शिंगांना रंग लावला जातो. करंज्या, लाडू, शंकरपाळ्या, चकल्या इत्यादी पदार्थ कोकणात दिवाळीला कोणीच बनवत नाहीत. कोकणात चावदिसाच्या दिवशी पोहे बनवले जातात. वाडीतले सर्वजण एकत्र एकमेकांकडे हे पोहे खाण्याच्या निमित्ताने जातात. वाडीतले हे सौहार्दतेचे संबंध हे साजरे होणार्‍या सणांवर असते. सण साजरे केले जातात तेच मुळात अशाप्रकारे ग्रामसंस्कृती टिकून राहण्यासाठी. गणपतीला एकमेकाकडे भजनाला जाणे किंवा दिवाळीला एकमेकाकडे पोहे खाण्यानिमित्त जाणे हा ग्रामसंस्कृतीतला शिष्टाचार आहे.

एकमेकांकडे पोहे देण्याघेण्याचा कार्यक्रम झाला की, लोक आपल्या कामाला लागतात. कोकणातल्या शेतकर्‍यांना या दिवसात सवड नसते. आपली कांबळी घेऊन तो बैल-गाई सोडतो आणि थेट रान गाठतो. दुपारीदेखील बैल घेऊन गोठ्यात बांधले की मग जेऊन थोडी टकली टेकून. तो माडाच्या झाडावर चढून दोन नारळ काढेल आणि नारळ सोलून पुढल्यादारी ठेऊन देईल. आणि चाकरमान्यांना उठवण्यासाठी अरे मेल्यानु ! उठा या दुपारच्या झोपन्यांनं तुमची पोटा वाडली हतं, उठा आणि चलत देवळात चला, वायचं चरबी झडान जायत

अशा या तिरकस बोलण्यावर कोण काय बोलेल? सकाळची पोटात उबारा देणारी थंडी आणि दुपारची उन्हाबरोबर किंचित बोचणारी थंडी अंथरुणातून उठू देत नाहीत. तरी देवळात जायचं म्हणजे उठायला हवं. दुपारचा चहा घेऊन सदरेवर ठेवलेले दोन नारळ घेऊन देवळाकडची वाट चालायची. वाटेत कोणाच्या लगडलेल्या केळी, कुठे तरी अननस अशी फळं बघायला मिळायची. हा महिना काही फळफळावळीचा महिना नाही.

वीस-पंचवीस मिनिटे चालल्यानंतर देऊळ दिसू लागते. देवळात गुरव साफसफाई करत असतो. तो पोटभरु गुरव असल्याने कोण आलेत, चाकरमानी की गावकरी याची त्याला विशेष काही पडली नसते तो दिलेला नारळ घेतो, नाव विचारतो. तोंडातल्या तोंडात काही तरी बडबडतो आणि चाकरमाण्याने दिलेले वीस-तीस रुपये खिशात ठेऊन ठेवलेला नारळ फोडून चार फोडी सगळ्यांना वाटतो. चला तकडे पयलाडी जावया तकडे घाडी गावतलो कडकडीत गार्‍हाणा घालतलो असं म्हणत सगळे पयलाडी देवळात जातात. त्या पयलाडच्या देवळात पोचल्यावर दोन चार मानकरी आणि घाडी बसलेला असतो. आता इथे साग्रसंगीत सोपस्कार होणार हे सांगणेच नको. बाबा, चल हे चाकरमानी इलेत वायचं नारळ ठेय नि गार्‍हाणा घाल गाराणा घालूया तर एवढे चाकरमानी इलेत, रे झिला तकडे देवीकडे नारळ ठेय नि हात झोडून उभे र्‍हवा.
सगळे चाकरमानी हात झोडून उभे राहिले की बाबू घाडी आपल्या खड्या आवाजात

बा देवा महापुरसा
घरच्या घरवाल्या, ब्राम्हणपूरसा,
लिंगा, जैनां, ब्राम्हणा, गांगो महाराजा,
मुळपुरशा, पाच पुरी बारा आकारा
राजसत्तेचो देवचार, पूर्वसत्तेचो देवचार
धरतीचो देव, भूमीचो आकारी नि चौर्‍यांशी खेड्याचो अधिकारी
त्याचप्रमाणं
आई ईटलाई, पावणाई, बा देवा नागेश्वरा
हे बाय, हे चाकरमानी चावदिसाच्या निमित्तान, दरर्षाप्रमाण तुझी ओटी भरूक इले हत त्याका
सुबुद्धी देवन वर्षाकाठी तुझी सेवाचाकरी त्यांच्या हातून होवून दे
ह्या कार्यात खय बारिक सारीक चूक झाली आसात तर मखलास कर
काय बारीक सारीक आडो माडो आसात तो तुझ्या पायाखाली दाबून लेकरांची बरकत कर गे आवशी
व्हय महाराजा !

असे कडकडीत गार्‍हाणं घातलं की आलेला चाकरमानी खूश होतो. चावदिसाच्या कोकणात विशेष सणसोहळा नसतो, पण एकमेकांकडे जाऊन पोहे खाण्यात मजा आहे. आज गोठ्यात बैल नाहीत म्हणून बैलांच्या शिंगांना कोणता रंग द्यायचा यावरून मुलांमध्ये भांडणं नसतात. हल्ली मुंबईसारखा फराळदेखील तळकोकणात बाजारात मिळतो. पण पोटात उबारा आणणारी थंडी, दातावर दात आपटत गोविंदा रे गोपाळा म्हणत तुळशीपुढे कारीट फोडायची मजा गावातच ! मुंबईत राहून मॉलमधून कितीही खरेदी केली तरी बाबांनी एकाच तागाच्या कपड्यांनी शिवलेले शर्ट आणि इतर कपडे आठवतात. एकाच रंगाच्या कपड्यावरन कोण कोणाची भावंडे हे सहज ओळखता यायचे, रंगाची ओळख आयुष्यभर लक्षात रहाण्याजोगी आहे. या गोडाच्या दिवसात घरातले कोणतरी रानात जाऊन सातवल वनस्पतींची सालं घेऊन येत आणि पाट्यावर चेचून त्यांचा रस काढून तो सर्वांना देत, तो पेलाभर रस पिताना नाकी नऊ यायचे, उभ्या आयुष्यात इतका कडू रस प्यायला नसेल, ही सातवल वनस्पती मूळची कडूच! डोळे बंद करून थेंब थेंब करत तो रस आम्ही पोटात ढकलत असू. आयुष्यात गोडाबरोबर कडू अनुभव पण घ्यावा असे तर ही सातवल वनस्पती शिकवत नसेल? , या कडू आठवणी प्रसंग गिळून टाकून समृद्ध जीवन जगावे हे चावदीसाचे दिवस शिकवतात. चावदीसाच्या आठवणी काही केल्या मनातून जात नाहीत, याचं कारण मुळात हेच आहे.

कार्तिकच्या त्या थंडीत पायातल्या वहाणा काढून लालमातीत चालताना होणारा आनंद काय वर्णावा, सकाळच्या दवात न्हालेली लालमाती पायांना खूप मऊ वाटते. तिमिरातून प्रकाशाकडे नेणारी ही दिवाळी तशी अलौकिक !. अगदी ज्ञानेश्वरांच्या श्लोकात वर्णिली आहे तशी

सूर्ये अधिष्टीली प्राची
जगा जाणीव दे प्रकाशाची
तैसी श्रोतया ज्ञानाची
दिवाळी करी …

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -