घरफिचर्ससारांशसुडाचे राजकारण घातकच!

सुडाचे राजकारण घातकच!

Subscribe

व्यवस्थेमध्ये शासनाकडे जनतेच्या पालकत्वाची भूमिका असते म्हणून तर त्यांना मायबाप सरकार म्हणून संबोधले जाते. भावनिक साद घातली जाते त्याप्रमाणे शासनानेही आपल्या लेकरांप्रति मायबाप जसे विशाल हृदयाने वागतात तसे उदार अंतकरणाने वागले पाहिजे. दडपशाहीचे सुडाचे धोरण ठेवले तर सामान्य जनता कुणाकडे पाहणार हा विचार केला पाहिजे. जेव्हा जी विचारांची लढाई असते तेव्हा ती विचारांनी लढायची असते, मात्र आज समाजमाध्यमांवर परस्परांवर सुडाने पेटलेले, परस्परांना शिव्यांची लाखोली वाहिलेले, एकमेकांना संपवण्याची टोकाची भाषा वापरलेले संदेश फिरताना दिसतात.

-अमोल पाटील

राजकारण हा शब्द जरी आपल्या औपचारिक तथा अनौपचारिक चर्चांमध्ये उच्चारला तरी अवघ्या काही क्षणात वातावरण गंभीर होते आणि सामान्य माणूस या शब्दानुसरून चर्चा करण्यास आपले मत ठामपणे मांडण्यास कचरतो. यातून या बाबीपासून त्याच्या चर्चेपासून शक्यतो लांबच राहिलेले बरे! अशी भूमिका घेताना दिसतो अशी परिस्थिती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. हे पूर्वापार चालत आलेले चित्र जरी असले तरी अलीकडे ते बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

समाजमाध्यमांवर सामान्य माणसं सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उघड भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि निकोप लोकशाहीसाठी ही अत्यंत स्वागतार्ह अशीच बाब म्हणावी लागेल. लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला विशेष महत्त्व आहे. त्यांना काय वाटते केवळ या केंद्रकाभोवती हे क्षेत्र वाटचाल करताना आपण पाहतो. मुळात राजकारणच नाही तर व्यक्ती विकासाच्या प्रक्रियेत जी क्षेत्रे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी असतात ती सर्व क्षेत्रे हे अखिल मानव समूहासाठीच्या उद्धारासाठीचे प्रवेशद्वार असतात आणि त्यापैकी कुठलेही क्षेत्र वाईट नसते आणि त्याला राजकीय क्षेत्रही अपवाद नाही.

आपल्याकडे त्या त्या क्षेत्रातील कार्यरत व्यक्तिमत्त्वाच्या भल्याबुर्‍या वर्तणुकीवरून त्या त्या क्षेत्राचे मूल्यमापन करण्याची एक वरकरणी पद्धत आहे. मुळात कुठल्याही व्यक्तीच्या भल्याबुर्‍या वर्तणुकीला ते क्षेत्र जबाबदार राहत नाही तर त्या व्यक्तीने व्यक्तिगतरित्या जोपासलेले विचार त्यातून त्याचा त्या क्षेत्राकडे व अंतिमत: समाजाकडे बघण्याचा निर्माण झालेला दृष्टिकोन व या दोन्ही बाबींच्या समन्वयातून त्याच्या हातून घडत जाणारे कार्य जबाबदार असते, हे आपण मान्य करायला हवे.

- Advertisement -

केवळ यामुळेच प्रत्येक क्षेत्रामध्ये भल्याबुर्‍या लोकांचा वावर आपणाला पाहायला मिळतो व ते लोक त्या त्या क्षेत्राला आपल्या वर्तणुकीने सन्मानित वा अवमानित करीत असतात. याचा अर्थ ते क्षेत्र मुळात वाईट नसते हा विचार आता मूळ धरला पाहिजे. आपल्या अगदी दैनंदिन जीवनमानावर थेट परिणाम करण्याचे सामर्थ्य बाळगणार्‍या या राजकीय क्षेत्रापासून दूर पळ न काढता त्याबाबत योग्यरित्या भूमिका घेऊन ती जोपासून हे क्षेत्र अधिकाधिक जनसामान्याभिमुख केले पाहिजे याचा प्रकर्षाने विचार व कृती करण्याची आज गरज आहे.

कुठल्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हे त्याने त्याच्या अंगी बाळगलेल्या वैचारिक बैठकीवरून आकाराला येत असते. माणसाचे विचार हे त्याच्या आईवडिलांकडून त्याच्यावर झालेले संस्कार, शाळेकडून मिळालेली शिकवण, अवतीभोवतीच्या समाजाकडून तथा सामाजिक सहवासातून निर्मित संवादातून तसेच ग्रंथवाचनातून व सामाजिक निरीक्षणातून त्याच्या अंगी आकाराला येत गेलेला दृष्टिकोन यातून बहरत गेलेले असतात. यातही विशेष भर असतो तो स्वचिंतनाचा. कारण एखादी घटना जरी सारखी असली तरी तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा व्यक्तीपरत्वे भिन्न असतो.

तसे असण्याचे कारण म्हणजे प्रत्येकाने आपल्या अंगी स्वचिंतनातून स्वत:ची अशी एक वैचारिक बैठक विकसित केलेली असते. त्यावर आधारितच त्याचे जीवनमान सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात कुठल्याही क्षेत्रामध्ये असे विभिन्न विचार बाळगून कार्यरत असलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या वैचारिक विकासाप्रमाणे ते त्या त्या क्षेत्रात आपले योगदान देण्याचे कार्य करीत असतात. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे एक साहित्यप्रेमी राजकीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याची एक

आगळीवेगळी आणि समृद्ध विकसित व सुसंस्कृत राजकीय परंपरा निर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. जेव्हा असे अभ्यासू व्यक्तिमत्त्व हे ज्या क्षेत्रात कार्यरत असतात तेव्हा ते आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्या त्या क्षेत्राला अधिक उंचीवर नेऊन ठेवण्याचे महान कार्य करीत असतात ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. बुद्धिवंताचा वावर हा ते कार्यरत असलेल्या क्षेत्राला अधिक उंचीवर नेवून ठेवण्यामध्ये अग्रगण्य रूपाने कारणीभूत ठरतो हे अगदी सहज मान्य होण्यासारखे आहे. प्रत्येक क्षेत्राची गती, प्रगती हे त्या क्षेत्रात कार्यरत मनुष्यबळाच्या अंगभूत गुणवैशिष्ठ्यांच्या जोरावरच ठरत असते. हा नियम राजकीय क्षेत्रालासुद्धा लागू पडतो, नाही असे नाही.

राजकीय क्षेत्राचा थेट संबंध सर्वांच्या दैनंदिन जीवनमानाशी पडत असतानाही या क्षेत्राबाबत विचार करणे, भूमिका मांडणे आणि निर्भीडपणे मत मांडण्याबद्दल कमालीची उदासीनता मात्र दिसून येत असते. होय ही गोष्ट खरी आहे की समाजमाध्यमांचा वापर जसजसा वाढत चालला आहे तसतसा हे चित्र बदलत आहे, हे जरी खरे असले तरी समाजमाध्यमांवर व्यक्त होणारी बहुतांश मते ही अभ्यासाच्या अभावातून किंवा सपशेल पूर्वग्रहातून किंवा अगदीच भावनेच्या आहारी जाऊन व्यक्त झालेली वाटतात.

याला काही अभ्यासू चिकित्सक व सखोल विश्लेषणाअंती मांडलेली मते अपवाद असतीलही, मात्र तुलनेने त्याचे प्रमाण नगण्यच आहे. राजकीय क्षेत्र हे अत्यंत परिणामकारक क्षेत्र आहे, ज्याच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब, दीनदुबळ्या तळागळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘आहे रे’ व ‘नाही रे’ या अर्थिक विषमतेमुळे समाजामध्ये निर्माण झालेल्या दोन वर्गातील दरी कमी करून सर्वांना उद्धारासाठीच्या समान संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य पार पाडले जाऊ शकते.

फक्त गरज असते ती नेतृत्वामध्ये सर्वोद्धाराच्या वैचारिक बैठकीची आणि त्याच्या पूर्णत्वासाठी आवश्यक इच्छाशक्तीची! आपल्यासह आपल्या अवतीभोवतीच्या समाजाला प्रगतीच्या वाटेवर प्रकर्षाने मार्गक्रमण करण्यासाठी मनोमन मनीषा बाळगून या क्षेत्रात येऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारी कितीतरी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यात वाढ होणे निश्चितच स्वागतार्ह आहे. राजकीय क्षेत्र हे स्वत:ला भूषवण्याचे क्षेत्र नसून ते जनसामान्यांच्या न्यायासाठी, उद्धारासाठी मिळालेली संधी आहे. निस्वार्थ सेवाभावाने त्या संधीचे सोने करावयाचे असते. हा विचार या क्षेत्रात कार्यरत प्रत्येक घटकाने प्राधान्याने केला पाहिजे. तसे घडेल तो दिवस राजकीय क्षेत्राचा सुदिन असेल आणि आपल्या लोकशाहीला बळकट करणारा असेल हे मात्र खरे.

जनता आणि त्यांचे लोकप्रतिनिधी यातील अंतर ज्या दिवशी कमीत कमी असेल, सर्वसामान्य घटकाला आपल्या लोकप्रतिनिधींसोबत अगदी सहज आपलं गार्‍हाणं मांडण्याची सोय असेल, एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न, आवाज सर्वोच्च सभागृहामध्ये ठामपणे मांडत असेल आणि आपल्या अधिकारांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देत असेल तर ही बाब लोकशाही व मानवतेसाठी अत्यंत भूषणावह म्हणून पाहिली पाहिजे. सुजाण जनता, सजग माध्यमं आणि त्यांच्याप्रति संवेदनशील व अभ्यासू लोकप्रतिनिधी हे त्रिकूट जेवढे सक्षम तेवढे राजकीय क्षेत्र हे विकासाभिमुख असणार हे स्पष्ट आहे.

इंटरनेटच्या युगामध्ये काहीही क्षणार्धात सर्वदूर पसरत आहे. हा काळ अत्यंत वेगवान आहे. या काळात सतत सावधपणे व आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून शहाणपणाने पावलं उचलणारा माणूसच निर्भयपणे जीवन जगू शकतो. सार्वजनिक जीवनामध्ये ज्या व्यक्तींवर अत्यंत महत्त्वाची पदे आहेत, ज्यांच्यावर सर्वसामान्य लोकांच्या जीवन व्यवहाराची जबाबदारी आहे त्यांच्यासाठी तर हा काळ परीक्षेचा आहे. समाजातील प्रत्येक घटक तुमच्याकडे पाहत असतो. तुमचे विचार, आचार हे कित्येकांसाठी अनुकरणीय असतात आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या पार पाडणार्‍या व्यक्तीही त्याला अपवाद नाहीत.

जेवढं सामान्य माणूस राजकीय भाष्य करीत असताना नीट अभ्यास करून ठोस पुराव्याअंती व अभ्यासाअंती करणे आवश्यक असते तेवढेच आवश्यक हे या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पदांवर बसून जबाबदार्‍या पार पाडणार्‍या जबाबदार व्यक्तींनीही भान ठेवणे व काळजीपूर्वक बोलणे आवश्यक असते हे लक्षात घ्यायला हवे. व्यवस्थेमध्ये शासनाकडे जनतेच्या पालकत्वाची भूमिका असते म्हणून तर त्यांना मायबाप सरकार म्हणून संबोधले जाते. भावनिक साद घातली जाते. त्याप्रमाणे शासनानेही आपल्या लेकरांप्रति मायबाप जसे विशाल हृदयाने वागतात तसे उदार अंतकरणाने वागले पाहिजे. दडपशाहीचे सुडाचे धोरण ठेवले तर सामान्य जनता कुणाकडे पाहणार हा विचार केला पाहिजे.

जेव्हा जी विचारांची लढाई असते तेव्हा ती विचारांनी लढायची असते, मात्र आज समाजमाध्यमांवर परस्परांवर सुडाने पेटलेले, परस्परांना शिव्यांची लाखोली वाहिलेले, एकमेकांना संपवण्याची टोकाची भाषा वापरलेले तर कधी खालच्या स्तरावर टीका केलेले व आपल्याच अल्प अभ्यासाचे अल्प ज्ञानाचे प्रदर्शन सर्वदूर पोहचवणारे मेसेज चित्रफिती पाहायला मिळतात ते पाहून सुसंस्कृत अशा राजकीय परंपरेवर मनापासून प्रेम करणार्‍यांना दुःखच होईल. यामुळे कुठल्याही संवेदनशील माणसाचे मन सुन्न झाले नाही तर नवलच.

आपण दिवसेंदिवस इतके का वैचारिक अंगाने खाली खाली घसरत चाललो आहोत याचा विचार सर्व बाजूने सर्वांनी करण्याची गरज आहे. समाजमाध्यमांवर झपाट्याने व्हायरल झालेले असे मेसेज किंवा चित्रफिती निदान पुढील पिढीने पाहू नये व त्यांच्यावर असे संस्कार होऊन हे क्षेत्र आणखी निम्नस्तरावर पोहचत र्‍हास पावू नये याकरिता या बाबी पसरण्यापासून रोखायला हव्यात. यावर अंकूश ठेवणारी ठोस अशी कुठलीही सोय उपलब्ध असलेली ऐकिवात तरी नाही. तेव्हा त्या बाबी तेथून हटवण्याची मोहीम जरी आपण हाती घेतली तरी त्यात किती यश मिळेल हा संशोधनाचा विषय आहे. म्हणून यापुढे तरी अशा बाबी करण्या वा पसरवण्यापासून अलिप्त राहणे त्याबाबत पूर्वकाळजी घेणे हाच उपाय वाटतो.

बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललेले बरे ही पूर्वापार चालत आलेली शिकवण खरोखर किती गरजेची आहे याचे महत्त्व या आजच्या विनाविचार भरमसाठ अनियंत्रित बोलत बरळत सुटलेल्या व्यक्तींकडे पाहून कुणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. काळ पुढे जात राहतो, पंरतु गोष्टी, घटना, प्रसंग हे सर्वदूर समाजमनावर जिवंत राहतात हे सुज्ञांनी कायम लक्षात ठेवायला हवे. परस्परांना चिथावत विषयाला स्वहाताने गंभीर न करता पुढच्या व्यक्तीचा नीट विचार करून त्याच्या ठिकाणी आपण स्वत: असतो तर काय केले असते याचा सहानुभूतीपूर्वक विचार करीत प्रकरण हाताळले गेले तर निश्चितच अर्ध्याहून अधिक समस्या संपतील हे खरे.

येणारा काळ आणखी स्पर्धेचा आणि गतीचा असणार आहे. एकीकडे भौतिक प्रगतीने गरूडझेप घेतलेली असताना दुसरीकडे वैचारिक प्रगतीला अंधारात चाचपडताना वरून पाहत बसणे कुणालाही परवडणारे नाही. भौतिक प्रगतीची फळे तेव्हाच गोड लागतील जेव्हा नैतिक अंगाने समृद्धी बहरत चाललेली असेल. याची जबाबदारी समाजातील अगदी प्रत्येक घटकावर आहे.

सर्व घटकाचा विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन मानवतेच्या मार्गावर मार्गक्रमण करणारे अभ्यासू संवेदनशील नेतृत्व जेव्हा राजकीय क्षेत्रात बहरतील तेव्हा हा लोकाभिमुख मानवतावादी मार्ग आणखी सोपा होणार आहे. सुजाण माणसाने स्वतःला राजकारणापासून अलिप्त ठेवत आल्यामुळे बरेच नुकसान झाले आहे. या क्षेत्रात कार्यरत असो अगर नसो हे क्षेत्र प्रत्येकाच्या वर्तमान आणि भविष्यावर थेट परिणाम करणारे क्षेत्र आहे, मग आपल्याशी संबंधित इतक्या महत्त्वाच्या क्षेत्राबाबत आपल्याला आकलन असणे हे सुजाणपणाचेच लक्षण आहे हे मान्य करायला हवे.

आपण जेव्हा एखादी भूमिका अगदी अभ्यासपूर्ण रीतीने मांडतो व त्याद्वारे अनेकांचे कल्याण अपेक्षित असते तेव्हा समाजमन त्याचे स्वागतच करते. म्हणून अभ्यासपूर्ण रीतीने सामान्यांनी बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. जे क्षेत्र आपल्या सर्वांशी संबंधित आहे, त्याद्वारे घेतले जाणारे निर्णय आपल्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारे असतील. ते परिणाम सर्वहितदायी असतील तर त्याचे स्वागत आणि ते निर्णय घेणार्‍याचे कौतुकही केले पाहिजे. जर त्यातून दुष्परिणाम होणार असतील तर त्यावर अभ्यासपूर्ण विवेचन मांडणे व अशा निर्णयाच्या दाहकतेबद्दलचीही जाणीव सर्वांना करून देणे क्रमप्राप्तच ठरते.

निर्णयप्रक्रियेतील जबाबदार व्यक्तींनी सामान्यांच्या प्रश्नांना संवेदना जागृत ठेवून सामोरे जाण्याची सदैव तयारीही ठेवली पाहिजे. कुणी आपल्याला प्रश्न विचारत आहे म्हणून जर सूडबुद्धीचे वर्तन त्या जबाबदार व्यक्तीकडून होत असेल तर निश्चितच ती व्यक्ती आतून अशा प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी अपयशी ठरली आहे. सत्याचा सामना करण्याची कुवत नाही ही बाब मान्य होण्यासारखी आहे. आपल्याला प्रश्न विचारणे हा आपल्याला या पदावर बसवलेल्यांना अधिकार आहे ही जाणीव पद भूषवणार्‍यांनी कायम ठेवायला हवी.

त्यांनी तसे वागणेही अभिप्रेत आहे. त्याचा निकोप राजकीय परंपरेसाठी फार उपयोग होतो. विश्लेषण, चिकित्सा, विवेचन, संवाद आणि प्रश्नोत्तरे या सर्व राजकारणाला तल्लख आणि तेजस्वी व सर्वसामान्याभिमुख करणार्‍या बाबी आहेत, हे ‘र राजकारणाचा’ शिकू पाहणार्‍यांनी नीट समजून उमजून घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच एक समृद्ध राजकीय क्षेत्र, सुसंस्कृत राजकीय परंपरा आणि थोर राजकीय आदर्श येणार्‍या नव्या पिढ्यांपुढे अभिमानाने उभे राहतील आणि नव्या पिढ्या स्वाभिमानाने त्यांना आपल्या उराशी बाळगून या क्षेत्रात वाटचाल करतील हे नक्की.

सुसंस्कृत राजकारणाची
इथं परंपरा पूर्वापार
सूडबुद्धी उगवता क्षणी
थांबतो रयतेचा उद्धार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -