घरफिचर्ससारांशवाढत्या अपघातांना आरटीओ जबाबदार!

वाढत्या अपघातांना आरटीओ जबाबदार!

Subscribe

राज्यात रोजच सुरू असलेल्या रस्ते अपघातांच्या मालिकेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. रोज मरे त्याला कोण रडे... या उक्तीप्रमाणे शासन, प्रशासन घटनेची पाहणी, चौकशी आणि मदतीची घोषणा आदी सोपस्कार करून आपली जबाबदारी झटकत असते, मात्र ठोस उपाययोजना होत नाही. खरेतर समृद्धीवरील भीषण अपघातातून राज्याच्या परिवहन विभागाने धडा घेतला पाहिजे. एकूणच सर्व स्लीपर कोच लक्झरी बसेसचे डिझाईन बदलण्याचे काम केले पाहिजे, अन्यथा यापुढे या प्रकारच्या स्लीपर लक्झरी कोचचे अपघात होऊन अशीच मोठी जीवितहानी झाली तर या प्रकारचे सदोष डिझाईन पास करणार्‍या व त्यासाठी फिजिबिलिटी सर्टिफिकेट देणार्‍या सर्व आरटीओंना का जबाबदार धरले जात नाही, असे तांत्रिक निरीक्षणातून समोर येत आहे.

– रवींद्रकुमार जाधव

समृद्धी महामार्गावर बस पलटी होऊन झालेल्या अपघातात बसला आग लागून आतील २५ जण जळून खाक झाले. त्यानंतर संपूर्ण भारतभरातच लक्झरी बसेसच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे. यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बसेस विशेषत: स्लीपर कोच बसेस यांच्यासंदर्भात नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. यानिमित्ताने हा प्रश्न निर्माण झाला आहे की, सध्याच्या स्लीपर बसेसचे जे डिझाईन आहे, ते डिझाईन आरटीओच्या कुठल्या अधिकार्‍यांनी मंजूर केले आहे? अगोदर त्या अधिकार्‍यांची डिग्री व गुणवत्ता तपासून पाहिली पाहिजे किंवा नेहमीप्रमाणे पैसे खाऊन या स्लीपर कोच डिझाईनची मंजूर केली जात असेल, तर हा एक मोठा सामाजिक अपराध समजून त्यांना दंडित केले पाहिजे.

- Advertisement -

सर्वात नोंद घेण्यासारखी मोठी बाब म्हणजे सध्या स्लीपर कोच लक्झरी बसचे डिझाईन ज्या प्रकारचे असते, तो प्रकार म्हणजे एक बंदिस्त पिंजरा ३०-३५ जणांना घेऊन हायवेवर फिरत असतो. या बंदिस्त पिंजर्‍याला काही अपघात झाला तर त्यातील प्रवाशांना जीव वाचविण्यासाठी प्रारंभीच्या गोल्डन मिनिट्समध्ये तातडीने बाहेर पडता आले पाहिजे, परंतु या कंझस्टेड पिंजर्‍यातून आतील प्रवासी अपघातानंतरच्या गोल्डन मिनिट काळ मर्यादेत बाहेर पडू शकत नाहीत किंवा अपघातग्रस्त लक्झरी बसमधून सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी त्या अपघाताच्या ठिकाणी उपस्थित झालेले परिसरातील नागरिक किंवा मदतकार्य करणारे पथक यांना त्यातील सर्व प्रवाशांना गोल्डन अवर्सच्या काही मिनिटांमध्ये या बंदिस्त पिंजर्‍यामधून बाहेर काढणे केवळ अशक्य होते. याप्रकारे या स्लीपर कोच लक्झरी बसेसची बॉडी बांधणी झालेली असते.

अजून खोलात गेले तर असे लक्षात येते की या प्रकारच्या बंदिस्त बांधणीच्या आणि इंच इंच जागेचा प्रवासी सीट वाढवण्यासाठी वापर करून बांधणी केलेल्या लक्झरी बसेसच्या प्रकाराच्या बसेस जगामध्ये फक्त भारतातच आहेत. अशा प्रकारच्या ‘मौत का पिंजरा’ ठरू शकणार्‍या या बसेसना व त्यांच्या डिझाईनला भारतातले आरटीओ फिजिबिलिटी देतातच कसे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. अधिक खोलात गेले तर असे लक्षात येते की बुलढाण्याच्या लक्झरी बस जळीत घटनेच्या आधी काही महिने काही नागरिकांनी देशाचे रस्ता परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांना व केंद्र आणि राज्य शासनाच्या परिवहन विभागांना या प्रकारच्या स्लीपर कोच लक्झरी बसेसमध्ये जास्तीत जास्त स्लीपर ब्लॉक बसविण्याच्या नादात धोकेदायक डिझाईन करण्यात आलेले आहे. त्याबाबत पत्र लिहून जागृत केले होते. त्याचा काही उपयोग झाला नाही. या प्रकारच्या अपघातात २५ प्रवाशांचे प्राण गेले. ही केवळ एक घटना आहे. याप्रकारे लक्झरी बसेस एखाद्या मोठ्या पुलावरून एखाद्या जलाशयातदेखील पडू शकतात. त्यावेळीदेखील लक्झरी बसच्या आतील डिझाईनमुळे त्यातील प्रवाशांना बसबाहेर पडणे केवळ अवघड होते.

- Advertisement -

बुलढाण्याच्या अपघातातील वाचलेल्या दोघा-तिघांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावरून ही बाब समोर आली आहे की जे लोक ड्रायव्हरच्या किंवा काचेच्या जवळ होते, तेवढ्या लोकांना फक्त बाहेर पडता आले, मात्र आतमध्ये स्लीपरमध्ये झोपलेल्या व्यक्तींना बाहेर पडता येणे शक्य झाले नाही. याचे कारण ज्या डबल डेकर स्लीपर कोच बनवलेल्या असतात, त्या एकमेकांना खेटून असतात. दोघांमध्ये दीड फुटाचा रस्ता असतो. ज्या वेळेस बस पलटते त्यावेळेस या दीड फुटामधून असलेल्या जागेत वेगवेगळ्या लगेज बॅगा वगैरे पडतात.

त्याच्यातून प्रत्येक सहा-सहा फुटाचा स्लीपर बॉक्स ओलांडून बाहेर पडणे अवघड होते किंवा बसच्या वरील टॉपचा पत्रा किंवा काच असेल तर तो तोडून बाहेर निघण्यासाठीदेखील त्याची आठ फूट उंची असते. एवढे आठ फुटांवर चढून बसच्या टॉपचे पत्रे काढून बाहेर निघणे कुठल्याही प्रवाशाला केवळ अवघड असते किंवा बाहेरील व्यक्तीनेदेखील बसच्या टॉपवर चढून पत्रा तोडून सर्वच्या सर्व स्लीपर बॉक्सच्या लोकांना बाहेर काढणे केवळ अवघड असते. याशिवाय बसचा अपघात होतो तेव्हा सर्व प्रवासी घाबरलेले असतात. त्यांना काहीच सुचत नाही आणि आग लागली तर त्या बसमध्ये धूर आणि आगीच्या लोळामुळे त्यांना बाहेर पडणे अशक्य होते.

थोडक्यात सांगायचे तर स्लीपर कोचमध्ये दोन स्लीपर ब्लॉकमध्ये अपघातसमयी बाहेर पडण्यासाठी कुठलीही जागा सोडलेली दिसत नाही. त्यामुळे या लक्झरी स्लीपर कोच सध्या धोकादायक बनल्या आहेत. एसटी महामंडळाच्या बसेसना ज्याप्रकारे एक आपत्कालीन दरवाजा असतो किंवा बसच्या शेवटच्या सीटच्या वर एक आपत्कालीन खिडकी असते, त्या धर्तीवर या स्लीपर कोच लक्झरी बसेसना आपत्कालीन दरवाजे किंवा मागील बाजूला आपत्कालीन खिडकीची व्यवस्था केल्यास अपघात घडल्यावर आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर निघून आपला जीव वाचवता येऊ शकेल.

– ( लेखक सामाजिक विश्लेषक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -