घरफिचर्ससारांशपाबळमधील आगळेवेगळे विज्ञान आश्रम

पाबळमधील आगळेवेगळे विज्ञान आश्रम

Subscribe

डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग आणि त्यांच्या पत्नी मीरा कलबाग यांनी १ जानेवारी १९८३ रोजी पाबळ इथे ‘विज्ञान आश्रमा’ची स्थापना केली. पाबळ हे पुण्यापासून ७० किलोमीटर दूर असलेल्या शिरुर इथलं एक खेडेगाव. इथे सुरू झालेल्या ‘विज्ञान आश्रमा’मुळे शिक्षणक्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल उचललं गेलं. प्रस्थापित व्यवस्थेच्या नावाने ओरडा करायची सामाजिक सवय आपल्या सगळ्यांच्या अंगी मुरलेली असते. आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीवर ‘फॉल्टी एज्युकेशन सीस्टिम’ असं शिक्कामोर्तब आपण कधीच करून टाकलं आहे. डॉक्टर कलबागांनी ते कधीच केलं, पण त्या अहितकारक आणि पोकळ शिक्षणपद्धतीविरुद्ध ते दंड थोपटून उभे राहिले आणि त्यांनी मुलांना आणि युवकांना मार्ग दाखवणार्‍या प्रयोगांची नवनिर्मिती साधली.

-सचिन जोशी

मला डॉ. कलबाग आणि विज्ञान आश्रम यांविषयी माहिती मिळाली ती नाशिकमधलेच माझे मित्र संतोष हुदलीकर यांच्याकडून. मी अर्थातच लगेच विज्ञान आश्रमाला भेट दिली. एक स्वप्न सच्चेपणाने सत्यात उतरताना तिथे पाहायला मिळालं. डॉ.कलबागांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२८ रोजीचा. २००३ पर्यंतचं लाभलेलं आयुष्य त्यांनी अक्षरश: सत्कारणी लावलं. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी मीरा कलबागांनी विज्ञान आश्रमाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. २०१६ साली त्यांचं निधन झालं. आता डॉ. योगेश कुलकर्णी हे कार्यकारी संचालक विज्ञान आश्रमाचं काम समर्थपणे बघत आहेत. माझी डॉ. कालबागांशी भेट झाली नाही याचं दुःख नेहमीच राहील.

- Advertisement -

त्यांच्याकडून मुळात विज्ञान आश्रमाची स्थापना अतिशय विचारपूर्वक करण्यात आली आहे. खाद्य संस्कृतीत पीएचडी करायला दोन वर्षं डॉ. कलबागांचं अमेरिकेत वास्तव्य होतं. तेव्हा तिथला शेतकरी शेती आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालताना त्यांना अनुभवायला मिळाला. त्यांच्या मनात विज्ञान आश्रमाची बिजं तिथे रोवली गेली. अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकरीचा मोह सोडून डॉक्टर ग्रामविकासाचा विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून भारतात परतले. त्यांनी शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी. नाईक यांची भेट घेतली.

त्यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर पाबळ खोर्‍याची निवड करण्यात आली आणि तिथे ‘काम करता करता शिका’ हे सूत्र राबवणार्‍या विज्ञान आश्रमाची सुरुवात झाली. दहावी-बारावीत नापास झालेल्या म्हणजे रूढार्थाने अयशस्वी ठरणार्‍या मुलांसाठी विज्ञान आश्रमाने यशाची कवाडं खुली केली. यातूनच अनेक मुलं पुढे उद्योजक होत आहेत. शिकायचं ते हाताने काम करतच हे आश्रमाचं मुख्य ब्रीद आहे. अम्मांनी म्हणजे मीरा कलबागांनी एक खूप लक्षणीय गोष्ट सांगितली, ‘डॉक्टर कलबाग गेले, पण इथे ध्येयाने प्रेरित झालेले अनेक कलबाग बघायला मिळतात.’

- Advertisement -

कोणताही प्रयोग डॉक्टर स्वत: आधी घरी करून बघत असत. त्यांना सगळं काही येत असे. इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात तर ते आनंदाने बागडत असत. विज्ञान आश्रमात अनेक प्रकारची कामं चालतात. इथे अभ्यासक्रमाचे दोन घटक असतात-सजीव आणि निर्जीव. फॅब्रिकेशन, बांधकाम, सुतारकाम आदींचा समावेश असलेला अभियांत्रिकी विभाग तर आहेच. शिवाय शेती, पशुपालन, अन्नप्रक्रिया, प्रयोगशाळेतल्या चाचण्या आदींचा समावेश असलेला गृह आणि आरोग्यज्ञान विभाग आहे.

इथल्या अभ्यासक्रमातले विषय अर्थातच जीवनाशी निगडित आहेत. सौरऊर्जा, जैविक तंत्रज्ञान आदींचा समावेश असलेले ऊर्जा, पर्यावरण असे वेगवेगळे विभाग आहेत. तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्प इथे मुलं शिकतात. सोलार दिवे तयार करणं, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारखी तंत्रं वापरून शेती उत्पादन करणं, खाद्य पदार्थांची निर्मिती करणं अशी अनेक प्रकारची कामं इथे केली जातात.

त्यातूनच विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या संकल्पनांची ओळख करून दिली जाते. उदाहरणार्थ-विजेच्या उपकरणांची दुरुस्ती करताना भौतिकशास्त्र, शेतात पीक घेताना जीवशास्त्र. या कल्पना सहजपणे मुलांना शिकता येतात. पुस्तककेंद्री शिक्षणापलीकडचं शिक्षण इथे मिळतं. जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलं आहे ते सर्व इथे बघायला मिळतं. इथले विविध अभ्यासक्रम शिकण्यासाठी भारतभरातून मुलं येत असतात. त्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. शिक्षणातून ग्रामीण विकास हे विज्ञान आश्रमाचं ध्येय आहे. त्याला भक्कम रूप देण्यासाठी पुढे पुणे विद्यापीठाशी करार करून ‘डिझाईन इनोव्हेशन सेंटर’ची निर्मिती करण्यात आली आणि महाविद्यालयीन युवकांची पावलंही विज्ञान आश्रमाकडे वळू लागली.

‘विज्ञान आश्रम’ शिक्षणाची प्रयोगशाळाच आहे. ही नेहमीसारखी शाळा नाही. विविध शाळांमध्ये मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी ही संस्था कार्य करते. विज्ञान आश्रम हा पुण्यातल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ संस्थेचा एक प्रकल्प आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधता येईल असा कलबागांचा विश्वास होता. त्यासाठी त्यांनी ‘रुरल डेव्हलपमेंट थ्रू एज्युकेशन सीस्टिम’ या संकल्पनेची आखणी केली. दारिद्य्ररेषेखाली असलेली मुलं, गरीब मुलं या संकल्पनेचा केंद्रबिंदू होता. सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान येतं, नवीन शोध लागतात.

पण या नवीन शोधांचा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर गरिबांचं जगणं सोपं व्हावं, सामान्य लोकांचं आयुष्य अधिक सुखकर व्हावं यासाठी होत नाही. गरिबांचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठी विज्ञान आश्रम काम करतो. डॉ. कलबागांच्या लक्षात आलं, ग्रामीण लोक काम करण्यासाठी नोंदी ठेवत नाहीत. निरीक्षण करत नाहीत. कारण त्यांना त्याची सवयच नाही. प्रयोगातून शिकणं, निरीक्षणातून शिकणं, अनुमान काढणं आणि पुन्हा प्रयोग करणं या पद्धतीने प्रयोग आपण फक्त प्रयोगशाळेतच करतो. पण हाच विचार आपल्या रोजच्या कामात राबवला तर परिस्थिती खूपच बदलू शकते.

हाच विचार शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण मुलांमध्ये रुजवावा म्हणून विज्ञान आश्रम पाबळमध्ये काम करतो. विज्ञान आश्रमाने पाबळमध्ये तीन शाळांत प्रयोग केले. आता देशभरातल्या सर्व सरकारी शाळांत ते राबवले जातात. हा अभ्यासक्रम आठवी ते दहावीच्या मुलांसाठी तयार करण्यात आला आहे. निसर्गच या अभ्यासक्रमाचा विषय असतो. हा अभ्यासक्रम दोन पद्धतीने राबवण्यात येतो. एक म्हणजे विज्ञान आश्रमातच एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे.

ज्याला ‘डीबीआरटी’ म्हणतात. दुसरी पद्धत म्हणजे नेहमीच्या शाळांमध्ये असलेला आठवी ते दहावीसाठी तीन वर्षांचा ऐच्छिक विषय घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणं; ज्याला ‘आयबीटी’ म्हणतात. एकूण सगळेच विषय कृतिशीलतेशी शास्त्रीय पद्धतीने निगडित असतात. इथे सर्व प्रयोगांचा स्वीकार होतो. विज्ञान आश्रमाला भेट दिल्यावर मला संपूर्ण वास्तू ओबडधोबड दिसली. नंतर मुख्याध्यापकांनी सांगितलं- ही संपूर्ण वास्तू मुलांनी घडवली आहे.

यानंतर या वास्तूकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. विज्ञान आश्रमात खूप वेगवेगळी घरं बांधली आहेत. ती सर्व मुलांनी बांधली आहेत. कमी खर्चात घरं कशी बांधता येतील याचं प्रात्यक्षिक आहे ते. केवळ नीट नोंदी न ठेवल्यामुळे शेतकर्‍याचा फायदा होत नाही. या शाळेतली मुलं डेअरी चालवतात. त्यात ते नोंदी ठेवतात की गाईला खायला किती दिलं? त्याला किती खर्च आला? खायला किती किती वेळाने दिल्यावर दूध जास्त मिळतं? दूध किती लिटर निघालं? किती रुपयांना दूध विक्री झाली? वाहतुकीचा खर्च किती आला; इत्यादी. यातून या गाईंची प्रॉफिटेबिलिटी किती आहे याचं गणित मांडलं जातं.

प्रत्येक जनावराच्या प्रॉफिटेबिलिटीची नोंद करणं, त्याची आकडेवारी जमा करणं हा इथल्या शिक्षणातला महत्त्वाचा भाग आहे. इथली मुलं स्वत: मिक्सर तयार करतात, बिस्किटं करायचं यंत्र घडवतात, पॉपकॉर्न करायचं मशीन, इलेक्ट्रिकल वस्तू बनवणं, घराचं वायरिंग करणं… असे अनेक प्रकल्प या शाळेत चालू असतात. जमिनीतलं पाणी शोधणं, रक्तगट तपासणं, हिमोग्लोबिनचं प्रमाण बघणं असे अनेक प्रकल्प मुलं राबवतात. इथली मुलं जास्तीत जास्त शास्त्रीय पद्धतीने शेतातली पिकं घेतात. हा सर्व त्यांच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे.

खेड्यातला अभ्यासक्रम म्हणजे केवळ शेतीला महत्त्व असं अजिबात नाही. आधुनिकतेची कास धरण्याचं महत्त्व कलबागांनी कधीच ओळखलं होतं. १९९० च्या सुमारास आश्रमात पहिल्यांदा संगणक आला. १९९८ साली मल्टिमीडिया तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीतून ‘कम्प्युटर धडे’ तयार करायला कलबागांनी सुरुवात केली. अशा प्रकारचे धडे शिक्षकांना सहजपणे तयार करता यावेत म्हणून डॉक्टरांनी रिचर्ड पाईप यांच्या सहकार्याने ‘रिऍलिटी लर्निंग इंजिन’ या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. डॉक्टर नेहमी म्हणत-‘विज्ञान आश्रमाचं महत्त्वाचं संशोधन म्हणजे आमची शिक्षणपद्धती.’

इंटरनेटचं महत्त्व कलबागांनी कधीच ओळखलं होतं. पाबळमध्ये इंटरनेट द्यायला कुठलीही कंपनी तयार नसल्याने त्यांनी आय.आय.टी. चेन्नईच्या सहकार्याने पाबळ आणि जवळपासच्या गावांना वायरलेसच्या तंत्रातून आंतरजालाची सेवा सुरू केली. ज्या काळात विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेत हाताळण्याचा गहन विषय असा समज होता त्या काळात त्यांनी अनेक दिशांनी विज्ञानाची कमाल दाखवून दिली आहे. तशी विज्ञाननिष्ठ शिक्षणपद्धती राबवून दाखवली.

आता त्या पद्धतीला शासनानेही मान्यता दिली आहे. डॉ. कलबागांनी विविध शिक्षण समित्यांवर सदस्य म्हणून काम केलं. भारत सरकारने कम्युनिटी पॉलिटेक्निकसाठी नेमलेल्या ‘कलबाग समिती’चे ते अध्यक्ष होते. त्यांनी ‘कम्युनिटी पॉलिटेक्निक’च्या माध्यमातून शिक्षण आणि विकास ही संकल्पना कशी राबवता येईल याची योजना त्यात मांडली; तो अहवाल भारताच्या संसदेसमोर ठेवला गेला आणि शिफारसी स्वीकारल्याही गेल्या.

प्रस्थापित शिक्षणपद्धतीचा बारकाईने अभ्यास करत केवळ विरोधासाठी विरोध न करता तिला शह देण्यासाठी डॉ.कलबागांनी विचारपूर्वक काही पावलं उचलली आणि विद्यार्थ्यांना योग्य रीतीने शिक्षण मिळावं म्हणून त्यांची योग्यता सिद्ध करणार्‍या ‘राष्ट्रीय प्रवेश परीक्षे’ची आखणी केली. त्यासाठीची पुस्तकं, सीडीज तयार केल्या. कलबागांच्या निधनापर्यंत २३ शाळांमध्ये ही प्रवेश परीक्षा नीट राबवली गेली. या कल्पनेचं सार्वत्रिकीकरण व्हावं म्हणून ते आग्रही होते.

अत्याधुनिक तंत्रज्ञान कमी खर्चात कसं उपलब्ध करायचं याविषयी त्यांचा अभ्यास होता. मात्र तिथे तडजोड नसावी हाही आग्रह होता. अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम.आय.टी.)च्या सहकार्याने विकसित झालेल्या ‘फॅब लॅब’ संकल्पनेत डॉ.कलबागांचा मोलाचा सहभाग होता. लोकांना त्यांच्या दैनंदिन समस्यांवर उत्तरं शोधता यावी यासाठी तंत्रज्ञान विकासाची सोय उपलब्ध करून द्यावी. त्याद्वारे विद्यार्थी, शेतकरी, युवक अशा कोणालाही मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवता याव्यात यासाठी आत्याधुनिक मशिन्स असलेली अमेरिकेबाहेरची पहिली ‘फॅब लॅब’ इथे सुरू झाली. आज अनेक देशांमध्ये ही कल्पना स्वीकारली जात आहे.

खर्‍या अर्थाने अनुभवाधारित शिक्षण म्हणजे काय याचा प्रत्यय विज्ञान आश्रम शाळेत येतो. म्हणूनच ही एक लक्षणीयरीत्या आगळीवेगळी शाळा ठरते. एकूणच पाबळचा ‘विज्ञान आश्रम’ हा महाराष्ट्राबाहेरही शिक्षणक्षेत्रासाठी आदर्श ठरत आहे. एक लेख काय, अनेक पुस्तकांना, प्रबंधांना पुरून उरेल इतकं वैविध्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण काम डॉक्टर कलबागांनी केलेलं आहे. त्यांच्या कामाची, प्रयोगांची आणि मूल्यांची ओळख करून देण्यासाठी पाबळ इथल्या ‘विज्ञान आश्रमा’ला भेट द्यायलाच हवी.

त्यांची वेबसाईट आहे-

https://vigyanashram.com

ही शाळा आगळीवेगळी का ठरते?
शिक्षणाला पुस्तकातून बाहेर काढणारी शाळा
अनुभवाधारित शिक्षणाला महत्त्व
विज्ञान आणि आध्यात्मिक मूल्यांचा मेळ
दहावी-बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दिशादर्शन आणि प्रयोगशील शिक्षण
ग्रामीण विकासासाठी कार्यरत
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जे काही सांगितलं आहे ते गेल्या वीस वर्षांपासून अंमलात
ग्रामीण विद्यार्थ्याच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचा यशस्वी प्रयोग
सर्व शिक्षणात प्रत्यक्ष कृतीवर भर

-(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -