घरफिचर्ससारांशआयुष्याची नवी परिभाषा : संज्या छाया

आयुष्याची नवी परिभाषा : संज्या छाया

Subscribe

कोरोनानंतर व्यावसायिक मराठी रंगभूमीवर ज्या काही मोजक्या नाट्यकलाकृती आल्या त्यातील एक म्हणजे ‘संज्या छाया’. जिगीषा अष्टविनायक निर्मित ही कलाकृती नाटक आणि समाज याच दोन घटकांतील संबंधावर बेतलेली आहे. दोन जोडपी एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच नाटकाच्या प्रयोगाला जातात. आणि त्या नाटकाने पूर्णपणे प्रभावित होऊन जातात. मात्र या दोन्ही जोडप्यांची प्रतिक्रिया आणि प्रत्यक्ष कृती मात्र परस्परभिन्न अशी आहे. आपली मुलं आपल्यापासून दुरावू नये म्हणून त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे संगोपन करणारी ही जोडपी. त्यांनी पाहिलेले नाटक असते प्रशांत दळवी लिखित ‘संध्या छाया’. सध्याचा सिक्वलचा ट्रेंड पाहता ‘संज्या छाया’ या नाटकाला ‘संध्या छाया’ या नाटकाचा सिक्वल अर्थात पार्ट टू असे संबोधल्यास ते अजिबात वावगं ठरणार नाही.

नाटक आणि समाज.. परस्परांमध्ये अनोन्यसाधारण संबंध आहेत हे मान्यच करावं लागेल. म्हणजे नाटकात समाजाचंच प्रतिबिंब दिसून येतं तर नाटकाचे समाज जीवनावर पडसाद उमटत असतात. जे वास्तवात घडत असतं तेच नाटकाच्या माध्यमातून दाखविण्यात येतं आणि जे नाटकातून दाखवलं जातं ते वास्तवात बर्‍याचअंशी अंगीकरलं जातं. नाटक हा समाज जीवनाचा जणू एकप्रकारे आरसा आहे. सिसिरो या प्रसिध्द ग्रीक विचारवंतांनी ‘नाटक’ हे जीवनाचे अनुकरण आहे. चालीरितींचा आरसा आहे. सत्याचे प्रतिबिंब आहे अशी नाटकाची एक व्याख्या केली आहे. त्या अनुषंगाने नाटकात जास्तीत जास्त वास्तव वाटेल असे जीवनाचे दर्शन असते.

कोरोनानंतर व्यावसायिक मराठी रंगभूमीवर ज्या काही मोजक्या नाट्यकलाकृती आल्या त्यातील एक म्हणजे ‘संज्या छाया’. जिगीषा अष्टविनायक निर्मित ही कलाकृती नाटक आणि समाज याच दोन घटकांतील संबंधावर बेतलेली आहे.

- Advertisement -

दोन जोडपी एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच नाटकाच्या प्रयोगाला जातात. आणि त्या नाटकाने पूर्णपणे प्रभावित होऊन जातात. मात्र या दोन्ही जोडप्यांची प्रतिक्रिया आणि प्रत्यक्ष कृती मात्र परस्परभिन्न अशी आहे. आपली मुलं आपल्यापासून दुरावू नये म्हणून त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे संगोपन करणारी ही जोडपी. त्यांनी पाहिलेले नाटक असते प्रशांत दळवी लिखित ‘संध्या छाया’. सध्याचा सिक्वलचा ट्रेंड पाहता ‘संज्या छाया’ या नाटकाला ‘संध्या छाया’ या नाटकाचा सिक्वल अर्थात पार्ट टू असे संबोधल्यास ते अजिबात वावगं ठरणार नाही. एकाच लेखकाच्या या दोन कलाकृती. ही दुसरी कलाकृती प्रदीर्घ कालावधीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली असली तरी त्यात आधीच्या कलाकृतीचा संदर्भ प्रामुख्याने दिला गेलाय. म्हणजे आधीची कलाकृती या नंतरच्या कलाकृतीत जणू एक प्रमुख पात्रच असल्याची जाणीव होत रहाते.

एक फरक मात्र या दोन्ही कलाकृतींमध्ये आहे. आणि तो म्हणजे यातील एक शोकात्मिका होती आणि एक सुखात्मिका आहे. उच्चशिक्षणानंतर नोकरीनिमित्त परदेशी स्थायिक झालेली तरुण मुलं आणि त्यामुळे त्यांच्या आईवडिलांच्या वाट्याला आलेलं एकाकीपण हा विषय संध्या छाया या नाटकामधून परिणामकारकरित्या मांडला गेला होता. ‘संज्या छाया’मधून मात्र त्याही परिस्थितीत उमेदीने जीवन जगण्याचा उपाय सुचवण्यात आला आहे. ‘संज्या छाया’चे कथानक वरवर पाहता संजय आणि छाया या पाटील दाम्पत्याचे आहे असे जरी वाटत असले तरी ही कथा आहे आयुष्याच्या दुसर्‍या इनिंगची. उतारवयातील भावविश्वाची, वार्धक्याकडे झुकलेल्या तरुण मनांची. आयुष्याची ही दुसरी इनिंग बहुतांश लोक खेळतच नसतात. पण इथे मात्र ‘मी सध्या काय करतो / करते’ असं सांगणारी जिंदादिल मंडळी आहेत.

- Advertisement -

संज्या म्हणजे मंत्रालयातील निवृत्त उपसचिव. निवृत्तीनंतर सर्वसामन्यांची मंत्रालयातील कामे मार्गी लावायच्या, गरजूंना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक कार्यात स्वतःला त्याने गुंतवून ठेवलंय. तर त्याची पत्नी छाया ही महिला बचत गटामार्फत जेवणाचे डबे बनवून देण्याचा उपक्रम चालवते आहे. या संज्या-छाया प्रमाणेच ही त्यांच्या ‘हॅपिनेस सेंटर’ची देखील कथा आहे. या दोघांनीच सुरू केलेल्या या हॅपिनेस सेंटरमध्ये त्यांच्या सारखीच समविचारांची मित्र मंडळी गोळा केलेली, जमा झालेली आहेत. यात नव्याने भर पडते ती न्या.कानविंदे आणि सौ.कानविंदे यांची. या सर्वांनी स्वत:ला आपल्या आवडीच्या कामात, छंदात सामाजिक कार्यात गुंतवून ठेवलेलं आहे. आपल्या उर्वरित आयुष्याचा हेतू त्यांना सापडला आहे.

मुलांमध्ये गुंतून न रहाणं, त्यांना त्यांची स्वतंत्र स्पेस देणं, त्यांच्यावर आपली मतं न लादता त्यांनी घेतलेले निर्णय स्वीकारणं, त्यांच्याकडून कशाची फारशी अपेक्षा न करणं, त्यांनी आपल्याला गृहीत धरल्यावर मात्र आपण आपल्या कामात व्यस्त आहोत हे ठणकावून सांगणं. या प्रकारची नवी जीवनशैली विशद करणारं आणि ती पटवून देणारं हे नाटक आहे.

लेखक प्रशांत दळवी यांनी याही नाटकात एक सामाजिक प्रश्न हाताळला आहे, मात्र तो अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीने. नाटकातील आशय हसत खेळत पण तितकाच प्रभावीपणे पोहचवला आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन प्रेक्षकांच्या मनाची पकड घेते. आणि ही पकड कुठेही सैल होत नाही हे विशेष. प्रेक्षकांना पूर्णपणे गुंतवून ठेवण्यात ते पूर्णतः यशस्वी ठरले आहेत. सगळ्याच कलाकारांनी आपापल्या पात्रांना योग्य न्याय दिला आहे. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो संज्या आणि छाया ही पात्रे साकारणार्‍या वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांचा. या दोघांची रंगमंचावरील केमेस्ट्री लाजवाब. वैभव मांगले यांनी आपली देहबोली, हावभाव आणि सहज वावर यातून संज्या हे पात्र सजीव केले आहे. त्यांच्या वयापेक्षा काहीशी वयस्कर असलेली ही व्यक्तिरेखा. पण रंगमंचावर वैभव मांगले यांचेऐवजी ‘संज्या’च दिसत राहतो ही त्यांच्या अभिनयाची ताकद. निर्मिती सावंत यांच्यासाठी तर अशा भूमिका सहजपणे साकारणं हा एक सवयीचा भाग होऊन गेलेला आहे. त्यांची छाया ही संज्याला उत्तम साथ देते.

इतर भूमिकांमध्ये न्या.कानविंदे आणि सौ.कानविंदे या भूमिका अधिक ठळकपणे लक्षात राहतात. सुनील अभ्यंकर यांनी सतत न्यायालयीन भाषा वापरणारे न्या.कानविंदे आणि योगिनी चौक-बोर्‍हाडे यांनी त्यांच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीचे पात्र छान रंगवले आहे. संज्या-छाया आणि त्यांच्या हॅपिनेस सेंटरच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होणारे बदल अचूकपणे दाखवले आहेत. आशीर्वाद मराठे (रघू), अभय जोशी (डॉ.भागवत), संदीप जाधव (इन्स्पेक्टर गायकवाड), मोहन साटम (सदावर्ते मास्तर) यांनी देखील आपापल्या भूमिकांना योग्य न्याय देत संज्या-छायाला सुयोग्य अशी साथ दिली आहे. राजस मुळे यांनी दोन पावलं पुढे, चार पावलं मागे असे आत्मविश्वासाचा अभाव असलेले किशोर हे पात्र सहजतेने साकारले आहे. हेच या नाटकातील एकमेव तरुण पात्र. अन्य दोन तरुण पात्रे ही प्रत्यक्ष रंगमंचावरून न दिसता व्हिडियो कॉलच्या माध्यमातून दिसतात. येथे ही व्हिडियो कॉल दाखवण्याची कल्पना नाविन्यपूर्ण अशीच.

लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाबरोबरच या संज्या छायाची तांत्रिक बाजूदेखील भक्कम आहे. नेपथ्यात प्रदीप मुळ्ये यांनी संज्या-छायाचं घर आणि त्यातच बदल होऊन हॅपिनेस सेंटरचं ऑफिस असं बारीक तपशिलांसह छान उभं केलं आहे. पुरुषोत्तम बेर्डे यांचं पार्श्वसंगीत नाटकभर जोश आणि उत्साह निर्माण करत राहतं. रवि-रसिक यांची प्रकाशयोजना प्रसंगानुरुप अशी आहे. दासू वैद्य यांनी लेखन केलेलं आणि त्याला अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं When we are there, I dont care.. हे गाणं उत्तम जमुन आलं आहे. ऐकताचक्षणी प्रेक्षक ते गुणगुणायला लागतो. आणि पडदा पडल्यानंतरही हे गाणं कानात, मुखात घोळत रहातं. वैभव मांगले यांच्या आवाज आणि गायकीचा सुयोग्य वापर केला गेला आहे. उलेश खंदारे यांनी पात्रांची रंगभूषा तर प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषा सांभाळली आहे. दोन्हीही पात्रांना अनुसरून आहे. विशेषतः संज्याचे पात्र यातून अधिक खुलवले गेले आहे. दोन तास पुरेपूर करमणूक करणारं, चांगला संदेश देणारं, भावणारं, भिडणारं असंच हे नाटक आहे. जे हसता खेळत आयुष्य जगण्याची एक नवी परिभाषा शिकवून जातं

–श्रीराम वाघमारे, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -