घरफिचर्ससारांशइलेक्ट्रॉनिक्सच्या सुवर्णयुगात रोजगार संधींचा ‘पाऊस’!

इलेक्ट्रॉनिक्सच्या सुवर्णयुगात रोजगार संधींचा ‘पाऊस’!

Subscribe

माहिती म्हणजे ‘डेटा स्टोरेज’ जसजसा वाढत जाऊ लागला, तसतसे कॉम्प्युटर हार्डडिस्क अधिकाधिक क्षमतेने वाढू लागल्यात, मात्र २००० सालानंतर माहितीचा अक्षरशः विस्फोट होऊ लागला. मग पेनड्राईव्ह, झिपड्राईव्ह आणि नंतर हार्डडिस्क दरवेळी बदलणे तसेच गरजेनुसार बाहेरून हार्डडिस्क जोडत माहिती साठवणे आणि ती सोबत वाहून नेणे हे एक ‘झंझट’चे काम झाले. बरं यासोबतच कॉम्प्युटर व्हायरस खतरा ही कायम! प्रसंगी संपूर्ण डेटा करप्ट होत उडाला की होणारा संताप, मनस्ताप आणि हळहळ यातून सुटका होणे हे खूप आव्हानात्मक दिव्य! यातून भल्या भल्या मोठमोठ्या कंपन्या आणि बँकादेखील सुटल्या नाहीत, मात्र यानंतर ट्रेड सिक्रेट चोरी तसेच व्हायरसची हेराफेरी यावर बर्‍याच अंशी मात करणारे सुवर्णयुग अवतरले! इलेक्ट्रॉनिक्स ‘माहिती ढग’ अर्थात ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’च्या माध्यमातून!

जणू आपली सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर आणि त्याला सुरक्षा देणार्‍या सॉफ्टवेअर ढगात ठेवून निश्चिंत व्हा! असे सांगणारे हे आभासी इलेक्ट्रॉनिक्स माहितीचे ढग जगभर लोकप्रिय नाही झाले तरच नवल! माहिती ढगांची सेवा ही इंटरनेट वापरत आपली साठवलेली माहिती सुरक्षितपणे परत मिळवता येते आणि हीच गोष्ट जनतेसाठी नाविन्यपूर्ण, क्रांतिकारी व झपाट्याने जगभर क्लाऊड प्रसार प्रचार होण्यासाठी कारणीभूत ठरली. अगदी सुलभ व अल्प खर्चात नव्हे, तर खर्च बचत करीत इंटरनेटद्वारे आपला मोबाईल, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरवरीलदेखील पाहिजे तेथून २४ बाय ७ बाय ३६५ असा आपला डेटा पाहता येतो असे हे अद्भुत इलेक्ट्रॉनिक्स ‘माहिती ढग’ म्हणजे ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’!

अशी झाली सुरुवात…

‘क्लाउड कॉम्प्युटिंग’ हा शब्द मोठ्या प्रमाणात २०००च्या दशकात जगभर वापरला जाऊ लागला. विशेष म्हणजे याच काळात विविध टेलिकॉम कंपन्यांनी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) अर्थात खासगी नेटवर्क ग्राहकांना पुरवायला सुरुवात केली होती. यामुळे भाडे स्वरूपात चक्क पैसे मोजत आपला डेटा व वेबसाईट्स ही आभासी इलेक्ट्रॉनिक्स ढगात म्हणजे क्लाऊडवर ठेवण्यासाठी चढाओढ सुरू झाली. विविध कंपन्यांना आपल्या प्रत्येक गोष्टींसाठी पूर्वी आपला सर्व्हर ठेवावा लागे आणि सर्व्हर डाऊन झाला की सर्व कामे ठप्प होत. ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’मुळे सर्व्हर ठेवण्याची आवश्यकताच संपली आणि कंपन्यांची आर्थिक भरभराट होऊ लागली.
खरंतर २००० सालाच्या आधीच आयबीएम या कंपनीने १९६० मध्ये आयबीएम ७०४ हा मेनफ्रेम कॉम्प्युटर बनवला. अनेक व्यावसायिकांना एकाचवेळी एक्सेस प्रदान करीत क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा ऑफर करणार्‍या पहिल्या कंपन्यांपैकी एक म्हणून ‘आयबीएम’ला श्रेय दिले जाते. १९६९ मध्ये जोसेफ कार्ल रॉबनेट लिकलायडर यांनी माहिती आदानप्रदान करण्यासाठी ‘इंटरगॅलॅक्टिक कॉम्प्यूटर नेटवर्क’ ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. आज वापरला जाणारा ‘क्लाऊड कॉम्प्यूटिंग’ याशब्दप्रयोगाचे हे उगमस्थान हेच होय. आज आपल्या फाइल्स, फोटो आणि कागदपत्रे कधीच हरवू नये असे ज्यांना वाटते अशा प्रत्येक व्यक्ती व समूह तसेच संस्थेसाठी ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ हे आज वरदान ठरले आहे.

- Advertisement -

इलेक्ट्रॉनिक्स ‘माहिती ढगां’चे विविध प्रकार

इलेक्ट्रॉनिक्स ‘माहिती ढगां’साठी आज अमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS), मायक्रोसॉफ्ट अझर, गुगल क्लाऊड आणि आयबीएम क्लाऊड असे विविध सेवा सेवा पर्याय उपलब्ध आहेत. ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ सर्व्हिसेसमध्ये इन्फ्रास्ट्रचर प्लॅटफॉर्म अप्लिकेशन तसेच माहिती साठविण्यासाठी स्टोरेज स्पेस यांसारख्या विविध सेवा सुविधा वापरकर्त्या ग्राहकाला उपलब्ध देतात. AWS Lambda सर्व्हरलेस कॉम्प्युटिंग किंवा Google BigQuery डेटा अ‍ॅनालिटिक्स सारख्या विशेष ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ सेवादेखील आहेत.
आयएएएस, पीएएएस, एसएएएस हे क्लाऊड कॉम्प्युटिंगचे तीन मुख्य प्रकार आहेत. सर्व्हर्सच्या एक विशाल नेटवर्क बनवत तसेच आपल्या आवश्यकतेनुसार गोपनीयतेसह सर्व्हिस घेत युजर म्हणजे वापरकर्ता पैसे मोजू शकतो ही माहिती ढगांची खासियत आहे.

१) क्लाऊड कॉम्प्यूटिंगचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सेवा (IaaS) :

इंटरनेटवर व्हर्च्युअल कॉम्प्युटर रिसोर्स प्रदान करतात. वापरकर्ते व्हर्च्युअल मशीन, स्टोरेज आणि नेटवर्किंग भाड्याने देऊ शकतात. तसेच आयटी व्यावसायिकांसाठी ऑपरेटिंग सिस्टम आणि अ‍ॅप्लिकेशन्सवर अधिक कंट्रोल करणे शक्य होते. विविध वर्कलोड्ससाठी लवचिक असले तरी यासाठी अधिक व्यवस्थापन आवश्यक असते. मेझॉन वेब सर्व्हिसेस आणि मायक्रोसॉफ्ट अझर ‘आयएएएस’ प्रदान करतात.

- Advertisement -

२) प्लॅटफॉर्म आणि सेवा (PaaS) :

डेव्हलपर लोकांना अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यासाठी, अ‍ॅप्लिकेशन लोड व मॅनेज करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आणि एनव्हार्मेंट प्रदान करते. नियंत्रण आणि वापर यांच्यातील समतोल प्रदान करतणे, सहजपणे डेव्हलपर लोकांना कोडिंगवर लक्ष केंद्रित करणे आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन कमी करणे ही खुबी यात आहे. वापरकर्त्याला यात पायाभूत सुविधांबद्दल काळजी करण्याची गरज उरत नाही. गुगल एप इंजिन आणि हिरोकू ही ‘पीएएएस’ची उदाहरणे आहेत.

३) सॉफ्टवेअर आणि सेवा (SaaS) :

इंटरनेटवर पूर्णपणे कार्यशील सॉफ्टवेअर वितरीत करते. देखभाल किंवा पायाभूत सुविधांची चिंता न करता वापरकर्ते वेब ब्राऊझरद्वारे या सेवां एक्सेस करू शकतात. कमीतकमी व्यवस्थापन व ताबडतोब सॉफ्टवेअर अपडेट प्रदान करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. गुगलवर्कस्पेस, मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ वसेल्सफोर्स ही लोकप्रिय ‘एसएएएस’ची उदाहरणे आहेत.

फायदेच फायदे!

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करीत क्लाऊड कॉम्प्युटिंगने खासगी व्यवसाय व सरकारी कामकाजात सकारात्मक बदल घडवला आहे.‘क्लाऊड कॉम्प्युटिंग अ‍ॅप्लिकेशन्स’चे नवनवीन ट्रेंड व अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या व्यवसायासाठी जसे ही उपयुक्त ठरतात तसेच एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक माहिती वापरासाठी देखील ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग अ‍ॅप्लिकेशन्स’ फायदेशीर ठरतात. ऑडिओ किंवा व्हिडीओसाठी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पुरवठा करण्यासाठीदेखील या सेवेचा भरपूर प्रमाणात जगभर वापर होत आहे हे विशेष! डेटा स्टोरेज प्लॅटफॉर्म मध्ये गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, वनड्राईव्ह किंवा बॉक्स यांचा नित्यनेमाने होणारा वापर सर्वांच्या परिचयाचा आहे. लवचिकता प्रदान करीत क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा आपल्या स्मार्टफोनचे बॅकअप ठेवण्यासाठीदेखील उपलब्ध आहे. तसेच पर्यावरण रक्षण व ऊर्जेचा ऑप्टिमाईझ म्हणजे पुरेपूर वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीदेखील हे क्षेत्र योगदान देत आहे. संवेदनशील डेटाचे संरक्षण करण्यात आणि उद्योग नियमांचे पालन करण्यात मदत करण्यासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग महत्वाची भूमिका बजावते.

जागतिक मार्केट!

जागतिक पटलावर अमेरिका, युके, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि भारतासह असंख्य देश इलेक्ट्रॉनिक्स माहिती ढगांचा सर्वाधिक वापर करतात. २०२२ साली जागतिक क्लाऊड कॉम्प्युटिंग बाजारपेठेचे मूल्य हे ४८३.९८ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते. (एक अमेरिकन डॉलर म्हणजे ८३.०१ भारतीय रुपये होय.) एका विश्लेषणानुसार क्लाऊड कॉम्प्युटिंग मार्केटचा आकार २०२३ मध्ये ०.५८ ट्रिलियन अमेरिकन डॉलरवरून २०२८ पर्यंत १.२४ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. सध्याची परिस्थिती पाहता २०२३ ते २०२८ पर्यंत १६.४० टक्के वार्षिक चक्रवाढ दराने (सीएजीआर) वेगवानवाढ या क्षेत्रात होणे अपेक्षित आहे.
‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ म्हणजे इंटरनेटवर संगणकीय सेवांचा पुरवठा होय. याक्षेत्रात सर्व्हर, डेटा स्टोरेज, डेटाबेस, नेटवर्किंग, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा नालिसिस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आदी अनेक गोष्टींचा समावेश आहे. परीणामी अत्यंत वेगवान आणि कल्पक नवकल्पना तसेच आवश्यक अनुकूल संसाधने यांचे या क्षेत्रात स्वागत होत ‘वर्ल्ड इकॉनॉमी’त भरभराट आणण ‘माहिती ढग’ योगदान देत आहेत.

भारत आणि ‘माहिती ढगां’ची वाढ!

२०२४ सालापर्यंत, भारतातील एकंदर असलेल्या विविध संस्था व कंपन्यापैकी ४० टक्क्यांपेक्षा जास्त समूह हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात इलेक्ट्रॉनिक्स क्लाऊड सेवा वापरणे ही एक अपरीहार्य गरज बनलेली असेल. २०२२ मध्ये भारतातील क्लाऊड कॉम्प्युटिंग बाजाराचा आकार ६.४७ अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे ५३७.०८ अब्ज रुपये इतका होता. २०२३ आणि २०२९ दरम्यान भारताच्या क्लाऊड कॉम्प्युटिंग बाजाराचा आकार १८.३७ टक्के वार्षिक चक्रवाढ दराने (सीएजीआर) इतकी जलदगतीने वाढ होत २०२९ सालापर्यंत १७.८ अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे १४७७.५९ अब्ज भारतीय रुपये इतक्या मूल्यापर्यंत आपला भारत पोहोचलेला असेल.

रोजगार संधींचा पाऊस!

नवीन तंत्रज्ञान आणि सेवांमुळे माहिती ढगांचे डायनॅमिक मार्केट वेगाने विकसित होत आहे. बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), डेटा नालिटिक्स आणि मशीन लर्निंग (एमएल), सिक्स जी वेगवान इंटरनेट सेवा सारख्या एडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे क्लाऊड कॉम्प्युटिंगची जागतिक मागणीचा महापूर आला आहे. आज मेझॉन, गुगल सर्व्हिसेस, जीमेल, ट्विटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम आदींवर माहिती मिळविण्यासाठी आपण थेट ‘क्लाऊड’ वरील साठविलेल्या माहितीशी सर्रास खेळत असतो याची अनेकांना कल्पना नसते. सॉफ्टवेअर, मोबाईल अ‍ॅप, सर्व्हर तसेच स्टोरेज स्पेस उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स ‘माहिती ढगां’चे सुवर्णयुगात म्हणजेच ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ क्षेत्रात रोजगारसंधींचा ‘पाऊस’ पडतो आहे. आयटी म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान वाढीतला एक महत्वाचा शास्त्रीय टप्पा म्हणजे ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ होय.

‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ म्हणजे आभासी पद्धतीने डेटा साठवून ठेवण्यासाठीची एक इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर प्लॅटफॉर्म असलेली सुरक्षित व जणू मोठ्या हार्डडिस्कची जणू व्यवस्थाच! ‘माहितीचे ढग’ हे संगणकीय उपकरणे आणि प्रणालीचा वापर इंटरनेटवरून सेवा देण्यासाठी करतात. यामुळे विशेषतः इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर आणि वायरलेस नेटवर्किंग याबाबत माहिती असणार्‍या विद्यार्थ्यांचा जगभरातील कंपन्या पैसे देऊन शोध घेत आहेत हे विशेष! शिक्षण, आरोग्य, डिफेन्स, न्यायदान, प्रशासन एक ना दोन, ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’चा वापर होत नाही असे एकही क्षेत्र आता शिल्लक नाही. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक्स ‘माहिती ढगां’च्या सुवर्णयुगात रोजगारसंधींचा ‘पाऊस’ कोसळतो आहे.

(लेखक विज्ञान व तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -