Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश तिसऱ्या महायुद्धाची नांदी

तिसऱ्या महायुद्धाची नांदी

Subscribe

करोना विषाणूचा जगभर फैलाव झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर चीन आर्थिक नाकेबंदीच्या कचाट्यात सापडला तर तो गप्प बसण्याची शक्यता नाही. त्यातून जागतिक शीतयुद्धाला प्रारंभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिका आणि चीनदरम्यान शीतयुद्धाला प्रारंभ होताना, चीन भारताची आर्थिक गळचेपी करण्यासाठी सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू शकतो. भारताचा शत्रू पाकिस्तानला सीमेपलीकडून दहशतवाद पेटवण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो. संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकन आणि युरोपियन देशांना नामोहरम करण्याची संधी शोधू शकतो. ती अर्थातच तिसर्‍या जागतिक युद्धाची नांदी ठरू शकते. त्याची सुरुवात झाली आहे. आज अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या देशांनी चीनला सज्जड दम भरला आहे.

30 डिसेंबर 20१९ रोजी चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला. पण चिन्यांनी त्याची माहिती जगापासून लपवून ठेवली आणि आज जगभर या महामारीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. चीनच्या वुहान प्रांतात सापडलेल्या या रुग्णापासून शेकडोजणांना करोनाची लागण झाली. मात्र आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल म्हणून चिनी सरकार लपवालपवी करत होते. तरीही जगसमोर ही बाब आली आणि चीनच्या कम्युनिस्ट सरकारला आपल्या बचावासाठी अनेक कसरती कराव्या लागल्या. अखेर जागतिक दबावामुळे 23 जानेवारीला २०२० रोजी शी झेन्ग ली या महिला शास्त्रज्ञाने वुहानमध्ये पसरलेला विषाणू वटवाघुळामुळे पसरला असल्याचा निष्कर्ष एका पेपराद्वारे जारी केला. हा पेपर पुढे 3 फेब्रुवारीच्या अंकामध्ये नेचर या नियतकालिकाने छापला आहे. शी झेन्ग ली वुहान शहरातील व्हायरॉलॉजी संस्थेमध्ये या विषयावर संशोधन करतात. त्यांच्यासोबत काम करणार्‍या चमूने असे म्हटले होते की, वुहानमध्ये मिळालेला विषाणू आणि सार्सचा विषाणू हे दोन्ही मानवी शरीरात प्रवेश मिळवण्यासाठी एकच पासवर्ड वापरतात. वटवाघुळात मिळणार्‍या विषाणूशी या विषाणूचा जनुक क्रम 96.2 टक्के मिळताजुळता आहे. हे प्रसिद्धीस देणार्‍या शी झेन्ग ली यांनी जणू असे सूचित केले होते की विषाणूचा प्रादुर्भाव नैसर्गिकरीत्या झाला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष विषाणूच्या रोग्यांवरून उडून वुहान शहरातील समुद्री जीव विक्रीच्या बाजाराकडे वेधण्यात आले. अर्थात हा चिनी सरकारचा एक डाव होता. जगभर करोनाची लागण होऊन चीनचे सरकार नामानिराळे राहू इच्छित होते. या बाजारामुळे साथ आली असल्याच्या निष्कर्षाला चीनच्या सरकार दरबारी मान्यता मिळू लागली. खरे म्हणजे या बाजारात समुद्री जीव विकले जातात व तिथे वटवाघुळे विकली जात नव्हती हे सत्य आहे, पण त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याची पद्धती अवलंबली गेली. उपचारासाठी येणार्‍या रूग्णांना देखील तुम्ही यापूर्वी वुहान बाजारामध्ये कधी गेला होतात – गेला नसाल तर तुम्हाला हा रोग नाही असे म्हणून परत पाठवले जात होते. अशा तर्‍हेने एक वातावरण तयार करण्यात आले. साहजिकच रोगाच्या लागणीविषयी लोक जागृत होऊ नयेत म्हणून लक्ष भलतीकडे वळवण्याचे काम जणू चालू होते. या घोषणेसोबतच वुहान शहरात संपूर्ण संचारबंदी 23 जानेवारी रोजी घोषित करण्यात आली.

खरे म्हणजे ज्या विषाणूचा प्रादुर्भाव होताना दिसत होता, त्याच्याच अभ्यासामध्ये संस्थेचे शास्त्रज्ञ संशोधनाचे काम करत होते. मग हा प्रादुर्भाव तिथून तर झाला नाही ना ही शंका प्रथम यायला पाहिजे होती. अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांनी त्यावरील उपायाबद्दल सोडा पण निदान त्याच्या लागणीबाबत सरकारी वैद्यकीय सेवेला सतर्क करायला हवे होते. असे काहीही होताना दिसले नाही. उलट संस्थेकडील सर्व विषाणूचे नमुने सीलबंद करण्यात आले. आपल्याकडे सुमारे 1400 हून अधिक नमुने असल्याचे ही संस्था एककाळ अभिमानाने सांगत असे – परंतु वेळ येताच या संबंधीचे ट्वीट डिलिट करण्यात आले. नमुने सीलबंद करण्याने काय झाले? साथीच्या बातम्या येत होत्या त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ञांना त्यासंबंधीचे तपशील तपासण्याची इच्छा होती. पण नमुने सील करून तज्ञांच्या हाती काही लागता नये याची तरतूद केली गेली. याच सुमाराला राष्ट्रीय टीव्ही वाहिन्यांवरून साथीबद्दल स्पष्टपणे बोलणार्‍या डॉक्टर मंडळींची निंदानालस्ती सुरू झाली. अशा तर्‍हेने खर्‍या बातम्या दडपल्या जाऊ लागल्या. चीनमध्ये यापूर्वी आलेल्या मोठ्या साथी हाँगकाँग शहराजवळील ग्वान्गडॉन्ग प्रांतामधून पसरत असत असे दिसते. पण ही साथ मध्यवर्ती भागामधून अन्यत्र पसरत होती. ही बाब विचित्र होती. आणि तेही असे एक स्थान जिथून विषाणू संशोधनाची संस्था अवघ्या काही किलोमीटरवर काम करते!! जर हा विषाणू नैसर्गिक अपघाताने पसरला असेल तर ही लपवाछपवी चीन सरकारला का बरे करावी लागत होती?

- Advertisement -

करोना विषाणूची साथ जगातल्या 160 हून अधिक देशांना सतावत असताना या मुद्यावरून जागतिक राजकारण मात्र पेटताना दिसत आहे. वुहान आणि करोना ही नावे आज एकमेकांशी अशी जोडली गेली आहेत की चिन्यांचा स्वाभिमान डिवचला जात आहे. चायनीज व्हायरस किंवा वुहान व्हायरस असे त्याचे वर्णन ऐकले की त्यांना कानामध्ये शिसे ओतल्यासारखे वाटते. या प्रकरणी एकंदरीतच संयमाची वानवा असलेला देश म्हणून चीन जगासमोर आला आहे. आपले काही चुकल्यामुळे जगभरातल्या हजारो निष्पापांच्या आयुष्याला गालबोट लागले आहे, त्यात हजारो निरपराधांचे प्राण गेले तर जगाला आज आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. परंतु त्याबद्दल जराही अपराधीपणाची जाणीव चिन्यांना आहे असे जगासमोर आलेले नाही. लपवाछपवीच्या तंत्रामुळे चीनमध्ये उणेपुरे चार साडेचार हजार लोक मृत्युमुखी पडले ही जगभरच्या जनतेला शुद्ध थाप वाटत आहे. जिथे करोनाचा जन्म झाला नाही त्या न्यूयॉर्क शहरात जर 10 हजारांपेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले असतील तर चीनमध्ये हा आकडा खरा आहे हे विश्वसनीय वाटत नाही. आणि आकडा खरा असेलच तर चिन्यांकडे या विषाणूवरचे काही औषधही असावे, पण चीन ते अन्य देशांना देत नाही असे लोकांना वाटले तर दोष कोणाला द्यायचा?

वुहान शहरामध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शी जिन पिंग 10 मार्चला गेले तेव्हा त्यांनी केलेल्या भाषणामध्ये काही मुद्यांची झलक मिळाली. करोना व्हायरस म्हणजे एक सैतान असल्याचे सांगत या सैतानाविरोधात चीनच्या लोकांचे युद्ध सुरू असून आपण त्यामध्ये विजयी होऊ असे शी जिनपिंग यांनी सांगितले. वरकरणी पाहता या शब्दरचनेमध्ये कोणाला काय गैर वाटावे? पण हेच भाषेचे वैशिष्ठ्य असते. एक म्हणजे एका कम्युनिस्ट देशामध्ये शी जिनपिंग सैतानाचे अस्तित्व मान्य करत आहेत आणि लोकांना त्याचे रूपक वापरून लढ्याला उद्युक्त करत आहेत. दुसरे असे की शी जिनपिंग स्वतः कडवे कम्युनिस्ट नाहीत ते स्वतःला कन्फ्युशियसचे अनुयायी समजतात. सैतानाचे अस्तित्व मानणे म्हणजे दैवी अघोरी शक्तींचे अस्तित्व कन्फ्युशियस मानत होता. तीच ही विचारधारा इथे दिसते. पण खरी गोम आहे ती पुढेच. चिनी भाषेमध्ये सैतान म्हणजे गोरा सैतान असतो. त्यामुळे शी जिनपिंग सैतानाविरोधातील लढाई असे म्हणतात तेव्हा ते गोर्‍यांच्या विरोधातील लढाई छेडण्याचे आवाहन करत असतात. या परकीय संकटाचा सामना करण्यासाठी ते जनतेला लोकलढ्यात उतरा म्हणूनही साद घालत आहेत. अशी लोकयुद्धाची भाषा माओ करीत असे आणि तीही पाश्चात्यांच्या विरोधात. तेव्हा शी जिनपिंग यांना कोणाविरोधातला लढा अपेक्षित आहे हे वेगळे सांगायला नको.

- Advertisement -

जगामधल्या 150 हून अधिक देशांमध्ये उत्पात घडवून आणणार्‍या या विषाणूने त्या त्या देशांची अर्थव्यवस्था टेकीला आणली आहे. संपूर्ण संचारबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले तसे विषाणूचा प्रसार आपण रोखू शकलो नाही तर देश 21 वर्षे मागे जाईल इतके हे भीषण संकट कोसळले आहे. म्हणजे लक्षात येईल की एखाद दोन महिने सर्व कारभार बंद ठेवल्यामुळे जितके नुकसान देशाचे होईल त्याच्या कित्येक पटीने जास्त नुकसान उद्योगधंदे चालू ठेवण्यातून देशाला भोगावे लागणार आहे असे मोदींचे अनुमान सांगत आहे. या परिस्थितीत संपूर्ण जगाला या भीषण संकटामध्ये लोटणार्‍या चीनबाबत कोणी अंतिम विचार केला तर दोष चीनकडेच जाणार आहे.
चीनकडे प्रशिक्षित मजूरवर्ग आहे. तो अत्यल्प मजुरीवर उपलब्ध आहे. महत्वाच्या पायाभूत सोयीसुविधा चीनने उभ्या केल्या आहेत. सबब आपले उत्पादन क्षेत्र जर चीनमध्ये नेऊन प्रस्थापित केले तर आपल्याला कमी दरामध्ये कच्चा माल अथवा तयार माल उपलब्ध होईल हे ते समीकरण होते. बघताबघता या यशस्वी समीकरणाच्या जोरावर अमेरिकेसारख्या देशामध्ये ग्राहकांच्या हाती बव्हंशी उत्पादने मेड इन चायना अशी पडू लागली. त्या अगोदर ज्या वेगाने अमेरिकेमध्ये उत्पादन क्षेत्र पसरत होते ते थांबले. उत्पादन क्षेत्रामधल्या उपजीविकेच्या संधी नष्ट झाल्या. मग सेवा क्षेत्र कसे विस्तारणार आहे याचा डंका सुरू झाला. त्यामध्ये काही अंशी शिक्षित मध्यमवर्गाची सोय लागली. पण निम्नस्तरीय वर्गाचे काय? कारखान्यांमधून काम करणार्‍या ब्ल्यू कॉलर कामगाराचे काय? त्याच्यासाठी उपजीविकेच्या संधी कायमच्या बंद झाल्या. आज परिस्थिती अशी आहे की पुनश्च कारखाने अमेरिकेमध्ये उभारायचे म्हटले तर प्रशिक्षित कामगार वर्ग मिळणे कठिण होईल. जो देश आपला मध्यमवर्ग मोडून काढतो तो परत उभा करणे अवघड काम होते. हे सर्व कशासाठी? तर वस्तू स्वस्त मिळाव्यात म्हणून. मग खरोखरच वस्तू स्वस्त मिळत होत्या का? चीनमधून बनवून घेतल्यामुळे कच्च्या मालाचे दर जर का कमी होते तर तयार मालातील नफा वाढला असणार हे उघड आहे.

चीनमधून उत्पादन बाहेर हलवणे ही प्रत्येक देशांसाठी केवळ सुस्थिर आर्थिक परिस्थितीची हमी राहिलेली नसून ती देशाच्या सुरक्षेची हमी होऊन बसली आहे. चीनमध्ये बनलेल्या कोणत्याही मालाला हात लावण्याची हिंमत जगभरची जनता करू धजणार नाही. प्रश्न एवढाच उरतो की हे सर्व किती काळात होऊ शकते. चीनमधून अमेरिकन उद्योगांनी आपले उद्योग हलवण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकन उद्योगांखेरीज जपानने आपल्या उद्योगांना उत्पादन चीनबाहेर हलवण्यासाठी 220 कोटी डॉलर्सची मदत देऊ केली आहे. हेच पाऊल दक्षिण कोरिया उचलत आहे. आणि ऑस्ट्रेलियासुद्धा. हळूहळू जर्मनी आणि फ्रान्सलाही तेच करावे लागणार आहे. या सर्व देशांनी भारताकडे आपली पसंती झुकली असल्याचे संकेत दिले असून तसे झाले तर ती भारतासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. भारतातही लोकसंख्या मोठी आहे. येथेही जगातील विकसित देशांच्या तुलनेत प्रशिक्षित मजूरवर्ग उपलब्ध होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारचे धोरणही परदेशी कंपन्या जास्तीतजास्त देशात याव्यात या अनुषंगाने त्यांना सोयीसुविधा देणारे आहे. चीनमधील उत्पादनकर्त्या कंपन्या भारतात आल्या तर येथील बेरोजगारीची समस्याही मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे सेवा क्षेत्राकडे जास्तीतजास्त झुकण्याचे केंद्र सरकारचे धोरण त्यांना सोडावे लागून उत्पादनावर भर द्यावा लागेल. सेवा क्षेत्र हे कितीही विस्तारणारे असले तरी ते शाश्वत नाही. उत्पादन क्षेत्रच प्रदीर्घ काळ रोजगार निर्मिती करू शकते, आता जगानेही मान्य केले आहे.

चीन अशाप्रकारे आर्थिक नाकाबंदीच्या कचाट्यात सापडला तर तो गप्प बसण्याची शक्यताच नाही. त्यातून जागतिक शीतयुद्धाला प्रारंभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिका आणि चीनदरम्यान शीतयुद्धाला प्रारंभ होताना, चीन भारताची आर्थिक गळचेपी करण्यासाठी सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू शकतो. भारताचा शत्रू पाकिस्तानला सीमेपलिकडून दहशतवादा प्रोत्साहन देऊ शकतो. संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकन आणि युरोपियन देशांना नामोहरम करण्याची संधी शोधू शकतो. ती अर्थातच तिसर्‍या जागतिक युद्धाची नांदी ठरू शकते. त्याची सुरुवात झाली आहे. आज अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या देशांनी चीनला सज्जड दम भरला आहे. काही ठिकाणी तर आर्थिक नुकसान द्यावे म्हणून दावे केले गेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संस्थेला आपण सध्या पैसे देणार नसल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेने तैवान अलायन्स इंटरनॅशनल प्रोटेक्शन अ‍ॅण्ड इन्हान्समेंट इनिशिएटीव्ह (तैपाई) अ‍ॅक्ट या कायद्यावर 27 मार्च रोजी स्वाक्षरी करून अमेरिकेचे राष्ट्राध्य्क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला डिवचले आहे. करोनानंतरच्या काळात हा संघर्ष अधिकच तीव्र होणार असून ती तिसर्‍या महायुद्धाची नांदी ठरणार आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -